Monday, September 16, 2019

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१७


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळी लोकं भेटतात आणि आयुष्याचे भाग होऊन जातात.
पुणे विद्यापिठात असताना रीफेक्तरी (विद्यापीठाची खानावळ) कधी लावता आली नाही. त्याला अनेक कारणे होती. एक तर  एकाच वेळी भरण्यासाठी महिनाभराचे पैसे कधीच नव्हते, दुसरं तिथे गर्दी प्रचंड. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी. आम्हा सर्वांसाठी आधार म्हणजे डबेवाले. प्रत्येकाचं स्वतःच अस्तित्व. डब्यातील मेनू कधी सारखे, कधी वेगळे. बाजारात काय स्वस्त त्यावर ते अवलंबून.  वरण-भात ठरलेला. एक भाजी आणि चार पोळ्या. असं डब्याचं स्वरूप. चवी मध्ये थोडा बहुत काय तो फरक. कधी भूक व्हायची कधी नाही. पण त्या डब्यानेच कित्येक वर्षे न चुकता साथ दिली.
फिजिक्स विभागाच्या समोर दुपारी साडेबारा- एक च्या आणि रात्री साडेसात-आठ च्या दरम्यान डब्बेवाले हजर. ती त्यांची ठरलेली जागा. त्या वेळेत विद्यार्थ्यांची गर्दी तिथं. डबा घ्यायचा आणि आसपास जागा सापडेल तिथे घोळक्याने बसायचं. नजर जाईल तिकडे विद्यार्थी डबे खात दिसतील या वेळेत.
कित्येक जण डबे लावतात कारण पैसे मागेपुढे चालते. तेवढं ते सहकार्य करतात. आमचंही तसंच. जगण्यापुरत्या पैशाची ही तडजोड आवाक्याबाहेर व्हायची. त्यामुळे डबे लावण्याशिवाय पर्याय नव्हता.
विद्यापिठात असताना कित्येक वर्ष माझा डबा ढोकळे काका नावाच्या गृहस्थांकडे होता.  वयस्कर गृहस्थ. पन्नाशी ओलांडलेली असावी कदाचित. गौर वर्ण. डोळ्यांसाठी चष्मा. भारदस्त आवाज. मजबूत शरीरयष्टी. म्हणजे तब्बेत ही आडनावाप्रमाणे.
बाईकवरून ते डबे विद्यापिठात आणत असत. ठरलेली वेळ. कधी कधी मागे-पुढे.  कित्येक वर्ष त्यांच्याकडे डबा असल्याने चांगली ओळख होती. वेळेवर मी त्यांना कधीही पैसे दिले नाही. तारीख पे तारीख कायमचं. त्यांनी म्हणायचं आणि मी हो म्हणायचं. उद्या देतो, परवा देतो, या तारखेला, त्या तारखेला.  ती वेळ कधीच  पाळली गेली नाही. कधी कधी आता त्यांना काय सांगावं म्हणून ८-१० दिवस डबा घ्यायला जायचं नाही. दांडी. त्यांना दिसायचं पण नाही. “विचारलं तर सांग घरी गेलाय म्हणून”, असं मित्रांना सांगून ठेवत होतो. त्यांना एकदा ते समजलं. तर मला एका मित्राच्या माध्यमातूननिरोप पाठवला की त्याला सांग पैसे आले की दे पण आता डबा घेऊन जात जा. दुसर्या दिवशी मी त्यांच्याकडे जाऊन डबा घेऊन जाऊ लागलो. असं नको करत जाऊ एवढंच काय ते त्याचं वाक्य.
एकदा डबेवाल्यांनी पैसे वाढवायचे ठरवलं होतं. त्या विरोधात सगळे जमले होते. दुपारची वेळ. त्या फिजिक्स विभागाच्या समोर मी हे कसं अयोग्य म्हणून ५-७ मिनिटे भाषण ठोकलं. विद्यापीठाने यांच्याकडून पैसे घ्यायला हवेत. इथे फुकटात बिजनेस करतात.  बोलण्याच्या ओघात मी असं बरंच काही बोलून गेलो. सगळे डबेवाले ते पाहत होते.
काका  माझ्या मित्राला म्हणाले, या सचिन ने गेल्या तीन महिन्यापासून पैसे दिले नाहीत. तरी मी त्याला डबा देतोय. आणि हा आमच्याच विरोधात बोलतो. मला ते कधी प्रत्यक्षात बोलले नाहीत. कायम अडचण समजून डबा देत राहिले. उशिरा का होईना मी त्यांचे पैसे तसे चुकवत होतोच. माझ्या बोलण्याच त्यांना वाईट वाटलं असेल कदाचित.
उन-पाऊस काहीही असो डबेवाले येतातच.  त्यांच्या दिनचर्येत कधी डोकावून पाहिलं तर आव्हानं लक्षात येतात. सकाळी ५ वाजेपासून त्याचं काम सुरु होते ते रात्री अकरा बारा पर्यंत. सब्जी मंडी मधून भाजीपाला खरेदी करणे. स्वयंपाक करून डब्यात भरणे. आणि शेवटी डब्यांची स्वच्छता. त्यांना सवड असतेच कुठं. कितीतरी काम.  कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला वेळेवर डबे पोचवले जातात. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांचे हे डबेवाले आधार. व्यवसाय आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न आजकाल कुणी करत नाही.  विद्यापिठात हजारो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेण्यासाठी येतात. अनधिकृत ची संख्याही मोठी. कित्येकांना आर्थिक प्रश्न असतात. अश्या स्थितीत हेच डबेवाले कित्येकांना जगवतात. आधार देतात. काही विद्यार्थी फसवेगिरी ही करतात. भाजी आवडली नाही तर त्या डब्यांमध्ये दगड-माती टाकून देतात. डबा उघडायला त्रास झाला तर जेवण करून तो डबा लावून ठोकायचं म्हणजे त्यांना उघडायला त्रास होईल. काही पैसे बुडवतात. पण ते कटू अनुभव असून सुद्धा डबेवाले डबे देतातच.  गरज म्हणा की चांगुलपणा. पण त्यांच्यामुळेच विद्यापीठामधील जेवणाचा प्रश्न सुटतो.
मी विद्यापिठ सोडल्यानंतर ढोकळे काकांनी  डबे बंद केल्याचे ऐकले. कदाचित वयामुळे जमत नसेल. त्यांना भेटण्याची इच्छा होती. पण कधी जमलं नाही. पुण्यात कधी गेलोच तर त्यांचा शोध घेऊन भेटेन.
विद्यापीठातले ते दिवस आठवले की या गृहस्थांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा आधार नसता तर कित्येक अडचणी निर्माण झाल्या असत्या कदाचित.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व आहे. कधी आपल्याला ते जाणवतं. तर कित्येक वेळा जाणवत नाही.
माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे त्याचं ते लक्षण. आपण मंदिरात जातो पण आपले प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवायला आपल्याला आसपासचे लोकंच मदत करतात. दमडी खिशात नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची पोटाची भूक भागवणारे हे डबेवाले. खिशात पैसे नसताना पोटाची भूक काय असते ते अनुभवलंय. कधी डबा नाहीच आला तर खाण्याची होणारी तारांबळ कशी विसरणार?
आज मी सहज डायरीची पाने चाळत होतो. त्यात डब्यांचा हिशेब लिहिलेला होता. या काकांची आठवण झाली आणि नकळत भूतकाळात गेलो.

चार-पाच वर्षे पोटाची भूक भागविणाऱ्या ढोकळे काका या गृहस्थाला सलाम. आज मला हे लिहावं वाटलं ते त्यांच्या कृतीमुळे. त्यांच्या चांगुलपणामुळे. गरजेच्या वेळी हात दिला म्हणून. नाहीतरी कुणावर लिहावं अशी मानसं आजकाल आहेत कुठे?

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव



Wednesday, September 11, 2019

माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान आणि शिक्षण

गेल्या आठवड्यात एका स्कूल मध्ये जाणे झालं. सोबत असलेल्या तिथल्या शिक्षकाने त्या संपूर्ण स्कूल चा फेरफटका घडवून आणला. काही क्लासरूम दाखवले. प्रोजेक्टर, कंप्युटर वगैरे उपलब्ध. नर्सरी च्या वर्गाजवळून जाताना तिथे प्रोजेक्टर वर पोएम सुरु होत्या. काही मुलं बसलेली तर काही इकडे-तिकडे फिरण्यात मग्न. शिक्षक मात्र बाहेर फिरत होत्या. आता शिक्षक वर्गात नाही म्हटल्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ठरवलेली उद्दिष्टे सध्या होऊ शकत नाही.
मला ते चित्र फार काही पटलं नाही. माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान नेमकं कसं वापरायला हवं यावर सुद्धा कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत.  ते शिक्षकांना पर्याय नाही तर त्यांच्या मदतीला आहे. एखादी कठीण संकल्पना सोपी करून सांगण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार माहिती-संप्रेषण तंत्रज्ञान वापरावर भर देण्यात आलेला आहे. त्याचाच वापर करायचा की योग्य तेथे वापर करायचा यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
काळ बदलला. शिक्षण पद्धती बदलल्या. पारंपारिक शिक्षण पद्धतीची जागा आता तंत्रज्ञानयुक्त साधनांनी घेतली. पूर्वी शिक्षक वर्गात यायचे तर हातात पुस्तक, डस्टर, खडू असं साधारण चित्र असायचं. आता तसं राहिलं नाही. आज-काल शिक्षक पेन ड्राईव्ह हातात घेऊन वर्गात जातात. कंप्युटर ला पेन ड्राईव्ह लावला की प्रोजेक्टर वर शिकवायचं पीपीटी च्या माध्यमातून. म्हणजे काय तर शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झालेत. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) शिरकाव झाला. स्मार्ट क्लासरूम निर्माण झालेत. प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिसून येतोय. एखादी संकल्पना  शिकवताना दृश्य दाखवले तर त्याचा परिणाम अधिक. त्यामुळे तास रटाळ होत नाही.  मात्र आपण त्याचा वापर कसा करतो यावर सारं काही अवलंबून आहे.
आजकाल मी कित्येकांना पीपीटी (पॉवर पोइंट प्रेझेन्टेशन) वापरताना पाहिलंय. परंतु एकदा पीपीटी बनवली की वर्षानुवर्षे तिच राहते. बरं त्या स्लाईड वर भरपूर माहिती दाखवली जाते. वर्गात जाऊन फक्त त्या स्लाईड वर पेस्ट केलेलं वाचून दाखवायचं. त्यामुळे मूळ हेतूलाच धक्का पोचतो आहे.
तंत्रज्ञान हे मदतीसाठी आहे. ते प्राथमिक होऊ शकत नाही. गणितासारखा विषय पीपीटी वर दाखवून चालणार नाही. शिक्षक ज्ञानदान पद्धतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक. त्यामुळे त्याची जबाबदारी ही जास्त.
माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. यामध्ये व्हिडियो, डिव्हिडी, स्मार्ट फोन, संगणक आणि त्याला लागणारे  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ई. चा  समावेश होतो.
इन्टरनेट मुळे क्रांती झाली. आवश्यक असलेली माहिती तत्काळ उपलब्ध होते. गुगल, याहू, बिंग सारख्या सर्च इंजिन वर फक्त क्लिक करा. किती सारे पेजेस उपलब्ध होतात.
आजच्या काळातील विद्यार्थी हा फक्त शिक्षकांवर अवलंबून नाही. यामुळे आतापर्यंत शिक्षककेंद्रित असणार्‍या शिक्षणपद्धतीत नवा बदल घडून आला आहे. आतापर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असत मात्र आता विद्यार्थी देखील स्वतः इंटरनेट वापरून माहिती मिळवू शकतात. म्हणजेच शिक्षणपद्धती विद्यार्थी केंद्रित होत आहे.
मागणी आणि प्रतिसाद या तत्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते. त्यामुळे शासन, खाजगी उद्योगधंदे, शाळा, विद्यापीठे एवढेच नव्हे तर अशासकीय संस्थासुद्धा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतात.  आय.सि.टी. चा फक्त शिक्षण क्षेत्रात नव्हे तर बँकिंग, मेडिकल,लॉं, टुरिझम अशा अनेक क्षेत्रात शिरकाव झालाय.
आज आपण घरी बसून आपण ऑनलाईन कोर्स जॉईन करून शिकू शकतो. मासिव ओपन ऑनलाइन कोर्सेस जसे की खान अकॅडेमी, स्वयम/एन.पि.टी.ई.एल. सारखे पोर्टल उपलब्ध आहेत. व्हिडीओ लेक्चर्स च्या माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत पोचते.  त्यांच्या परीक्षा ही ऑनलाइन.
यामुळे वेळेची, पैशाची बचत होते. कित्येक विद्यार्थ्यांना मोठ-मोठ्या शहरात जाऊन क्लासेस लावणे शक्य होत नाही. मग ते ऑनलाइन कोर्सेस चा आधार घेतात.
शिक्षकांसाठी भरपूर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. गूगल क्लासरूम, मूडल, गुगल फॉर्म सारख्या सुविधा वापरून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहता येते. त्यांच्याकडून हवं ते करवून घेता येते.
विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न आता ते स्वतः शोधू शकतात आणि त्याचे समाधान करू शकतात. पारंपारिक शिक्षणाच्या सोबत तंत्रज्ञानाचा वापर केला तरच ते अधिक फायदेशीर ठरेल. 
आज नर्सरी पासून स्मार्ट क्लासरूम आहेत. प्रोजेक्टर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कथा/कविता शिकवल्या जातात.  यु-ट्यूब वर हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत कुठल्याही विषयावर.
एवढं सारं असून आव्हानं कमी नाहीत. किती शिक्षक तंत्रज्ञाचा वापर करतात? किती शिक्षकांना ते माहित आहे? किती शाळांमध्ये तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता आहे. यावर सर्व अवलंबून.
सुविधा असून चालत नाही. त्यांचा योग्य प्रमाणे वापर व्हायला हवा.
गुगल क्लासरूम किती लोकांना माहित आहे? हा मोठा प्रश्न.
प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेच्या विद्याथ्यांना परिपक्वता कमी असते. त्यांना आपण कसं शिकवतो/घडवतो ते महत्त्वाचं. त्यांच्या हाती तंत्रज्ञान देणं कितपत योग्य. आजकाल मोबाईल वापरणारी पिढी काय सर्च करते ते पाहिलं तर आव्हानं किती जास्त आहेत हे लक्षात येईल.

ICT असूनही शिक्षकाचं महत्त्व कमी होत नाही. व्हर्च्युअल होणं हे काही उद्दिष्ट होऊ शकत नाही.
ज्ञानाची आदान-प्रदान करताना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान याचा आपण वापर कसा करतो त्यावर त्याची परिणामकारकता अवलंबून.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Monday, September 9, 2019

"आउट ऑफ बॉक्स थिंकिंग"

आजकाल प्रत्त्येक जण सांगत असतो...थिंक आउट ऑफ बॉक्स. बर्याचदा  ते ऐकलं पण नेमकं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे काय? याबद्दल कुणीच सांगत नाही.
कित्येकांना मी विचारलं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे काय?
मला मिळालेली उत्तरे अशी: चौकोटी बाहेर विचार करणे, चौकोनाबाहेर विचार करणे, क्षमतेपलीकडे विचार करणे, वेगळा विचार करणे ई.
पण चौकोटी बाहेरचा/ चौकोनाबाहेरचा/ क्षमतेपलीकडे/वेगळा  विचार म्हणजे कुठला विचार? मुळात ही संकल्पना कित्येकांना समजली नाही. ऐकत जायचे आणि वापरात आणायचे एवढचं काय ते. थिंक आउट ऑफ बॉक्स असं सांगणे म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखा प्रकार.
आपल्याकडे एक पद्धत रूढ झाली आहे. एखादी गोष्ट इंग्रजीमध्ये विचारली की आपल्यापैकी बहुतांशी त्याचं मराठी अथवा हिन्दी मध्ये भाषांतर करतात. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग च्या बाबतीत तसंच. म्हणजे तुम्ही कुणाला विचारलं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे काय तर तुम्हाला उत्तर मिळेल-चौकोटी बाहेर विचार करणे.
आता चौकोटी बाहेर विचार करणे  / आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे:
गुगल सर्च केल्यानंतर मला मिळालेल्या काही व्याख्या:
·         “…is a metaphor that means to think differently, unconventionally, or from a new perspective.”( https://en.wikipedia.org/wiki/Thinking_outside_the_box)
·         “Thinking that moves away in diverging directions so as to involve a variety of aspects and which sometimes lead to novel ideas and solutions; associated with creativity” (https://www.vocabulary.com/dictionary/out-of-the-box%20thinking)
·         Idea generation or problem solving that is not constrained by self-imposed limits or conventional barriers. Being free or breakthrough thinking, it creates new paradigms and explores non-logical and uncommon ways and solutions. (http://www.businessdictionary.com/definition/out-of-the-box-thinking.html)
यावरून असं लक्षात येईल की वेगळंच काहीतरी अपेक्षित आहे. मग काय करायला हवं.
सर्वात आधी आपला बॉक्स  कुठला हे समजलं पाहिजे. तो बॉक्स समजला की त्याच्या बाहेर कसं जायचं ते कदाचित कळेल.
म्हणजे जोपर्यंत आपल्या विचारांची चौकट, तिची मर्यादा  लक्षात येत नाही तो पर्यंत त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही.
आता ही विचारांची चौकट प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते. म्हणून मी कसा आहे, माझी विचार करण्याची पद्धत काय, आलेल्या समस्येला मी नेहमी कसं सामोरे जातो वगैरे याचं विश्लेषण करणे गरजेचे आहे.
आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग ’ या संकल्पनेचा अर्थ– काही तरी सर्जनशील विचार करणं, पारंपरिक मार्गाने जाण्यापेक्षा वेगळा मार्ग  शोधणे  किंवा ती गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाणं अथवा पारंपारिक विचारसरणीला फाटा देऊन नाविन्याचा शोध घेणे असा होऊ शकतो.
दैनंदिन जिवनामध्ये कित्येक प्रसंग आपल्यासमोर येतात. आपण वेग-वेगळ्या पद्धतीने त्या सोडवण्याच्या प्रयत्न करतो. त्याचं एक उदाहरण-
एकदा संध्याकाळी कॉलेज संपल्यानंतर मी घरी गेलो. घरात प्रवेश केल्यानंतर मला असं लक्षात आलं की बायको मुलाला पुस्तकामध्ये कलर  शिकवण्याचा प्रयत्न करत होती. हा रेड कलर, हा ब्लू वगैरे वगैरे. तो काही लक्ष देत नव्हता. तो  नैसर्गिक मानवी स्वभाव. एखादी गोष्ट कर म्हटलं की आपण ही करत नाही.
शिकवण्याची ही पारंपारिक पद्धत. घरा-घरांमध्ये हे चित्र आपल्याला दिसून येईल. बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत लहान मुलांसाठी जसं की साईझ , शेप, फ्रुट्सबद्दल. चित्रांच्या माध्यमातून दिलेलं असते सगळं.
पण ते पुस्तकातून शिकवणं मला काही रुचलं नाही. कारण तीन वर्षाच्या मुलाला तेवढी काही समज नसते.मुलं ऐकत ही नाही.
मी फ्रेश झाल्यानंतर त्याला मार्केट ला घेऊन गेलो. ५०-६० बलून चं एक पकेट घेऊन आलो. त्यात वेगवेगळ्या कलर चे बलून होते. घरी आल्यानंतर एक एक बलून फुगवून हवेत सोडायचा.  हा रेड कलर चा....हा ब्लू कलर चा. असं करता करता एक दीड तासांमध्ये तो संपूर्ण कलर समजायला लागला. उद्देश सफल झाला.
कलर शिकविणे हा उद्देश. पण पद्धत वेगळी. थोडक्यात त्याला वाटलं आपण खेळतोय. माझा उद्देश वेगळा-लर्निंग थ्रू फन. सगळ्यात सोपी पद्धत.
म्हणजे काय पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन नवीन वाट शोधणे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.
ज्या लोकांकडे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे ती आपल्याला यशाच्या शिखरावर पोचलेली दिसतात.
नामवंत लेखक शिव खेरा यांनी म्हटलेलं आहे की: “जितनेवाले कोई काम अलग नही करते, वे हर काम अलग ढंग से करते है/”

धोनी एक कर्णधार म्हणून खूप यशस्वी झाला. याचं कारण काय तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. २०११ च्या वर्ल्ड कप च्या अंतिम सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर खेळायला आला आणि पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहित.  तसं पाहिलं तर  युवराज त्या क्रमांकावर खेळायला यायला हवा होता. संपूर्ण सिरीजमध्ये युवराज चं योगदान प्रचंड होतं. पण तसं झालं नाही.  
रोहित शर्मा च्या करिअर ची पहिली सहा वर्षे तशी वाया गेली. पण २०१३ च्या चम्पिअन ट्रॉफी मध्ये धोनीने त्याला ओपनिंग करायला लावलं आणि तो एक उत्कृष्ट ओपनर म्हणून नावाजला गेलाय.
अशी अनेक उदाहरणे आपल्याला दैनंदिन जीवनात दिसून येतील. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग साठी शिक्षणाची गरज नाही. ती एक विचार प्रक्रिया आहे. कुणाकडे ही असू शकते.
समजा, वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना एक विद्यार्थी मोबाईल वर गेम खेळत आहे., हे त्या शिक्षकाच्या लक्षात आलं. मग त्या शिक्षकाची प्रतिक्रिया काय? आपल्या सर्वाना माहित. पारंपारिक पद्धतीने विचार केला तर कुठलाही शिक्षक रागावेल किंवा रागावतोच. यातून काय होतं एकतर तो विद्यार्थी पुढच्या क्लास ला येणार नाही किंवा आला तरी फार लक्ष देणार नाही. एवढ्या विद्यार्थ्यांसमोर रागावल्याने शिक्षांबद्दल त्याचं मत नकारार्थी होऊन जाईल. मग सांगायचं कसं. ही परिस्थिती आजकाल प्रत्येक शिक्षक अनुभवतो. मला एखादा विद्यार्थी मोबाईल वापरताना दिसला की मी म्हणतो व्हेरी गुड. मल्टी-टास्किंग (Multi-tasking). असं म्हटलं की त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही. तो स्व:ताहून मोबाईल बंद करतो वापरणं.  
जिओ चं उदाहरण घ्या. असा काही बिजनेस प्लान घेऊन आले की इतर टेलीकोम कंपन्यांना पळता भुई थोडी झाली. कित्येक कंपन्या बंद झाल्या तर उरलेल्या अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत आहेत.
IDEA says: An idea can change your life, but Jio came up with an idea and it changed the life of IDEA.

पतंजलीने नाही का आयुर्वेद हा धागा पकडून इतर कंपन्यांना आव्हान उभं केलं. किती तरी हजार कोटींचा टर्न ओव्हर आहे आता.
थोडक्यात काय तर आपल्याला जे अपेक्षित आहे ते करण्याची वेगळी पद्धत.
स्पर्धेचं युग आहे. यात टिकायचं असेल तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग शिवाय पर्याय नाही.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव