Friday, January 26, 2018

जागो ग्राहक जागो –भाग ३

दीड-दोन वर्षापूर्वीची गोष्ट. मी एकदा गॅस बुक केला होता. एका नंबरवर मिस कॉल दिला म्हणजे गॅस बुक व्हायचा. मी घरी नसताना गॅस सिलेंडर घरी मिळाले. जेवढी किंमत होती त्यापेक्षा वीस रुपये अधिक त्या वितरीत करणाऱ्या लोकांनी माझ्या बायकोकडून घेतले. तिने विचारलं असं का तर दुसर्या मजल्यावर आणावा लागला त्यासाठी असं उत्तर तिला मिळालं. ति काही बोलली नाही. पैसे देऊन टाकले. मला कॉल केले परंतु त्या वेळेस माझं लेक्चर सुरु होतं. मी काही फोन उचलला नाही. लेक्चर संपल्यावर मी माझ्या कॅबिन ला आलो तेव्हा तिचे दोन-तीन मिस कॉल्स दिसले. मी लगेच फोन केला तर तिने घडलेला प्रकार सांगितला. याआधी जेव्हाही सिलेंडर मिळायचं तेव्हा मी घरी असायचो. पैसे देताना मी सहजच १० रुपये शिल्लक देत होतो. त्याबाबत मला कधी काही वाटले नाही. पण आताचा प्रसंग वेगळा होता. ती लोकं वीस रुपये जास्त घेऊन गेली होती.
सुरुवातीला जाऊ द्यावसं हि वाटलं. पण मन काही मानत नव्हतं. स्व-इच्छेने देणे आणि खोटं सांगून घेणे यात फरक आहे.

भारत गॅस ची वेबसाईट पाहिली आणि वाचून काढली. त्यात स्पष्ट असं म्हटलंय कि दिलेल्या पत्त्यावर पोचविण्याची जबाबदारी ही वितरकाची आहे. जेवढ्या रुपयांचे बिल आहे तेवढेच पैसे ग्राहकाने द्यावे. पण हे गॅस सिलेंडर पोचवणारे कामगार कित्येक लोकांकडून १०-२० रुपये घेत असतात. रक्कम फार कमी असल्याने कुणी मनावर घेत नाही. आपण सोडून देतो आणि इथेच आपली गफलत होते. आणि या लोकांची वृत्ती बळावत जाते.
तक्रार करावी कि करू नये या द्विधा मनस्थितीत होतो. वीस रुपये...फार छोटी रक्कम पण तिचं महत्त्व किती होतं भूतकाळात. त्या वीस रुपयांसाठी शेतात ५-६ तास काम करावं लागत होतं. पुण्यात असताना शिवाजी नगर पासून विद्यापीठापर्यंत पायी जात होतो कारण दहा रुपये वाचविण्यासाठी. भूक कितीही लागली तर नाश्त्यासाठी १०-१५ रुपये नसायचे. असे कित्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आले. आता त्या रकमेची भलेही किंमत नव्हती. ते मला खटकलं नाही फार. खटकलं ती पैसे उकळण्याची पद्धत. खोटं सांगून तुम्ही असं नाही करू शकत.
मग काय तक्रार करायची असं ठरवलं आणि भारत गॅस च्या वेबसाईट वरून कस्टमर केअर चा नंबर घेतला आणि फोन केला. दोन-तीन वेळेस फोन लावला. कधी बिझी तर कधी कट असं सुरु होतं. कट झालाच तर प्रत्येकवेळी दुसरा प्रतिनिधी बोलतो. त्याला पुन्हा सगळा प्रकार सांगावा लागतो. सुरुवातीला स्वागत,विविध पर्याय, हा यासाठी हा अंक त्यासाठी तो अंक, भाषा निवडा, प्रतिनिधीकडे फोरवर्ड करत आहोत असं भरपूर काही असते. असे कित्येक अडथळे पार करून माझं त्या प्रतिनिधीशी बोलणं झालं. सविस्तर प्रकार सांगितला. ठिकाण, वितरकाची माहिती, माझ्या कनेक्शन चे डिटेल्स असं सर्व काही सांगितलं आणि मला माझे पैसे आताच परत हवेत म्हटलं.
प्रतिनिधी म्हटला कि १५ मिनिटात तुमच्या समस्येच समाधान करतो. फोन झाला आणि मी माझं काम करत बसलो. थोड्याच वेळात मला वितरकाचा फोन आला आणि तुम्ही कशाला दिले वगैरे म्हणत होता. मी एकच म्हटलं कि हे तुमचे कामगार आहेत; तुम्ही त्यांना योग्य निर्देश द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत आणि माझे वीस रुपये आताच परत करा. बोलताना आवाज चढत्या स्वराचा होता. बोलणे झाले आणि मी फोन बाजूला ठेवला. १५-२० मिनिटांनी मला बायकोचा फोन आला आणि त्याने पैसे परत आणून दिले आणि माफ करा असं म्हटला.


थोड्या वेळाने वितरीत करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला आणि सर माफ करा, पुन्हा असं होणार नाही आणि आमच्या साहेबाना फोन करून पैसे मिळाले हे सांगा म्हटला. मी फार काही बोललो नाही. हो ला हो केलं.  यानंतर मी ऑनलाईन पैसे पे करायला लागलो.  
प्रश्न २० रुपयांचा नव्हताच. ज्या मार्ग त्याने वापरला तो खटकला. आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला.  आपण हॉटेलात जातो तर सहज १०-२० रुपये टीप म्हणून देतोच की. ती स्व-इच्छा. द्यायलाच पाहिजे असं नाही.

                                                                                                                      सचिन भगत

1 comment: