अलीकडे तू तीन वर्षाचा झाला. नाही म्हणायला तुझ्यासोबत आम्ही पण वाढलो. तू
बोलायला लागला अन आम्ही काय बोलू नये यावर किती चर्चासत्र पार पडली असतील. जस
आम्ही बोलतो तू तसाच रिपीट करतो. मग चांगल असो कि वाईट. रागाच्या भरात भाषेचा
दर्जा घसरला कि तू ही तेच अनुकरण करतो. आणि पुढचे कित्येक दिवस तू ते विसरत नाही. आपण
तसं बोलायला नको होतं याच्यासमोर याची वारंवार जाणीव करून देतोस. मी कुठे बाहेर
गेलोच तर आल्यानंतर “मला का नाही नेलं” असा तुझा पहिला प्रश्न. तुला काय हवं काय
नको हे सारं तुला कळायला लागलाय. घरी यायला उशीर झालाच तर “माझे बाबा कुठे गेले”
असं विचारून तू थांबत नाही. फोन लावून द्यायला भाग पडतो. तुम्ही कुठे आहे, घरी या.
मला यायचं तुमच्यासोबत...असं ऐकलं मी घराच्या दिशेने मार्गस्थ होतो.
तू फार वेळ कशातही रमत नाही. बोलायला
लागल्यापासून तुझे सातत्याने येणारे प्रश्न. कित्येकदा मला ही माहित नसते. तुझ्या
प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसतातच. कुणी भेटलं तर कोण होते ते. ते काय आहे.
वगैरे वगैरे. कधी कधी काय उत्तर द्यावे
हा पण प्रश्नच.
“मला राग आला आता” असं मी म्हटल्यावर तुझा प्रश्न- कुठून आला, कुठे चालला तो. आता नेमकं राग म्हणजे काय कसं
सांगावं. मी अन्नुत्तरीत. पण तू मात्र पिच्छा सोडत नाही. मग कसातरी विषय बदलून न्यायाचा.
हे नेहमीचं झालंय.
तू बोलत असतो आणि आम्ही ऐकत असतो. रोज कॉलेज ला जावू नका. मला पण यायचं आहे.
हे नेहमीचंच. बेल वाजली किंवा दरवाजा वाजला तर कोण आलंय पाहायला तू तिथं पोचलेला
असतो. कित्येकदा दरवाजा उघडून तू बाहेर पडलेला असतो. जेवताना ताटावर येणारी सायकल...आमची
होणारी चिडचिड...कधी कधी एक-दोन फटका...त्यातून तुझं रडणं आणि आता मी तुमच्याशी बोलत नाही असं
म्हणणं...आणि पुन्हा ती सायकल अन तू. नेहमीचं...अंगवळणी पडलंय.
आयुष्यातील प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवून जातो. तसंच आमचंही झालंय. झोपताना मला इंग्रजी मध्ये गोष्ट सांगा असं रोज.
मला गोष्टी येतच नाहीत. मग मी अशीच गोष्ट तयार करून सांगत असतो. आता रोज तिच
गोष्ट. एकदा मराठी आणि एकदा इंग्रजीत.
पूर्वी बरं होतं सहा वर्षे वय झाल्यानंतर शाळेत नाव घातलं जायचं. म्हणजे
मुलांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ
व्हायची. आता सारं बदललंय. आधी प्ले
ग्रुप. मग तीन वर्षे पूर्ण व्हायला लागली की नर्सरीत. त्यात ही चोईस...सि.बि.एस. ई.,
आय.सि.एस.ई. की स्टेट बोर्ड. आता कुठे बोलायला लागले आणि शाळा सुरु. व्यावसायीकरण
झालंय.
आपण ही त्यात सापडलोय. सकाळी तयारी करून द्यावी. शाळेत सोडायला जावं. सोबत टिफीन.
युनिफोर्म...शूज...गळ्यात आय कार्ड..एक-दोन पुस्तके वाचता येत नाही तरी पण. बरं
तिथे शाळेत काय करतो तो प्रश्न. त्या स्लायडिंग कडे वर्गातून पळून जाणे एवढं कळलंय
फक्त. नर्सरीत काय तर इंग्रजी वर्णमाला...हातात लेखन पकडता येत नाही अजून अन सुरु
झालंय ए...बि...काढणं. तुम्ही त्याला
शिकवत जा काहीतरी असं मी रोज ऐकतोय घरी. माझं उत्तर एकच...मी त्याला शिकवणार नाही.
जिकडे तिकडे शिक्षकांचा भडीमार नकोय. शाळेतले शिक्षक पुरेसे आहेत. शाळा आणि घर यातला
फरक त्याला कळायला हवा. घराला शाळा बनवून कसं चालणार? बालपण जगू द्यावं मुलांना.
मनसोक्त खेळली...बागडली पाहिजेत...मस्ती केली पाहिजे. अविस्मरणीय व्हायला हवं ते.
पालकांनी पालक च राहावं किंवा पालक व्हायला आधी शिकलं पाहिजे असं माझं मत आहे.
अन्यथा पालकांसाठी सुद्धा कार्यशाळा आयोजन सुरु होईल. तसं काही ठिकाणी सुरु झालंय.
वयानुसार शिकतोच आपण. आज नाही तर उद्या. कुणी
लवकर कुणी उशिरा. निसर्गाचा खेळ सारा. एखादी
गोष्ट परिपक्व होण्याआधी प्रक्रिया केली तर परिणाम उलटा च होणार कारण ते निसर्गाच्या विरुद्ध. मुलं जन्माला यायच्या आधी नऊ
महीने असते आईच्या पोटात. झटपट नाही होत प्रत्येक गोष्ट. म्हणून मी त्याला शिकवत
नाही. वेळ आली की जमेल त्याला. उत्कृष्ट शिक्षक लाभले म्हणून उत्कृष्ट विद्यार्थी
बाहेर पडत नाहीत. हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून. योग्य वेळी योग्य गोष्टी
व्हायला हव्यातच. पण योग्य वेळ कोणती याचं कुठलंच भान आजकाल आढळत नाही.
प्ले ग्रुप च्या गोंडस नावाखाली कमाई सुरु झालीय. ठरलेली फी भरायची. आई-वडिलांना
मुलांसाठी वेळ नाही. उगाच घरी त्रास. त्यापेक्षा तिथे दोन-तीन तास सोडून द्यायचं. पूर्वी
असं नव्हतचं. प्ले ग्रुप ची गरज पडली नाही. दारं-खिडक्या कायम उघड्या असायच्या. गल्ली-बोळामधली
पोरं एकत्र येऊन खेळायची. सुरकाठी..रिंगण गोट्या...लपाछपी...विटी-दांडू...लगोरी...लंगडी... भिंगऱ्या .. भोवरे असे किती सारे खेळ
होते. काळ बदललाय. नामशेष झालेत कित्येक
खेळ. येणाऱ्या पिढ्यांना कदाचित हे आठवणार नाही. मोकळ्या हवेत खेळणं...बागडणं बंद
झालंय...भिंती फक्त सिमेंट च्या च नव्हे तर मनाच्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. पालक
ही सिलेक्तीव झाले आहेत. कुणा-सोबत खेळावं...कुणासोबत नाही सारं सांगितल्या जातेय.
जिकडे-तिकडे फक्त भिंती. कसा घेणार मुलं मोकळा श्वास?
आता दार-खिडक्या सतत बंद असतात. पालकांसहित
मुलंही घरात कोंडली जाऊ लागली आणि टीव्ही,
मोबाईल, कंप्युटर यात अडकायला लागली आहे. त्यातून कित्येक मानसिक समस्या निर्माण
होत आहेत. पण आपल्याला याचं देणं-घेणं नाही. मी माझं कुटुंब...येणाऱ्या पिढ्या ही
एकलकोंडी होण्याची भीती आहे. सामाजीकरण नाही तर कुठं येणार मानसिक विकास. मुलांना
रागावलेलं आवडत नाही. थोडंस जरी टेन्शन आलं तर आभाळ कोसळल्या सारखं होते.
व्यावसायिक लोकांना त्यात ही संधी दिसली. कमावण्याचे मार्ग सापडला.
व्यक्तिमत्त्व विकास, लाइफ स्किल्स, संभाषण कौशल्य यावर वर्क शॉप, सेमिनार,
लेक्चर्स उपलब्ध आहेत. या विषयांवर लाखो पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. गोंडस
शिर्षक देऊन पैसे मिळवणे सुरु झालंय. पुस्तके वाचून अथवा प्रशिक्षण घेऊन कुठला आलाय व्यक्तिमत्त्व विकास? आणि हे क्लासेस
वाले म्हणतात एक महिन्यात...दोन महिन्यात..भंपकबाजी नुसती. ते झटपट श्रीमंत झालेत
एवढं मात्र खरं.
म्हणजे काय तर ज्या गोष्टी मुलं लहान असताना शिकत होती आता ते चार भिंतीआड
शिकत आहेत तेही पैसे देऊन. गुगल सर्च केला तर कित्येक ट्रेनर, ट्रेनिंग देणाऱ्या
संस्था सापडतील. बक्कल पैसा कमावणे सुरु आहे. पण आडातच नाही तर पोहर्यात येणार
कुठून ही म्हण तंतोतंत लागू पडतेय. भांडवलीकरण झालंय प्रत्येक गोष्टीचं आजकाल. आपणही
त्याचा एक भाग बनून बसलो. असो कधीतरी यात बदल घडेल. आपण बदलू...समाज बदलेल..या
आशेवर...
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव -४४४२०३
Very nice Sachin sir
ReplyDeleteKeep it up