व्यक्तिविशेष:
(पूर्वार्ध)
पुणे विद्यापीठात शिकत असताना अनेक व्यक्तींशी
संबंध आला. त्यातले काही कायम लक्षात राहिले कुठल्या ना कुठल्या कारणाने.
प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण. प्रत्येकाची आपली स्वतंत्र शैली होती, आचार-विचार वेगळे होते.
एवढ्या सार्या भिन्नता असूनही कुठल्यातरी धाग्याने आम्ही बांधले गेलो. आठवणीत
असलेल्या व्यक्तींबद्दल लिहावेसे वाटले. प्रत्येकाबद्दल लिखाण शक्य नाही किंवा
माझ्या शब्दांच्या मर्यादा आहेत. त्यातील काही -
१ श्रीकांत मिश्रा:
हिंदी विभागाचे विद्यार्थी.कधीपण हातात दोन-तीन
पुस्तके असायची. हिंदी मध्ये बोलायचे. मराठी समजते आणि बोलता पण येते. आमचा संवाद
हिंदीत असायचा. त्यांच्यामुळे आम्हीही हिंदी मध्येच बोलायचो. उंच, तब्बेतीन हि सुदृढ पण
साध-सरळ व्यक्तिमत्त्व. त्याचं चालणं म्हणजे पळण्यासारख. सकाळी लवकर उठून व्यायाम
करणे आणि जयकर कडे प्रस्थान करणारं व्यक्तिमत्त्व. डोक्यावरच्या समोरच्या भागातील
केसांची गळती स्पष्ट दिसत होती. उरलेल्या केसांची मात्र ते कुठलंतरी लाल रंगाचं
तेल वापरायचे मालिश करताना. आमच्यासाठी तो थट्टेचा विषय. मुळचे उत्तरप्रदेशचे.
मुंबईत आले आणि नन्तर इथे. प्रचंड संघर्षमय जीवन. पण त्याची वाच्यता नाही.
येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची वृत्ती. ओपन मधील विद्यार्थ्यांना
नेट पास होणे मम्हणजे मोठी कसरत. अपयश येत असताना आम्ही त्याना पाहिलंय, अनुभवलंय. त्यांचा चेहरा
सर्व काही सांगून जायचा. पण पुन्हा त्याच चिकाटीने ते अभ्यास करायचे, पेटून उठायचे. प्रंचंड
ज्ञान असूनही यशाने त्यांना हुलकावणी दिली. पण माणूस डगमगला नाही. हाल-अपेष्टा सहन
करून पुढे जात राहिला. असं खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. सोशल नेटवर्किंग
खूप. इतर विभागाचे विद्यार्थी, कॅन्टीन, मेसवाले हि त्याना ओळखायचे. जयकर ग्रंथालयात
त्यांची अभ्यासाची जागा ठरलेली. कधी तरी नजर गेलीच तर सुवाच्च अक्षरातील त्यांच्या
नोट्स लक्ष वेधून घ्यायच्या. सारं कसं शिस्तबद्ध. कायम टी-शर्ट वर असायचे.
आमच्यासाठी ते मार्गदर्शक.
मी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर
त्यांच्याशी संपर्क आला तो कमवा आणि शिका या योजने-अंतर्गत. या योजनेत अनेक
विद्यार्थी सहभागी असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असणार्यांसाठी पुण्यात जगण्याचा
आणि शिकण्याचा एक चांगला मार्ग. भरपूर विद्यार्थी या योजनेत काम करत असल्याने ते
वेगवेगळ्या ग्रुप विभागले जायचे. त्या ग्रुप चा एक लीडर अशी रचना. मी यांच्या
ग्रुप मध्ये होतो. जेमतेम १५-२० विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्ये. सकाळी सहा वाजता
आमचं काम सुरु व्हायचं. काम काय तर फिजिक्स विभाग आणि जयकर वाचनालय स्वच्छ करायचं.
हातात झाडू घेतला कि तो किमान अडीच तास तरी सुटायचा नाही. पुणे विद्यापीठात
झाडांची संख्या खूप असल्याने पाला-पाचोळा खूप असायचा. सुरुवातीला झाडू हातात घ्यायची
लाज वाटत होती परंतु ते नित्याचेच झाले होते. कित्येकवेळा आमच्या वर्गामधील
मुलं-मुली हाय-बाय करायच्या. आपल्या हातात झाडू आणि ते कॅन्टीन ला वगैरे नाश्ता
करायला जात असत. एक वेगळीच भावना असायची मनात. पण पर्याय नव्हता.
