Thursday, September 17, 2020

अर्णब गोस्वामी - पत्रकारिता क्षेत्रातील एक विकृत चेहरा

अर्णब गोस्वामी...एक धडाडीचा पत्रकार, जण-सामान्य जनतेचा आवाज असं काही चित्र काही वर्षांपूर्वी होतं. तो कित्येकांचा आयकॉन होता...आयडॉल होता. द टेलिग्राफ पासून पत्रकारितेची सुरुवात करणारा अर्णब नंतर एन.डी.टी. व्ही., टाईम्स नाऊ ते स्वतःची रिपब्लिक टीव्ही वर सतत आपल्यासमोर येत राहिला. या दरम्यान एक पत्रकार म्हणून त्यात अनेक बदल झाले. एक संयमित, अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करणारा अर्णब आता मात्र बिथरला आहे. सध्या तो रिपब्लिक टीव्हीचा एडिटर इन चीफ आहे.

पालघर मध्ये हत्या झालेलं प्रकरण असो , सुशांत सिंगचं आत्महत्या प्रकरण असो की अजून काही तो मिडिया ट्रायल घडवून आणतोय. त्याचा तो आविर्भाव, वर्तणूक, मी म्हणतो तेच खरं ई. लाईव्ह पाहताना मात्र आता किळस निर्माण होते. अर्णब गोस्वामी स्वतःला सध्या न्यायाधीश समजत असून कुणालाही जुमानत नसल्याचं चित्र आहे आणि हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीशिवाय शक्य नाही हे उघड आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक रसातळाला घेऊन जातो. त्यामुळे पत्रकार की कलाकार असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.

पत्रकारिता एक सन्माननीय क्षेत्र काम आहे. जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोचविण्याचे काम पत्रकार करत असतात. परंतु अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही हे मात्र पत्रकारिता कशी असू नये याचं ज्वलंत उदाहरण आहे."जसा जसा तो मोठा होत गेला, प्रसिद्ध होत गेला तसे आरोप ही त्याच्यावर होत राहिले.  २०१८ मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईनं आत्महत्या केली होती. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

विमानामध्ये एकपात्री विनोदी कलाकार (स्टँडअप कॉमेडियन) कुणाल कामरा याने अर्णव गोस्वामीशी अयोग्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर इंडिगो विमान कंपनीने सहा महिन्यांसाठी बंदी घातली. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

आपल्या शो मध्ये तो अरेरावी करतो, पक्षपात करतो असंही त्याच्या बाबतीत बोलले जाते. जस जसं वय वाढत जाते तसं तसं परिपक्वता वाढत जाते असं म्हणतात परंतु ४७ वर्षीय अर्णब च्या बाबतीत मात्र ते उलट आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख असो, कर्मचाऱ्यांशी उद्धवर्तन असो तो सतत चर्चेत आहे.  रिपब्लिक टीव्ही म्हणजे त्याची मक्तेदारी, सब कुछ अर्णब.

एकीकडे  त्याच्या चॅनेल ची टी.आर. पी. वाढत असताना एक एक जण त्याला सोडून जात आहे. अलीकडेच तेजिंदरसिंग सोधी यांनी त्याच्या नेटवर्क राम-राम ठोकला. राजीनामा पत्रात त्यांनी  अनेक धक्कादायक खुलासे केलेत. सर्वात मोठं नेटवर्क म्हणताना अनेक राज्यात साधा एक रिपोर्टर सुद्धा नाही.

पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित “रामनाथ गोयंका अवार्ड फॉर एक्सलंस इन जर्नालिझम” मिळवणारा, एक चांगला, अभ्यासू, सत्ताधार्याना धारेवर धरणारा ते बाष्कळ बडबड करणारा, आक्रस्ताळ करणारा, प्रखर हिंदुत्व जोपासणारा, भाजपा समर्थक, पत्रकारितेचे सारे संकेत तुडवणारा हे अधपतन क्लेशदायक आहे. पत्रकारितेची हत्या केल्याचं पाप मात्र त्याच्या माथी लागेल हे शाश्वत सत्य.

एकीकडे अर्णब विष ओकत देशाच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करत असताना रविश कुमार सारखा पत्रकार मात्र एक हाती किल्ला लढवतो आहे. देशासाठी महत्त्वांच्या मुद्द्यांवर बोलतोय.

लोकशाहीचा चौथा खांब डळमळीत झाला आहे. पेड पत्रकारिता सुरु झालीय. रविश सोडला तर बाकी सारे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला...मग सरकारला जाब कोण विचारेल? कोरोना ने अर्थव्यवस्था डळमळीत केलीय, अनेक बेरोजगार झालेत या विषयी कुणीच बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून कंगना, सुशांत, बॉलीवूड वगैरे सुरु आहे. लोकांचं मनोरंजन होईल. पण नुकसान होईल ते या देशाचं.

हे सर्व घडत असताना पत्रकारांच्या हक्कांचे आणि पत्रकारितेच्या नियमांचे संरक्षण करणारी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मात्र मूक गिळून गप्प आहे.

 

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

1 comment: