Friday, October 5, 2018

व्यक्ती विशेष (उत्तरार्ध)


ज्या ठिकाणी मी जाणार होतो तिथे परिचित कुणीच नव्हतं. पुणे सोडणार होतो. काय होईल, कसं होईल ही चिंताही होती. तिथे गेलो आणि दुसरी व्यक्ती भेटली ज्यांनी मला ३६० डिग्री बदलून टाकलं. ती व्यक्ती म्हणजे डॉ. माधव राऊळ. काय बोलावं यांच्याबद्दल. पंढरपूर मधील माझी सुरुवात आणि शेवट तेच.
डॉ. माधव राऊळ-
उमरग्याचे मुळचे. भारदस्त, महत्त्वाकांक्षी,प्रभावी व्यक्तिमत्त्व. पंढरपूर ला मी पहिल्यांदा गेलो तेव्हाही श्रीमंत सर सोबत होते.  तिथला जॉब पक्का झाला आणि पुणे सोडण्याचा निर्णय झाला.
महाविद्यालयात रुजू झालो. माधव सरांच्या अंडर काम करायचं होतं. तो पहिला दिवस आजही आठवतो. त्यांनी मला बोलावलं आणि समोर बसायला सांगितलं. ते सांगायचे आणि मी लिहित होतो. कश्यासाठी आलोय आणि काय सुरु झालंय. निर्णय तर चुकला नाही ना असा प्रश्न पडला. जसे-जसे दिवस गेलेत तसे गैरसमज गळून पडलेत.
मी घरी येत असताना बस स्टोप ला भेटायला येऊन पैसे हवेत काय असं न विचारता खिष्यात पैसे टाकणारा हा माणूस. त्यांनी जे आपलं मानलं ते नाहीच कुणी करू शकत. माझ्या आनंदात आनंद मानणारा. किती फिरलो असेल त्यांच्यासोबत. सोलापूर, उमरगा, महाड, रायगड , कोकण, पुणे, मुंबई भरपूर. प्रत्येक प्रवास हा अविस्मरणीय. सर असले म्हणजे माहोलच. त्यांच्या पि.एच. डी. कामा-निमित्त पंढरपूर-सोलापूर किती फेर्या झाल्या असतील? मोजमाप नाही.  पार्ट्यांच तर बोलायलाच नको. अगणित. हॉटेलवर, माझ्या रूमवर रंगलेल्या पार्ट्या अन सोबतीला जगजीत सिंग च्या गझल्स. भन्नाट होतं सारं. सरांची मुलगी मनश्री लहान होती तेव्हा. तिच्यासोबत किती वेळ घालवला असेल. अजूनही तिचं नाव आहे माझ्या बाईकवर. आणि राहील.
एक कुटंब म्हटलं तरी चालेल. कधी अंतर दिलं नाही. त्यांनी मला जे प्रेम दिलं ते नाही विसरता येणार. सणवार सारे त्यांचाघरीच.  संध्याकाळचे जेवण कित्येकदा त्यांच्याकडेच. एकदा का जीव टाकला तर ते कधीच सोडत नाही. कधी कधी त्यांच्या या स्वभावाचा फायदा ही घेतात लोकं. मी त्याला अपवाद होतो. त्यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचा विश्वास असावा. त्यांच्या सगळ्याच गोष्टी मला पटत होत्या  किंवा माझ्या त्यांना पटत होत्या असंही नव्हे. “If you want to build relations, you must respect the differences and this is what we did”.
तिथे असतानाच एम.फिल. नेट आणि पी.एच. डी. नोंदणी हे सारं घडलं. माझ्या एम.फिल चं सर्टिफिकेट माझे गाईड मला न सांगताच विद्यापीठातून घेऊन गेले होते. माधव सर सोबत होतो गाईड ला भेटायला गेलो तेव्हा. पाच हजार रुपये उकळले गाईड ने. त्याने पैसे मागताच सरांनी खिश्यातून पैसे काढले आणि दिलेत.
सर, पि .एच. डी. करा असं ते कित्येकदा म्हणतात. एवढे आर्टिकल लिहिता लिहिता पी.एच. डी. झाली असती. पण काय ना ते शक्य झालंच नाही. तसे माझे पि .एच. डी  चे गाईड म्हणजे भले गृहस्थ. तसले गाईड शोधून सापडणार नाही. ठरवलं असतं तर झालंही असतं. मी पि .एच. डी. मटेरीअल नाही हे माझ्या लक्षात आलं.  मी पंढरपूर सोडलं आणि संपलं सगळं. प्राधान्यक्रम बदलले होते.
गमतीने आम्ही नेहमी म्हणायचो “Our job is to convert donkeys into horses.” ट्रेनिंग चं हेच तर आहे.
ते सुट्ट्या कधीच घेत नाही. त्यांचाच काय तो प्रभाव. आजही मला सुटी घ्यावीशी वाटत नाही.
Fully professional आहे. कॉलेज ला असताना कधीच सूट दिली नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक या दोन गोष्टी भिन्न ठेवणारा माणूस. कायम धडपड. फक्त काम आणि काम. खाजगी क्षेत्रात काम करत असताना हेच कमी येतं. सरांचा दांडगा संपर्क आहे लोकांशी. जिथे जाल तिथे भेटणारे आहेत. बर्याच ठिकाणी भटकंती झाली त्यांच्यासोबत.
मी जे काय शिकलो ते यांच्या सान्निध्यात. माझी जडण-घडण तिथेच. ट्रेनिंग त्यांच्याच सान्निध्यात. साधारण दीड वर्ष होतो त्यांच्यासोबत. तो काळ  माझ्या आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय. प्रोफेशनलीझम काय ते नकळत शिकलो. अभियांत्रिकी मध्ये जम बसवता आला त्याचं श्रेय त्यांनाच जातं. असं कित्येकांना घडवलंय त्यांनी. ते मानत नाही हा भाग वेगळा. त्यांनी ज्याला ज्याला मदत केली त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही. मस्त कुटुंब आहे. सामावून घेतात. आताच्या काळात ते कठीणच. सहवास...आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. सहवास चांगला असेल तर आपली प्रगती होते. या लोकांचा सहवास मिळाला नसता तर मी कुठे असतो? माहित नाही. या लोकांनी आठवणी दिल्यात. जे चांगलं आहे ते घेत जावं. बाकी सोडून द्यावं. जगात कुणी परिपूर्ण नाही.  आता संपर्क फार कमी आहे. पण आठवणी कश्या विसरणार?


व्यक्ती विशेष (पूर्वार्ध)


नेट-सेट हुलकावणी देत होतं. भविष्य अधांतरी होतं. जॉब चा पर्याय म्हणून मी अभियांत्रिकी कडे वळलो. या क्षेत्राबद्दल फार काही माहित नव्हतं. माझ्या काही परिचयातील काहीजण आधीच इकडे जॉब करत होते.  तो पर्याय मलाही खुणावत होता. नेट पास नाही झालो तर काय? हाताशी काहीतरी पाहिजे. आणि अभियांत्रिकीकडे मार्गक्रमण सुरु झालं. इकडे “बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल” अशी परिस्थिती. जे शिकलो त्याचा काहीही संबंध नाही. आणि जे शिकवायचं आहे आहे ते कधीच पाठ्यक्रमात नव्हतं. अश्या परिस्थितीत पाय रोवणे कठीण होतं. पण काय ना काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि सगळी प्रक्रिया सोपी होऊन जाते. म्हणजे ते transition सोपं झालं. अश्या दोन व्यक्तींचा मला सहवास लाभला. त्यांना बराच अनुभव होता. त्यांच्या सोबत राहून कित्येक गोष्टी कमी कालावधीत शिकता आल्या आणि स्पर्धेत टिकता आलं. आपण परिपूर्ण नसतोच. आसपास ची लोकं आपल्याला खूप काही शिकवून जातात. ज्या क्षेत्रात कधी काम करण्याची कल्पना ही केली नव्हती त्या  क्षेत्रात प्रवेश करायचा होता.  
माझ्या व्यावसायिक जीवनातील ती पहिली व्यक्ती म्हणजे प्रा. अशोक घुगे.
प्रा. अशोक घुगे:
मुळचे सोलापूर कडचे. नक्की आठवत नाही. विद्यापीठात असताना ओळख झाली ती वाचनालयात. एकाच विषयाचे असल्याने कनेक्टिंग पोइंट होताच. मला सिनिअर. त्यामुळे आम्ही सर च म्हणतो त्यांना. पुढे कधीतरी त्यांच्या सोबत काम करेल असं वाटलं नव्हतं. जबरदस्त माणूस. प्रचंड सकारात्मक दृष्टीकोन असणारा. हाय-बाय वगैरे नेहमीचं असायचं. गरिबीतून संघर्ष करून पुढे आलेला.
मला जॉब हवा होता. शोधाशोध सुरु असायची. एकदा त्यांच्याकडून असं समजल कि ते काम करत असलेल्या महाविद्यालयात एम.ए. इंग्लिश उमेदवार पाहिजे म्हणून. आतापर्यंत बरेच उमेदवार येऊन गेलेत पण ते सारे रिजेक्ट झाले. त्या वेळेस चे डायरेक्टर फार खतरनाक होते असं ऐकिवात होतं त्यांच्याकडून. असलं काय विचारात असतील मुलाखतीत कि बरेच जण रिजेक्ट झाले. माझी उत्सुकता ताणली गेली.  जॉब पाहिजे होता. तिथे मुलाखतीला जायचंच असं ठरलं. तिथे फोन केला. ते म्हटले, “येऊन जा”. श्रीमंत सर सोबत होते. बाईक ने आम्ही त्या महाविद्यालयात पोचलो. डायरेक्टर बिझी होते. वेळ होता. अशोक सरांना सांगितलेलं नव्हतं. तरी पण भेट झालीच. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. एका शिपायाने तुम्हाला मध्ये बोलावलं आहे असा निरोप दिला. मी अशोक  सरांना म्हटलं, “सर, बाहेर येईल तर ऑफर लेटर च घेऊन येईल.” त्यांनी स्मितहास्य दिल. अतिआत्मविश्वास आणि मी हे कायमचं समीकरण. त्या अतिविश्वासाने कित्येकदा कामंही झालीत तर कधी दगा ही दिला. तो अतिआत्मविश्वास नको त्या ठिकाणी नडला आयुष्यात आणि त्याची किंमत ही चुकवावी लागली. पण मी तो काही सोडला नाही. तीच माझी आईडेनटीटी (Identity). मूळ स्वभाव तो. त्यात नाही बदल करता येत. मी तसा कधी प्रयत्न ही केला नाही. असो.
मी आतमध्ये प्रवेश केला आणि मुलाखत सुरु झाली. साहेबांचा पहिलाच प्रश्न -दहावीतून मुलं तंत्रनिकेतन ला आली. नवीन आहेत. शिकवा त्यांना ते समोर बसले आहेत असं समजून. मी सुरु झालो ते थांबवेपर्यंत. थोडावेळ ते शांत होते. काहीतरी करत होते. ते संपवून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि साहेबांचा दुसरा प्रश्न “किती पगार हवाय,”. बोलणी झाली. थोड्या वेळात ऑफर लेटर मिळालं आणि बाहेर पडलो. (संभाषण ईंग्रजी मध्ये होतं. भाषांतर केलंय.)
तिथून पुढचे तीन-चार महिने अशोक सर आणि मी हा अध्याय सुरु झाला. मला त्यातलं फार काही माहिती नव्हतं. अशोक सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.  ते महाविद्यालय उंचावर आहे. नैसर्गिक सान्निध्य लाभलंय. रूम च्या बाहेर डोकावलं कि जंगल..उतार आहे.
त्यांना पुस्तके खरेदी करण्याचा शोक. वाचलेत कि नाही ते माहित नाही. पण रूम ला आलो कि कुठलही पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं काहीतरी. कधी कधी मी ते पुस्तकं चाळत होतो.
मी बोलायला फटकळ. समोरच्याला काय वाटेल याची कधी चिंता केलीच नाही.  ते नेहमी मला सांगत राहिले. समोरच्याला फक्त दोन-चार चांगल्या शब्दांची गरज असते. आपण तेच करायचं. त्यांच्या भाषेत-Satisfy the ego of others. मला ते फार काही जमलं नाही पण प्रयत्न केला थोडा फार.
त्यांची वक्तृत्व शैली चांगली. मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व. साधारण तीन-चार महिने त्यांच्यासोबत होतो. कलीग, रूम मेट. सुटी असली कि सोबत पुण्यात फेरफटका असायचा. चित्रपट, हॉटेलिंग वगैरे कित्येकदा सोबतच. सकाळी उठून माझ्यासाठी चहा करणारा हा माणूस. भविष्याचा गप्पा कित्येकदा व्हायच्या. आमच्यात व्यवहार कधी आला नाही.
पण एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. सेटल होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. तासनतास अनुभवांची देवाण-घेवाण झाली.  आता आमच्यात सारं काही आलबेल होतं असंही नाही. पण त्यांनी कधी ते मनाला लावून घेतलं नाही. मला नाही पटलं तर मी ते सरळ सांगत होतो. त्यांनी ही ऐकून घेतलं. चर्चेतून मार्ग काढण्यावर त्यांचा भर. माझं उलट होतं. तुटेपर्यंत तानल्याशिवाय जमत नव्हतं. पण त्यांनी सांभाळून घेतलं.
पण त्या कालावधीत जी सकारात्मक उर्जा निर्माण झाली ती महत्त्वाची. यश-अपयश यावर कित्येकदा चर्चा झाली.  त्यांची स्वप्ने प्रचंड. स्वप्न पाहायला का पैसे लागतात असं ते म्हणायचे. भन्नाट माणूस आहे हा. टिप-टाप राहणीमान. गळ्यात एक bag अडकवलेली. एखादी गोष्ट समोरच्याला कशी पटवून द्यावी हे त्यांच्याकडून शिकावं. कुठलीही समस्या आली तर निराश न होता चालत राहतो. स्वबळावर केलंय सारं.  नसरापूर च्या मंदिराला भेटी दिल्यात अधून-मधून.
शेवटचा संपर्क कधी झाला आठवत नाही. पण माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुरुवातीची दिशा त्यांनीच दिली. त्या महाविद्यालयात माझं मन काही रमलं नाही आणि सुरु झाला दुसरीकडे जाण्याचा प्रवास. चार महिन्यातून मी तेथून एक्झिट केलं कित्येक सार्या आठवणी घेऊन.



Thursday, October 4, 2018

अनुभव-४


२००९-१० ची गोष्ट असेल. एम.ए. संपलं होतं. एम.फिल फक्त विद्यावेतन आणि होस्टेल या दोन गोष्टींपुरते मर्यादित होतं. विद्यावेतन मिळण्याचा कालावधी संपण्याचा मार्गावर होता. पुण्यात राहायचं असेल तर जॉब करणे गरजेचं होतं. सी. एच. बि. वर सिनिअर कॉलेज ला जॉब करायचा नव्हता. कारण सी. एच. बि.  वाल्यांचे हाल जाणून होतो. अभियांत्रिकी ला एम.ए. इंग्लिश ची आवश्यकता असते हे माहित होतं.  त्यामुळे इंजीनिरिंग कॉलेज ला जॉब करायचा असं ठरलं. रोज वर्तमानपत्र चाळत होतो. आणि एके दिवशी जाहिरात सापडली. Walk-In –Interview for the post of assistant professor in Communication Skills.
एम. ए. विथ सिक्स्टी पर्सेंट. मराठवाडा मित्र मंडळ चं कॉलेज होतं. त्या दिवशी रेझुमे तयार केला आयुष्यात पहिल्यांदा. त्याला आम्ही बायोडेटा म्हणत असू तेव्हा.आता तो वेगळ्या अर्थाने वापरला जातोय. मुलाखतीच्या दिवशी त्या महाविद्यालयात पोहचलो. नाव नोंदणी केली. चांगला तीस हजार रुपये पगार त्यांनी जाहीर केला होता.  जसे-जसे उमेदवार येत होते तसे तसे एका रूम मध्ये जायला सांगितलं जात होतं. एका जागेसाठी तब्बल तीस उमेदवार. सगळे कसे टिप-टाप.  एक बाई वर्गात आली आणि म्हटली प्रत्येकाला आता डेमो द्यावा लागणार. लिस्ट नुसार डेमो द्यायचा. माझा क्रमांक चौदावा. आता डेमो म्हणजे काय? मला काही सुचेना. म्हटलं पाहू काय होते ते. थोड्या वेळाने ५-६ प्राध्यापक वर्गात आले. पहिल्या क्रमांकच नाव पुकारण्यात आलं. महिला होती. चांगली तयारी करून आलेली होती. तिनं पी.पी.टी. सुरु केली आणि फाड-फाड ईंग्रजी बोलायला लागली. जसा तिचा वेग वाढत होता, तसे तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. आयुष्यात कधी पुढे जाऊन बोललो नाही. आता कसं होणार. जसा जसा माझा नंबर जवळ येऊ लागला तशी धडधड वाढली. काय त्यांची ती भाषा. आत्मविश्वास. स्टेज डेरिंग. मी अचंबित होतो. तेरा डेमो झाले. आता माझाच होता. माझं नाव पुकारण्यात आलं. एकदा-दोनदा-तीनदा. मी काही जागेवरून उठलो नाही. सुदैवाने कुणी ओळखीचं नव्हतं. माझं नाव पुकारल्यावर मीच आजूबाजूला कोण आहे हा म्हणून विचारपूस करत होतो. शेवटी कंटाळून त्या बाईने पुढचा नंबर घेतला. बर झालं सुटलो. म्हणून थोडंस हायसं वाटलं.  ते तरी बर कि नोंदणी करणारे वेगळे आणि इथे आलेले वेगळे होते.
थोड्या वेळाने मला फोन आला असं भासवून मी फोन कानाला लावला आणि मागच्या दरवाज्यातून बाहेर पडलो. विद्यापीठ गाठेपर्यंत मागे वळून ही पाहिलं नाही.
आयुष्यात कधी पी.पी.टी. पाहिली नव्हती. पुढे जाऊन बोलण्याचा तर कधी संबंधच नाही. फक्त पुस्तकी ज्ञान. ते किती तकलादू आहे हे लक्षात आलं. जॉब मिळणं सोपं नाही हे कळून चुकलं होतं. आता काय होणार या चिंतेने त्रस्त झालो, अस्वस्थ झालो. बोलल्या शिवाय पर्याय नाही. कुठं चुकलं असेल? आपली शिक्षण पद्धती तर चुकीची नाही? लिहिता येते मग बोलता का येत नाही. उत्तर सोपं होतं. कधी प्रयत्नच केला नाही.
पाचव्या वर्गापासून इंग्रजीची सुरुवात झाली. ए फॉर अप्पल पासून झेड फॉर झेब्रा पर्यंत. नंतर टेन्स आले आणि आयुष्य च टेन्स मध्ये आलं. भाषा कुणी शिकवली का आजपर्यंत? कुणीच नाही. सर्वांनी भाषेबद्दल शिकवलं. (We learn about language and not language). बि.ए. इंग्लिश, एम. ए. इंग्लिश. आऊट पुट शून्य. काय फायदा या शिक्षणाचा? असंख्य प्रश्न निर्माण झाले माझ्या मनात. बर शिकलो काय तर कथा, कविता, कादंबर्या, नाटकं. पण वाचली का कधी? नाहीच. समरी वर काम चालायचं. काही प्राध्यापक महाशय तर समरी वाचून दाखवायचे. संपलं तिथं. आम्हीही तेच केलं.
दुर्दैवाने कुठल्याच विद्यापीठात भाषा शिकवली जात नाही. ते अजून ही त्या बीसी डीसी, अंगलो-सेक्शन  ते पोस्ट-मोडर्ण पर्यंत अडकले आहेत. हीच लोकं पुढे जाऊन प्राध्यापक होतात. आणि तोच कित्ता गिरवतात. नोकरी मिळवण्या लायक कौशल्ये कुठे आहेत? वानवा आहे त्यांची.
आता काय करावं अश्या विचारात पडलो. एका विख्यात प्राध्यापकाकडे गेलो. सर, ईंग्रजी कसं बोलावं असा प्रश्न केला. ते महाशय म्हणाले ग्रामर, वोकबुलरी, प्रत्येक दिवशी ०५ नवीन शब्द पाठ कर असं बरंच काही मार्गदर्शन केलं त्यांनी. आभार मानून मी तिथून काढता पाय घेतला. हेच तर केलंय आतापर्यंत. आणि हा परत तेच सांगतोय. हा एवढा मोठा कसा काय झाला असा प्रश्न पडला.
बर मराठी किंवा हिंदी शिकताना कुठलं ग्रामर चं पुस्तक वापरलंय. कुठली डिक्शनरी. काहीच नाही. We speak Hindi or Marathi before the identification of alphabets. Then where is the question of grammar and vocabulary? स्पोकन इंग्लिश च्या नावाखाली पैसा कमावणे सुरु आहे. झटपट भाषा शिकवू असे कित्येक लेखकांची पुस्तके मिळतात बाजारात. पण किती जण शिकलेत. शून्य.
भाषा शिकण्याची प्रक्रिया एकच आहे. एल.एस.आर.डब्ल्यू (Listening-Speaking-Reading-Writing). हे माझ्या लक्षात आलं. आपलं उलट आहे. आपण सुरु करतो शेवटून. मग वेगळ काय घडणार. प्रोसेस जर फॉलो झाली नाही तर तेच होणार.
पुढचे तीन-चार महिने एकच काम केलं. स्वतःशी बोलत गेलो आणि भाषा अवगत झाली. कित्येक हास्यापद प्रसंग ही घडले या दरम्यान.  एकदा एकटाच विद्यापीठाच्या बाहेर चालत होतो. त्या ई स्क्वेअर जवळ होतो. रहदारी भरपूर होती. स्वतःशीच बोलत बोलत चाललो होतो. अचानक मी मागे वळून पाहिलं तर दोन व्यक्ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या. त्यांना नक्की वाटलं असेल की याला काहीतरी मानसिक समस्या आहे. त्यांना टाळण्यासाठी मागून येणाऱ्या पी. एम. टी. मी चढलो. शिवाजी नगरला उतरलो आणि दुसर्या पी. एम. टी. ने  परत विद्यापीठात. काय वाटलं असेल यार त्यांना. जाऊ दे ते कुठं ओळखतात मला. म्हणून तो विषय मी सोडून दिला. नंतर फार सतर्क झालो. मागे-पुढे कुणी आहे कि नाही याची खात्री करत होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी ओपन कॅन्टीन ला चहा पीत होतो. माझं लक्ष एका कोपर्यात होस्टेल च्या बाजूने फोन वर बोलत असलेल्या मुलीकडे गेलं. फार मोठ्या आवाजात बोलत होती. फार कुणी लक्ष देत नव्हतं. मला तो दुपारी घडलेला प्रसंग आठवला. त्या व्यक्तीचे हाव-भाव आठवलेत. आणि हिच्याकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही. चहा संपला. मी मोबाईल बंद केला आणि दुसर्या कोपर्यात गेलो. आणि बोलायला लागलो. कित्येकदा मी मोबाईल बंद करून फोनवर बोलत राहायचो ते पण इंग्रजीत. कसलीच अडचण नाही. दुसरा मार्ग सापडला होता. आयुष्यात कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. बंद केलेला मोबाईल ही कामाला आला.
व्यावहारिक ईंग्रजी कडे कुणी लक्षच देत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फौज निर्माण होतेय. कला शाखेचं तेच झालंय. गुण एकीकडे तर कौशल्ये दुसरीकडे. यांचा मेळ घालायला हवा. पण किती प्राध्यापकांना वेळ आहे?  एवढे द्या आणि पेपर प्रकाशित करा. असा धंदा जोरात सुरुय. एम.फिल साठी एवढे पैसे, पी.एच डी. साठी एवढे. हेच सुरुय.
भाषा ही कला म्हणून शिकलं पाहिजे. त्यामध्ये ज्याला येते तो फार मोठा वगैरे प्रकार नकोतच. आताच्या काळात टिकायचं तर बदलावं लागेल. शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. नाहीतरी इंग्लिश मेडीअम स्कूल्स चा बाजार मांडलाय या लोकांनी. दोन-तीन हजार रुपयांवर काम करणारे शिक्षक मिळत आहेत. कसा पुढे जाणार भारत?
मी रविवार ला आठ, नऊ, आणि दहावी च्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात असतो.  एकदा मी शिकवत असताना बोर्डवर एक वाक्य लिहिलं –“I brought my luggage. आणि ते वाचलं. वर्गात ९० च्या आसपास विद्यार्थी होते. जसं मी “आय ब्रॉट माय लगेज “असं म्हटलं तिकडून सर्वांची एकदमाने प्रतिक्रिया आली, “सर, इट इज ब्राउट.” क्षणभर मी थबकलो. त्याचा उच्चार सांगितला. डिक्शनरी दाखवली. तेव्हा त्याचं समाधान झालं. कुणी सांगितलं तर मिस ने असं बोलले. आता ही जर परिस्थिती असेल तर काय होणार? उत्तर एकच-घंटा.
                                                                                                                                                सचिन भगत