Tuesday, January 21, 2020

नेमकं-३


एका प्रशिक्षणासाठी गेलो होतो अमरावती विद्यापिठात. एका मुलीच्या हातात एक पुस्तक दिसलं. मला राहवलं नाही. तिच्याजवळ जाऊन कुठलं पुस्तक आहे ते पाहिलं. 2007 मध्ये प्रकाशित झालेलं ख़ालेद हुसैनी लिखित. ते इंग्रजी मध्ये.  त्यामुळे मी मराठीत न बोलता तिच्या सोबत इंग्रजी मध्ये संवाद साधला. छान बोलत होती. वाचलेलं कळत होतं.
आठव्या इयत्तेत शिकत असलेली एक मुलगी. हे पुस्तक वाचतेय याचं मला कुतूहल वाटलं. सोबत तिची बहिण होती. तिच्यापेक्षा लहान. तिच्या हातात मोबाईल होता. तू का नाही वाचत म्हटल्यावर ती म्हटली ही मला पुस्तक देत नाहीय. मला ते पुस्तक वाचायचं आहे. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या हातातलं ते पुस्तक बरंच काही सांगून जातं.
सहसा हे आढळत नाही. सोशल नेट्वर्किंग च्या काळात, तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती लयास जात असताना हे चित्र सुखावह वाटलं. त्या मुलींचा हेवा वाटला. कारण आजकाल असंख्य पुस्तकं घरात असताना त्यांना हात लागत नाही. आपल्या आयुष्यात अभ्यासक्रम व्यतिरिक्त पुस्तक क़्वचितच येते. हा मुलभूत फरक आहे वातावरणाचा. जे आपल्या कुटुंबामध्ये सहजासहजी आढळत नाही. आपल्याला आकर्षण आहे ते तंत्रज्ञानाचं, मोबाईल चं. पुस्तकाचं वेड नाही, वाचनाच वेड नाही.
वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो पण पुस्तक दिसत नाही. ग्रंथालय ओस पडली आहेत.

वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. बदलत्या कळत स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर वाचन गरजेचं आहे. ज्ञानाचे दरवाजे खुले होतात. स्पर्धेत टिकाव लागू शकतो.  मत, प्रतिक्रिया बदलतात, विचार बदलतात, आचरण बदलते. व्यक्तिमत्त्वात बदल होतो.
ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात कमी किमतीत उपलब्ध आहेत. असंख्य ई-बुक्स उपलब्ध आहेत. पण  पुस्तक हातात घेऊन वाचनाची मजा काही औरच. व्हर्च्युअल मध्ये तो फील येत नाही.
नव्या माध्यमांच्या प्रवेशाने वाचन संस्कृती लोप पावली आहे. वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. पुस्तकाचं गाव भिलार हे त्याचं एक उदाहरण. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. तो तेवढ्या पुरता मर्यादित होऊन गेलाय. वाचनाने आपण समृद्ध होतो, प्रगल्भ होतो. त्यामुळे वाचन ही एक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे.  विशिष्ट प्रसंगी भेटवस्तू न देता पुस्तके भेट देता येतील का यावर विचार मंथन व्हायला हवं.

सचिन भगत  (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव

Tuesday, December 17, 2019

महिला सशक्तिकरण (Women Empowerment)

महिला सशक्तीकरण...भरपूर लिखाण झालंय...बोलल्या गेलंय...गल्ली-बोळापासून तर संसदेपर्यंत चर्चा...चर्चा आणि चर्चा फक्त. कुठंय महिलासशक्तीकरण हा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.
स्त्री म्हणजे दुर्बलता ....काहीतरी कमी असं ओबळ-ढोबळ चित्र प्राचीन काळापासून रंगवण्यात आलंय. त्याच्या बाहेर यायला आपण अजूनही तयार नाही. आजकाल स्त्रिया विविध क्षेत्रात काम करत आहेत. चांगल्या पदावर आहेत. पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत. अशा स्त्रियांचं प्रमाण किती? अगदी नगण्य...ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत.
अधून-मधून महिला आरक्षणाच्या गप्पा होतात...चर्चा झडतात.  पण राजकीय आरक्षण देऊन भागणार आहे? जे काही आहेत त्यात काय दिसून येतंय...अनेक ठिकाणी महिलांचे कारभार त्यांचे पती महाशय पाहतात. महिला फक्त सयाजीराव.
शिकत असताना सिमोन दि बोव्हा चं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचनात आलं होतं. फार काही समजलं नाही. पण स्त्री स्वातंत्र्य वगैरे काय तेवढं लक्षात राहिलं. त्या स्त्री आणि पुरुष यांचातला भेदाभेद मस्त मांडलाय.

 Two separate beings, in different circumstances, face to face in freedom and seeking justification of their existence through one another, will always live an adventure full of risk and promise." (p. 248)” Simone de Beauvoir, The Second Sex

Representation of the world, like the world itself, is the work of men; they describe it from their own point of view, which they confuse with absolute truth.” Simone de Beauvoir, The Second Sex

Man is defined as a human being and a woman as a female — whenever she behaves as a human being she is said to imitate the male.” Simone de Beauvoir
तसंच कमला दास याचं आत्मचरित्र माय स्टोरी मध्यंतरी वाचनात आलं. स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या असलेल्या कमला दास याचं लिखाण म्हणजे पुरुषी परंपरेला छेद देणारं. सडेतोड...ज्या विषयवार सहजासहजी कुणी बोलत नाहीत त्यावर त्यांनी परखड भाष्य केलंय. जे शब्द चार-चौघात आपण बोलायला अजूनही अडखळतो त्यावर त्यांनी परखड लिहिलंय. एका स्त्रीच्या च्या वेदना म्हणा...स्वातंत्र्याची आस म्हणा किंवा अजून काही.
स्त्री-पुरुष यांच्यातला भेदाभेद आलातरी कुठून? त्याची सुरुवात कुठून...प्रत्येक घरात...प्रत्येक माणसाच्या मनात...जीन्स मध्ये म्हटलं तरी चालेल.
निसर्गाने निर्माण करताना कधीही भेदभाव केला नाही. आपण मात्र प्रत्येक ठिकाणी भिंती निर्माण केल्या.
प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरापासून होते. कायदा करून, नियम बनवून महिला सशक्तीकरण  होणार नाही. आपण बदललं पाहिजे. बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर यायला हवं.
सबरीमाला मंदिर असो, शनी-शिंगणापूरच शनी मंदिर असो अथवा अनेक अशी मंदिरे जिथे स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता त्यावर झालेला वाद आठवत असेल. कुणी सांगितलं हे. पुरुषी संस्कृती...दुसरं काय?
मालिका असो, चित्रपट असो stereotype सुटत नाही. थोडा-बहुत बदल व्हायला लागलाय पण तो पुरेसा नाही.
सातच्या आत ची संस्कृती घट्ट झालीय. आपण बंदिस्त करून ठेवलंय स्त्रियांना एका प्रतिमेत. डूज आणि डोंट फक्त त्यांच्यासाठी. पुरुष मात्र मोकाट. काही केलं तर मर्दानगी चं प्रतिक.
एकदा मुलगी बघण्याच्या ठिकाणी जावं लागलं...सगळीकडच चित्र म्हणजे मुलाकडच्या लोकांनी प्रश्न विचारायचे आणि मुलीने उत्तरे द्यावी.  फक्त मुलीनेच प्रश्नांची उत्तरं द्यावी काय?
प्रश्न काय तर....नाव...शिक्षण...जन्मतारीख....झालं.
मी न राहवून म्हटलंच...बाई तुला काही विचारायचं असेल तर तू पण विचार...काळ बदललाय आता.
सर्व मुलांवर अवलंबून का? मुलींना चोईस का नाही? मुलीचा बाप backfoot वर नेहमीच. असं का? असे अनेक प्रश्न आहेत.  ही प्रथा काही बदलत नाही. कारण बदल आपल्याला आपल्या घरात नकोय. तो इतरांच्या घरात हवाय. जे काय बदलायचं ते इतरांनी बदलाव आपण नाही. ही आपल्यापैकी प्रत्येकाची मानसिकता.
स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं.चूल आणि मुल यातून सुटका केली पाहिजे. समाज फार विचित्र आहे. एखाद्या माणसाने बायकोला घर-कामात मदत केली तर त्याला वेग-वेगळी विशेषणं लावली जातात. यात घराची मंडळी सर्वात पुढे. म्हणजे जे पुरुष थोडा-बहुत बदल करू इच्छितात त्यांही नाउमेद केलं जातं.
अगदी मोजक्या स्त्रियांना ह्या रूढी-परंपरा झुगारत्या आल्या आहेत. हे प्रमाण वाढायला हवं. त्याशिवाय पर्याय नाही. मुलांना वेगळा न्याय , मुलींना वेगळा न्याय. हे चक्र थांबवण गरजेचं आहे. त्याचं ही आयुष्य आहे. त्यानाही जगू द्यावं त्यांच्या मनाप्रमाणे.
एकदा एका लग्नात नवरदेवा कडील लोकांनी नवरदेवाला उचलून घेतला हार टाकते वेळी, आता त्या मुलीने काय कराव? विचित्र आहे सगळं. गमती-जमती चालतात हो. पण त्या कुठल्या प्रकारच्या असाव्यात? याचं कुठलंही भान नाही.  

त्या “लिपस्टिक अंड र माय बुरखा” मध्ये नाही त्या स्त्रिया स्वातंत्र्याच्या शोधात असतात. जे त्यांचा अधिकार आहे ते त्यांना कधीच मिळत नाही. मग नाईलाजाने त्यांना काहीतरी करावं लागतं.
मालिका, चित्रपट यांची समाज-प्रबोधन करण्याची जबाबदारी असते.  पण कित्येकदा तसं होत नाही. ते अजूनही पारंपारिक चित्रण रंगवतात स्त्रीचं काही बोटावर मोजता येणारे अपवाद वगळले तर.
राजा राम मोहन रॉय चं काय होतं....समाज बदलायचं होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचे होते. फुलेंनी तेच केलं. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली. आज क्रांती ची गरज आहे. कित्येकदा आपले अधिकार मागून मिळत नाही. ते घ्यावे लागतात.
सोशल मेडिया वर स्त्रियांवर अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणारे काही कमी नाहीत.  तू गप्प बस...तुला काय कळतंय? असे स्त्रियांना उद्देशून होणारे संवाद रोज चेच. घरोघरी.  म्हणजे सगळं समजणे-उमजणे याचा ठेका फक्त पुरुषांचाच. स्त्री ही काय फक्त उपभोगाची वस्तू नाही हे रुजवणं गरजेचे आहे.  कंगना राणावत बघा....स्पष्ट बोलते...सगळ्या रूढी-परंपरा स्त्रियांनी वेशीवर टांगायल्या हव्यात.  
स्त्रियांवर होणार्या अत्याचारांच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपर्यात घडत आहेत. पेपरात वाचून, मोर्चे वगैरे काढून तर कधी एखादं twit करून, फेसबुक पोस्ट लिहून आपण निषेध व्यक्त करतो. एवढं करून भागणार नाही. कृती हवी.
सकाळी उठून चहा घेऊन येहे वाक्य जेव्हा थांबेल तेव्हा बदलाची अपेक्षा करूया.


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव


Thursday, December 12, 2019

घर...


काल नट सम्राट हा चित्रपट पाहत होतो. चौथी-पाचवी वेळ असेल. कितीही वेळा पाहावं मन तृप्त होत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याक्य यांचे अर्थ मला नव्याने गवसतात प्रत्येकवेळी. गवसत जातात.  काल ही तसंच झालं.
तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या प्रतिभेने विस्तारलेले नाटक 'नटसम्राट'. त्यावर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा चित्रपट.
काल त्या नट सम्राट च्या ह्या ओळी आवडल्या. आणि कित्येक वेळ मी त्यावर चिंतन करत राहिलो.
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून  कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?...


घर...इवलासा  शब्द. पण अक्ख आयुष्य बदलण्याची ताकद ठेवणारा. त्याच्यासाठी संघर्ष तसा प्रत्येकाचा.
स्वप्न...प्रत्येक व्यक्तीचं. गरीबांपासून मध्यमवर्गपर्यंत. आजही कित्येक विद्यार्थी शिक्षण घेत असताना नोकरी लागल्यानंतर घर प्रत्यक्षात आणायचं स्वप्न उराशी बाळगतात. कधी लवकर कधी उशिरा. प्रत्यक्षात येते पण. आपलं स्वतःच घर असावं असा विचार न करणारा व्यक्ती जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
मी  पण त्यातला एक. पावसाळ्यात रात्री-बेरात्री कोसळणारा पाऊस आणि कुठे कुठे गळतेय त्याचा शोध घेऊन खाली काहीतरी म्हणजे भांडी वगैरे ठेवण्यासाठी उडालेली तारांबळ, हिवाळ्यात कडाक्याची थंडी.  अस्वथ रात्री. त्या प्रत्येक रात्रीने एक स्वप्न तयार केल. लढण्याची प्रेरणा दिली.
घराबाहेर पडलो ते त्या घरासाठी. पण प्रत्येक गोष्ट वाटते तेवढी ही सोपी नाही. नोकरी लागली म्हणजे घर होत नाही. भांडवल उभारणे हा पहिला प्रश्न. त्यात खाजगी नोकरी असेल तर बँका ही टोलावतात. तसंच झालं. सरकारी बँकांचे उंबरठे झिजवून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी एका फायनान्स कंपनीकडून भांडवल उभं झालं. व्याज तसं जास्तच. आणि मग ई.एम.आय. चं चक्र सुरु झालं. असो.
घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय घेतलाय. या दोन्ही गोष्टींवर कितीही खर्च करा समाधान कधीच मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो या दोन्ही गोष्टींवर. लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल असे अनेक प्रश्न असतात मनात.  
घर...स्वतःच असलं काय आणि भाड्याचं असलं काय...काय फरक पडतो? आपण समज करून घेतलेय वेगवेगळे. निवारा हवाय. कुठल्या घरात मिळत मिळतो ते महत्त्वाची नाही. पण आपल्याला तेच महत्त्वाचे झालंय दुर्दैवाने.
मध्यंतरी एक मित्र म्हटला, घर कधी घेणार आहे?
आहे की गावाला. आता अजून कशाला? ते पुरेसं आहे. मी उत्तरलो.
मग इथे भाड्याचा घरात राहणार का आयुष्यभर? त्याने विचारलं.
हो...काय होतं. छान आहे. मी उत्तरलो.
स्वतःच्या घराचं समाधान तुला नाही कळणार? तुला काय माहिती? तो सहज बोलून गेला.
मी म्हटलं, असेलही. पण मला माहित ही करून घ्यायचं नाही.
त्यानं विषय पुढे रेटला नाही. मी ऐकणार नाही हे त्याला माहित होतं. तो तसा हुशार. जिथे संदेश पोचवायचा तिथे त्याने पोचवला. म्हणजे  माझ्या बायकोला मात्र सांगितलं. त्याला घर घ्यायला सांग म्हणून. आता पुढचं काही सांगायची काय गरज नाही. कारण सगळ्यांचे अनुभव सारखेच. कॅसेट सुरु.
या घराणे कित्येकांच्या मनात घर केलंय. ते काही पिच्छा सोडत नाही. म्हणजे कसं सारं ठीक सुरु असताना आपल्याकडे अजून हे नाही ही भावना वृद्धिंगत करणे आणि वर्तमान अस्वस्थ करणे नाही का?
घर...प्रतिष्ठा..स्टेटस चं प्रतिक. मी हे केलंय ते केलंय चा जयघोष.
एकदा एका शहरात गेलो होतो. एक मित्र अचानक भेटला. अनेक वर्षानंतर.
बरं झालं तू भेटला. चल, तुला घर दाखवतो. नवीन घेतलंय. अजून शिफ्ट झालो नाही.
पुढचा अर्धा तास त्या घरात फिरून झालं. बिल्डर ने काय दिलं. आपण additional काय करवून घेतलं. किचन, बाथरूम, toilet (इंडिअन/वेस्टर्न), या दिशेला त्या दिशेला, बेडरूम एरिया चांगला आहे. किती लाखात झालं. कॅश. वगैरे वगैरे पुराण.  मला त्यात फार काही रस नव्हताच. अनेक वर्षांनी भेटलो तर थोड्या गप्पा होतील अशी आशा होती. पण तसं काही झालं नाही. मी ही सोडून दिलं.  हाय-बाय करून निघालो.
किती घरांना घरपण राहिलंय? किती घरांमध्ये मोकळा श्वास घेता येतोय? आज त्या घरापेक्षा नाती टिकवणं, घरपण टिकवणं महत्त्वाचं झालंय. कितीही देखणं घर झालं म्हणून शांती, सुख नाही मिळत.
पूर्वी झोपड्या असायच्या. पण घरपण होतं. सकाळी...संध्याकाळी एकत्र जेवण्याची पद्धत होती. बायका सकाळी उठून सडा-सारवण करायच्या.  हे चित्र हद्दपार झालंय. आता घरं मोठ्ठी होताहेत...जेवढ्या भिंती त्या घरात आहेत त्यापेक्षा जास्त भिंती मनामनात झाल्या आहेत. दिसणारी भिंत पार करता येईल पण मनातल्या न दिसणाऱ्या भिंतींच काय? त्या दिवसेंदिवस वाढत जाणार. जाताना आपलं माणूसपण ही घेऊन जाणार.
कुणीतरी म्हटलंय:
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

