Wednesday, September 25, 2019

संभाषण कौशल्ये (Communication Skills)

काळ बदलला, शिक्षण पद्धती बदलली, मार्केट चं स्वरूप बदललं. त्यामुळे विविध कंपन्यांना लागणारं मनुष्यबळ ही वेगळ्या कौशल्याचं. व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. प्रोडक्ट्स कुठलेही असोत त्याचं मार्केटिंग केल्याशिवाय विकल्या जात नाही. ज्याचं सादरीकरण चांगलं त्याचा व्यवसाय चांगला. त्यामुळे चांगलं संभाषण कौशल्य असलेया लोकांना बाजारात मागणी आहे. आजकाल शालेय अभ्यासक्रमात संभाषण कौशल्य समावेशित करण्यात आले आहे. 
विद्यार्थी दशेपासून प्रत्येकाने ते आत्मसात करावे हा त्यामागील उद्देश. फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. लोकांसमोर ते मांडता यायला हवं. पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराची, सादरीकरणाची, संभाषण कौशल्यांची जोड हवी. त्याशिवाय खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविणे तर कठीण आहेच पण ती टिकविणे त्यापेक्षाही कठीण.  आय.टी. सेक्टर मध्ये तर संभाषण कौशल्या शिवाय पर्याय नाही.  पारंपारिक शिक्षण पद्धतीत कौशल्यांवर भर नव्हता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घोकंपट्टी करून गुण मिळवणारे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत. ज्याच्याकडे जास्त कौशल्ये त्याला नोकरीच्या संधी जास्त हे समीकरण झालंय.
आपण इतरांशी कसे बोलतो, कसा संवाद साधतो, आपल्या  चेहऱ्यावरील भावमुद्रा कशी, हाव-भाव कसे आहेत, देह-बोली कशी आहे, आपली भाषा कशी आहे, आपण कसं चालतो, उभे राहतो अथवा बसतो अशा अनेक गोष्टींवर आपलं संभाषण कौशल्य अवलंबून.
संभाषण कौशल्ये वृद्धिंगत करावी असं वाटत असेल खालील गोष्टी आत्मसात केल्याच पाहिजे-
•बोलण्याशी सुसंगत हावभाव, देहबोली आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा
•बोलताना आत्मविश्वास हवा
•इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता
•नजरेला नजर भिडवून बोलणे
•बोलताना आणि ऐकताना उत्साह दाखवणे
•बोलण्यात स्पष्टपणा हवा
•कमी शब्दात जास्त मांडण्याची कला असावी
•संदिग्ध बोलणे टाळावे
•भाषेचा प्रभावी वापर
संभाषण कौशल्यांचे महत्व वाढल्याने बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध या विषयावर. प्रशिक्षण संस्था आणि प्रशिक्षक चा ही बोलबाला आहे. वर्कशॉप, सेमिनार मधून मार्गदर्शन सुरु आहे.
चांगल्या संवादाने चांगलं व्यक्त होता येतं. मत चांगल्या पद्धतीने मांडता येते. इतरांशी बोलताना, संवाद साधना काही अलिखित नियम असतात त्याचं पालन करता यायला हवं. बहुतांशी राजकारणी लोकांकडे संवाद कौशल्ये असते. त्यामुळे ते लोकांना संमोहित करतात. त्याचं मत परिवर्तन करतात. ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं त्याचं सादरीकरण चांगलं.

एका दिवसात संभाषण कौशल्ये आत्मसात करता येत नाहीत. त्याचा नेहमी सराव करावा लागेल. विद्यार्थ्यानी वक्तृत्व, वादविवाद या सारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. जिथे जिथे बोलण्याची संधी मिळेल तिथे तिथे बोलावं. आपल्या चुकांपासून सातत्याने शिकलं तर ही कौशल्ये लवकर आत्मसात करता येतील. फक्त अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कुठल्याही शाखेतल्या विद्यार्थ्यासाठी हे महत्त्वपूर्ण.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

No comments:

Post a Comment