Tuesday, January 21, 2020

नेमकं-३


एका प्रशिक्षणासाठी गेलो होतो अमरावती विद्यापिठात. एका मुलीच्या हातात एक पुस्तक दिसलं. मला राहवलं नाही. तिच्याजवळ जाऊन कुठलं पुस्तक आहे ते पाहिलं. 2007 मध्ये प्रकाशित झालेलं ख़ालेद हुसैनी लिखित. ते इंग्रजी मध्ये.  त्यामुळे मी मराठीत न बोलता तिच्या सोबत इंग्रजी मध्ये संवाद साधला. छान बोलत होती. वाचलेलं कळत होतं.
आठव्या इयत्तेत शिकत असलेली एक मुलगी. हे पुस्तक वाचतेय याचं मला कुतूहल वाटलं. सोबत तिची बहिण होती. तिच्यापेक्षा लहान. तिच्या हातात मोबाईल होता. तू का नाही वाचत म्हटल्यावर ती म्हटली ही मला पुस्तक देत नाहीय. मला ते पुस्तक वाचायचं आहे. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या हातातलं ते पुस्तक बरंच काही सांगून जातं.
सहसा हे आढळत नाही. सोशल नेट्वर्किंग च्या काळात, तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती लयास जात असताना हे चित्र सुखावह वाटलं. त्या मुलींचा हेवा वाटला. कारण आजकाल असंख्य पुस्तकं घरात असताना त्यांना हात लागत नाही. आपल्या आयुष्यात अभ्यासक्रम व्यतिरिक्त पुस्तक क़्वचितच येते. हा मुलभूत फरक आहे वातावरणाचा. जे आपल्या कुटुंबामध्ये सहजासहजी आढळत नाही. आपल्याला आकर्षण आहे ते तंत्रज्ञानाचं, मोबाईल चं. पुस्तकाचं वेड नाही, वाचनाच वेड नाही.
वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो पण पुस्तक दिसत नाही. ग्रंथालय ओस पडली आहेत.

वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. बदलत्या कळत स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर वाचन गरजेचं आहे. ज्ञानाचे दरवाजे खुले होतात. स्पर्धेत टिकाव लागू शकतो.  मत, प्रतिक्रिया बदलतात, विचार बदलतात, आचरण बदलते. व्यक्तिमत्त्वात बदल होतो.
ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात कमी किमतीत उपलब्ध आहेत. असंख्य ई-बुक्स उपलब्ध आहेत. पण  पुस्तक हातात घेऊन वाचनाची मजा काही औरच. व्हर्च्युअल मध्ये तो फील येत नाही.
नव्या माध्यमांच्या प्रवेशाने वाचन संस्कृती लोप पावली आहे. वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. पुस्तकाचं गाव भिलार हे त्याचं एक उदाहरण. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. तो तेवढ्या पुरता मर्यादित होऊन गेलाय. वाचनाने आपण समृद्ध होतो, प्रगल्भ होतो. त्यामुळे वाचन ही एक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे.  विशिष्ट प्रसंगी भेटवस्तू न देता पुस्तके भेट देता येतील का यावर विचार मंथन व्हायला हवं.

सचिन भगत  (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव

No comments:

Post a Comment