मिश्रा सर ग्रुप लीडर असूनही आमच्या सोबत काम
करायचे. त्याना ते करण्यात आनंद वाटत होता. काळानुसार आमच्यात हि बदल झालेत.
त्यांच्याकडे पाहून आम्हीही बिनधास्त झालो. तसं ग्रुप लीडर ने काम नाही केलं तरी
काही हरकत नव्हती किंवा त्यांनी फक्त काम करून घ्यायचं असं होतं. पण याचं
व्यक्तिमत्त्व वेगळ होतं. आमच्यात ते मिळून-मिसळून राहायचे. त्याचं वाचन अफाट.
त्यांच्या जीवन जगण्याच्या ठराविक संकल्पना. सत्याचे पुरस्कर्ते. परखड
व्यक्तिमत्त्व. हिंदी विभाग म्हणजे त्यांच्या एकतेसाठी ओळखला जायचा. जेवताना सगळे
एकत्र. कित्येकवेळा आम्ही सोबत रूमला खिचडी करत असायचो. जेवतानाची ती मजा काही
औरच. वेगवेगळ्या विषयांवरून मी त्याना चिडवत होतो. मुलींसोबत दिसले कि रात्री रूम
ला टिंगल ठरलेली असायची.
एम.फिल ला असताना आम्ही भरपूर दिवस एकाच
रुममध्ये. अनुभवांची देवाण घेवाण होत राहिली. एकमेकांचा जीवन प्रवास ठाऊक होता.
खेचा-खेची कायम चालायची. मी टीका करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. ते सर्व
त्यांनी कधी मनाला लाऊन घेतलं नाही किंवा तसं झालं असले तरी कधी बोलून दाखवले
नाही. एकदा त्यांच्या मोबाईल मधले मेसेज मी त्याना न कळत वाचून काढलेत. त्याना
कळल्यावर प्रंचड राग आला होता. नंतर मात्र सुरळीत सुरु राहिलं. त्याचं नियोजन
ठरलेलं असायचं. ठराविक पैश्यांमध्ये महिना निघून जायचा. आमचं उलट होतं. पैसे आले
कि आमची उधळपट्टी सुरु. त्यांनी कित्येक वेळा उपदेशाचे डोस पाजले असतील पण
आमच्यावर कधी फरक पडला नाही किंवा समजून आम्ही पाडून घेतला नाही. आम्ही त्याना बडे
भाई म्हणत होतो. कित्येक आंदोलनामध्ये सहभाग. स्पष्टवक्ता असल्याने कायम विद्यापीठ
प्रशासन विरोधी. त्यांच्या विभागात त्याच्या ज्ञानाबद्दल तोड नव्हती. आपल्या
विषयात पारंगत. चर्चा-टिंगल-टवाळी नेहमीची असायची. आम्ही सगळे नेट -सेट चा अभ्यास
करत होतो. कित्येक वेळा अपयश आलं असेल पण जिद्द मात्र होती. निकालाची चिंता न करता
त्यांचा अभ्यास सुरु असायचा. जयकर ला कधी दांडी मारली नाही. कालांतराने आम्ही सगळे
नेट पास झालो. प्रत्येकाची जगण्याची दिशा बदलली आहे. ते पुण्यात आहेत. जॉब सुरु
आहे. अधून-मधून संपर्क असतो. विद्यापीठात श्रीकांत मिश्रा ये नाम हि काफी है.
त्यांच्या लग्नाला जाता आलं नाही उत्तरप्रदेशात. त्यांनी खूप शिव्या हासडल्या मला.
खंत आहे नक्कीच. सर आपने हि हमे सत्य के मार्ग पर चलने को कहा और जो तत्त्व आपने
सिखाये वो आज भी याद है.
2 नामदेव पवार:
नामदेव पवार हे दुसरं व्यक्तिमत्त्व. मुळचे
लातूरकडचे. आमचा संपर्क आला तो पाच नंबरच्या होस्टेलला. ओळख होतीच. ओळख
म्हटल्यापेक्षा विरोध असणारं नातं. त्याला कारणेही होतीच. एकमेकाला समजायला बराच
वेळ गेला. पवार सर म्हटलं कि कुठल्याही विषयवार पोट-तिडकीने बोलणारा माणूस. अभ्यास
चांगला-विषयाचं ज्ञान चांगलं पण नेट परीक्षेने कित्येक वेळा हूल दिली. नेहमी
तिसर्या पेपर मध्ये ८०-८८ च्या दरम्यान गुण. पास व्हायाल नव्वद ची आवश्यकता. अपयश
कसं पचवायचे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. ती वेदना कुणीच समजू शकत नाही. तिची
तीव्रता हि शब्दांच्या पलीकडे. पण या माणसानं जिद्द सोडली नाही यश मिळेपर्यंत.
