Wednesday, June 3, 2020

गुंतागुंत


नेहमी...कायम...सातत्याची...अखंड...अविरत...कितीही प्रयत्न करा बाहेर पडायचा...गुंता काही सुटत नाही....
तो कशाचाही असो मग...भावनिक...व्यावहारिक...आर्थिक...राजकीय अथवा सामाजिक....प्रत्येक ठिकाणी ती गुंतागुंत...
गोष्टी सोप्या करायला जावं तर कठीण होऊन बसतात...सोडून दिलं कि गुंता अधिकच वाढत जातो...कशा-कशातून सुटका करावी?
स्पष्ट बोललं कि गुंता सुटतो पण नाती तुटतात...नाती टिकवायला गेलं कि गुंता वाढत जातो...फसगत होत राहते नेहमी.....मग निमुटपणे सहन करत राहायचं....
आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत...त्या अपेक्षांची पूर्ती करणं कित्येकदा शक्य होत नाही...त्यातून सुरु होते आपली प्रतिमा हनन....भूतकाळातले अनुभव आपली पाठ सोडत नाही आणि वर्तमान जगू देत नाही अशी अवस्था....
जेव्हा जेव्हा हि बंधने झुगारण्याचा प्रयत्न करावा, आसपास ची लोकं आडकाठी करायला सुरु करतात....समाजाला अपेक्षित जगावं कि स्व-इच्छेने ...द्वंद...गुंतागुंत....इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती...
विचारप्रणाली...डावी...उजवी कि अजून कुठली...माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी विचारधारेचा आधार लागतो असंही म्हटलं जातं बर्याचदा...
या जगात एकच विचारप्रणाली होऊ शकते ती म्हणजे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य...डाव्या...उजव्या या फंदात पडलं कि गोंधळ होतो...चुकीचं हि समर्थन करण्याची शक्यता असते किंवा असतेच...आजकाल ते सर्रास दिसून येते....मला हि विचारधारा आवडते म्हणून सारं काही बरोबर असं होऊ शकत नाही...
माणुसकी...माणूसपण हे विचारधारा होऊ शकत नाही का?
आज कुठे हि जा...लोकं सरळ-सरळ दोन गटात विभागले गेले आहेत....कुठलीही विचारधारा परिपूर्ण नाही...गुण-दोष आहेतच...त्यामुळे ते स्वीकारणं कठीणच...
मानवी कल्याणासाठी जो झटतो त्याची विचारधारा पहायची नसते… विचारधारा खायला देत नाही...पोटाचा प्रश्न सोडवत नाही...

गुंतागुंत आहे सगळी...नेमकं काय करावं हे सुचत नाही...आसपास चं वातावरण ही दिवसेंदिवस गढूळ होत चाललंय...निरागसता लोप पावत चाललीय....गोंधळ उडालाय विचारांचा सगळीकडे...सोपं...साधं...सरळ काही उरलं नाही...प्रत्येक गोष्ट किचकट होऊन बसली...गफलत होऊन बसली आहे...
हा गुंता कधीतरी सुटेल हीच काय ती आशा...

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

No comments:

Post a Comment