काही आठवणी....
२००६ ची वेळ....पूण्यामध्ये नुकताच गेलो होतो. पहिल्या दिवशी वाटलं आपण काही पुण्यात राहू शकत नाही. तसंही मन जळगाव अन तिथल्या आठवणींमध्ये गुंतलेलं. सुरुवातीचे काही दिवस तर शिवाजी पुतळ्याजवळ घालवले. पण नंतर तेही नकोसं झालं. दिवसभर इंग्रजी विभागात जाऊन तत्त्वज्ञान ऐकून काही कळत नव्हतं. सगळं इंग्रजी मध्ये असायचं. आता इंग्रजी कधी माझ्या बापाला कळली नाही. अन शिक्षकांना हि फार काही इंग्रजी येत होत असंही नाही. पदवी पर्यंत सगळं इंग्रजी मराठीतून शिकलो. परीक्षेला घोकंपट्टी केली कि मिळाले गुण असं समीकरण. पण इथे पुण्यात तसं नव्हतंच. आपलं सगळं जेमतेम. त्यात हि विभागातील लोक फाडफाड इंग्रजी बोलायचे. वाटायचं काय भारी शिकवायचे कारण डोक्यात काहीच जात नव्हतं. कित्येक दिवस तर मागे बसून डुलक्या देण्यापलीकडे काहीच केलं नाही. समोरची चार पाच डोकी काहीतरी बोलत असायची. आम्ही मात्र शांत. त्यांच्या काय चर्चा चालायच्या कधी कळल्या नाही. त्या सगळ्यांचा हेवा वाटायचा. पण फक्त हेवाच वाटला. ते कधी बदलावं वाटलं नाही. आपण मराठी मानसं अशीच.
दिवसामागून दिवस जात राहिलेत. हळू हळू त्या वातावरणाचा सराव झालं. काही मित्र झालेत. सगळा वर्ग ग्रुप मध्ये विभागाला गेला. मग खर्या अर्थानं पुण्यातलं जीवन सुरु झालं. तोपर्यंत चार-पांच महिने निघून गेले होते. एकदा रूम मधून बाहेर पडलो कि रात्रीच वापस यायचं. कमवा आणि शिका....जयकर आणि आपला विभाग यातच दिवस जात होतं.
जयकर ग्रंथालय म्हणजे सगळ्या प्रकारची लोकं एकाच ठिकाणी. सुरुवातीला तिथं अभ्यास करायला फार मजा यायची. प्रत्येकाच्या जागा हि ठरलेल्या जस काय त्या आपल्या बापाच्या च आहेत असा प्रत्येकाचा आविर्भाव. काही तर एकदा पुस्तकं जागेवर ठेवली कि रात्रीच घ्यायला यायचे. कुठं जायचे ते माहित नाही...पण अनिकेत कॅन्टीन किंवा मेन बिल्डींग च्या मागे कुणासोबत तरी बसलेले दिसायचे. तो हि एक प्रकारचा अभ्यासच होता. काहींची प्रेमप्रकरणं विध्यापिठात माहित असायची. त्याचं ते एका डब्यात खाणे...जवळ बसून अभ्यास करणं....सोबत चहाला जाने...नि रात्रीला तिला सोडायला होस्टेल पर्यन जाने सगळं काही व्यवस्थित चालायचं. कधी कधी ते विचित्र वाटायचं तर कधी या सगळ्या गोष्टींचा हेवा वाटायचं.
सकाळी जयकर आलो कि वृत्तपत्र वाचल्याशिवाय मन लागत नव्हतं. म्हणून काही वेळानंतर चहाला गेलो कि वृत्तपत्र घेऊन यायचो. वाचायला लागलो कि आजूबाजूचे त्यात डोकावायला सुरु करायचे. ते म्हणजेच फुकटे पेपर वाचक. आपण वाचण्याआधीच ते एक दोन पण काढून घ्यायचे नि आपल वाचन संपण्याची वाट पाहायचे. तिथले फुकटे पेपर वाचकांचा मला फार राग यायचा. मी कधी कुणाकडून वृत्तपत्र घेऊन वाचलं नाही. काही दिवसानंतर मी कुणालाच वृत्तपत्र देत नव्हतो. जयकर अंगवळणी पडलं होतं. तिथेच बसून कित्येक लोकांचं भविष्य उज्ज्वल झालं. पण मला काही जयकर पावलं नाही. सलग दोन-तीन वर्ष जयकर मध्ये बसून हातात काहीच नाही आलं. सगळं मिळालं ते जयकर बाहेर राहुनच. मग एकदा जयकर सोडलं ते सोडलच. पण त्या जयकर ने खूप मित्र दिलेत. खूप आठवणी दिल्यात. भांडण पण खूप झाली. तो माझा अपरीपक्क्वपण असेल कदाचित.
एक दोन वर्षानंतर मात्र जगणं बदललं. तासनतास अनिकेत कॅन्टीन ला बसून वेळ घालवायचा नि चहा ढोसलत राहायचे. आमचे मित्र हि बरोबर पाहिजे त्या गोष्टी घेऊन यायचे. मग गोल्ड्प्लेक पासून गुडंगगरम पर्यंत.....सगळे प्रकार उपलब्ध. सोबतीला चर्चा असायच्या . चर्चा नाही वादविवाद. त्यात किती वेळ घालवला ते सांगता येणार नाही पण त्या अनिकेत कॅन्टीन ने खूप मित्र दिलेत किंवा त्या प्रक्रियेत खूप मित्र झालेत. कित्येक लोकांनी माझ्यावर टीका केल्यात. पण त्या मी दुर्लक्ष करत गेलो. मला कधी कळलंच नाही कि मी कसा भरकटत गेलो. गेलो ते कधी रुळावर आलोचं नाही. तो अपयशाचा काळ कधी विसरता नाही येणार. पण काही मित्रांनी खूप साथ दिली. जयकर मध्ये कधी मन लागलं नाही नंतर. हळू-हळू जयकर सोडलं ते सोडलच. खर तर जयकर सोडायला नको होतं पण संयम नव्हता माझ्याकडे.
आत्ता ते सगळं आठवतंय. विद्यापीठान खूप शिकवलं ते हि नकळतपणे. विद्यापीठात प्रवेश केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. एक साध आयुष्य होतं. बाहेर पडताना मात्र आयुष्य बदलेलं होतं. जगण्याच्या संकल्पना बदलल्या होत्या. जग खूप मोठं आहे नि संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे हि समजलं होतं. अभ्यासापलीकडच आयुष्य शिकायला मिळालं. भलेही विद्यापीठात यश मिळालं नसेल पण जी शिकवण तिथं नकळत मिळाली जी जगण्यास पुरेशी होती
No comments:
Post a Comment