Friday, October 5, 2018

व्यक्ती विशेष (उत्तरार्ध)


ज्या ठिकाणी मी जाणार होतो तिथे परिचित कुणीच नव्हतं. पुणे सोडणार होतो. काय होईल, कसं होईल ही चिंताही होती. तिथे गेलो आणि दुसरी व्यक्ती भेटली ज्यांनी मला ३६० डिग्री बदलून टाकलं. ती व्यक्ती म्हणजे डॉ. माधव राऊळ. काय बोलावं यांच्याबद्दल. पंढरपूर मधील माझी सुरुवात आणि शेवट तेच.
डॉ. माधव राऊळ-
उमरग्याचे मुळचे. भारदस्त, महत्त्वाकांक्षी,प्रभावी व्यक्तिमत्त्व. पंढरपूर ला मी पहिल्यांदा गेलो तेव्हाही श्रीमंत सर सोबत होते.  तिथला जॉब पक्का झाला आणि पुणे सोडण्याचा निर्णय झाला.
महाविद्यालयात रुजू झालो. माधव सरांच्या अंडर काम करायचं होतं. तो पहिला दिवस आजही आठवतो. त्यांनी मला बोलावलं आणि समोर बसायला सांगितलं. ते सांगायचे आणि मी लिहित होतो. कश्यासाठी आलोय आणि काय सुरु झालंय. निर्णय तर चुकला नाही ना असा प्रश्न पडला. जसे-जसे दिवस गेलेत तसे गैरसमज गळून पडलेत.
मी घरी येत असताना बस स्टोप ला भेटायला येऊन पैसे हवेत काय असं न विचारता खिष्यात पैसे टाकणारा हा माणूस. त्यांनी जे आपलं मानलं ते नाहीच कुणी करू शकत. माझ्या आनंदात आनंद मानणारा. किती फिरलो असेल त्यांच्यासोबत. सोलापूर, उमरगा, महाड, रायगड , कोकण, पुणे, मुंबई भरपूर. प्रत्येक प्रवास हा अविस्मरणीय. सर असले म्हणजे माहोलच. त्यांच्या पि.एच. डी. कामा-निमित्त पंढरपूर-सोलापूर किती फेर्या झाल्या असतील? मोजमाप नाही.  पार्ट्यांच तर बोलायलाच नको. अगणित. हॉटेलवर, माझ्या रूमवर रंगलेल्या पार्ट्या अन सोबतीला जगजीत सिंग च्या गझल्स. भन्नाट होतं सारं. सरांची मुलगी मनश्री लहान होती तेव्हा. तिच्यासोबत किती वेळ घालवला असेल. अजूनही तिचं नाव आहे माझ्या बाईकवर. आणि राहील.
एक कुटंब म्हटलं तरी चालेल. कधी अंतर दिलं नाही. त्यांनी मला जे प्रेम दिलं ते नाही विसरता येणार. सणवार सारे त्यांचाघरीच.  संध्याकाळचे जेवण कित्येकदा त्यांच्याकडेच. एकदा का जीव टाकला तर ते कधीच सोडत नाही. कधी कधी त्यांच्या या स्वभावाचा फायदा ही घेतात लोकं. मी त्याला अपवाद होतो. त्यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचा विश्वास असावा. त्यांच्या सगळ्याच गोष्टी मला पटत होत्या  किंवा माझ्या त्यांना पटत होत्या असंही नव्हे. “If you want to build relations, you must respect the differences and this is what we did”.
तिथे असतानाच एम.फिल. नेट आणि पी.एच. डी. नोंदणी हे सारं घडलं. माझ्या एम.फिल चं सर्टिफिकेट माझे गाईड मला न सांगताच विद्यापीठातून घेऊन गेले होते. माधव सर सोबत होतो गाईड ला भेटायला गेलो तेव्हा. पाच हजार रुपये उकळले गाईड ने. त्याने पैसे मागताच सरांनी खिश्यातून पैसे काढले आणि दिलेत.
सर, पि .एच. डी. करा असं ते कित्येकदा म्हणतात. एवढे आर्टिकल लिहिता लिहिता पी.एच. डी. झाली असती. पण काय ना ते शक्य झालंच नाही. तसे माझे पि .एच. डी  चे गाईड म्हणजे भले गृहस्थ. तसले गाईड शोधून सापडणार नाही. ठरवलं असतं तर झालंही असतं. मी पि .एच. डी. मटेरीअल नाही हे माझ्या लक्षात आलं.  मी पंढरपूर सोडलं आणि संपलं सगळं. प्राधान्यक्रम बदलले होते.
गमतीने आम्ही नेहमी म्हणायचो “Our job is to convert donkeys into horses.” ट्रेनिंग चं हेच तर आहे.
ते सुट्ट्या कधीच घेत नाही. त्यांचाच काय तो प्रभाव. आजही मला सुटी घ्यावीशी वाटत नाही.
Fully professional आहे. कॉलेज ला असताना कधीच सूट दिली नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक या दोन गोष्टी भिन्न ठेवणारा माणूस. कायम धडपड. फक्त काम आणि काम. खाजगी क्षेत्रात काम करत असताना हेच कमी येतं. सरांचा दांडगा संपर्क आहे लोकांशी. जिथे जाल तिथे भेटणारे आहेत. बर्याच ठिकाणी भटकंती झाली त्यांच्यासोबत.
मी जे काय शिकलो ते यांच्या सान्निध्यात. माझी जडण-घडण तिथेच. ट्रेनिंग त्यांच्याच सान्निध्यात. साधारण दीड वर्ष होतो त्यांच्यासोबत. तो काळ  माझ्या आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय. प्रोफेशनलीझम काय ते नकळत शिकलो. अभियांत्रिकी मध्ये जम बसवता आला त्याचं श्रेय त्यांनाच जातं. असं कित्येकांना घडवलंय त्यांनी. ते मानत नाही हा भाग वेगळा. त्यांनी ज्याला ज्याला मदत केली त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही. मस्त कुटुंब आहे. सामावून घेतात. आताच्या काळात ते कठीणच. सहवास...आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. सहवास चांगला असेल तर आपली प्रगती होते. या लोकांचा सहवास मिळाला नसता तर मी कुठे असतो? माहित नाही. या लोकांनी आठवणी दिल्यात. जे चांगलं आहे ते घेत जावं. बाकी सोडून द्यावं. जगात कुणी परिपूर्ण नाही.  आता संपर्क फार कमी आहे. पण आठवणी कश्या विसरणार?


No comments:

Post a Comment