Sunday, August 30, 2020

गिग इकॉनॉमी (Gig Economy) म्हणजे काय?

अलीकडे व्यापाराचे स्वरुप बदलते आहे. जॉब चे स्वरूप बदलत आहेत. प्रत्येक कंपनी पैसे कसे वाचतील याचा विचार करते म्हणजे नफ्याचा विचार करते. प्रत्येक कामासाठी नवीन उमेदवार नियुक्त करणे  कंपनीला सुद्धा परवडणारे नाही. शोर्ट टर्म प्रोजेक्ट असतील, छोटे-मोठे काम असेल तर नवीन नियुक्ती करणे तोट्याचा सौदा. त्यामुळे नवीन नवीन शक्कल कंपन्या लढवत असतात. गिग इकॉनॉमी हा त्यातील एक प्रकार. त्याला टास्क इकॉनॉमी असेही म्हटले जाते. गिग इकॉनॉमी म्हणजे फ्री मार्केट सिस्टम. गिग हा शब्द स्लँग असून त्याचा अर्थ म्हणजे ठराविक कालावधीसाठी असणारे एखादे काम.  गिग हा शब्द संगीतकार वापरतात.

त्यात  कंपनी एखादे काम ठराविक कालावधीत व्यावसायिकाकडून करून घेते. त्यांचा करार असतो. ठराविक कालावधीत ते काम पूर्ण झाले की त्या व्यावसायिकाचा त्या कंपनीशी काही संबंध राहत नाही. अनेक लोकांना एखाद्या कंपनीत आयुष्यभर राहणे कदाचित आवडत नसेल तेव्हा ते फ्री-लान्सर म्हणून असे काम  किंवा प्रकल्प पूर्ण करून देतात कंपन्यांना. यात त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य असते. कंपनीत जायची गरज भासत नाही. असेल त्या ठिकाणाहून ते काम पूर्ण करतात. काम पूर्ण केल्यानंतर करारानुसार त्यांना त्यांचे देयक मिळते. भारतात सुद्धा गिग इकॉनॉमी जोर धरू पाहत आहे. डेटा अॅनालिटिक्स, कंटेंट रायटिंग, भाषांतर, निवड, विक्री, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्किटेक्चर, अकाउंटिंग, कन्सल्टिंग असे अनेक गिग जॉब्ज दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. कंपन्या आपले प्रकल्प आऊटसोर्स करत आहेत. 

गिग इकॉनॉमी  च्या विस्तारामागे अनेक कारणे आहेत. अनेकांना आपण करत असलेल्या कामाचा कंटाळा येऊ शकतो किंवा कंपनीत वेळेवर वेतन न मिळणे, प्रमोशन न मिळणे, वेतन न वाढणे  असे अनेक करणे असू शकतात ज्यामुळे लोकं या क्षेत्राकडे वळत आहेत. या शिवाय ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे ते असे अनेक जॉब्स एकाच वेळी करत असतात. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी. एकाच वेळी असे व्यक्ती अनेक कंपन्यांशी सबंधित असतात. त्यांच्या कामात लवचिकता असते. त्यांना मिळणारे काम अल्प किंवा दीर्घ काळासाठी असू शकते.

ज्यांना खूप परिश्रम करण्याची सवय असते त्यांच्यासाठी हे लाभदायक क्षेत्र. आजकाल अनेक कंपन्या अश्या कामाची संधी देत आहेत. कंपन्यांना सुद्धा कौशल्य असलेल्या लोकांकडून काम पूर्ण करवून घेता येते.

आजकाल अनेक वेबसाईट गिग जॉब्ज च्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यात ओला, उबेर, अमेझॉन अश्या अनेक कंपन्या आहेत.



प्रगत राष्ट्रांमध्ये गिग इकॉनॉमी वेगाने विस्तारत आहे. कौशल्य असणाऱ्या लोकांना प्रचंड स्कोप आहे. पारंपारिक नोकऱ्यांच्या मागे न जाता या क्षेत्रात सुद्धा करिअर करता येऊ शकते. गरज आहे ती कौशल्यांची.  तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून काम करता येऊ शकते. येत्या काही वर्षात गिग जॉब चे प्रमाण प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने याकडे संधी म्हणून बघितले पाहिजे. बदलत्या काळाशी जुळवून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण  अडगळीत पडणार नाही.

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव


Thursday, June 18, 2020

स्टँड-अप कॉमेडीची व्याख्या बदलणारा कपिल शर्मा


कपिल शर्मा...घराघरात पोचलेलं लोकप्रिय नाव...प्रत्येकाला कपिल शर्मा हे नाव माहित झालंय...एवढं यश यापूर्वी कोणत्या कॉमेडीयन ला मिळालं नाही.
स्टँड-अप कॉमेडी करणारे अनेक आहेत भारतात. त्यात भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, राजू श्रीवास्तव, सुनील ग्रोव्हर, अली असगर, सुनील पाल, जॉनी लिव्हर असे अनेक स्टँड-अप कॉमेडी करणारे कलाकार आहेत. त्यात कपिल शर्मा याने आपला वेगळा ठसा उमटवला...
२००७ द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्याने पदार्पण केलं...आणि विजेता ठरला....तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलं नाही...त्याआधी त्याने “हसदे हसांदे रहो” या पंजाबी शो मध्ये काम केलं होतं...
सोनी टीव्ही च्या कॉमेडी सर्कस च्या सहा सिझन मध्ये त्याने सहभाग घेतला आणि प्रत्येक सिझन चा विजेता ठरला... ‘झलक दिखला जा’ हा डान्स शो होस्ट केला...
२०१३ मध्ये त्याने स्वतःचा “कॉमेडी नाईट विद कपिल” हा शो कलर्स वाहिनीवर सुरु केला....त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला...
‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रसारित होऊ लागला त्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला...
तो तिथेच थांबला नाही तर विविध अवार्ड शो सुद्धा होस्ट करू लागला... ‘किस किस को प्यार करू या चित्रपटातून त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं...
सध्याच्या घडीला कपिल शर्मा  आघाडीचा कॉमेडीयन आहे. अल्पावधीत त्याने या क्षेत्रात नाव कमावलंय.
त्याची संवादफेक आणि त्यातून निर्माण झालेला विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतो...हसायला भाग पाडतो.
कमरेखालचे विनोद, पांचट विनोद हि आपल्याला पाहायला मिळतात पण म्हणून एक यशस्वी कॉमेडीयन म्हणून त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही.
सुरुवातीला कॉमेडीयन  आणि प्रेक्षक एकमेकांसमोर असायचे. तंत्रज्ञानाचा जसा-जसा वापर वाढत गेला तसा स्टॅण्ड-अप कॉमेडी चा प्रसार होत गेला. यू-टय़ुब च्या माध्यमातून व्हिडीओ अपलोड करणे सुकर झालं.  खरं तर स्टॅण्ड-अप कॉमेडी हा अमेरिकेत उदयास आला आणि त्याचा इतर देशांमध्ये प्रसार झाला. मनोरंजन हा त्याचा मूळ उद्देश. हे क्षेत्र आता व्यावसायिक झालंय. अमाप पैसा मिळू लागलाय. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांची संख्या हि वाढली आहे.

प्रेक्षकांना खीळखिळून हसवणं सोपं नाही. त्यासाठी प्रसंगावधान, आसपास चालणाऱ्या घडामोडी यावर लक्ष ठेवावं लागतं. वेळेवर उद्भवणाऱ्या प्रसंगावर विनोद करता यायला  हवा, व्यंग जमलं पाहिजे. सोबत भाषेवर पकड, body language , चेहऱ्यावरचे हावभाव त्याला अनुसरून असले पाहिजे.  हे सारं जुळून येण्यासाठी प्रचंड मेहनत. आणि तेच कपिल शर्माने केलंय.
स्टँड-अप कॉमेडी हा कलाप्रकार त्यानं सामान्यांपर्यंत पोचवला असं म्हणायला हरकत नाही.
स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्यांनी कपिल शर्मा चं उदाहरण समोर ठेवून शिकावं.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Wednesday, June 3, 2020

गुंतागुंत


नेहमी...कायम...सातत्याची...अखंड...अविरत...कितीही प्रयत्न करा बाहेर पडायचा...गुंता काही सुटत नाही....
तो कशाचाही असो मग...भावनिक...व्यावहारिक...आर्थिक...राजकीय अथवा सामाजिक....प्रत्येक ठिकाणी ती गुंतागुंत...
गोष्टी सोप्या करायला जावं तर कठीण होऊन बसतात...सोडून दिलं कि गुंता अधिकच वाढत जातो...कशा-कशातून सुटका करावी?
स्पष्ट बोललं कि गुंता सुटतो पण नाती तुटतात...नाती टिकवायला गेलं कि गुंता वाढत जातो...फसगत होत राहते नेहमी.....मग निमुटपणे सहन करत राहायचं....
आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत...त्या अपेक्षांची पूर्ती करणं कित्येकदा शक्य होत नाही...त्यातून सुरु होते आपली प्रतिमा हनन....भूतकाळातले अनुभव आपली पाठ सोडत नाही आणि वर्तमान जगू देत नाही अशी अवस्था....
जेव्हा जेव्हा हि बंधने झुगारण्याचा प्रयत्न करावा, आसपास ची लोकं आडकाठी करायला सुरु करतात....समाजाला अपेक्षित जगावं कि स्व-इच्छेने ...द्वंद...गुंतागुंत....इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती...
विचारप्रणाली...डावी...उजवी कि अजून कुठली...माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी विचारधारेचा आधार लागतो असंही म्हटलं जातं बर्याचदा...
या जगात एकच विचारप्रणाली होऊ शकते ती म्हणजे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य...डाव्या...उजव्या या फंदात पडलं कि गोंधळ होतो...चुकीचं हि समर्थन करण्याची शक्यता असते किंवा असतेच...आजकाल ते सर्रास दिसून येते....मला हि विचारधारा आवडते म्हणून सारं काही बरोबर असं होऊ शकत नाही...
माणुसकी...माणूसपण हे विचारधारा होऊ शकत नाही का?
आज कुठे हि जा...लोकं सरळ-सरळ दोन गटात विभागले गेले आहेत....कुठलीही विचारधारा परिपूर्ण नाही...गुण-दोष आहेतच...त्यामुळे ते स्वीकारणं कठीणच...
मानवी कल्याणासाठी जो झटतो त्याची विचारधारा पहायची नसते… विचारधारा खायला देत नाही...पोटाचा प्रश्न सोडवत नाही...

गुंतागुंत आहे सगळी...नेमकं काय करावं हे सुचत नाही...आसपास चं वातावरण ही दिवसेंदिवस गढूळ होत चाललंय...निरागसता लोप पावत चाललीय....गोंधळ उडालाय विचारांचा सगळीकडे...सोपं...साधं...सरळ काही उरलं नाही...प्रत्येक गोष्ट किचकट होऊन बसली...गफलत होऊन बसली आहे...
हा गुंता कधीतरी सुटेल हीच काय ती आशा...

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव