Thursday, May 8, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी: भाग-२


पुण्यात दोन वर्ष कसे निघून गेलेत कळलंच नाही. पुण्यात नाही पुणे विद्यापीठामध्ये. कारण शहरात जाने कधी शक्य झाले नाही. शहरात जायचं म्हटलं तर पैसा हवा आणि तोच माझ्याकडे नव्हता. त्यामुळे आमचा मुक्काम विद्यापीठातच. फार झालं तर एबीसी त पुस्तके आणायला जायचो. पुण्यात राहून पुणे काय हे जॉब करेपर्यंत कळाल नाही. विद्यापीठ खरं तर एक मोठ खेड. तिथं विद्यार्थी हि खेडयातलेच जास्त. त्यामुळे आपण शहरात राहतो हा भास कधी होत नव्हता. 

तीन वर्ष नेट-सेट चा अभ्यास केला पण यश काही मिळेना म्हणून जॉब सुरु केला. खर्या अर्थानं पुणे तेव्हा कळायला लागलं. इ स्क़ेअर ला पीएमटी मधून पाहिलं होतं फक्त. पण चित्रपट पाहणं शक्य झालं नाही. जॉब सुरु केल्यानंतर मात्र हे सगळं बदलत गेल. मग काय. जयकर कमी अन बाहेर जास्त. सोबतीला नवीन दुचाकी. काही सांगायलाच नको. रात्री बेरात्री शहरात फेरफटका मारणं...सारसबाग...पार्वती...शनिवारवाडा ....चतुश्रुंगी.........शनिवार अन रविवार ला...सिंहगड, तोरणा, लेण्याद्री, भीमाशंकर, राजगड, शिवनेरी, रांजणगाव, लोणावळा, थेऊर, मोरगाव असं सगळं पालथं घातलं. मुव्ही तर नेहमीचेच झालेत. आम्ही चार पांच मित्राचं फक्त हेच काम. कंटाळलो होतो त्या जयकर ला. पण या सगळ्या प्रक्रियेत अभ्यासापासून कसं दूर गेलो ते लक्षात आलंच नाही. अभ्यासात पूर्वीसारखा जोश नव्हता. तेच ते वाचून कंटाळवाण झालं होतं. सलग दोन वर्ष पुणे आणि आसपास असलेली सगळी ठिकाण भटकून झाली त्यामुळे पुणे सोडताना काहीच वाटलं नाही. फक्त तुळशीबाग नाही पाहिली कारण ती काही आपल्यासाठी नाही हे माहित होतं. आमचे काही मित्र मात्र मैत्रिणींसोबत नेहमी तुळशीबागेत जायचे. काय खरेदी केलं त्यांनी ते कधी सांगितलं नाही विचारलं तरी.

वसतिगृहात राहताना फार मजा आली. कधी अनधिकृत रहायची वेळ आली नाही ते सुदैव. देकून चा त्रास सोडला तर सगळं व्यवस्थित होत. पाच नंबरच्या वसतिगृहात राहताना वाटेल तसं आयुष्य जगायला मिळालं. तिथं राहण्यात एवढी मजा होती कि डेंगू ची साथ असताना सुद्धा आम्ही काही मित्र घरी गेलो नव्हतो. ती भन्नाट शांतता अजूनही आठवते. एवढं मोठं वसतिगृह अन मोजून १०-१५ विद्यार्थी राहत होते त्या कालावधीत. तिथं अनेक प्रसंग घडलेत. काही लक्षात आहेत. त्यातला एक प्रसंग. 

दिवाळी चा काळ होता. आम्ही दोन-तीन मित्रांनी ठरवलं कि इथे राहुनच अभ्यास करायचा. जेमतेम पैसे होते आमच्याकडे. या कालावधीत मेस बंद असते म्हणून खिचडी करायची असं ठरलं. मग झाली जुळवाजुळव सुरु. शेगडी नि भांडी मित्रांकडून गोळा केली. आम्हाला वाटलं खिचडी करणे फार अवघड नाही. पहिला दिवस होता मेस बंद असण्याचा. तांदूळ वगैरे आणून झालेत. पैसे जेमतेम असल्याने नाश्ता वगैरे बंद होतं. पातेल शेगडीवर ठेवलं नि एक एक वस्तू टाकत गेलो. भूक खूप लागली होती. सगळ पातेल भरून तांदूळ टाकलेत. आणि पाणी टाकल. आता एवढे दिवस हे हि माहित नव्हतं कि तांदूळ फुगतात. व्हायचं तेच झालं. थोड्या वेळाने जळल्याचा वास यायला लागलं. पाहतो तर काय. पाणी कधीच संपलेलं नि तांदूळ करपायला लागलेलत. मग सगळं प्रकार लक्षात आला. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. मग त्यातले अर्धे तांदूळ काढून पुन्हा सगळी प्रक्रिया. असं करून दोनदा खिचडी बनवून खाल्ली. करपलेली होती पण काय करणार. भूकेपुढे कुठलाही इलाज नव्हता. खरं तर ती पण फार छान वाटली. दोन तीन दिवसांनी मात्र सगळ व्यवस्थित करायला लागलो. सलग दहा दिवस खिचडी खाल्ली. अपवाद फक्त एका दिवसाचा. पोट काही नव्हतं म्हणून बहिणीकडे जाऊन डबा आणला आमच्यासाठी. सकाळी गेलो ते संध्याकाळी परत आलो. त्या दिवशी आमच्या मित्रांचे एवढे फोन आलेत कि ते आयुष्यात कधी आले नाहीत. ते वाट पाहत होते मी कधी येतो म्हणून. संध्याकाळी चपात्या खाताना सगळयांचे चेहरे पाहण्यासारखे होते. न बोलता जेवण सुरु होत. मग कुठं सगळ्यांचे चेहरे खुलले होते. चपात्यांची बरोबरी खिचडी करणार नाही. दिवसातून दोन-तीन वेळा करावी लागत होती. अभ्यास करण्यासाठी थांबलो होतो पण झालं भलतच. दिवस-रात्र फक्त खाण्याच्या नियोजनात जात होतं. खोदा पहाड निकाला चुहा असं म्हटलं तरी हरकत नाही. नंतर खिचडी कित्येक वेळा केली, म्हटलं तर प्रत्येक रविवार ला. पण चांगला धडा मिळाला. पोटात अन्न नसेल तर डोकं पण चालत नाही. खिशात पैसे असताना कधी भूक लागली नाही किंवा लागत नाही पण पैसे नसताना पोटात कावळे ओरडतात. 

एलीस गार्डन चे फेरफटके तर नेहमीचे. प्रेमियुगुलांसाठी उत्कृष्ट ठिकाण. तेही निसर्गरम्य वातावरणात. काही तर तिथे अभ्यास करायला जायचे. नेमका किती आणि कसा अभ्यास व्हायचा ते सांगता नाही येणार. तिथं बसलेलं प्रेमीयुगुल पाहणं आम्हाला फार छान वाटायचं. मी आणि माझा मित्र संध्याकाळी न चुकता एलीस गार्डन मधून चक्कर मारून यायचो. कधी कधी आमचे मित्र हि सापडायचे तिथं त्यांच्या मैत्रिणींसोबत. आम्हीं पण न पाहिल्यासारखं करत होतो मग. आमचा मित्राला असल्या गोष्टींमध्ये फार रस. त्या निमित्ताने माझी हि सुप्त इच्छा जागृत व्हायची. मी सांगत नव्हतो पण छान वाटायचं त्या सगळ्या गोष्टी अनुभवताना. त्यातून निष्पन्न काही होत नव्हतं तो भाग वेगळा. पण ते वय असते. त्यातली मजा हि काही औरच.

No comments:

Post a Comment