खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतलंय. म्हटलं तर कुठलाही विषय माझ्याकडे
नाही. तरीपण काहीतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. शिकत असताना आपण खूप
स्वप्न रंगवली. तासनतास चर्चा झाल्यात. पण त्यापैकी कुठल्याही स्वप्नावर आपण आजगायत
काम सुरु केलेलं नाही. कारणे अनेक असतील. ती तर नेहमी असतात. पण असं मर्यादित जीवन
अपेक्षित नव्हत केल कधी. आपण आपलं जीवन बंदिस्त केलंय एका परिघात. त्यातून बाहेर पडण्याची
गरज आहे आता. किती दिवस मी आणि माझं कुटुंब या संकल्पनेत जगणार आहोत आपण. हे तर कधी ठरवलं
नव्हतं आपण.
मी स्वप्नं पाहणं सोडून दिलंय
आता. वास्तवात जगण्याची सवय करून घेतलीय. स्वप्नांवरनाहीजगता येत हे पण कळून
चुकलंय आता. बारा वर्षाच्या बाहेरच्या जगात खूप काही अनुभवलं. आताकुठलाही अनुभव
घ्यायची इच्छा उरली नाही. जीवन पण कस असतं. किती स्वप्नं दाखवतं पण
प्रत्यक्षात काहीच येत नाही. मृगजळ आहे सगळं. आता त्यामागे लागण्यात अर्थ नाही
म्हणून काहीतरी विधायक करावं म्हणतोय. काय ते निश्चित नाही. पण विचार केल्यावर
काहीतरी निघेन. आयुष्य थांबल्यासारखं झालंय आजकाल. प्रत्येक दिवस येतो
नि जातो. आजकाल फक्त महिना कधी संपतो नि पगार कधी हातात पडतो एवढच काय ते सुरु
आहे. पगार आणि आपण. एक अदृध नातं निर्माण झालंय. पैसा आपल्याकडे येतो
कि आपण पैश्यामागे धावतो काहीच कळत नाही. हेच का ते आयुष्य ज्याची आपण वाट पाहत
होतो कित्येक वर्षांपासून. माझ्याकडे उत्तर निश्चितच नाही. अन कुनाकडे असेल असंही नाही. असलंच तर
कुणी स्वीकारेल हि शाश्वती नाही.
आसपास सगळं बदललं आहे. अनुभवांनी कधी पाठलाग सोडला नाही. भटकत असताना
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याचा पुरेपूर अनुभव आला. जग बदलत गेलं. आसपास चे
सगळे बदललेत पण मी मात्र अजूनही हि तसाच आहे. मूळ स्वभावात फार काही बदल झाला
नाही. आतातर होणे पण नाही. मी खूप काही करेन असं मला नेहमी वाटायचं. सारं काही
फक्त वाटलंच. प्रत्यक्षात येण्याआधीच सगळं अचानक नाहीसं झाल. कि मी नाहीसं केलं.
माहित नाही.
जीवन जगणं सोपं झालंय भूतकाळाच्या तुलनेत. म्हणून प्रश्न संपलेत, अडचणी
संपल्यात असंही नाही. पण ती मजा नाही येत जगण्यात. सगळं तेच तेच होऊन बसलय. लोकांचे
प्रश्न ठरलेले अन आपली उत्तरे हि ठरलेली. नवीन असं काही घडत नाही. घडवण्याची ती
उर्मी हि नष्ट झाली. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटला कि व्यक्ती काही करत
नाही. तसंच काही माझं झालंय. कदाचित माझी मानसिकता बदलली असेल काळाच्या ओघात. शून्यातून
सगळं निर्माण करताना होणारी कसरत कुणाच्या वाटेला येऊ नये.
आता शांतता हवी आहे. पण ती मिळेना शी झाली. कधीकधी हे सगळं सोडून दूर जावं
म्हणतो. नको त्या अपेक्षा, नको तो संसार, अन नको ते मानवी जीवन जे फक्त पावलागणिक
त्रास देतं. या सगळ्यापासून सुटका करावीशी वाटते. पण पुन्हा प्रश्न तोच अन उत्तर
हि तेच. नुसतं वाटून उपयोग नाही. खरं तर उपयोगासाठी करायचं नसतंच काही. मग काय
चाललंय हे. फक्त लिखाण कि मनातलं द्वंद कि अजून काही. का मनाची अस्थिरता. शेवटी
मनाची घालमेल का होत असते नेहमी? आपण स्वतःला का शोधत असतो नेहमी?
जीवन न उलगडणारं कोडं आहे. ते उलगडण्याचा निरर्थक प्रयत्न सुरु आहे. नेमकं
आपल्याला काय हवं आहे. काही कळत नाही. पण काहीतरी हवं आहे. म्हणून हि सगळी खटाटोप
सुरु आहे. आपण नेहमी उत्तरांच्या शोधात असतो. सोप्या गोष्टी हि कठीण करतो. सगळं
आसपास असून पण नसल्यासारखं जाणवतं नेहमी. हे माझ्या बाबतीत कि प्रत्येकाच्या च.
कुणासठाऊक काय चाललंय ते. लहान असताना लवकर मोठं व्हावसं वाटतं. मोठं झाल्यावर
मात्र लहानपण च चांगलं होत हि जाणीव त्रस्त करते नेहमी. आपण नेहमी धावत असतो
कशाच्या तरी मागे. मिळालं तरी धावणं मात्र थांबत नाही. मग आपण धावतोच कशाला सगळं
माहित असून. निष्फळ आहे सगळं. तरी त्यात अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरु असतो आपला.
आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण नाही. आपण स्वतंत्र नाहीच. आपण
गुलाम आहोत. आपण तेच करतो जे इतरांना हवं असतं. आपण तसचं वागतो जे समाजाला
अपेक्षित असतं. या पलीकडे आपण जात नाही. सगळे हेच करतात. मग कुठलं स्वातंत्र्य आहे
आपल्याला. तरी आपण स्वतंत्र असल्याचा आविर्भाव आणतो नेहमी. कोणकुणाला फसवतं. आपण आपल्याला
कि कुणी आपल्याला.भरकटत राहतो आपण अशा अनेक प्रश्नांभोवती. उत्त्तर नाही मिळालं
तरी जगणं सुरूच असते. ते थांबतच नाही.अन आपण हि थांबत नाही. आपण शोध घेत असतो एका गोष्टीचा
जी आपल्याला समाधान देईल. पण असं काही सापडतच नाही. तरी शोध मात्र सुरु असतोच अविरत.
स्वतःला शोधताना आपण हरवून बसतो जे आपल्याकडे आहे. मग जे हरवलं त्याचाही शोध सुरु
होतो. हे चक्र सुरु असतं सातत्याने.आपण मागे वळून कधी पाहत नाही. वर्तमानात काय
आहे त्याकडे हि कधी लक्ष नसते आपलं. आपण नेहमी भविष्याचा विचार करत राहतो अन वर्तमान
गमावून बसतो. अन हे कधी लक्षात येतच नाही. वेळपण कुठ असतो आपल्याकडे काय होतंय
त्याचा विचार करायला. सगळं काही सुटेल पण माणसाची मिळवण्याची हाव काही केल्या सुटत
नाही.आहे त्यात समाधान मानण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती. ती फक्त दाखवण्यासाठी.
खरं तर आपण समाधानी कधी नसतोच.
वसतिगृहातील पण काय आयुष्य होत साल. कायम दगदग. खोलीनंबर बारा मध्ये
घडलेल्या घटना, चर्चा, एका डब्यामध्ये दोन लोकांच जेवण.आबा च्या मेस चे प्रकरणं
थेट डॉक्टर गडे कडे नेण्यापर्यंत ची मजल.जॉनी चे भांडण लावण्याचे उद्योग. भोई ते
लिखाण अन त्यातले आपण खलनायक. असं बरच काही. तरीपण कसलाही ताण नाही घेतला.
स्वीकारत गेलो ते हे सगळं बदलणार म्हणून. ते बदललं हि. पण भूतकाळ विसरता येतच नाही
कितीही प्रयत्न केला तरी. एनेसेस चंते शिबीर. तिथल्या त्या आठवणी नाहीच विसरता
येणार. दोन रुपयाचा तो भाभीचा चहा. रोज पाणी सोडायचा ते काम तुम्ही सगळ्यांनी
शिकून घेतलं आणि मी नसताना पार पाडलं हि. अन ते तयार झालेलं समीकरण कायम घट्ट होत
गेल अनेक अडचणींमधून.
जळगावने शिक्षनापलीकडचं आयुष्य दिल. वेळ मिळाला कि चित्रपट मग तो
चेतना असो कि अजय चा एखादा. मला पुण्याला जायचं नव्हतं. मला तर प्रवेश परीक्षा पण
द्यायची नव्हती पण कुणीतरी कि उत्तीर्ण हो आणि जाऊ नको. यशस्वी तर होऊन दाखव. मग
सगळं झालं अन पुण्याला जायचा मोह आवरला नाही. माझ्या मागे जॉन्या पण आला. मला तो मोठा
आधार.अधून मधून तू आश्चर्याचे धक्के देतं राहिलास. कधी माझ्या वाढदिवसाला तर कधी
भेटायला येत राहिलास. मग आपण पुण्याच्या आसपास केलेली भटकंती अवर्णनिय. फ्लिपकार्टा
नं पाठवलेलं ते पुस्तक मध्यरात्री बनवून खाल्लेली खिचडी ना तुला विसरता येणार ना
मला. माझा स्वभाव फार चांगला नसतानाही तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे जुळवून घेतलं
किंवा अजूनही घेताय ते शब्दांपलीकडे आहे. आणि म्हणूनही कित्येक लोक आयुष्यात आलेत
आणि गेलेत. पण कुणाशी भावनिक नातं कधी निर्माण झालं नाही.
जळगाव या शहरानं खूप काही दिलं. तिथेच सगळी स्वप्ने पाहिली. एमजे चं
वसतिगृह लक्षात राहील ते त्या स्वप्नांसाठी. मागेपुढे ते सगळं प्रत्यक्षात आलंही पण
जीवनाला एक वेगळ वळण देऊन गेलं.
अश्या अनेक घटना न थांबता सांगता येतील. पण माझ्याकडे तेवढे शब्द
नाहीत. तेवढा वेळ हि नाही. जगण्यासाठी धडपड सुरु आहे. ती हि संपेल कधीतरी. मग
शांतपणे बसून हे सगळं आठवून वेळ घालवावा लागेल. म्हणून थांबतो. पण लिखाण थांबणार नाहीत. अधून मधून ते सुरूच राहील मग मी
कितीही मग्न का असेना कामात. लिहायला सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं डोक्यात पण
सुरुवात केल्यानंतर आपोआप येत गेल. विषय नव्हता माझ्याकडे. पण विषय नसताना
लिहिण्याचा प्रयत्न केला.
सचिन भगत
No comments:
Post a Comment