राज्यशास्त्र विभागाचं एक वैशिष्ट असायचं ते म्हणजे जो कोणी त्या विभागात प्रवेश
घ्यायचा तो काही दिवसात स्वतःला राजकीय तज्ञ समजत होता. जसं-काही
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयाची जाण फक्त त्यांच्याकडे. त्यामुळे कित्येकांचा पाहण्याचा
दृष्टीकोन तसाच असायचा. पवार सर मात्र त्याला अपवाद ठरले. मी त्यांच्या
सान्निध्यात आल्यानंतर खर्या अर्थान त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख झाली. त्याना
कित्येक विषयांची समज होती. आपल्या विषयात ते पारंगत होते. त्यांच्या बोलण्यातून
ते नेहमी जाणवत राहायचं. वेळप्रसंगी ते विभागाविरोधात हि जायला घाबरले नाहीत.
इतरांसारखे लांगुल-चालन हि त्यांनी केले नाही. स्वतःची प्रतिमा नेहमी कायम ठेवली.
आंदोलनामध्ये हि त्यांचा सहभाग असायचा. त्याआधी आमच्यात सौदाहार्याचे नाते नव्हते.
एकदा काय झालं कि राज्यशास्त्राच्या एका मुलासोबत आमच्या विभागातील एक मुलगी सोबत
फिरत होती. मी पुढाकार घेऊन त्या मुलीला समजावलं. अर्थातच इतर अजून हि सोबत होते.
पण हे सगळं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना खटकलं. तिथूनच तो विरोध सुरु झाला
ते एम.ए. होईपर्यंत. माझे एक सिनिअर ज्ञानेश्वर चोथवे यांच्या ग्रुप चे. त्यांच्या
माध्यमातून माझा पवार सरांशी संबध आला. विचारांची देवाण-घेवाण सुरु झाली. समज-
गैरसमज गळून पडले होते. कित्येकवेळा आम्ही सर्वजन गडांची किंवा पुण्याच्या आसपास
भटकंती केली. ते क्षण खरंच अनमोल आहेत. आणि तोरणा गडाकडे जाताना झालेला अपघात कसा
विसरणार. आम्ही दोघेही पडलो होतो. ते चालक आणि मी मागे बसलेलो. गाडीचं थोडं नुकसान
झालं होतं पण जीवनात मानसं महत्त्वाची आहेत. वस्तूंमध्ये माझा जीव कधीच नव्हता आणि
आजही नाही. पवार सरांनी नंतर भरपाई म्हणून पैसेही दिलेत. ते मला नको होते. पण मी
नाही म्हणू शकलो नाही त्याची खंत आहे. जयकर मधील त्यांच्याबद्दल च्या खूप आठवणी
लिहिता येतील. पण त्या इथे अनावश्यक आहेत.
मी पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर अधून-मधून
संपर्क झाला. त्याचं व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहिलं. सचिन तू एक पुस्तक लिही
असं बर्याचदा म्हटले ते. मी कित्येक मित्रांच्या लग्नाला गेलो नाही. पण त्यांच्या
पत्रिकेची वाट बघतोय. कारण जायचं आहे. भेटायचं आहे. आता कुठल्यातरी महाविद्यालयात
जॉब सुरु आहे त्यांचा.
काही लोकं शोधून सापडत नाहीत. हवा तसा सहवास
नेहमीच मिळत नाही. पण काही लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या काहीतरी शिकवून
जातात. मिश्रा सर आणि पवार सर दोघेही माझ्या पेक्षा वयाने मोठे. दोघांच वैशिष्ट
म्हणजे त्यांनी कधी चाटुगिरी केली नाही. विद्यापीठात चाटुगिरी करण्याची आणि मिळेल
ते पदरात पडून घेण्याची खूप मोठी परंपरा आहे. हे त्याला अपवाद. मोठे असून त्यांनी
मला सांभाळून घेतलं. माझ्या चुका दुर्लक्ष केल्या. आपल्यासोबत झालेल्या चर्चेने
मला स्वतःची प्रतिमा बदलता आली. आय मिस यु बोथ.
सचिन भगत
No comments:
Post a Comment