आपण समाजशिल आहोत. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही असं पूर्वीपासून ऐकत/वाचत आलो. विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांची गरज भासते. त्या गरजेतून कदाचित भाषेचा शोध लागला असेल. विज्ञान प्रगत नसल्याने जगभरात वेग-वेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या असाव्यात. या शतकात विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतल्याने जग जवळ आलं. आदान-प्रदान होऊ लागलं. एकमेकांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण झाली.
संवादाची साधने प्रचंड वाढली पण संवाद कमी झाला. एकमेकांशी बोलणं सोडून मोबाईल, टी. व्ही. कंप्युटर सोबत खेळणं सुरु झालं. पूर्वी संवादाची साधने नव्हती म्हणून पत्र व्यवहार चालायचा. कधी-तरी भेट व्हायची. आम्ही दोन-तीन मित्र सातत्याने पत्र व्यवहार करायचो कारण फोन घेण्याची ऐपत नव्हती.
स्पर्धेमुळे पुढे मोबाईल फोन सर्व-सामन्यांच्या आवाक्यात आला आणि पत्रव्यवहार बंद झाला. आपण फोन चा वापर करू लागलो. सुरुवातीला काही दिवस संपर्क झाला. नंतर तो हळू-हळू कमी होत गेला आणि आता तो काम पडेल तेव्हा वर येऊन ठेपला आहे. तो ही काही मिनिटांकरिता, सेकंदाकरिता.
कधी फोन केलाच, तर मी जेवतोय, बाईकवर आहे, कामात आहे, मिटिंग मध्ये आहे, मुव्ही पाहतोय नंतर बोलतो असे संवाद कानावर येतात. “नंतर” कधी याचा उलगडा कधी होत नाही. नंतर कधी उगवत नाही. सोशल नेटवर्किंग (फेसबुक, ट्विटर, इंस्ताग्राम), यु-ट्यूब, टिक-टोकं यात वेळ जाऊ लागलाय. जाईल तिथे आसपास काय चाललंय ते अथवा निसर्ग सौंदर्य अनुभवण्या ऐवजी फोटो, सेल्फी काढण्यात आणि लागलीच अपडेट करण्यात मग्न आपण. नेमकं काय चाललंय. सारे अनभिज्ञ.
असंच एकदा एका मित्राचा मेसेज आला काही वर्षांपूर्वी. डायरीमध्ये कुठंतरी लिहून ठेवला होता. आज पाने उलटवत असताना तो नजरेस पडला. तो असा ...”डू यु रियली थिंक वुई आर अलाइव?” वाचून मी काही उत्तर दिलं नव्हत. फक्त एका कागदावर जे वाटतं ते लिहित गेलो...
...तुझ्या प्रश्नांचे उत्तर देणे तसं अवघड...तेवढेच सोपे...पण जाणूनबुजून अवघड करण्याचा प्रयत्न. तरी सुद्धा उत्तर मिळेल की नाही मला खात्री नाही. कारण खात्री हा शब्दच जीवनातून हद्दपार झालाय...उरली फक्त आशा...कधीही नं संपणारी...सतत आपले अस्तित्व कायम ठेवणारी...काही करण्यास प्रवृत्त करणारी...परिणाम काहीपण असेल. अंधारात निशाना साधण्याचा तो प्रकार. खांडेकर म्हटले...”माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो. माणूस स्वप्नांवर जगतो, मग ती स्वप्ने कितीही असंभाव्य असोत.”
या वाक्याचा पुरेपूर अनुभव घेतोय. किंबहुना जीवनाचा एक भाग झालाय.
तुझा मेसेज अनपेक्षित नव्हताच. एकेकाळी तासंतास असलेला संवाद लुप्त झालाय. काळाच्या ओघात बरीच समीकरणे बदलतात. त्यात काही वावगे नाही. तो निसर्ग नियम.
समाज...एक विचित्र संकल्पना. जेव्हा-जेव्हा आपण संकटात असतो, त्यावेळी तो बघ्याची भूमिका बजावतो. तो कधी आपल्या मदतीला येत नाही. तोच समाज आपण यशस्वी झाल्यानंतर आपल्या मागे असतो. दूर गेलेले आपल्याशी संबंध जोडू पाहतात या ना त्या कारणाने. समाजाची भूमिका स्वार्थानुसार बदलते. तरी आपण समाजाचा विचार करतो. पण समाज आपला विचार करतो का? नाहीच...
त्यावेळी माझ्या मित्राला पडलेला प्रश्न आता पडत नाही. मलाही नाही. संवाद लुप्त झालाय. विचारांची देवाण-घेवाण मर्यादित. कधीतरी भेट. भेटीत वेगळ काही प्लानिंग करायचं तर परवानगी घ्यावी लागते.
पूर्वीसारखं कुठलं नवीन वाचन नाही, त्यावर चर्चा ही नाही.
पुढच्या महिन्याची एक तारीख कधी उजाडते आणि पगार कधी जमा होतो एवढी काय ती चिंता. होम लोन, पोलिसी असे कित्येक ई.एम.आय. येणारा पैसा आणि लागणारा पैसा याचं गणित कधी जुळत नाही. एवढंच सुरु आहे फक्त.
मोठी –मोठी स्वप्ने हवेत विरली. जे करायचं होतं ते राहून गेलंय. जे विचाराधीन होतं वाहून गेलंय. विसर पडलाय. वेळ...बदलली की माणूस बदलतो. झालं गेलं गंगेला मिळालं. मी तोच का? असा प्रश्न कित्येकदा पडतोय.
जग व्यवहारावर चालते असं कधीतरी वाचनात आलेलं. त्यावेळी त्याचा अर्थ लागला नाही. आता तो प्रत्येक पावलागणिक तो दिसतोय. व्यवहार...कोणता आणि कसला? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा प्रवेश कधीच झाला.
संबंध ही आजकाल व्यापार झालाय ...जिथे भावनांना थारा नाही...असतो तो फक्त लाभ.
आज सारं काही बर्यापैकी आहेत. समस्या आहेत पण तिव्रता कमी आहे.
साध्या दोन रुपयाच्या चहासाठी करावी लागणारी तळमळ...खटाटोप,संघर्ष आता बंद झालाय.
स्वतंत्र असल्याची जाणिव असताना आजूबाजूला किती बंधने निर्माण झाली समजलंच नाही.
जेव्हा खाण्याची सोय नसते तेव्हा प्रत्येक व्यक्ती भरारी मारण्याचे स्वप्न पाहतो. पण पोटाचा प्रश्न मिटला की कित्येकांची भरारी घेण्याची उमेद तिथेच संपते. आपलं ही तेच झालंय. या गर्दीचा एक भाग...
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव
No comments:
Post a Comment