Thursday, May 8, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी....भाग 3


पाच-सहा वर्षांच्या कालावधीत पुणे विध्यापिठात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही गोष्टी अंगाशी आल्या पण सुदैवाने त्यातून सहीसलामत बाहेर पडलो. पुणे विद्यापीठ म्हणजे विद्येचं माहेरघरच नाही तर आंदोलनांच पण. मी त्यात पडणार नाही असं होणार नव्हतंच. तिथे असताना प्रत्येक आंदोलनात भाग घेतला. त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पण सगळीच आंदोलन योग्य असतात असं नाही. काही चुकीची आंदोलन पण पाहायला मिळाली. कमवा आणि शिका संदर्भात झालेलं आंदोलन त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन. पूर्णपणे चुकीच होत. पण मागे हटतील ते राज्याशास्राचे विद्यार्थी कसले. आधीच त्यांना असं वाटायचं कि सगळं त्यानांच कळते. विषय कुठलाही असो त्यात ते पारंगत असल्याचा त्यांचा भास. प्रत्येक जन स्वतःला राजकारणाचा विश्लेषक समजायचा. काही अपवाद आहेत. दुर्दैवाने त्याचं त्याचं ते आंदोलन यशस्वी झालं होतं. यात काही शहाण्या पत्रकार मंडळीनीही खूप प्रसिद्धी दिली या प्रकरणाला. ते पण त्याचं विभागातून शिकून पुढे वृत्तपत्रपदविका करून पत्रकार झाले होते. त्यामुळे खरं काय नि खोटं काय कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. असो. झालं गेलं गंगेला मिळालं.

मी विद्यापीठात गेल्यानंतर कॅन्टीन संदर्भात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यात ओपन कॅन्टीन ची थोडी तोडफोड पण केली. मॉब असल्यावर काही पण करता येतं. तिथून मग असल्या निरर्थक भानगडीमध्ये पडणे हा माझा हक्कच झाला. मग ते एम फिल स्टायपेंड, होस्टेल च आंदोलन असो कि अजून काही. सहभाग सुरूच राहिला ते एक प्रकरण अंगाशी येईपर्यंत.

ते झालं असं कि एकदा मी एम फिल ला असताना पाच नंबरच्या वसतिगृहात राहायचो. रात्रीचे एक-दीड वाजले असतील. एका जुनिअर चा फोन आला कि कुणीतरी आजारी आहे. हेल्थ सेंटर ला आलोय पण डॉक्टर काही प्रतिसाद देत नव्हता. मग काय आम्ही दोन तीन मित्र हेल्थ सेंटर ला गेलो. दरवाजा ठोकून पाहिला, फोन करून पाहिला, आवाज देऊन झालं पण डॉक्टर काही बाहेर येत नव्हता. मग मी दगड भिरकावून काच फोडली. क्षणार्धात डॉक्टर आपल्या पत्नीसह बाहेर आला. फार रागात होते ते. भरपूर तोंड सुख घेतलं त्यांनी माझ्यावर. सेक्युरिटी तेथे होताच. कारवाई करा म्हणत होतं. काही वेळानंतर अजून दोन-तीन सेक्युरिटी आले. डॉक्टर महाशय माफी मग असं म्हणत होते नि नुकसान भरपाई मागत होते. मी नाही म्हटलो. मी माफी मागितली नाही. कारण आई-वडिलांनी मला माफी मागायला कधी शिकवलं नाही किंवा शिकवलं असेल मी ते लक्षात ठेवलं नसेल. माफी मागितली असती नि भरपाई दिली असती तर पुढची प्रक्रिया टळली असती कदाचित. पण माज जास्त होता माझ्यात. केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप नव्हता. 

मला चिंता होती पुढे काय होणार त्याची. तसं पाहिलं तर माझ्यापुढे पर्याय होता. बाईक असल्याने बाहेर हॉस्पिटल ला जान शक्य होतं. पण कुणाच्याच डोक्यात आलं नाही. कारण विद्यापीठ म्हणजे आपल्या बापाचीच मालमत्ता असं प्रत्येकाचा समज. मी पण त्यातलाच एक. नंतर मेन बिल्डींग ला सेक्युरिटी ऑफिस मध्ये जाऊन माझ्याकडून सगळं लिहून घेण्यात आलं. रात्री २ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत मी तिथेच होतो खुर्चीवर बसून. सकाळी रूम ला जाऊन फ्रेश होऊन आलो. मग माझ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान डॉक्टर दाम्पत्यानं रजिस्ट्रार कडे तक्रार केली होती. त्यामुळे निर्णय लांबला नि मला सोडण्यात आलं. सगळा प्रकार माझ्या विभाग प्रमुखाला कळवण्यात आला. त्याने मला बोलावून चांगलीच खरडपट्टी काढली. मी काहीच बोललो नाही. ज्या व्यक्तीसाठी मी हे सगळं केलं होत तिने सांगितलं कि मला तिने बोलावलं नव्हतं. मी स्वतःच आलो होतो असं ती म्हटली. तिचा आणि माझा फार काही संबंध नव्हता. मी तिच्याशी कधी बोललेलो पण नव्हतो. पण आपली समाजसेवा काय करणार. नको तिथे हस्तक्षेप करायचा. मी या प्रकरणात चांगलाच अडकलो होतो. विभाग प्रमुखांशी माझे संबंध चांगले नव्हते त्यामुळे आपली आता वाट लागणार हे कळून चुकलं होतं. 

दोन-तीन दिवसांनी मला मिटिंग ची नोटीस मिळाली. स्थळ होतं रजिस्ट्रार ऑफिस. तेथे मी, विभागप्रमुख, दोन्ही होस्टेल चे रेक्टर, रजिस्ट्रार, सेक्युरिटी आणि डॉक्टर असे सगळे होते. मग प्रत्येकाने मी कसा चुकीचा आहे नि माझा कसा इतर घटनांमध्ये कसा सहभाग होता हे कथन केलं. आमचे विभागप्रमुख तर म्हटले याला जेल मध्ये टाका नि एम फिल रद्द करा. रेक्टर चं हि तेच मत. डॉक्टर ला तर तेच हवं होत. पण सगळं ऐकून झाल्यावर रजिस्ट्रार ने मला खूप शिव्या घातल्या नि माझ्या समोर दोन पर्याय ठेवले. एक मी आई-वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर माफी मागावी अन दुसरा एम.फिल रद्द करावं अन्यथा आम्ही करू ते असं सांगण्यात आलं. मी फक्त ऐकत होतो. शेवटी मी म्हटलो कि आई-वडिलांना बोलावणे शक्य नाही. पण मी होस्टेल सोडून बाहेर राहायला जातो. बाकी कुठलाच पर्याय मला मान्य शक्य नव्हता. नंतर विनंती करून मी ते मान्य करून घेतलं. बाहेर येऊन आधी तेच करण्यात आलं. होस्टेल जमा करण्यात आलं. पण मी काही बाहेर जाणार नव्हतो. माझ्यानंतर होस्टेल माझ्या मित्राला मिळणार हे मला माहित होतं. त्याने लगेच होस्टेल ऑफिस ला जाऊन रूम मिळवली नि मी त्या रूम मध्ये आयुष्यात पहिल्यांदा अनधिकृत राहायला लागलो. कारवाई झाली होती पण माझ्या वर त्याचं फार काही फरक पडलं नव्हता. हे सगळं करत असताना जो मनाचा खंबीरपणा हवं होता तो माझ्याकडे होता म्हणून या प्रकरणात साहिसाहालामात बाहेर पडलो.

हे माझं शेवटच प्रकरण. नंतर मी कधीही कुठल्याही प्रकरणात सामील झालो नाही. काही फायदा होत नाही. आपण अडकलो कि कुणी आपल्या मागे येत नाही हे कळून चुकलं. कारवाई झाली याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं ते फक्त एका गोष्टीचं कि ज्या व्यक्तीसाठी मी हे केलं होतं त्या व्यक्तीने तरी मला साथ द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे मी पराभव स्वीकारला. लढून उपयोग नव्हताच मग. माझ्या या कृतीचे वेगवेगळे अर्थ काढल्या गेले. खूप चर्चा झाली पण मी कधी त्यावर बोललो नाही. एकटा पडलो होतो मी त्या प्रकरणात. माझं विद्यापीठातल आयुष्य संपलं असं मला जाणवायला लागलं होतं. मी ज्या उद्देशान इथे आलो तो उद्देश कधीच मागे पडला होता. त्याचं मला काही सोयरसुतक नव्हतं. त्यापासून मी खूप दूर गेलो होतो. आणि आता वापस येणे शक्य नव्हते. हळू-हळू मी बाहेर पडायला सुरुवात केली. माझं मन लागत नव्हतं तिथे. एकीकडे नेट/सेट पास होत नव्हतो तर दुसरीकडे असल्या रिकाम्या गोष्टी सुरु होत्या. दुसर्यांना मदत करण्याचा भारी शौक नडला. नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. मग अभ्यास कमी झाला तो झालाच. माझे काही हितशत्रू विद्यापीठात होतेच. त्यांना फार आनंद झाला मी अडकलो त्याचा. या प्रकरणातून मी खूप काही शिकलो. गरज असते तेव्हा कुणी मदतीला येत नाही. ज्याच्यासाठी काही कराव ते पण पाठींबा देत नाही.

या घटनेनंतर खूप दिवसांनी मी महाराष्ट्र बँकेत गेलो होतो. तिथं डॉक्टर अन माझी भेट झाली. मी सॉरी म्हटलो तेव्हा. डॉक्टर पण इट्स ओके म्हणून निघून गेला. आयुष्यात पहिल्यांदा कुणालातरी मनापसून सॉरी म्हटलं होतं. नाहीतर सॉरी हा शब्द आपल्या डिक्शनरी मध्ये नाही. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यात अन चुकीच्या गोष्टी करण्यात निम्मे आयुष्य गेलं. माझ्या दृष्टीने तेच जीवन. इतरांपासून वेगळ होण्याच्या नादात मी अनेक चुका केल्या. मागे वळून पाहताना फक्त चुकांचा ढीगच दिसतो जो कि आता दुरुस्त होऊ शकत नाही. तरीही आज जेथे आहे तेथे व्यवस्थित आहे. चुकांचा आयुष्यावर फार काही परिणाम झाला नाही ते बर झालं.....

No comments:

Post a Comment