काळाच्या ओघात कित्येक गोष्टी/प्रसंग विस्मरणात गेल्यात...जात आहेत. कधीतरी तुटक-तुटक आठवतं. जे आठवलं ते लिहून टाकावं असं ठरवलंय. १५-१६ वर्षांपूर्वीचा प्रसंग. एम . जे. च्या होस्टेल राहत होतो पदविदरम्यान.
एकदा एका रूम मध्ये एन. सि. सि. कॅम्प साठी आलेली मुले थांबली होती. नववी अथवा दहावी ची असावीत कदाचित. नेमकं आठवत नाही. १०-१५ मुलं होती. ८-१० दिवस कॅम्प चालला त्यांचा महाविद्यालयात. कॅम्प झाल्यानंतर सर्व मुले निघून गेलीत. एक विद्यार्थी मात्र गेलाच नाही. कॅम्प कधीपर्यंत आहे आम्हाला काही माहित नव्हतं. काही असेल म्हणून तो थांबला असेल असं वाटलं. एक-दोन दिवस तो एकटाच दिसला. न राहवून त्याला विचारलं तर तो म्हटला जाणार आहे काही तरी काम आहे वगैरे. एकदा संध्याकाळी मी मेस मधून जेवण करून येताना हा प्रवेशद्वाराजवळ बसलेला दिसला. जेवला का रे? तो नाही म्हटला. फिस्ट होती. तरी त्याला मेस मध्ये घेऊन गेलो आणि जेवण द्यायला सांगितलं. पैसे माझ्या नावावर टाकायला सांगितलं.
दुसर्या दिवशी तो पुन्हा दिसला. त्याला विचारपूस केली. त्याची उत्तरे काही समाधानकारक नव्हती. काहीतरी गडबड आहे असं जाणवलं. कॅम्प ची माहिती घेतली. कॅम्प संपला असं कळाल होतं.
मग काय रात्री त्याला रूम मध्ये बोलावलं. आम्ही चार-पाच जण मिळून त्याला त्याचा पत्ता विचारला. तो काही सांगतच नव्हता. उडवा-उडवीची उत्तरे देत होता. त्त्याला त्याच्या घरी सोडून द्यायचे ठरले. त्याचं सर्व समान एका पिशवीत टाकून आम्ही मार्गस्थ झालो. पैसे वगैरे नसल्याने ऑटो वगैरे अशक्यच. रात्रीचे दहा-अकरा वाजले असतील. त्याला घेऊन आम्ही सोडवायला घेऊन गेलो. जळगाव मध्ये कुठल्या तरी नगरात. सुरुवातीला तो आम्हाला फिरवत राहिला. एवढं पायी फिरवलं पण खरं काही सांगत नव्हता. आमच्यापैकी एकाचा राग अनावर झाला आणि त्याच्या कानशिलात लगावली. तो रडायला लागला.
“मला घरी मारतील. मला घरी नेऊ नका. मी उद्या जाईल.” असं तो विनवणी करत राहिला. आम्ही मात्र ठाम होतो. त्याची आई दुसर्या पुरुषासोबत राहते एवढीच काय ती माहिती त्याने सांगितली. पण आमचा विश्वास नव्हता त्याच्यावर.
एका घरी घेऊन गेला पण ते ही त्याचं घर नव्हत. शेवटी दमदाटी करावी लागली. तेव्हा कुठे तो एका घराजवळ घेऊन गेला.
त्याची जाण्याची इच्छा नव्हती. बेल वाजवली. एक स्त्री आणि एक पुरुष बाहेर आले. त्याला तिथे सोडलं. दरवाजा बंद झाला. पण त्याचा रडण्याचा आवाज स्पष्टपणे बाहेर येत होता. त्या पुरुषाने त्याला बदडणे सुरु केलेलं. त्याने सांगितलेलं खरं वाटायला लागलं होतं. ती त्याची आई पण तो पुरुष त्याचा बाप नव्हता. आपलं चुकलं की काय? तो घरी जायला का तयार नव्हता? त्याचे वडील कुठे? त्याचं काय झालं? कायदेशीर घटस्फोट की अजून काही? त्याची आई या पुरुषासोबत कशी? हा सावत्र की अजून काय? पोटच्या पोराला अशी वागणूक देताना त्या स्त्री मधली आई कुठं गेली असेल? एवढ्या लहान वयात त्याला मिळणारे अनुभव कसे असतील?
या प्रसंगाने फक्त असंख्य प्रश्न निर्माण झालेत. त्याचं कुठलंही उत्तर मिळालं नाही. आम्ही तसा प्रयत्न ही केला नाही. रात्री येताना त्याच्यावर चर्चा करत रूम ला पोचलो. आपण योग्य केलं की अयोग्य...कुणास ठाऊक. पण तो प्रसंग मन हेलावून टाकणारा. पण कुणावरही असा प्रसंग येऊ नये. लहान वयात मनावर झालेले घाव/परवड विस्मरणात जात नाहीत.आयुष्यभर टोचत राहतात. तिच नकारात्मक प्रवृत्तीस कारणीभूत ठरते. ज्या वयात मायेची/प्रेमाची गरज असते, त्या वयात त्याच्या नशिबी आलेलं जीवन म्हणजे नशिबाने केलेली थट्टा. खेळण्या-बागडण्याचा, शिकण्याचा काळ. नशिबाने मात्र त्याच्यासमोर वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं.
त्याचा रडवेला, केविलवाणा चेहरा आजही मला आठवतो. तो मुलगा कुठे असेल...त्याचं काय झालं पुढे...शिकला की नाही. माहित नाही. आपल्या सुखासाठी मुलांना वार्यावर सोडणारे कित्येक उदाहरणे आस-पास आढळतात. त्यात त्या मुलांचा काय दोष. कोमेजल जातं बालपण, कोमेजल जातं तारुण्य. तथाकथित समाज मात्र फक्त मौन धारण करतो. सोयर-सुतक नाही कुणाचं कुणाला. आई-वडिलांच्या आधाराशिवाय जगणाऱ्या मुलाचं भविष्य काय? रस्त्याच्या, कडेला, बस-स्टोप जवळ, रेल्वे स्टेशन जवळ अनेक ठिकाणी कित्येक मुलं भिक मागताना दिसतात. कित्येकांच्या नशिबी येतं ते रस्त्यावरच आयुष्य. आपण कधी खोलात जात नाही. यांच्या अंगात काम नाही. फुकाच पाहिजे. त्यांना पैसे द्यायला नको. वगैरे वगैरे कमेंट्स आपण ऐकत आलोय.
आपल्यापैकी किती लोकांनी त्यांच्या आयुष्यात डोकावून पाहिलंय. कुणीच नाही. आपण फक्त मत व्यक्त करत असतो आसपास च्या परिस्थितीवर काही माहिती नसताना. आपल्यापैकी कित्येक त्यांना तुच्छतेची वागणूक देतात, हेटाळणी करतात. आणि दोन-चार पुस्तके वाचली की पुन्हा मानवतावाद, समाजसेवा याबद्दल चर्चा करायला मोकळे.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव
Superbbb..����
ReplyDelete