आजकाल वेगळ्याच प्रथा पडल्या आहेत. त्यातली एक म्हणजे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळणे. ‘ग्रेट डेन, लॅब्रेडोर रिट्रीवर, बुलडॉग, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन असे अनेक. त्यांच्याशी गप्पा मारणे, संवाद साधने असं दैनंदिन जीवनात अथवा चित्रपटांमध्ये दाखवलं जाते. आसपास लोकं असताना आपला संवाद समाप्त संपलाय. प्रत्येक ठिकाणी असं होतं असंही नाही. काही अपवाद आहेत. घरपण टिकवून आहेत. अजूनही काही घरांमध्ये किमान एक वेळेस सोबत जेवण्याची प्रथा आहे.

एकत्रित कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण झुकलोय. घराला शोभा येते ती लोकांनी भिंतीनी किंवा कलरिंग ने नव्हे. कुणाला प्रायव्हसी तर कुणाला काय हवंय जे एकत्रित कुटुंब पद्धतीत शक्य नाही. यात कोण चुकीचं हे ठरवणं ही अवघड. कारण प्रत्येक जण आपल्याजागी योग्य. मग नेमकी काय गफलत आहे. चूक कोणाची हा प्रश्न उरतोच.
एकदा एका मित्रासोबत एका शहरात गेलो होतो. त्या शहरात काय काय विशेष म्हणून तो दाखवत राहिला. शेवटी म्हटला चल आता आपण प्लॉट पाहू. अलीकडेच घेतलाय. तो तिथं घेऊन गेला. रोड टच. नवीन वस्ती. मेन रोड लागून. दोन्ही बाजूला रोड. एवढी किंमत. असं ठरलं. तसं ठरलं. गुंतवणूक. भविष्यात राहायचं ठरलं तर बेस्ट लोकेशन अश्या अनेक डिटेल्स मिळाल्यात. माझ्या दृष्टीने हे सुद्धा पुराण. १५-२० मिनिटे तिथे उभे होतो.
येताना मी त्याला गमतीने म्हटलं, प्लॉट दाखवायला घेऊन आला होतास का?
दिलखुलास हसला. कमीना है तू. मुझे पता था तू ऐसा ही कहने वाला था. चांगला मित्र असल्याने गमती-जमती ओघाने आल्याच. 
घर ते घरचं...कुणाची झोपडी असेल, कुणाचं तीन-पत्र्याचं असेल, कुणाचं दगड-मातीचं असेल,  कुणाचं कॉंक्रीट चं असेल, कुणाचं छोटं, कुणाचं भलं मोठ्ठ जसं टू-थ्री बि.एच. के., कुणाची टोलेजंग इमारत, तर कुणाचं गगनचुंबी अपार्टमेंट मधलं एक. वगैरे. घरं तर मोठ्ठी झालीत. पण त्या घरांमध्ये लोकांची कमतरता आहे. भयाण शांतता. किलबिल नाही, गोंगाट नाही. गजबजलेला सहवास नाही. आपल्या आजूबाजूला कोण म्हणजे शेजारी कोण याचा पत्ता नाही. आजकाल मुला-बाळांना ही वेगवेगळ्या रूम्स आहेत अनेक ठिकाणी. सारे बंदिस्त. एकाच छताखाली पण कोसो दूर मनानं. कुणाच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा मागमूस नाही. सोबत असून नसल्यासारखी.

कुठल्या तरी देशात त्यांनी खेडी निर्माण केली आहेत म्हणे. लोकं येऊन राहतात तिथं काही दिवस पैसे देऊन. काय तर नैसर्गिक सान्निध्य. चुलीवरची भाकर म्हणजे स्वयंपाक.  जे सोडून गेलो आज त्याचा ध्यास.
पूर्वी पोळी मिळणे दुरापस्त होतं. आज भाकर मिळणे दुरापास्त झालंय. कित्येकदा हॉटेल मध्ये गेल्यावर ज्वारी, बाजरी ची भाकर आहे का म्हणून विचारणारे अनेक.
घर असलंच पाहिजे. पण आपला आवाका जपून. वेळ आली की होईलच ना. त्यावर आतापासून कशाला विचार करायचा? वैयक्तिक मत. सारेच सहमत होतील असं नाहीच. घरापेक्षा सध्याच्या घराला घरपण कसं येईल असा विचार करता येईल? सिमेंट च्या भिंती कधी पार करता येतील?  माणसा-माणसांमध्ये निर्माण झालेलं अंतर कधी कापता येईल?

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव