Monday, October 29, 2018

बदलता काळ, बदलते संबंध-४


१९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. उद्योगधंदे आले, बाजारपेठ खुलल्या, रोजगाराच्या संधी वाढल्या. मध्यम वर्गाच्या हातात पैसा खेळू लागला. तो पैसा कॅश करण्याचा प्रयत्न उद्योग जगताकडून सुरु झाला. नवीन नवीन गोष्टी बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु झाला. तंत्रज्ञानाचा वापर हळू-हळू वाढायला सुरु झाली होती. या शतकाच्या सुरुवातीला खर्या अर्थाने प्रचंड उलथापालथ होण्यास सुरुवात झाली. भारतासारख्या बाजारपेठेला नजरंदाज करता येणं शक्यच नाही.
सुरुवातीला मोबाईल फोन आवाक्यात नव्हता. इनकमिंग-आउट गोइंग ला भरपूर पैसे पडत. अंबानींनी तो आवाक्यात आणला. सामन्यांच्या आवाक्यापलीकडे असणारा मोबाईल सहज उपलब्ध झाला. नोकिया चं साम्राज्य आठवत असेल. फिचर फोन घरोघरी झाला. coin बॉक्स, एस.टी.डी. कालबाह्य ठरले. मोबाईल फोन द्वारे संभाषण सुरु झालं. पैसे पडत. त्यामुळे मिस कॉल, मेसेज, रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत ६० रुपयात अमर्यादित बोलणं असे प्रकार सुरु झालेत. आम्ही कित्येकांनी ते केलंय. पैसे वाचविण्यासाठी मिस कॉल वर काम भागवणारे असंख्य होते. चुकून रिसीव्ह केला तर शिव्या. सणावाराच्या शुभेच्छा एक दोन दिवस आधीच पोचत. कारण त्या विशिष्ट दिवशी मेसेज pack चालायचं नाही (black-out days). साधारण एक मेसेज एक रुपया असं समीकरण. आता परिस्थिती बदलली आहे. रोमिंग, black out days इतिहासजमा झालेत. फुकटात कॉलिंग असल्याने मिस कॉल हि बंद झाला. आणि सोशल नेट्वर्किंग ने तर मेसेजिंग हि बंद करून टाकलंय.
बाजारपेठेचा विचार करणाऱ्या मोबाइल कंपन्या आणि सव्‍‌र्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यातच सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसायला लागली. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात झाली. टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणली आणि त्याचं अनुकरण करणं इतर कंपन्यांना सुद्धा करावं लागलं. जेवढे सेकंद बोलाल तेवढेच पैसे. एवढंच पुरेसं नव्हतं. त्याला इंटरनेट जोडलं गेलं  आणि स्मार्ट फोन चा प्रवेश झाला. फिचर फोन ला घरघर लागली. त्यात इंटरनेट ने आपल्याला वेड लावलं. नेट साठी मोबाईल कंपन्या भरपूर पैसा वसूल करत होत्या. त्याला आळा घातला तो जिओ नं.  जियोने जवळपास फुकट म्हणता येईल, अशा दरात मोबाइल सुविधा पुरवायला सुरुवात केली ते ही फोर जी. अत्यंत आक्रमक मार्केटिंग करीत जिओ मोबाइलच्या क्षेत्रात उतरले आणि प्रस्थापित मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले. मग प्रत्येकाची स्पर्धा सुरू झाली ती सर्वाधिक ग्राहक कोणाकडे असतील याची. डेटागीरी सुरु झाली.
जिओच्या आगमनानंतर ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी मोबाइल सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्राहकाला इंटरनेट डेटा अत्यल्प किंमतीत देण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मोफत डेटा, मोफत कॉल्स अशा अनेक प्रलोभनांमुळे जिओच्या ग्राहकसंख्येत वेगाने वाढ झाली. कॅशबॅक च्या लोभापायी रिचार्ज करणारे काही कमी नाही.
खाता जेवता, उठता-बसता मोबाईलवर. जाताना-येताना अगदी रस्त्यावरून जातानाही याचा वापर केला जातो. सोशल नेट्वर्किंग वर पसरवलं गेलेलं खरं काय नि खोटं काय काहीच कळत नाही. फालतू विनोद, विडंबन तर सर्रास.
मोबाइल पोर्नोग्राफी, डेटिंग साइट, तासन्तास फोनवर बोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं, व्ही.डी.ओ कॉल सुरु झालेत.  मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक अशा महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. किती सारे apps उपलब्ध झालेत. ४ जी ने विदाऊट बफरींग व्हिडीओ पाहणं सोपं झालं. मोबाईल मध्येच एवढी स्पेस यायला लागली कि मेमरी कार्ड चा वापर संपण्यात जमा आहे.   
पण आज आपण मोबाइलचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो आहोत आणि या डेटा वॉरमध्ये मोबाइल सुविधा देणाऱ्या कंपन्या आपल्याला आणखीनच प्रलोभनाला बळी पाडून तो वापर वाढवताना दिसत आहेत.
अन्न,वस्त्र आणी निवारा या बरोबरच मोबाईल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. आज भाजीवाल्यापासून भिकाऱ्यापर्यंत, शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील म्हातार्यांकडे दिसतो. खायला अन्न नाही, राहायला घर नाही पण मोबाईल हवाच  अशी मानसिकता तयार झाली आहे. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही.
channels ची स्पर्धा च पाहून घ्या. पूर्वी किती मिनिटे ब्रेक आहे हे माहित नसायचं. आता त्यांना आता सांगावं लागतंय. ये ढाई किलो का हाथ नाही, ढाई मिनिट का ब्रेक है किंवा स्क्रिन च्या उजव्या बाजूला दोन मिनिटांचा  time countdown  दाखवावा लागतो. टी.आर. पी. साठी काय नाही सुरु. तेच-तेच कथानक, अतिशोयक्ती, अंगावर मोजके कपडे घालून आकर्षित करण्याचा प्रयत्न, तर्क-विरहित कल्पना. सध्या तर त्या साउथ कडील फिल्म्स चा बोलबाला आहे. कुठलंही channel लावा ते दिसून येईल. बरं लॉजिक चा पत्ता नाही.  
हे सारं घडत असताना आपण कुठे आहोत. आपण तेच करत आहोत जे त्यांना हवं आहे. ते आपल्याला प्रलोभने दाखवतात आणि आपण बळी पडतो. सुरुवातीला फुकट, cashback वगैरे. मग हळू हळू पैसे वसूल केले जातात.
हेच काय. हॉटेल्स, lodge वगैरे पहा. फ्री वायफाय चे फलक लावलेले दिसतील. माणसाची लोभी वृत्ती कॅश केलीय त्यांनी.
हरवून बसलोय आपण स्वतःला या अर्थकारनात. पैसे असो किंवा नसो फक्त वापरा, खरेदी करा. मदतीसाठी बँकां हि सरसावल्या आहेत. पैसे नसतील तर ई.एम.आय., क्रेडीट कार्ड वगैरे.
प्रत्येकाला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे या लोकांनी. किती घरांमध्ये टी.व्ही. बंद करून एकत्र जेवणाची पद्धत आहे?  किती लोकं झोपताना मोबाईल बंद करतात? किती विद्यार्थी मोबाईल शिवाय अभ्यास करू शकतात?  संशोधनाचा विषय आहे. तंत्रज्ञानाशी आपलं नातं घट्ट झालं पण मानवी नातं सैल झालं.
संवाद-संपर्क क्रांती घडवून आणणा-या सोशल मीडियाने आज बहुतांश लोकांचे जीवन व्यापून टाकले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रचंड वाढलाय. आभासी चित्र निर्माण झालंय. एकटेपणा, नैराश्य वाढलंय. संवाद ढासळला कि हे प्रकार होणारच. सध्याच्या जगामध्ये किती काळ स्क्रीनसमोर असावे याचाही विचार असायला हवा. विरंगुळा म्हणून मोबाईल वापरणे नित्याचेच झाले आहे. आपण हि तेच करतो.
तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही.  स्माइलपेक्षा आता स्माइली महत्त्वाची झाली आहे. आताच्या पिढीवर हेच संस्कार होत आहेत. बदल झपाट्याने होत गेला. अर्थातच चांगल्या बाजू आहेतच. त्याबद्दल दुमत नाही. पण कुठली गोष्ट किती वापरावी, कशी वापरावी, आणि कशासाठी वापरावी याबद्दल जाणीव असणे गरजेचं झालंय. हे करत असताना माणसाचा माणसाशी असलेला संवाद टिकला पाहिजे तो फक्त व्हर्चुअल पुरता मर्यादित असता कामा नये.

No comments:

Post a Comment