Wednesday, October 31, 2018

अनुभव ७


जीवन एक चक्र आहे. प्रत्येक पावलावर ते आपल्याला अनुभव देत जाते. कधी चांगले कधी वाईट. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं अनुभव समृद्ध होत जातो. नवीन शिकत जातो. विद्यार्थी दशा प्रत्येकाचा जीवनातला महत्त्वाचा टप्पा. प्रश्नाचं स्वरूप वेगळ. त्याची उत्तरे हि आपल्याला शोधावी लागतात. छोटे छोटे प्रोब्लेम ही मोठे बनून जातात.  आमची विद्यार्थी दशा म्हणजे चोहोबाजूंनी अडचणी असलेली. जाईल तिथं समस्या, काही करेल तिथे अडचण. असाच एक अनुभव-
पुणे विद्यापिठात एम.ए. च्या दुसर्या वर्षाला असताना ची गोष्ट. आमच्या विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ची दोन दिवसीय कॉन्फरन्स आयोजित केली होती. दुसरा दिवस होता.  कॉन्फरन्स सुरु व्हायला वेळ होता. आम्ही वेळेआधीच तिथे होतो. हिवाळा होता.  कोवळ्या उन्हात आमच्या विभागाचे एक प्राध्यापक महाशय काही महिला प्राध्यापाकांसोबत विभागाबाहेर बसलेले होते. चर्चा सुरु होती त्यांची. ऐकावं म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. तेव्हा या लोकांचं प्रचंड आकर्षण होतं. ओळख असल्याने गुड मोर्निंग सर म्हणून चर्चा ऐकू लागलो. त्यांनी ओळख करून दिली त्या महिला प्राध्यापकांची. विविध विषयांवर चर्चा सुरु होत्या. तू माझं कौतुक, मी तुझं कौतुक असं चक्र सुरु होतं.  साधारण अर्धा तास झाला असेल. आमचे प्राध्यापक महाशयांनी त्या महिला प्राध्यापकांना चहा घेऊयात असं म्हटले. त्या हो म्हटल्या. थंडीचे दिवस. चहा कुणाला नकोय?  आमच्या विभागाजवळ च ओपन कॅन्टीन आहे. रस्ता ओलांडला कि  कॅन्टीन मध्ये. प्राध्यापक महाशयांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटले, सचिन, चहा घेऊन ये सर्वांसाठी. मी तेथून निघावं तेच त्यातली एक महिला प्राध्यापक अरे पैसे घे म्हटली. माझे पाय तिथे अडखळले  पण आमचे महाशय उत्तरले, “तो घेऊन येईल. असू द्या.”
खिश्यात दमडी नाही. सहा लोकं म्हणजे तीस रुपये हवेत. आता काय करावं? तेथून निघालो आणि कॅन्टीन ला आलो. ४-५ मिनिटे विचार केला.  त्या चहावाल्याकडे गेलो आणि म्हटलं “आमच्या ....सरांनी सहा कप चहा सांगितला आहे. ते नंतर पैसे देतील. तो व्यक्ती उत्तरला, “उन्होने नही बोला है उनके नामपर कुछ भी देनेका.” “अहो ते बसले आहेत सर तिथे. तुम्ही विचारू शकता, त्यांनीच पाठवलं आहे मला, मी आत्मविश्वासाने बोललो.” फार विचार न करता त्याने सहा कप भरले आणि माझ्या स्वाधीन केले. “खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं” या कधीतरी ऐकलेल्या तत्त्वाचा वापर झाला. खोटं बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. चहा घेऊन तिथून निघालो.
प्राध्यापक महाशयांच्या चर्चा सुरु होत्या. चहा दिला.  thank you ... thank you आपले नेहमीचे शब्द कानावर आले. हसत-खेळत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवसाचं सेशन सुरु होण्याच्या बेतात होतं. त्यामुळे थोड्या वेळाने ते हॉल कडे जाण्यास निघाले. मला वाटलं, सर नन्तर तरी पैसे देतील. पण तसं काही झालं नाही.
ते निघून गेले. मी त्या रिकाम्या कपांकडे पाहत बसलो बराच वेळ. कॅन्टीन वापस न्यावेत कि नाही? पैसे मागितले तर काय बोलायचं? विविध प्रश्न होते डोक्यात. शेवटी मी ते कप उचलले आणि कॅन्टीन ला एका कोपर्यात ठेऊन आलो त्या चहावाल्याची नजर चुकवत. पुढचे पंधरा दिवस मी कॅन्टीन कडे फिरकलो ही नाही.
तसंही आमचे प्राध्यापक महाशय आणि महिला हे काही नवीन नव्हतं. बरेच किस्से चवीनं चर्चिले जात होते. वर्षभरात सिनिअर कडून कित्येक गोष्टी ऐकून सामान्य ज्ञान ओसंडून वाहत होतं.

विद्यार्थ्यांकडे पैसे असतीलच असं नाही. बरं सामन्यांकडे पोकेट मनी हा प्रकार नसतो. लाख –दोन लाख पगार असणार्यांनी तीस रुपये देऊ नयेत. कठीण आहे सारं. कदाचित त्यांना वाटलं असेल छोटी रक्कम आहे. पण आमच्यासाठी ती किती मोठी होती त्यांना नाहीच कळणार. खिश्यात दमडी नसताना किती दिवस काढले असतील? किती वर्षे काढली असतील? एका डब्यात दोन असो कि एक वेळचा डबा. डबे बंद असले की होणारे हाल कुणाला माहित? भूक लागली कि चहा वर निभावून न्यायचं. असंख्य वेळा झालंय, केलंय असं. भूक...या शब्दाभोवती फिरतं आपलं जीवन. ती नाही टाळता येत. नियंत्रण तर शक्यच नाही. उपाशीपोटी झोप लागत नाही. अभ्यास तर दूर राहिला. विद्यापिठात शिक्षणासाठी  येणारे असे कित्येक विद्यार्थी सापडतील ज्यांना हे अनुभव आलेत.
सचिन भगत

Monday, October 29, 2018

बदलता काळ, बदलते संबंध-४


१९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. उद्योगधंदे आले, बाजारपेठ खुलल्या, रोजगाराच्या संधी वाढल्या. मध्यम वर्गाच्या हातात पैसा खेळू लागला. तो पैसा कॅश करण्याचा प्रयत्न उद्योग जगताकडून सुरु झाला. नवीन नवीन गोष्टी बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु झाला. तंत्रज्ञानाचा वापर हळू-हळू वाढायला सुरु झाली होती. या शतकाच्या सुरुवातीला खर्या अर्थाने प्रचंड उलथापालथ होण्यास सुरुवात झाली. भारतासारख्या बाजारपेठेला नजरंदाज करता येणं शक्यच नाही.
सुरुवातीला मोबाईल फोन आवाक्यात नव्हता. इनकमिंग-आउट गोइंग ला भरपूर पैसे पडत. अंबानींनी तो आवाक्यात आणला. सामन्यांच्या आवाक्यापलीकडे असणारा मोबाईल सहज उपलब्ध झाला. नोकिया चं साम्राज्य आठवत असेल. फिचर फोन घरोघरी झाला. coin बॉक्स, एस.टी.डी. कालबाह्य ठरले. मोबाईल फोन द्वारे संभाषण सुरु झालं. पैसे पडत. त्यामुळे मिस कॉल, मेसेज, रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत ६० रुपयात अमर्यादित बोलणं असे प्रकार सुरु झालेत. आम्ही कित्येकांनी ते केलंय. पैसे वाचविण्यासाठी मिस कॉल वर काम भागवणारे असंख्य होते. चुकून रिसीव्ह केला तर शिव्या. सणावाराच्या शुभेच्छा एक दोन दिवस आधीच पोचत. कारण त्या विशिष्ट दिवशी मेसेज pack चालायचं नाही (black-out days). साधारण एक मेसेज एक रुपया असं समीकरण. आता परिस्थिती बदलली आहे. रोमिंग, black out days इतिहासजमा झालेत. फुकटात कॉलिंग असल्याने मिस कॉल हि बंद झाला. आणि सोशल नेट्वर्किंग ने तर मेसेजिंग हि बंद करून टाकलंय.
बाजारपेठेचा विचार करणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि सव्‍‌र्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातच सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसायला लागली. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात झाली. टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणली आणि त्याचं अनुकरण करणं इतर कंपन्यांना सुद्धा करावं लागलं. जेवढे सेकंद बोलाल तेवढेच पैसे. एवढंच पुरेसं नव्हतं. त्याला इंटरनेट जोडलं गेलं  आणि स्मार्ट फोन चा प्रवेश झाला. फिचर फोन ला घरघर लागली. त्यात इंटरनेट ने आपल्याला वेड लावलं. नेट साठी मोबाईल कंपन्या भरपूर पैसा वसूल करत होत्या. त्याला आळा घातला तो जिओ नं.  जियोने जवळपास फुकट म्हणता येईल, अशा दरात मोबाइल सुविधा पुरवायला सुरुवात केली ते ही फोर जी. अत्यंत आक्रमक मार्केटिंग करीत जिओ मोबाइलच्या क्षेत्रात उतरले आणि प्रस्थापित मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले. मग प्रत्येकाची स्पर्धा सुरू झाली ती सर्वाधिक ग्राहक कोणाकडे असतील याची. डेटागीरी सुरु झाली.
जिओच्या आगमनानंतर ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी मोबाइल सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्राहकाला इंटरनेट डेटा अत्यल्प किंमतीत देण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मोफत डेटा, मोफत कॉल्स अशा अनेक प्रलोभनांमुळे जिओच्या ग्राहकसंख्येत वेगाने वाढ झाली. कॅशबॅक च्या लोभापायी रिचार्ज करणारे काही कमी नाही.
खाता जेवता, उठता-बसता मोबाईलवर. जाताना-येताना अगदी रस्त्यावरून जातानाही याचा वापर केला जातो. सोशल नेट्वर्किंग वर पसरवलं गेलेलं खरं काय नि खोटं काय काहीच कळत नाही. फालतू विनोद, विडंबन तर सर्रास.
मोबाइल पोर्नोग्राफी, डेटिंग साइट, तासन्तास फोनवर बोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं, व्ही.डी.ओ कॉल सुरु झालेत.  मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. किती सारे apps उपलब्ध झालेत. ४ जी ने विदाऊट बफरींग व्हिडीओ पाहणं सोपं झालं. मोबाईल मध्येच एवढी स्पेस यायला लागली कि मेमरी कार्ड चा वापर संपण्यात जमा आहे.   
पण आज आपण मोबाइलचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो आहोत आणि या डेटा वॉरमध्ये मोबाइल सुविधा देणाऱ्या कंपन्या आपल्याला आणखीनच प्रलोभनाला बळी पाडून तो वापर वाढवताना दिसत आहेत.
अन्न,वस्त्र आणी निवारा या बरोबरच मोबाईल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. आज भाजीवाल्यापासून भिकाऱ्यापर्यंत, शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील म्हातार्यांकडे दिसतो. खायला अन्न नाही, राहायला घर नाही पण मोबाईल हवाच  अशी मानसिकता तयार झाली आहे. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही.
channels ची स्पर्धा च पाहून घ्या. पूर्वी किती मिनिटे ब्रेक आहे हे माहित नसायचं. आता त्यांना आता सांगावं लागतंय. ये ढाई किलो का हाथ नाही, ढाई मिनिट का ब्रेक है किंवा स्क्रिन च्या उजव्या बाजूला दोन मिनिटांचा  time countdown  दाखवावा लागतो. टी.आर. पी. साठी काय नाही सुरु. तेच-तेच कथानक, अतिशोयक्ती, अंगावर मोजके कपडे घालून आकर्षित करण्याचा प्रयत्न, तर्क-विरहित कल्पना. सध्या तर त्या साउथ कडील फिल्म्स चा बोलबाला आहे. कुठलंही channel लावा ते दिसून येईल. बरं लॉजिक चा पत्ता नाही.  
हे सारं घडत असताना आपण कुठे आहोत. आपण तेच करत आहोत जे त्यांना हवं आहे. ते आपल्याला प्रलोभने दाखवतात आणि आपण बळी पडतो. सुरुवातीला फुकट, cashback वगैरे. मग हळू हळू पैसे वसूल केले जातात.
हेच काय. हॉटेल्स, lodge वगैरे पहा. फ्री वायफाय चे फलक लावलेले दिसतील. माणसाची लोभी वृत्ती कॅश केलीय त्यांनी.
हरवून बसलोय आपण स्वतःला या अर्थकारनात. पैसे असो किंवा नसो फक्त वापरा, खरेदी करा. मदतीसाठी बँकां हि सरसावल्या आहेत. पैसे नसतील तर ई.एम.आय., क्रेडीट कार्ड वगैरे.
प्रत्येकाला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे या लोकांनी. किती घरांमध्ये टी.व्ही. बंद करून एकत्र जेवणाची पद्धत आहे?  किती लोकं झोपताना मोबाईल बंद करतात? किती विद्यार्थी मोबाईल शिवाय अभ्यास करू शकतात?  संशोधनाचा विषय आहे. तंत्रज्ञानाशी आपलं नातं घट्ट झालं पण मानवी नातं सैल झालं.
संवाद-संपर्क क्रांती घडवून आणणा-या सोशल मीडियाने आज बहुतांश लोकांचे जीवन व्यापून टाकले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रचंड वाढलाय. आभासी चित्र निर्माण झालंय. एकटेपणा, नैराश्य वाढलंय. संवाद ढासळला कि हे प्रकार होणारच. सध्याच्या जगामध्ये किती काळ स्क्रीनसमोर असावे याचाही विचार असायला हवा. विरंगुळा म्हणून मोबाईल वापरणे नित्याचेच झाले आहे. आपण हि तेच करतो.
तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही.  स्माइलपेक्षा आता स्माइली महत्त्वाची झाली आहे. आताच्या पिढीवर हेच संस्कार होत आहेत. बदल झपाट्याने होत गेला. अर्थातच चांगल्या बाजू आहेतच. त्याबद्दल दुमत नाही. पण कुठली गोष्ट किती वापरावी, कशी वापरावी, आणि कशासाठी वापरावी याबद्दल जाणीव असणे गरजेचं झालंय. हे करत असताना माणसाचा माणसाशी असलेला संवाद टिकला पाहिजे तो फक्त व्हर्चुअल पुरता मर्यादित असता कामा नये.

Friday, October 26, 2018

बदलता काळ, बदलते संबंध -३


जसा काळ बदलला, तसा माणूस बदलला. मनोरंजनाची अफाट साधने निर्माण झाली. पूर्वी ती नव्हती तेव्हा लोकांमध्ये संवाद भरपूर असायचा. ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं तर ते प्रकर्षाने दिसून येईल. आता तंत्रज्ञान आलं. मनोरंजनाची साधने आली. आणि माणसाचा स्वभाव, वर्तन बदलत गेलं. पूर्वी संपूर्ण गावात एक-दोन टी. व्ही. संच. तेही फक्त दूरदर्शन. रेडीओ बर्यापैकी असायचा. विविधभारती चे कित्येक कार्यक्रम लोकप्रिय. ते जयमाला असो की सखी सहेली, पिटारा, संगीत-सरिता. खरं तर विविधभारती रेडियो वाहिनी ही प्रसिध्द झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे. बरंच काही बोलता येईल त्याबद्दल. क्रिकेटची मॅच जेव्हा असायची तेव्हा तेव्हा रेडिओची कॉमेट्री ऐकणे मजाच. मराठी समालोचन ऐकणे एक आनंदाची बाब असायची. चेंडु नुसताच तटवला ( प्लेड केला ), झेल घेतला ( कॅच घेतला ), धावबाद ( रन-ऑउट ), यष्टीरक्षक ( विकेटकिपर), गोलंदाज/ गोलंदाजी ( बोलर/ बोलींग ) हे शब्द तर ऐकणे आता दुरापास्त झाले आहे.
अलीकडच्या काळात सारं बदललं. प्रत्येकाच्या घरात टी.व्ही. चा प्रवेश झाला. टाटा स्काय, डिश टी. व्ही. एअर टेल सारख्यांनी भरपूर channels उपलब्ध करून दिली. आज २००-३०० channels सहज उपलब्ध आहेत २००-३०० रुपयांमध्ये. 
रेडिओ रोजचा राहिला नाही. एफ. एम. रेडिओ सुरु झाला, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नाही. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग. शहरांमध्ये तर कानात हेडफोन टाकून एफ.एम. ऐकणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात भर सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बस मधील एफ. एम. ची. जिकडे-तिकडे फक्त गोंगाट. आपण हरवलो आहे या गोंगाटात. 
पूर्वी संध्याकाळी लोकं एकत्र यायची. चावडीवर, पारावर, कट्ट्यावर बसायची. हिवाळ्यात शेकोट्या पेटवून अवती-भवती बसेलेले लोकं नित्याचंच. गप्पा व्हायच्या. परिस्थिती बदलली आहे. आज तसं नाही. चावडी, पार ओस पडलेत. शेकोट्या अभावानेच आढळतात. कुणाच्याही घरी जा टी. व्ही. सुरु असतो. अख्ख कुटुंब टी. व्ही. त मग्न. कुठंय चर्चा, कुठंय संवाद. कुणी पाहुणे आले तर ते पण टी. व्ही. पाहण्यात मग्न. सिरिअल्स च तर विचारायला नको. त्यांची कल्पनाशक्ती तर कधी नव्हे तेवढी रसातळाला गेलीय. लॉजिक चा पत्ता नाही. सासू-सुना वाद असो कि अजून काही चोथा केलंय त्याच-त्याच गोष्टींचा. हातात मोबाईल तर नेहमीचाच. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे कित्येक पालकांना ठाऊकच नाही. भारतात तर पाहता पाहता गरीब-श्रीमंत, मालक-कामगार, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणाई या सर्वांच्याच कानाला मोबाइल लागला. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात त्यावरून बोलणे, अश्लील एसएमएस पाठविणे, वाहने चालविताना अपघात होण्याची तमा न बाळगता त्याचा वापर करणे वगैरे वगैरे. सुद्धा ओघाने आलंच. 
लहान मुल रडतंय म्हणून त्याचा हातात मोबाईल देणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यात कौतुक. त्याला सगळं कळत. यु.ट्यूब लावता येत वगैरे वगैरे. घरात पालकच हल्ली स्मार्टफोन वरील फेसबुक व वॉट्स अ‍ॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला वेळ या अ‍ॅप्सवर घालवतात. जिथे पालकच आपलं दायित्व विसरून गेलेत तिथे काय अपेक्षा करणार. खेळण्या-बागडण्याच वय वाया चाललं आहे. मोबाईल दिल्याशिवाय तो/ती जेवतच नाही असे कित्येक लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय.
पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर फेकलं कि बाहेर खेळायला जाणारी मुलं आज घरातच अडकली आहेत. आउट डोअर गेम्स ची जागा कम्प्युटर गेम्स/ मोबाईल ने घेतलीय. मैदानी खेळ सुटल्याने मुलं व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे.
जीवन हि रिमोट झालंय आजकाल. लोकं ही रिमोट झालेत. news channels तर विकाऊ झालेत. त्यांना जे हवं असतं तेच आपल्याला पाहावं लागतं. या सार्यांचा परिणाम आपल्यातला संवाद नाहीसा किंवा कमी होण्यात झाला. संवेदना कमी होत चालल्या आहेत. ईतरांशी काहीच देणं-घेणं उरलं नाही. कामापुरते काम. पुढच्या १०-१५ वर्षात गंभीर चित्र दिसेल. त्याचे परिणाम हि आपल्याला भोगावे लागतील. तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा हे ठरवावे लागेल. शिक्षण द्यावं लागेल. जागरुकता निर्माण करावी लागेल. अतिरेकी वापर थांबवायला हवा. एकत्र यायला हवं. चर्चा झडल्या पाहिजेत. संवाद झाला पाहिजे. 
                                                                                                                                                       सचिन भगत