एक दोन दिवसांपूर्वी एक मित्र शेगाव ला माझ्याकडे आला. आम्ही सोबत शिकलेलो असल्याने खूप गप्पा रंगल्या. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा करत होतो. विद्यापीठातल्या कित्येक प्रसंगांवर नि घटनांवर आम्ही चर्चा केली. मग त्याने मला विचारलं कि पुणे विद्यापीठातला तुला कुठला प्रसंग नेहमी आठवतो? मी थोडा वेळ थांबलो. मग त्याला सांगायला सुरुवात केली.
विद्यापीठात असताना कमवा आणि शिका योजनेत काम करून काही पैसे मिळायचे. महिन्याचा खर्च तर निघून जायचा. पण अभ्यास होत नाही म्हणून मी दुसर्या वर्षाला असताना ते काम सोडलं आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. तेव्हापासून पैशाची कमतरता निर्माण झाली. मी पैसे उसने घेऊन कसतरी भागवत होतो. पण पैसे वेळेवर मिळत नव्हते. कधी कधी तर कित्येक दिवस एक रुपया हि खिशात नसायचा. डबेवाल्या चे पैसे दोन तीन महिने देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पैसे नसतील तर अभ्यासात मन लागत नव्हत.
एकदा काय झालं कि रात्री डबेवाला आलाच नाही. माझ्याकडे पैसे नव्हते जेवणासाठी. कुणी देईल असंही नव्हतं कारण आधीच त्यांच्याकडून पैसे घेतलेले होते. म्हणून अभ्यास सोडून मी रूम ला जाऊन झोपलो. भूक खूप लागली होती पण उपाशी झोपण्याचा प्रयत्न सुरु होता. खूप वेळ झोप लागली नाही. सकाळी खूप लवकर जाग आली. रात्री जेवण केलेलं नसल्याने पोटात कावळे ओरडत होते. नाश्ता करण्याइतके पैसे पण नव्हते. भूक अनावर झाली होती. आंघोळ करून सरळ गेट च्या बाहेर आलो. समोर एका ठिकाणी खूप मुलं नाश्ता करत होती. पैसे तर नाही पण खायचं तर आहे. थोडा वेळ विचार करत पीएमटी बस stop वर बसलो. शेवटी सरळ रस्ता ओलांडला नि समोर गेलो. एक पोहे घेतले आणि खायला सुरुवात केली. पैसे कुठून द्यायचे हा प्रश्न होताच. पोहे तर खाऊन झाले. खूप गर्दी असल्याने त्या stall मालकाचं पण माझ्याकडे काही लक्ष नव्हतं. म्हणून हळू च तिथून काढता पाय घेतला ते नीट रूम ला जाऊन धडकलो. म्हणजे माणूस काय करू शकतो भूक लागल्यावर त्याचा प्रत्यय आला. प्रश्न फक्त दहा रुपयांचा होता पण ते हि माझ्याकडे नव्हते. हे इथेच संपलं नाही तर विद्यापीठातील ओपन कॅन्टीन ला पण पैसे न देतच दोन-तीन वेळा नाश्ता केला. हे करत असताना फार वाईट वाटलं. तरी पण मी ते करत गेलो. हे मला बदलायचं आहे या आशेवर मी जगत गेलो. आज पैसा आहे पण खाण्याची ती इच्छा नाही. पैसे खिशात असल्यानंतर कधीच भूक लागत नाही.
आजही हे प्रसंग आठवतात. हसायला येतं कधी कधी. पण ती परिस्थिती तशी होती. कुणाला फसवणं हा उद्देश नव्हताच कधी. नाईलाजास्तव हे करावं लागलं. माणूस परिस्थितीचा गुलाम असतो. असं माझ्याबाबतीत झालं असं नाही. असे अनेक आहेत. फक्त कुणी सांगत नाही. आणि मला असल्या गोष्टी सांगण्याचा भारी शोक. जे आपण केलं ते सांगण्यात कसली लाज. लाज असतीच तर असल्या गोष्टी केल्याचं नसत्या. करायला लाज वाटली नाही तर सांगायला कुठली आली लाज.
सगळं ऐकल्यानंतर आम्ही खूप हसलो. ते खरंच हसणं होतं कि चेहऱ्यावर चे भाव लपवण्याचा प्रयत्न होता याबद्दल मी साशंक आहे. यानंतर मात्र आम्ही फार काही बोललो नाही. अतिशय आनंदात सुरु झालेल्या आमच्या गप्पांना वेगळी वास्तवतेची किनार मिळाली होती. ते स्पष्ट जाणवत होतं. आणि असंच गंभीर होऊन आम्ही कधी झोपलो ते कळाल नाही. हा प्रसंग सांगावा कि नाही या विचारात मी होतो. पण खरं सांगण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत मला माहित असलेलं प्रसंग गुपित राहिलं नव्हतं. आज हि ती परिस्थिती आठवली कि मन स्तब्ध होतं. मनाची ती घालमेल. चुकीचं करताना सापडलो तर किती अपमान होईल असे वेगवेगळे विचार आणि तरीही आपण तशी कृती करायला धजावतो. आहे ना कोडं. जे कधी सोडवता येत नाही. ते फक्त कोडं बनून राहते. मलाही ते कोडं सोडवायचं नाही. भरपूर गोष्टी करायच्या आहेत. मागचं सगळं विसरून पुढे जायचं आहे. जन्माला घालताना निसर्गाने विसरण्याची कला द्यायला हवी होती. कमीत कमी आनंदाने जगता आलं असतं. कारण आठवणी पाठ सोडत नाही. जेवढं विसरण्याचा प्रयत्न करावा तेवढं जास्त आठवतो. कदाचित यालाच जीवन म्हणतात.
No comments:
Post a Comment