Wednesday, September 4, 2019

सहज सुचलं म्हणून...भाग १


मंगळवार...शेगाव ला आठवडी बाजार भरतो. काही झालं तरी बाजार चुकवला जात नाही. हप्तभारासाठी जो काही भाजी-पाला लागतो तो घेऊन यायचा. आजूबाजूच्या खेड्यांमधील कित्येक व्यापारी, किरकोळ विक्रेते आपला माल घेऊन येतात. दिवसभर विक्री करतात.
मी नेहमी सकाळी जातो बाजारात. एकतर गर्दी कमी असते, फार वेळ लागत नाही. कित्येक नोकरी करणारे सकाळी बाजारात जाणे पसंद करतात. मालाचा भाव थोडा जास्त असतो. संध्याकाळी परिस्थिती उलट असते. प्रचंड गर्दी असते. प्रत्येक विक्रेताला माल संपवून परतीची घाई असते. भाव पडलेले असतात.
ऋषीपंचमी निमित्त सकाळचं कॉलेज. सकाळी बाजारात जाता आलं नाही. त्यामुळे दुपारी बाजारात गेलो. भरपूर वेळ होता. म्हणून जरा निवांत भटकंती करत बसलो.
तसं कुणाकडून काय घ्यायचं ते ठरलेलं. तरीपण भटकंती म्हणून सारा बाजार पालथा घातला. टीनेजर पासून ६५-७० वर्षांच्या वृद्धापर्यंत विक्रेते आढळले. कुणी तंबू ठोकलेले. तर कुणी उघड्यावर. पायाला लागणाऱ्या चपला, बूट .सि. विकल्या जातात आणि भाजीपाला सारख्या जीवनावश्यक वस्तू मात्र उघड्यावर. दुर्दैवी चित्र.
फिरता-फिरता त्या बाजारात मला पुस्तकात शिकलेल्या कित्येक संकल्पना वापरात दिसल्या. संभाषण असो की जाहिरात. लक्ष वेधून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यातल्या कित्येकांचा पुस्तकांशी संबंध आला नसेल पण जे आपण वाचतो ते त्याचा वापर करतात. समाजातील सर्व स्तरातील जीवन जवळून अभ्यास करण्याचे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. या बाजारात आलेला प्रत्येक विक्रेता स्वतःच्या तर्हेने मालाची जाहिरात करत असतो.
फळे घ्यायची तर एका आजोबांकडून. नेहमीच. बाजारात ते आपलं दुकान थाटतात. हंगामानुसार आंबे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, चिक्कू, बोरं, सफरचंद, कलिंगड, डाळिंब, किवी असे कित्येक फळे विक्रीला आणतात. प्रत्येक मंगळवार ला त्यांची भेट होतेच. एखाद्या वेळेस गेलो नाही तर तुम्ही दिसले नाही म्हणून विचारणारे ते गृहस्थ.
गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्याकडून खरेदी करत असल्याने चांगले ओळखीचे झालेत. पैसे असले नसले तरी अडचण नाही. घेऊन जा...पैसे कधीपण द्या...हे त्याचं नेहमीचं वाक्य. सुरुवातीपासून त्यांच्या बद्दल कुतूहल. कित्येकदा त्यांच्याशी चर्चा करावी, गप्पा माराव्यात असं वाटायचं. वेळेअभावी कधी जुळून आलं नाही.
काल मात्र भरपूर वेळ होता. साधारण तीन वाजले असतील. आजोबांची जायची वेळ झाली होती. सकाळपासून ते तीन वाजेपर्यंत थांबतात. त्यानंतर त्यांचा मुलगा थांबतो. १५-२० मिनिटे त्यांच्याशी गप्पा मारल्यात. त्यांचे कित्येक पैलू कळाले.  त्या दरम्यान त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य नजरेखालून घातलं. मध्ये-मध्ये मी एखादं दुसरं विचारात होतो.
सत्तर च्या आसपास वय. दहावी पास. घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणापासून काम करण्याची सवय. कधी शेतात तर कधी पाव विकून घर-खर्चाला हातभार लावायचा. दहावीनंतर एदलाबाद ला टेलिफोन ऑपरेटर म्हणून सरकारी नोकरी मिळाली होती. पण ३०० रुपये महिन्याला. म्हणजे १० रुपये दिवस. आजोबांना मान्य नव्हतं. त्यामुळे ते रुजू झालेच नाहीत. व्यावसायिक वृत्ती.
जस-जसं वय वाढत गेलं तसं-तसं व्यवसायाचा गणित उमगू लागलं. व्यवसाय हेच चरितार्थाच साधन झालं. व्यवसाय सुरु केला तेव्हा भांडवल नव्हतं. थोडं-थोडं करता करता ते आता ते फळांचे विक्रेते आहेत.
आजोबांचा दिवस सकाळी वाजता सुरु होतो. कुठल्याही परिस्थितीत .३० ला अंघोळ. सहा वाजता सब्जी मंडित. तेथून माल उचलायचा आणि बाजारात घेऊन जायचा. स्थायिक दोन दुकाने पण आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून ते राबत आहेत. आता वय झालं. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवते.चेहऱ्यावर च्या सुरकुत्या, पांढरे केस, बोलताना लागणारा दम...सावळा वर्ण असं बरंच काही बोलकं. सफेद कुर्ता आणि धोती, डोक्याला पांढरी टोपी असा पेहराव.  वय झालं म्हणून तरी पण ते घरी बसत नाहीत. गुडघे त्रास देतात. जास्त बसने होत नाही आता असं आजोबा सहज बोलून जातात. खूप मोठं कुटुंब आहे. दोन मुलं, तीन मुली. सगळे विवाहित. नातू-पणतू. कुणी शिकतंय. कुणी नोकरीला लागलं. आयुष्यभर काम केलं पण मुलं कधी कुणाच्या कामाला गेली नाही. असं बरीच माहिती पुरविली आजोबांनी.
नियत चांगली पाहिजे फक्त. बरकत असते धंद्याला. हे दुकान म्हणजे पाच एकर शेती आहे असं आजोबा अभिमानाने सांगतात. पण मेहनत आहे. ती करावीच लागेल त्याशिवाय पर्याय नाही.
धंदा म्हटलं की नफा तोटा आलाच. कित्येकदा वाहतुकीदरम्यान खराब झालेली फळे कुणी घेत नाही. ग्राहकांचे अनेक प्रकार. पाच-दहा रुपयासारखे घासाघीस करणारे काही कमी नाहीत. गरीब असो वा श्रीमंत हे मात्र ठरलेलं. हिच लोकं मॉल मध्ये जाऊन मागेल तेवढी किमत देऊन वस्तू खरेदी करतात. रेट फिक्स्ड असा बोर्ड दिसला की तोंडातून शब्द निघत नाही त्यांच्या. स्टेटस चा प्रश्न ही आलाच. तिथे घासाघीस करणे म्हणजे कमीपना असे विचार करणारे ही असंख्य. इथे मात्र पाच-दहा रुपयांसाठी ही लोकं मेल्यागत करतात. कष्टाची किमत कमी होत चालली आहे. त्याचं हे द्योतक.

हि कष्टकरी लोकं फार शिस्तीचे. सवय ते मोडत नाहीत.
इकडे आपण सुशिक्षित. कधीही उठावं, कधीही झोपावं. चर्चा काय तर मी चहा बंद केलाय, सकाळी फिरायला जाणे सुरु केलंय. डायेटीग सुरु आहे. दीक्षित पाळतोय. इतका वेळ जेवायचं. दोन-जेवणात एवढं अंतर असावं वगैरे वगैरे. दोन-चार किलो कमी झालं की लगेच फेसबुक पोस्ट. पूर्वीचा आणि आताचा. त्यावर येणाऱ्या लाईक/कमेंट्स . प्रत्येक गोष्टीची जाहिरात. तेच आपलं आयुष्य.
दुसर्या बाजूला कष्टकरी वर्ग. दोन वेळेस च्या जेवणासाठी कायम झपाटलेला. संघर्षाचं जीवन जगणारा. सतत धावणं सुरु असते. त्याचं वजन हि वाढत नाही. मग कसली डायेटीग अन काय?  एखाद्या शेतकऱ्याने/कामगाराने दीक्षित फॉलो केल्याचं ऐकिवात नाही.  
आपण नोकरदार वर्ग. एकदा ऑफिस ला जायचं आणि बुड टेकवायचं. हालचाल नाही, काही नाही. तोच आपला कम्प्युटर आणि माउस. वाटलं तेव्हा चहा-नाश्ता. भरपेट नेहमी. 
वयाच्या सत्तरीत असणारे हे आजोबा सहज बोलता बोलता बरंच काही शिकवून जातात. त्यांनी पुस्तके नसतील वाचली. पण समाज वाचला आहे. लोकं वाचली आहेत. जीवनाचं प्रत्येक पान उलटवलं आहे. त्याचा आनंद उपभोगलाय. अजून हि सुरु आहे.
आपलं काय...ठरलेली नोकरी. ठरलेलं वेळापत्रक. ठरलेली जागा. ठरलेलं काम. बस. संपलं सारं.
फळ विक्रीचा व्यवसाय हा तसा सामाजिक दृष्ट्या नाक मुरडणाराच व्यवसाय. त्यामुळे सुशिक्षित लोकं  हाती तराजू घेवून फळ विक्रीसाठी बसलेले दिसत नाही.
रस्त्याच्या कडेला किंवा गाडीवर फळे विकणारे अनेक छोटे विक्रेते आपल्याला आसपास आढळतात.
उन-वारा-पाऊस याची चिंता करता त्यांचा व्यवसाय सुरु असतो. हे आजोबा त्यांचे प्रतिनिधी. वयाची चिंता करता संसाराचा रहाटगाडा ओढताना चेहर्यावरच हास्य टिकवून ठेवलंय. शरीर साथ देत नसलं तरी इच्छाशक्ती प्रचंड आहे.  
या लोकांच्या आयुष्याकडे पाहिलं की जीवन काय याचा अर्थ उमगू लागतो.  आपल्यापैकी कित्येक या आयुष्यापासून अनभिज्ञ.  
(टीप: फोटो मुद्दाम कोलाज केलाय. परवानगी न घेता एखाद्याचा फोटो अपलोड करणे योग्य नाही म्हणून.)

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव

Thursday, August 22, 2019

#LATE POST: नेमकं भाग-२


अलीकडे तू तीन वर्षाचा झाला. नाही म्हणायला तुझ्यासोबत आम्ही पण वाढलो. तू बोलायला लागला अन आम्ही काय बोलू नये यावर किती चर्चासत्र पार पडली असतील. जस आम्ही बोलतो तू तसाच रिपीट करतो. मग चांगल असो कि वाईट. रागाच्या भरात भाषेचा दर्जा घसरला कि तू ही तेच अनुकरण करतो. आणि पुढचे कित्येक दिवस तू ते विसरत नाही. आपण तसं बोलायला नको होतं याच्यासमोर याची वारंवार जाणीव करून देतोस. मी कुठे बाहेर गेलोच तर आल्यानंतर “मला का नाही नेलं” असा तुझा पहिला प्रश्न. तुला काय हवं काय नको हे सारं तुला कळायला लागलाय. घरी यायला उशीर झालाच तर “माझे बाबा कुठे गेले” असं विचारून तू थांबत नाही. फोन लावून द्यायला भाग पडतो. तुम्ही कुठे आहे, घरी या. मला यायचं तुमच्यासोबत...असं ऐकलं मी घराच्या दिशेने मार्गस्थ होतो.  
तू फार वेळ कशातही रमत नाही.  बोलायला लागल्यापासून तुझे सातत्याने येणारे प्रश्न. कित्येकदा मला ही माहित नसते. तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसतातच. कुणी भेटलं तर कोण होते ते. ते काय आहे. वगैरे वगैरे. कधी कधी काय उत्तर द्यावे हा पण प्रश्नच.
मला राग आला आता असं मी म्हटल्यावर तुझा प्रश्न- कुठून आला, कुठे चालला तो. आता नेमकं राग म्हणजे काय कसं सांगावं. मी अन्नुत्तरीत. पण तू मात्र पिच्छा सोडत नाही. मग कसातरी विषय बदलून न्यायाचा. हे नेहमीचं झालंय.

तू बोलत असतो आणि आम्ही ऐकत असतो. रोज कॉलेज ला जावू नका. मला पण यायचं आहे. हे नेहमीचंच. बेल वाजली किंवा दरवाजा वाजला तर कोण आलंय पाहायला तू तिथं पोचलेला असतो. कित्येकदा दरवाजा उघडून तू बाहेर पडलेला असतो. जेवताना ताटावर येणारी सायकल...आमची होणारी चिडचिड...कधी कधी एक-दोन फटका...त्यातून तुझं  रडणं आणि आता मी तुमच्याशी बोलत नाही असं म्हणणं...आणि पुन्हा ती सायकल अन तू. नेहमीचं...अंगवळणी पडलंय.
आयुष्यातील प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवून जातो. तसंच आमचंही झालंय.  झोपताना मला इंग्रजी मध्ये गोष्ट सांगा असं रोज. मला गोष्टी येतच नाहीत. मग मी अशीच गोष्ट तयार करून सांगत असतो. आता रोज तिच गोष्ट. एकदा मराठी आणि एकदा इंग्रजीत.
पूर्वी बरं होतं सहा वर्षे वय झाल्यानंतर शाळेत नाव घातलं जायचं. म्हणजे मुलांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक  वाढ व्हायची.  आता सारं बदललंय. आधी प्ले ग्रुप. मग तीन वर्षे पूर्ण व्हायला लागली की नर्सरीत. त्यात ही चोईस...सि.बि.एस. ई., आय.सि.एस.ई. की स्टेट बोर्ड. आता कुठे बोलायला लागले आणि शाळा सुरु. व्यावसायीकरण झालंय.  
आपण ही त्यात सापडलोय. सकाळी तयारी करून द्यावी. शाळेत सोडायला जावं. सोबत टिफीन. युनिफोर्म...शूज...गळ्यात आय कार्ड..एक-दोन पुस्तके वाचता येत नाही तरी पण. बरं तिथे शाळेत काय करतो तो प्रश्न. त्या स्लायडिंग कडे वर्गातून पळून जाणे एवढं कळलंय फक्त. नर्सरीत काय तर इंग्रजी वर्णमाला...हातात लेखन पकडता येत नाही अजून अन सुरु झालंय ए...बि...काढणं.  तुम्ही त्याला शिकवत जा काहीतरी असं मी रोज ऐकतोय घरी. माझं उत्तर एकच...मी त्याला शिकवणार नाही.  जिकडे तिकडे शिक्षकांचा भडीमार नकोय.  शाळेतले शिक्षक पुरेसे आहेत. शाळा आणि घर यातला फरक त्याला कळायला हवा. घराला शाळा बनवून कसं चालणार? बालपण जगू द्यावं मुलांना. मनसोक्त खेळली...बागडली पाहिजेत...मस्ती केली पाहिजे. अविस्मरणीय व्हायला हवं ते.
पालकांनी पालक च राहावं किंवा पालक व्हायला आधी शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. अन्यथा पालकांसाठी सुद्धा कार्यशाळा आयोजन सुरु होईल. तसं काही ठिकाणी सुरु झालंय.  वयानुसार शिकतोच आपण. आज नाही तर उद्या. कुणी  लवकर कुणी उशिरा. निसर्गाचा खेळ सारा. एखादी गोष्ट परिपक्व होण्याआधी प्रक्रिया केली तर परिणाम उलटा च होणार कारण ते निसर्गाच्या विरुद्ध. मुलं जन्माला यायच्या आधी नऊ महीने असते आईच्या पोटात. झटपट नाही होत प्रत्येक गोष्ट. म्हणून मी त्याला शिकवत नाही. वेळ आली की जमेल त्याला. उत्कृष्ट शिक्षक लाभले म्हणून उत्कृष्ट विद्यार्थी बाहेर पडत नाहीत. हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून. योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायला हव्यातच. पण योग्य वेळ कोणती याचं कुठलंच भान आजकाल आढळत नाही.
प्ले ग्रुप च्या गोंडस नावाखाली कमाई सुरु झालीय. ठरलेली फी भरायची. आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नाही. उगाच घरी त्रास. त्यापेक्षा तिथे दोन-तीन तास सोडून द्यायचं. पूर्वी असं नव्हतचं. प्ले ग्रुप ची गरज पडली नाही. दारं-खिडक्या कायम उघड्या असायच्या. गल्ली-बोळामधली पोरं एकत्र येऊन खेळायची. सुरकाठी..रिंगण गोट्या...लपाछपी...विटी-दांडू...लगोरी...लंगडी... भिंगऱ्या .. भोवरे असे किती सारे खेळ होते.  काळ बदललाय. नामशेष झालेत कित्येक खेळ. येणाऱ्या पिढ्यांना कदाचित हे आठवणार नाही. मोकळ्या हवेत खेळणं...बागडणं बंद झालंय...भिंती फक्त सिमेंट च्या च नव्हे तर मनाच्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. पालक ही सिलेक्तीव झाले आहेत. कुणा-सोबत खेळावं...कुणासोबत नाही सारं सांगितल्या जातेय. जिकडे-तिकडे फक्त भिंती. कसा घेणार मुलं मोकळा श्वास?
आता दार-खिडक्या सतत  बंद असतात. पालकांसहित  मुलंही घरात कोंडली जाऊ लागली आणि टीव्ही, मोबाईल, कंप्युटर यात अडकायला लागली आहे. त्यातून कित्येक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. पण आपल्याला याचं देणं-घेणं नाही. मी माझं कुटुंब...येणाऱ्या पिढ्या ही एकलकोंडी होण्याची भीती आहे. सामाजीकरण नाही तर कुठं येणार मानसिक विकास. मुलांना रागावलेलं आवडत नाही. थोडंस जरी टेन्शन आलं तर आभाळ कोसळल्या सारखं होते.


व्यावसायिक लोकांना त्यात ही संधी दिसली. कमावण्याचे मार्ग सापडला. व्यक्तिमत्त्व विकास, लाइफ स्किल्स, संभाषण कौशल्य यावर वर्क शॉप, सेमिनार, लेक्चर्स उपलब्ध आहेत. या विषयांवर लाखो पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. गोंडस शिर्षक देऊन पैसे मिळवणे सुरु झालंय. पुस्तके वाचून अथवा प्रशिक्षण घेऊन  कुठला आलाय व्यक्तिमत्त्व विकास? आणि हे क्लासेस वाले म्हणतात एक महिन्यात...दोन महिन्यात..भंपकबाजी नुसती. ते झटपट श्रीमंत झालेत एवढं मात्र खरं.
म्हणजे काय तर ज्या गोष्टी मुलं लहान असताना शिकत होती आता ते चार भिंतीआड शिकत आहेत तेही पैसे देऊन. गुगल सर्च केला तर कित्येक ट्रेनर, ट्रेनिंग देणाऱ्या संस्था सापडतील. बक्कल पैसा कमावणे सुरु आहे. पण आडातच नाही तर पोहर्यात येणार कुठून ही म्हण तंतोतंत लागू पडतेय.  भांडवलीकरण झालंय प्रत्येक गोष्टीचं आजकाल. आपणही त्याचा एक भाग बनून बसलो. असो कधीतरी यात बदल घडेल. आपण बदलू...समाज बदलेल..या आशेवर...
                                                                                            सचिन भगत (९९२२१२७३८५)
                                                                              श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
                                                                             शेगाव -४४४२०३

Tuesday, August 20, 2019

जागो ग्राहक जागो- भाग ४


प्रत्येकाला पैसा हवाय. हाव. त्यामुळे चेन मार्केटिंग सारखे प्रकार बाजारात आले. थोडक्यात वैयक्तिक संबंधांच्या साखळीमधून विकण्याचे तंत्र. त्यासाठी प्रशिक्षण ही दिले जाते. मोठ-मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या होतात. सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात. आणि आपण त्याला बळी पडतो. सॅनिटरी नॅपकिन पासून आजकाल चेन मार्केटिंग सुरु झालीय. एकाने मेंबर व्हायचं आणि मेंबर कनेक्ट करत जायचं ठराविक रक्कम भरून. आपण मेंबर झालो की मग नातेवाईक,परिचित, मित्र, शेजारी असे आपणही जोडायला सुरुवात करतो. एवढे सदस्य झाले की एवढा वाटा तुमचा असं ते ढोबळ स्वरूप. खूप मोठ्या प्रमाणात कमिशनचे प्रलोभन दाखवले जाते.  आकर्षक व्याजदर/नफा वगैरे . कित्येक लोकं या प्रलोभानापायी बुडालीत. मैत्रेय चं बघा काय झालंय. कित्येक लोकांचे पैसे बुडालेत. मालक/प्रतिनिधी (मार्केटिंग एजंट) कमवून बसलेत. सामान्य माणूस लोभेपायी देशोधडीला लागला. पैसे कधीतरी मिळतील अशी आशा कित्येकांना आहे. तसं अशक्यच. जाऊ द्या.
विमा क्षेत्रात सध्या भरपूर गुंतवणूक सुरु आहे. मोठ-मोठ्या बँका, कंपन्या ग्राहक मिळवण्यासाठी सरसावल्या आहेत. कित्येक लोकं आपण गेल्यानंतर काय या भितीने विमा काढतात तर काही गुंतवणूक म्हणून. मुळात विमा कशासाठी काढावा याचं ज्ञान समाजात नाही. विमा पॉलिसी नेमकं काय हेच कित्येकांना माहित नाही. विमा प्रतिनिधी फक्त ज्यावर जास्त कमिशन तेच ग्राहकांना सांगतात. खरं-तर विमा म्हणजे गुंतवणूक नाहीच.  प्रतिनिधीना टार्गेट दिलेले असतात. खरं-खोटं बोलून ग्राहक मिळवण्याची शर्यत सुरु आहे. असंख्य प्लान उपलब्ध आहेत. आपल्यामधील कित्येक त्याला बळी पडत आहेत. असाच एक प्रसंग.
मध्यंतरी आम्ही ट्रीप ला गेलो होतो. आठ-दहा लोकं. प्रवासा-दरम्यान इकडच्या-तिकडच्या गप्पा होतातच. प्रत्येक आपापले अनुभव सांगत होता. त्यात मी माझा विमा क्षेत्रा-संबंधित अनुभव सांगितला. माझी फसवणूक झाली होती. भांडून मी पैसे परत मिळविले. (जागो ग्राहक जागो- भाग २) आमच्यापैकी एकाची तशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. विमा काढून ८-९ महीने उलटले होते. पन्नास हजार रुपये वार्षिक हप्ता. प्रतिनिधी त्यांच्या ऑफिस ला येऊन भेटली होती. माहिती सांगितली. यांनी ती स्विकार करून हप्ता ही भरला. ३-४ महिन्यानंतर त्यांना मेल आला कंपनीकडून. पन्नास हजाराचे ४१ हजार झाले होते. म्हणजे तो विमा गुंतवणूक म्हणून तर होताच पण subject to market risk.
त्या प्रतिनिधीने दिलेली माहिती अर्धवट होती. यांनी गुंतवणूक म्हणून विमा घेतला आणि त्या प्रतिनिधीने त्याला subject to market risk करून टाकलं. ते यांना माहित नाही. यांना मार्केट रिस्क नको होतं. झालं. आता पुढे काय? यांना काहीच माहित नाही. “फसवलं नं राव त्या बाईने मला”, असं ते तीन-चार वेळा बोलले.
मला पैसे परत मिळू शकतात काय? त्यांनी विचारलं.
विमा काढून बरेच महीने उलटले असल्याने मी साशंक होतो. विमा रद्द करण्याचा कालावधी हि संपला होता. त्याला फ्री लुक पेरिअड असं म्हणतात म्हणजे विम्याची कागदपत्रे मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला मला ते नकोय म्हणून रद्द करता येते. पण तो पर्याय हि समोर नव्हता.
त्यामुळे मी म्हटलं, प्रयत्न करूयात. रीतसर तक्रार दाखल करू.
ट्रीप वरून परत आल्यानंतर त्यांनी मला त्या विम्याचे कागदपत्रे दाखवली. नेमकं काय सांगितलं होतं आणि काय झालंय याची विचारपूस केली. तक्रार कुठे आणि कशी दाखल करायची हे माहित असल्यने फक्त कुठल्या मुद्द्यावर भर द्यायचा म्हणजे विमा रद्द होऊन पैसे वापस मिळतील यावर विचार केला. त्यानंतर तक्रार करण्यासाठी खालील मेल लिहिला:
Dear Sir/Madam,
I am XXX  from  Shegaon. Your representative visited me to get the policy from me. I agreed for the policy-No.00000000-XXXXX and paid 50000/-. I received the documents later on. I did not read it for many months. When I received official statement from your side (monthly policy charge details-All funds), the amount has been in decreasing order. This is not what your representative had conveyed me. As per her information, this was an investment policy. Now it has been revealed that it is subject to market risk. This was not conveyed by her.
It is clear that what she conveyed was not true at all. I still remember that she did not allow me to fill the policy documents. She said, “I will do it.” I trusted her. She has deceived me.
I have gone through the rules of IRDAI which clearly states that the policy documents have to be filled by me as I am an educated person. This has not happened in my case. Your representative did it. I only signed it. Now I realize why she did it.
I do not agree with this policy. I request you cancel my policy and return the amount with deductions as per the rules of IRDAI.
This is not the way to do the business. I am really disappointed by this type of business. Such type of business harms the image of XXX which is known for the best business and service.
I am writing this to you as I believe that justice will be done.
Kindly cancel my policy and return my amount.
If you don’t do it, I will approach Consumer Forum. The legal options are open.
The details of Policy: XXXXX
हे जसच्या तसं त्यांनी त्यांच्या ई-मेल वरून पाठवलं संबंधित कंपनीला. तक्रार आल्याने एक-दोन दिवसात काही प्रतिनिधी त्यांना येऊन भेटून ही गेलेत. मन वळवण्याचा ही प्रयत्न झाला. इकडून नकार. विमा काढताना रेकोर्डिंग करण्याची पद्धत काही बँका/कंपन्या करत आहेत. यांच्या बाबतीत रेकोर्डिंग झालं होतं. ते तपासण्यात आलं. रेकोर्डिंग खराब झाल्याने त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.
प्रकरण अंगावर येईल असं दिसल्याने त्यातल्या एकाने हा प्रसंग दुसर्या प्रतिनिधीच्या माथी मारला. तो दुसरा प्रतिनिधी काही दिवसांआधी हे जग सोडून गेला होता. रीतसर प्रक्रिया पार पडली. जवळ-पास एक महिन्याने संपूर्ण रक्कम परत मिळाली.




आता सुशिक्षित लोकांना जर गंडवलं जात असेल तर अशिक्षित/सामान्य लोकांबाबत तर कल्पना करवत नाही.  फसवणूक करणारे सुशिक्षित. किती हा विरोधाभास. आपण ज्ञानाच्या/ नैतिकतेच्या गप्पा ठोकतो दोन-चार पुस्तके वाचली की पण ते अंमलात येत नाही.  कित्येक लोकं मागे लागतात /भेटतात  विमा काढण्यासाठी. बहुतांशी आपल्या आसपासचीच जास्त. नाही म्हटलं तर रुसवे-फुगवे. असा विचार करून विमा काढणार्यांची संख्याही काही कमी नाही. हे फक्त विम्याच्या बाबतीत नाही. तर बाजारात कित्येक प्रोडक्ट्स चेन मार्केटिंग पद्धतीने विकले जात आहेत.  
विमा काढू नये असं मत नाही. विमा चांगलाच. फक्त आपल्याला काय हवंय आणि ते मिळतेय का याची खात्री करायला हवी. कारण पैसा आपला. तो फुकटात मिळत नाही. त्याला मेहनत करावी लागते. संघर्ष करावा लागतो. कित्येकांची बोलणी ऐकावी लागतात. भविष्य चांगलं व्हावं म्हणून कित्येक स्वप्नांना तिलांजली दिली जाते.  ग्राहक सजग होणं काळाची गरज आहे. फसवणूक टाळण्याचा तो एकमेव मार्ग.

सचिन भगत (9922127385)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव