Tuesday, August 1, 2017

आयुष्याला कलाटणी देणारे काही प्रसंग

प्रसंग एक:
पंधरा-सोळा वर्षे वय...फार काही कळत नव्हतं. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास खायचे हि वांधे होते. त्यामुळे शनिवार-रविवार शेतात कामाला जाने नित्याचेच. असंच एकदा एका शेतकऱ्याच्या शेतात कामाला गेलो होतो. ग्रामीण भागात पाथ हा एक शब्द आहे. म्हणजे अनेक मजुरांचा समूह. त्याचा एक नेता (आताच्या भाषेत). त्याने सर्वांसाठी काम शोधणे. तो काम करत नाही. शेतकऱ्याला जेवढे मजूर लागतात तेवढे पुरवणे. म्हणजे मजुराचा शेतकर्याशी संबंध येत नाही. मजुरी वगैरे सगळं काही हा शेतकर्याशी बोलणार. असंच एकदा मी पाथीमध्ये कामाला गेलो होतो. दोन-अडीच तास काम केल्यानंतर सगळे एकत्र जेवण करत होते. तेवढ्यात शेतीमालक तिथे आला. किती मजूर आहेत म्हणून त्याने विचारणा केली. २१ अस उत्तर त्याला मिळालं. मला फक्त वीस च पाहिजे असं त्याने सांगितलं आणि माझ्याकडे पाहून याला कशाला कामाला आणलं अशी विचारणा केली. याला वापस पाठवून दे असं म्हणून तो निघून गेला. जेवण सुरु होतं. हे संभाषण ऐकून जेवण अर्धवट सोडलं आणि सरळ घरचा रस्ता पकडला. काही मजुरांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. एक-एक रुपया जमा करून तुला २० रुपये देऊ म्हटले. त्यावेळेस मजुरी तेवढी होती. पण मला ते पटलं नाही. शेत फार दूर होतं. नदी-नाले ओलांडत माझा परतीचा प्रवास सुरु होता. दोन-अडीच तास काम केल्यानंतर असं झाल्याने फार वाईट वाटलं. बर्याच दूर आल्यानंतर मी एका झाडाखाली बसलो निवांत बसलो आणि नकळत डोळ्यातून अश्रू सुरु झाले. आसपास फक्त पक्ष्यांची किलबिलाट, आणि वेगानं सुटणारा व वारा. आकाश निरभ्र होतं. भविष्यात काय लिहिलंय आहे याची ती चुणूक होती. असे कित्येक प्रसंग येणार, पुढे काय होणार याचा विचार करत करत तिथेच संध्याकाळ झाली आणि मी घरी येण्यासाठी निघालो.
प्रसंग दोन:
अकरावी ला होतो तेव्हाची हि गोष्ट. मी नातेवाईकांकडे शिकण्यासाठी होतो. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. पण नन्तर त्यांचे आणि माझी वडिलांचे वाद झाले. आणि त्याची झळ माझ्यापर्यंत येऊन पोचली. अभ्यास सुरु असताना लाईट बंद करणे, शिवीगाळ करणे, कॉलेज जा जाण्यासाठी सायकल न देणे असे नानातर्हेचे प्रयोग सुरु होते. माझ्यासमोर पर्याय नव्हता. मी हे सगळं सहन करत होतो. कित्येक वेळा गच्चीवर जाऊन रडलोय. एवढ्या कमी वयात हे सर्व सहन नाहीच करता येत. पण समोर भविष्य होत. निमुटपणे सगळं सहन करणे एवढ्याच पर्याय होता. एकदा असंच सकाळी पोहे खात होतो. त्यात एक नातेवाईक सदस्य तिथे आला आणि माझ्या हातातली पोह्याची प्लेट हिसकावून बाहेर फेकली. मी काहीच नाही बोललो. पण मनात मात्र भावनांच द्वंद सुरु झालं होतं.  आजही जेव्हा पोहे समोर आले कि त्या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
प्रसंग तीन:
जळगाव ला पदवीच शिक्षण सुरु होतं. इथेही नातेवाईक पण जरा जवळचे. त्यामुळे सगळं काही ठीक असेल अशी धारणा होती. पण तसं काहीच नव्हतं. रोज ते मला काम कर म्हणायचे. शिकून काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा कंपनीत जा, अठराशे रुपये मिळतात. पुढे अजून जास्त मिळतील मला शिकायचं होतं. इथेही फसलो होतो. कधी कधी तर याला चहा द्यायचा नाही इथपर्यंत सगळं. मी जेमतेम सहा-आठ महिने तिथे कसेबसे काढले आणि नन्तर होस्टेल ला गेलो. कमवा आणि शिका योजनेत काम करायचं. महिन्याला जेवणापुरते पैसे मिळायचे आणि राहणे फुकट. वसतिगृहात गेल्यानंतर त्या नातेवाईकांकडे मी क़्वचितच गेलो. मला आठवत नाही. मी कित्त्येक वेळा जळगाव जातो पण तिथे पाय टाकत नाही.
वाईट काळात ज्यांनी साथ दिली नाही त्यांची साथ नकोय.  चांगल्या काळात तर कुणीपण साथ देते.
दोन वेळेस च्या जेवणासाठीचा संघर्ष माणसाला या समाजात काय नाही सहन करायला भाग पाडत?
कधी निमुटपणे, कधी निर्लज्जपणे तर कधी काहीच कळल नाही असं.
मी का शिकलो? तर मला त्याची आवड होती किंवा तेच माझं ध्येय होतं असं काही नाही.  पण आसपास च्या लोकांनी मला प्रेरित केलं. त्यांनी दिलेला प्रत्येक अनुभव कायम झोंबत राहिला. त्यामुळे मी चालत राहिलो. त्या प्रसंगांनी मला जगण्याची नवी उमेद दिली, बदल घडवण्याची स्फूर्ती दिली.
मी कुणालाही दोष देत नाही. ज्याने त्याने त्याचं त्याचं कर्तव्य केलं. कुणी चांगले तर कुणी वाईट अनुभव दिलेत. पण त्या अनुभवांनी मी समृद्ध झालोय, शिकलोय, वाढलोय. त्यामुळेच रंगीबेरंगी जीवनाचा आस्वाद घेऊ शकलोय. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यात यांनी खूप हातभार लावलाय. वेगवेगळ्या प्रकारची लोकं नसती भेटली तर जीवनाचा अर्थ कळला नसता आणि जीवन अनुभवता हि आलं नसतं.


No comments:

Post a Comment