Saturday, May 24, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी...५



एम.फिल करत होतो त्यावेळेस ची गोष्ट. संध्याकाळी गाईड चा फोन आला कि उद्या भेटायला ये म्हणून. मी होकार दिला. तेव्हा माझ्याकडे बाईक होती. उद्या जायचं कसं प्रश्न माझ्यासमोर होता कारण माझ्याकडे जेमतेम ५०-६० रुपये होते. रात्री मी काही मित्रांना पैसे मागितले पण त्यांच्याकडे नव्हते. सकाळी आठ वाजेला मी विद्यापीठातून निघालो. असलेले पैसे पेट्रोल साठी वापरले. शिरूर ला जायचं होत. जवळपास ६०-७० किलोमीटर. जाण्याचा प्रश्न नव्हता. पण यायच कसं? विचार करत करत शिरूर ला गेलो. गाईड ला भेटलो. जेमतेम १०-१५ मिनिट्स च काम होत. पण भेटन गरजेचं होतं. तिथून थोडं पुढे आल्यानंतर गाडी बंद पडली. ते होणारच होत. आता काय करायचं. तिथं ओळखीचं तर कुणी नव्हतं. सकाळपासून चहा पण घेतला नव्हता. तेवढेही पैसे नव्हते. गाडी एका बाजूला लावली आणि मी मित्रांना फोन करायला सुरुवात केली. दहा-पंधरा मित्रांना फोन लावले असतील. कुणाकडून च काही जमेना. 

माझा एक नाशिक च मित्र आहे. तो एका कॉलेज ला जॉब करत होता. शेवटी मी त्याला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली. मला हवे होते फक्त दोनशे रुपये. साडे दहा वाजले होते. त्याला मी बँक अकाऊंट नंबर पाठवला आणि एका एटीएम जवळ जाऊन थांबलो. तो अर्धा तास म्हटला होता. मग मला थोडं बरं वाटलं. आणि त्याच्या फोन ची वाट पाहत थांबलो. एक तास झाला तरी त्याचा काही फोन येईना म्हणून मीच त्याला फोन केला. तर तो म्हटला कि मी एका विद्यार्थ्याला बँकेत पाठवलं आहे. असे दोन तास निघून गेले. दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. दोनशे रुपयासाठी काय काय करावं लागलं.

त्याचं झालं असं कि मी त्याला महाराष्ट्र बँकेचा नंबर दिला तर त्याने त्या विद्यार्थ्याला एसबीआय मध्ये पाठवलं होत. बँके वाले म्हणत होते कि अकाऊंट नंबर चुकीचा आहे म्हणून. परत फोन करून सगळं व्यवस्थित झालं. साडेतीन तास मी तिथे बसून होतो. दोन वाजले होते. पैसे काढून सरळ गाडी ढकलत पेट्रोल पंपावर नेली. दीडशे रुपयांचे पेट्रोल टाकले नि पन्नास रुपये मला ठेवले. भूक लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तो एकमेव प्रसंग जेव्हा माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते आजपर्यंत तशी परिस्थिती आली नाही. 

शिरूर सोडलं ते थेट मध्ये एका हॉटेल ला थांबलो. थोडं खाऊन पुण्याकडे निघालो. संध्याकाळ झाली होती मी विद्यापीठात आलो तेव्हा. असं झालं होतं हे मी काही कुणाला सांगितलं नाही. 
कधी कधी स्वतःचा राग पण येत होता. माहित असून असं करायचं म्हणजे अवघड च आहे. पण मी आशावादी आहे. मी जर जातोय तर वापस कसातरी येईलच. काहीतरी होईल. म्हणून मी निघालो होतो. कितीही कठीण प्रसंग असला तरी मार्ग निघतोच. थोडा त्रास झाला. दहा पंधरा फोन करावे लागले आणि तीन चार तास वाट पहावी लागली. 

स्वतःहून अडचणी वाढवून घ्यायला फार आवडतं मला. नंतर पण गाईड ला भेटायला जाऊ शकलो असतो. पण गाईड नावाचा प्राणी फार विचित्र. बोलावून पण येत नाही म्हटल्यावर इगो दुखावला असता आणि वाट लावली असती माझी. तशी हि लावलीच पण एम.फिल पूर्ण झालं. काय संशोधन केलं मी देव जाने. पोटात काही नाही काय घंटा संशोधन होणार आहे. Research is not possible unless your basic needs are fulfilled. पण कोण वाचते ते. सगळे असंच करतात. 

थेसिस चं आयुष्य तरी काय तर एक ग्रंथालयात, दुसरा गाईड कडे आणि तिसरी प्रत आपल्याकडे. संपलं आपलं संशोधन. वर्षाकाठी कित्येक एम.फिल, पी. एच डी होतात. कुठं आहे त्याचं संशोधन. कुठला बदल पाहायला मिळाला आपल्याला. काहीच नाही. सगळं शून्य. पैसे दिले कि सगळं होत. आता तर गाईड हि पैसे मागत आहेत. पुण्यात तर परिस्थिती वाईट. काही गाईड ला तर फक्त मुली पाहिजेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मुलांना उभे पण करत नाहीत ते. संशोधनाच्या नावाखाली लुट सुरु आहे. विद्यापीठ विद्यावेतन देते त्यासाठी. पण बाकी काय तर शून्य. विद्यार्थी पण काय करणार. त्यांना ऐकून घ्याव लागते सगळं. मग कसा समर्थ भारत होणार. तो फक्त स्वप्नातच राहील. पुणे विद्यापीठान राबवलेल्या समर्थ भारत अभियानातून काय निष्पन्न झालं ते सगळ्यांना माहित आहे. काही लोक समर्थ झाले असतील तो भाग वेगळा. त्यावर न बोललेलं बर.

मला पैश्याचं नियोजन कधीच जमलं नाही. अजूनही जमत नाही. सेव्हिंग नावाचा प्रकार नाही आयुष्यात. कितीवेळा सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला पण अपयश. आता तर प्रयत्न हि करणे सोडून दिले. फक्त प्रत्येक क्षण जगायचं ठरवलंय. भौतिकवादी जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत. त्याचा मी आनंद घेतो. I always feel that this is what I am born for. I am born to struggle….I am born to survive in spite of sudden ups and downs in life. 

-सचिन भगत

No comments:

Post a Comment