नेट-सेट हुलकावणी देत
होतं. भविष्य अधांतरी होतं. जॉब चा पर्याय म्हणून मी अभियांत्रिकी कडे वळलो. या
क्षेत्राबद्दल फार काही माहित नव्हतं. माझ्या काही परिचयातील काहीजण आधीच इकडे जॉब
करत होते. तो पर्याय मलाही खुणावत होता.
नेट पास नाही झालो तर काय? हाताशी काहीतरी पाहिजे. आणि अभियांत्रिकीकडे मार्गक्रमण
सुरु झालं. इकडे “बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल” अशी परिस्थिती. जे शिकलो त्याचा
काहीही संबंध नाही. आणि जे शिकवायचं आहे आहे ते कधीच पाठ्यक्रमात नव्हतं. अश्या परिस्थितीत
पाय रोवणे कठीण होतं. पण काय ना काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि सगळी
प्रक्रिया सोपी होऊन जाते. म्हणजे ते transition सोपं झालं. अश्या दोन व्यक्तींचा मला सहवास
लाभला. त्यांना बराच अनुभव होता. त्यांच्या सोबत राहून कित्येक गोष्टी कमी
कालावधीत शिकता आल्या आणि स्पर्धेत टिकता आलं. आपण परिपूर्ण नसतोच. आसपास ची लोकं
आपल्याला खूप काही शिकवून जातात. ज्या क्षेत्रात कधी काम करण्याची कल्पना ही केली
नव्हती त्या क्षेत्रात प्रवेश करायचा
होता.
माझ्या व्यावसायिक जीवनातील
ती पहिली व्यक्ती म्हणजे प्रा. अशोक घुगे.
प्रा. अशोक घुगे:
मुळचे सोलापूर कडचे.
नक्की आठवत नाही. विद्यापीठात असताना ओळख झाली ती वाचनालयात. एकाच विषयाचे
असल्याने कनेक्टिंग पोइंट होताच. मला सिनिअर. त्यामुळे आम्ही सर च म्हणतो त्यांना.
पुढे कधीतरी त्यांच्या सोबत काम करेल असं वाटलं नव्हतं. जबरदस्त माणूस. प्रचंड
सकारात्मक दृष्टीकोन असणारा. हाय-बाय
वगैरे नेहमीचं असायचं. गरिबीतून संघर्ष करून पुढे आलेला.
मला जॉब हवा होता.
शोधाशोध सुरु असायची. एकदा त्यांच्याकडून असं समजल कि ते काम करत असलेल्या महाविद्यालयात
एम.ए. इंग्लिश उमेदवार पाहिजे म्हणून. आतापर्यंत बरेच उमेदवार येऊन गेलेत पण ते
सारे रिजेक्ट झाले. त्या वेळेस चे डायरेक्टर फार खतरनाक होते असं ऐकिवात होतं
त्यांच्याकडून. असलं काय विचारात असतील मुलाखतीत कि बरेच जण रिजेक्ट झाले. माझी
उत्सुकता ताणली गेली. जॉब पाहिजे होता.
तिथे मुलाखतीला जायचंच असं ठरलं. तिथे फोन केला. ते म्हटले, “येऊन जा”. श्रीमंत सर
सोबत होते. बाईक ने आम्ही त्या महाविद्यालयात पोचलो. डायरेक्टर बिझी होते. वेळ
होता. अशोक सरांना सांगितलेलं नव्हतं. तरी पण भेट झालीच. इकडच्या-तिकडच्या गप्पा
झाल्या. एका शिपायाने तुम्हाला मध्ये बोलावलं आहे असा निरोप दिला. मी अशोक सरांना म्हटलं, “सर, बाहेर येईल तर ऑफर लेटर च
घेऊन येईल.” त्यांनी स्मितहास्य दिल. अतिआत्मविश्वास आणि मी हे कायमचं समीकरण.
त्या अतिविश्वासाने कित्येकदा कामंही झालीत तर कधी दगा ही दिला. तो अतिआत्मविश्वास
नको त्या ठिकाणी नडला आयुष्यात आणि त्याची किंमत ही चुकवावी लागली. पण मी तो काही
सोडला नाही. तीच माझी आईडेनटीटी (Identity). मूळ स्वभाव तो. त्यात नाही बदल करता येत. मी तसा
कधी प्रयत्न ही केला नाही. असो.
मी आतमध्ये प्रवेश केला
आणि मुलाखत सुरु झाली. साहेबांचा पहिलाच प्रश्न -दहावीतून मुलं तंत्रनिकेतन ला
आली. नवीन आहेत. शिकवा त्यांना ते समोर बसले आहेत असं समजून. मी सुरु झालो ते
थांबवेपर्यंत. थोडावेळ ते शांत होते. काहीतरी करत होते. ते संपवून त्यांनी
माझ्याकडे पाहिलं आणि साहेबांचा दुसरा प्रश्न “किती पगार हवाय,”. बोलणी झाली.
थोड्या वेळात ऑफर लेटर मिळालं आणि बाहेर पडलो. (संभाषण ईंग्रजी मध्ये होतं.
भाषांतर केलंय.)
तिथून पुढचे तीन-चार
महिने अशोक सर आणि मी हा अध्याय सुरु झाला. मला त्यातलं फार काही माहिती नव्हतं.
अशोक सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. ते
महाविद्यालय उंचावर आहे. नैसर्गिक सान्निध्य लाभलंय. रूम च्या बाहेर डोकावलं कि
जंगल..उतार आहे.
त्यांना पुस्तके खरेदी
करण्याचा शोक. वाचलेत कि नाही ते माहित नाही. पण रूम ला आलो कि कुठलही पुस्तक
घ्यायचं आणि वाचायचं काहीतरी. कधी कधी मी ते पुस्तकं चाळत होतो.
मी बोलायला फटकळ.
समोरच्याला काय वाटेल याची कधी चिंता केलीच नाही. ते नेहमी मला सांगत राहिले. समोरच्याला फक्त दोन-चार
चांगल्या शब्दांची गरज असते. आपण तेच करायचं. त्यांच्या भाषेत-Satisfy the ego
of others. मला ते फार
काही जमलं नाही पण प्रयत्न केला थोडा फार.
त्यांची वक्तृत्व शैली
चांगली. मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व. साधारण तीन-चार महिने त्यांच्यासोबत होतो.
कलीग, रूम मेट. सुटी असली कि सोबत पुण्यात फेरफटका असायचा. चित्रपट, हॉटेलिंग
वगैरे कित्येकदा सोबतच. सकाळी उठून माझ्यासाठी चहा करणारा हा माणूस. भविष्याचा
गप्पा कित्येकदा व्हायच्या. आमच्यात व्यवहार कधी आला नाही.
पण एक प्रभावी
व्यक्तिमत्त्व. सेटल होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. तासनतास अनुभवांची
देवाण-घेवाण झाली. आता आमच्यात सारं काही
आलबेल होतं असंही नाही. पण त्यांनी कधी ते मनाला लावून घेतलं नाही. मला नाही पटलं
तर मी ते सरळ सांगत होतो. त्यांनी ही ऐकून घेतलं. चर्चेतून मार्ग काढण्यावर
त्यांचा भर. माझं उलट होतं. तुटेपर्यंत तानल्याशिवाय जमत नव्हतं. पण त्यांनी
सांभाळून घेतलं.
पण त्या कालावधीत जी
सकारात्मक उर्जा निर्माण झाली ती महत्त्वाची. यश-अपयश यावर कित्येकदा चर्चा झाली. त्यांची स्वप्ने प्रचंड. स्वप्न पाहायला का
पैसे लागतात असं ते म्हणायचे. भन्नाट माणूस आहे हा. टिप-टाप राहणीमान. गळ्यात एक
bag अडकवलेली. एखादी गोष्ट समोरच्याला कशी पटवून द्यावी हे त्यांच्याकडून शिकावं. कुठलीही
समस्या आली तर निराश न होता चालत राहतो. स्वबळावर केलंय सारं. नसरापूर च्या मंदिराला भेटी दिल्यात अधून-मधून.
शेवटचा संपर्क कधी झाला
आठवत नाही. पण माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुरुवातीची दिशा त्यांनीच दिली. त्या
महाविद्यालयात माझं मन काही रमलं नाही आणि सुरु झाला दुसरीकडे जाण्याचा प्रवास.
चार महिन्यातून मी तेथून एक्झिट केलं कित्येक सार्या आठवणी घेऊन.
No comments:
Post a Comment