Monday, December 8, 2014

पुणे विद्यापीठ- भाग ७ (अविस्मरणीय गेट-टुगेदर)


सुरुवात कुठून करावी हे कधीच कळत नाही. काहीतरी डोक्यात येतं आणि लिखाण सुरु होतं. आयुष्यात अनेक प्रसंग आलेत. नेमकं कुठल्या प्रसंगावर लिहावं हेच कळत नव्हतं. तेव्हा एका प्रसंगाची आठवण झाली. पुणे विद्यापीठात होतो. पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. आमच्या वर्गात एकजूट कधीच नव्हती. प्रत्येकाचं तोंड वेगळ्या दिशेला. सगळे एकत्र यायचे म्हणून आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलं. मी, रव्या, सुभाष, मनोज, जित्या, संदीप आणि आन्या असे सगळे मिळून मनोज महेर च्या रूमवर जायचं ठरलं. रूम विद्यापीठाच्या जवळचं होती. नॉन वेज आणि ड्रिंक असा मेनू. पैसे गोळा करून रात्री आम्ही तिथं पोचलो. आवश्यक सगळं खरेदी केलं. मग सुरु झाली पार्टी. मनोज, आन्या आणि जित्या काही ड्रिंक घेणारे नव्हते. मी, कदम, रव्या आणि संदीप मनसोक्त प्यायलो. माझा तो पहिलाच प्रसंग. त्यामुळे किती घ्यावी काही कळल नाही. त्यातून च YOU KNOW, MY MIND IS MOVING हे वाक्य आलं. नंतर ते वाक्य फार प्रचलित झालं आमच्यात.

एकच मिनिट थांबा, मला तिला फोन करायचा आहे, प्रॉमिस केलंय मी तिला. असा म्हणणारा तो सुभाष. आता ती कोण कधी त्याने स्पष्ट सांगितलं नाही. आम्हाला माहित असूनही खेचण्याचे उद्योग मात्र सुरु राहायचे. त्याचं आणि माझं कधी जमत नव्हतं . कारण त्याला जी मुलगी आवडत होती तिच्यावर मी पण लाईन मारतो असं त्याला वाटत होतं. त्याने धमक्या देऊन पाहिल्या खूप वेळा. तिचं लग्न झाल्यावर मात्र तो बदलला. त्याचं ते प्रेम सगळ्यांना माहित होतं. प्रत्यक्षात आलं नाही तो भाग वेगळा. अर्थातच एकतर्फी असल्याने पराभव निश्चित होता. पाच नंबरच्या वसतिगृहात राहत असताना मात्र आम्ही कधी नव्हे ते चांगले बोलत होतो. खूप वेळेस सोबत पार्ट्या केल्यात. तो नेहमी मला सच्या म्हणायचा. सच्या साल्या हे नेहमी त्याच्या तोंडी असायचं. आम्ही पण काही त्याच्या नावाचा अपभ्रंश करायचं थोडी सोडलं होतं.

रव्या हे एक वेगळ व्यक्तिमत्त्व. शांत राहील तो रव्या कसला. पार्टी मध्ये त्याचा पाय काही ठिकाणावर राहत नव्हता. वारंवार जमिनीवर आदळत होता. माझा भगत चा भग्या त्यानेच केलं. साल्याने नंतर सरळ नाव कधी घेतलंच नाही.

गेट टुगेदर मध्ये सगळ्या पोरींचा इतिहास समोर येत गेला. कोण काय करत आणि कुणासोबत फिरतं , कुणाला कोण आवडते, रात्री फोनवर कोण कुणाशी बोलतो अशा सगळ्या खमंग चर्चा. दोन-तीन तास हे सगळं सुरु होतं. खाण्याचा काही प्रश्नच नव्हता.

जे काही खाल्लं ते काही वेळाने सगळं बाहेर पडलं. तो रव्या मात्र अरे भग्या मेला कि जिवंत आहे म्हणून ओरडत राहिला आणि खाण्याचा आनंद घेत राहिला. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा mind move झाला होता.

तरी पण मनाने आम्ही काही एकत्र आलो नाही. ते शक्य झालं ते एम ए झाल्यानंतर. नंतर कुठलाही वाद उरला नाही. कारण वाद असण्याचं कारण म्हणजे मुली. आता त्याचं विद्यापीठात नाही म्हटल्यावर सगळं कसं शांत होत. त्यामुळे वादविवाद आपोआप संपले होते. नंतर कदम माझा चांगला मित्र झाला. सगळं विसरून आम्ही ध्येयाकडे वाटचाल करत होतो.

आन्या बद्दल किती लिहावं. तो आमच्यासाठी क्रीटीसीझम मधला डेरीडा. खऱ्या अर्थाने आधुनिक.  आधी लिव इन रिलेशनशिप आणि नंतर रजिस्टर लग्न असा तो त्याचा प्रवास. एके काळी माझ्या शिवाय कधी जेवत नव्हता. नेहमी माझ्या आसपास असणारा मित्र. गरजेच्या वेळी नेहमी धावून येत होता. वादविवाद होत राहिलेत पण आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. अपयश च्या वेळी मानसिक आधार देणारा तोच. त्याच्या रूमवर ची खिचडी कशी विसरणार. घरून आला कि डब्बा आणायला कधी विसरायचं नाही तो. आम्ही तर त्याची वाटच पाहत होतो. एकदा तर रात्री दोन वाजता आम्ही त्याच्या घरी जाण्यासठी पुण्यातून निघालो. बारामतीत पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती. तिथून पन्नास किलोमीटर अजून प्रवास होता. काय मजा आली होती त्या प्रवासात. थंडी चे दिवस आणि गाडी चालायची म्हणजे सोपं नव्हतं. बऱ त्याला गाडीही चालवता येत नव्हती. त्याच्या घरी पोहचे पर्यंत मात्र माझी वाट लागली होती.

संदीप म्हणजे एक अस्सल व्यक्तिमत्त्व. मुलींच्या प्रेमात रडणारा. जी आवडत नव्हती तिला बहिण म्हणणारा. त्याला किती वेळा प्रेम झालं ते नाही सांगता येणार. पण त्याच्या शेवटच्या प्रेमाच्या वेळी मी साक्षीदार. तिच्या सोबत राहून तो फार बदलून गेला होता. तिच्यासोबत कुठ कुठ फिरला असेल त्यालाच माहित. तिचं लग्न ठरलं तेव्हा तर खऱ्या अर्थाने मजनू झाला होता. खरंच झाला होता कि नाटक करत होता ते त्यालाच माहित. तिच्या लग्नाला आम्ही पुण्यातून थेट नाशिक गाठलेलं. खिशात फक्त तीकीटापुरते पैसे. तिथे गेल्यावर एका जुनिअर कडून पाचशे रुपये घेतलेले परत येण्यासाठी. प्रवासात चहा पिण्यासाठी हि पैसे नव्हते. भूक लागली होती पण जेवण च गेलं नाही आणि आम्ही परत आलो.  एकदा त्याची आणि माझी मुंबईत भेट झाली. पूर्वीचे दिवस कधीच संपले होते. नवीन आयुष्य सुरु झालं होतं.

यात नंतर आमच्यात सामील झाला तो अजिंक्य. तसं आम्ही त्याला आज्या म्हणतो. तो एक वेगळाच माणूस. कुणालाही आपलेसे करून घेण्याच त्याचा स्वभाव.एकदा त्याच्या जवळ गेलं कि तो कधीही दूर होत नाही. त्याचे अनेक किस्से रंगवून सांगण्यात काही लोकांचे दिवस गेलेत. मुळात त्याच्याबद्दल फार गैरसमज असायचे इतरांचे. पण तसं काहीच नव्हतं. तो एक चांगला गृहस्थ. कुणाशीही कधीही वैमनस्य त्याने ठेवलं नाही. इतर काय म्हणतात ते तो दुर्लक्ष करतो. आणि त्याला वाटेल तसं जगतो. मानसं कशी जोडावी हे त्याच्यापासूनच मला थोडं शिकायला मिळालं. मला जमलं नाही तो भाग वेगळा. पुण्यात गेलो कि त्याला नेहमी भेटतो. विद्यापीठात फेरफटका मारून आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. जातीने ब्राम्हण असला तरी सर्वसमावेशक. जातीचा त्याला कधी अभिमान नाही. आमचा तो विद्यापीठाबाहेर चा कट्टा कायम असायचा. पण त्याला पोरींचा फार नाद. दिसायला देखणा असल्याने ते साहजिक होतं. त्याचा अभ्यास म्हणजे परीक्षेच्या आधी. जयकर मध्ये फार वेळ कधी न बसू शकणारा तो. काही दिवसांपूर्वी पुण्यात गेलो तेव्हा भेटला. अजूनही तसाच. भरपूर वेळ आम्ही सोबत घालवला. कित्येक विषयांवर चर्चा झाली. आपलेपण काय असते हे तेव्हा खऱ्या अर्थाने कळाल.  

आता मी काय फार धुतल्या तांदळाचा होतो अस नाही. माझेही अनेक उद्योग सुरु असायचे. हि झाली कि ती. पण अयशस्वी.

आता  सगळे वेगवेगळ्या मार्गाला लागलेत. ध्येय एकच होतं. नेट पास व्हायचं. नंतर ते प्रत्यक्षात आलंही. रव्या गावाकडेच ४० किमी अंतरावर कॉलेज ला आहे. आन्या आय आय टी मध्ये पी एच डी करतोय. कदम कोकणात आहे. एकदा महाड ला गेलो होतो तेव्हा त्याला भेटलो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. संदीप नाशिक ला आहे. जित्याचा काही पत्ता नाही. सगळे विवाहबद्ध झालेत. दुर्दैवाने कुणाच्याही लग्नाला जाता आले नाही. विद्यार्थी अवस्था संपली कि मोकळेपणा ने जगता येत नाही. वाढत्या जबाबदार्यांमुळे प्रत्येकजण बंदिस्त होतो. कधीतरी संपर्क होतो. पण तो हि कामानिमित्त.
ते दिवस म्हणजे भारलेले क्षण. असे ते विद्यापीठातले दिवस. काटेरी वाटेवर चा प्रवास परंतु सुवर्ण भविष्याची स्वप्ने पाहताना प्रत्येकाने ते हि स्वीकारलं. चढ-उतार येत राहिलेत पण न डगमगता प्रत्येकजण पुढे चालत राहिला. या कालावधीत या सगळ्या मित्रांनी जीवनाला वेगळा अर्थ दिला. आठवणीत ठेवण्यासारखे क्षण दिलेत. सुरुवात कशी पण असो परंतु शेवट मात्र चांगला झाला. कुणाच्याही मनात कुणाबद्दल गैरसमज नव्हता. आणि तेच महत्त्वाचं आहे.

कधी वेळ मिळालाच पुन्हा एकदा गेट टुगेदर करूयात.

Miss you all. Miss every moment that we spent together. For all the members of the First Ever GET TOGETHER…
(काही मर्यादांमुळे सगळ्या गोष्टी लिहू शकलो नाही.....त्या समजून घ्याव्यात.)


















Thursday, November 27, 2014

अन्नुत्तरीत प्रश्न-रिकामटेकड्या गप्पा

Laptop घेतल्यापासून कित्येक चित्रपट मी गोळा करून ठेवलेत. कधीही चित्रपट पूर्ण न पाहणे हा माझा छंद. दोन तीन तासांचा चित्रपट एका तासामध्ये पाहायचा. काल रात्री झोप लागत नव्हती म्हणून फोल्डर मध्ये कोणता चित्रपट पाहायचा हे शोधत होतो. त्यात Stanley ka Dibba हा एक चित्रपट होता पण मी कधी पहिला नाही. साधारण दोन-तीन वर्षानंतर पूर्ण चित्रपट पहिला. पुणे सोडल्यापासून कुठल्या थीएटर मध्ये जाऊन चित्रपट पहायची इच्छा झाली नाही. चित्रपट पाहून झाल्यावर मन अस्वथ झालं. नकळत कसा भूतकाळात गेलो आणि बालपण आठवायला लागलं. हा लेख म्हणजे Stanley ka Dibba पाहिल्यानंतर ची प्रेरणा. एका चांगल्या कलाकृतीला एवढे दिवस नजरेआड केल्या गेल्याचं वाईट वाटल.

१९९०-ते २००० काळ. म्हणजे बालपण. शाळेत जाताना कधी कधी डब्बा घेऊन जात होतो. सगळे एकत्र येऊन डब्बा खाणे हे ओघाने आलेच. माझ्या डब्यात नेहमी भाकरी असायची. श्रीमंती घरातली पोरं पोळ्या सोडून काही खायची नाहीत. तो फरक स्पष्टपणे जाणवायचा. म्हणून दुपारच्या सुट्टीत घरी येऊन जेवत होतो. त्या वयात काय कळणार. पोळ्या मिळायच्या त्या फक्त सणासुदीला. मी आईला किती वेळ सांगायचो कि मला पोळ्या पाहिजेत पण कधी मिळाल्या नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या गोष्टी लहान असताना आवडायच्या पण मिळाल्या नाहीत, आज त्या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार आहे. आज सगळ्या गोष्टी आवाक्यात असताना मला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही.
लोक सरकारला कितीही अकार्यक्षम म्हणत असले तरी गरिबांना स्वस्त धन्य दुकानातून धान्य स्वस्तात देण्याचं श्रेय हि त्यांचं. गुणवत्ता कमी जास्त असेल. नाहीतर गरिबांना ह्या गोष्टी कधी मिळाल्या नसत्या.

मध्यंतरी दिल्ली ला जाण्याचा योग आला. मोठ्या हॉटेल ला कार्यक्रम होता. सलग तीन दिवस होतो तिथे. साधारण दोन-अडीच हजार लोक. फाइव स्टार हॉटेल म्हणजे सगळ्या गोष्टी मुबलक उपलब्ध. मी फक्त निरीक्षण करत होतो. दिसायला श्रीमंत असलेली लोकं खरंच किती गरीब असतात हे जेवणाच्या वेळी दिसून यायचं. जस त्यांना कधी मिळालाच नाही अशी त्यांची वर्तणूक.

आजही गरिबांना पुरेसं अन्न मिळत नाही. कित्येकांना उपाशी पोटी झोपावं लागत असेल याची तर कल्पनाच नाही. पुणे विद्यापीठात आज हि कित्येक मुले मेस बंद असली कि काहीतरी खाऊन वेळ निभावून नेतात. कारण बाहेर जाऊन खाण्याची ऐपत नाही. तेवढा पैसा नाही. भविष्याची स्वप्नं घेऊन येणारा प्रत्येक जण फक्त आशेवर सगळ्या गोष्टी निभाऊन नेतो. लोकं magi शौक म्हणून खातात पण आमच्यासाठी ते जेवणापेक्षा कमी नव्हतं. खिचडी बनवून खाणे हा पण त्यातलाच एक प्रकार. जर स्वस्त धान्य दुकाने बंद केली तर आजही कित्येक लोक उपाशी झोपतील. सरकारने सगळ द्यावं या मताचा हि मी नाही. फक्त मेक इन इंडिया ची घोषणा देऊन विकास होणार नाही किंवा स्वच्छ भारत अभियान चालवून देश स्वच्छ होणार नाही किंवा त्याही पुढे जाऊन जन धन योजना सुरु करून लोकांकडे पैसा येईल असंही नाही. सगळं डिजिटल झालं म्हणजे विकास झाला हा समज हि त्याच पातळीवरचा. ६०-७० टक्के मतदान झालं म्हणजे चमत्कार झाला हा आपला भाबळा समज. पण ३०-४० टक्के लोक मतदान करत नाही त्याचं काय? मग कशी काय आपली लोकशाही रुजली? आजही वास्तव काय आहे.

मुठभर श्रीमंत लोकांना गरिबी काय असते हे कळणार नाही. चांगल्या एसी रुममध्ये बसून गरिबांबद्दल पुस्तके, लेख लिहिणारे भारतात कमी नाहीत. पेट्रोल, नैसर्गिक वायू कोण वापरत? त्यावर सवलती चालतात सगळ्यांना. गरिबांकडे ना गॅस आहे ना गाड्या. आज नोकरी करणारे हि त्याचा फायदा घेतात. खर तर त्यांना सवलती द्यायलाच नको. बऱ आम्हाला ते नको असे स्वाभिमानी लोक आहेत तरी कुठे भारतात. शेतकरी लयास जात असताना सरकार मात्र शांत आहे. इंडिया शायनिंग चं बागुलबुवा करून तात्पुरत चांगलं वाटेलही. पण भविष्याचं काय?  सगळेच प्रश्न अन्नुत्तरीत आहेत. सरकार कुठलंही असो सामान्य लोकांच्या जीवनात काही बदल होत नाहीत.


शिक्षण क्षेत्राचे तर कधीच बारा वाजलेत. राजकारण्यांनी प्रचंड कमाई केली शिक्षणसंस्था उभारून. डीएड म्हणजे नौकरी हे समीकरण काळाच्या ओघात नष्ट झालं. पैसा आहे तर नौकरी. एका जागेचा भाव वीस-पंचवीस लाखांवर जाऊन ठेपला आहे. गुणवत्ता असूनही दारोदार भटकणारे विद्यार्थी काही कमी नाहीत. आवश्यक सगळ्या पात्रता असूनही आर्थिक व्यवहारांमुळे विद्यार्थी नोकरी पासून वंचित राहतात. कोण बदलणार हे सगळं. आपण बदलायचं तर सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत आहे कुठं आपल्यात. पोटासाठी चाललेली हि धडपड व्यक्तीला काय करायला लावेल कुणास ठाऊक. परवा एका मॉल मध्ये गेलो होतो. बाहेर एक मुलगा पाम्फलेट वाटत होता. मी ते घेतलही. त्याला सहज विचारलं कि काय शिक्षण झालंय तुझं. तो म्हटला एमबीए. काय वाईट अवस्था आहे. यात दोष कुणाचा? शिक्षण पद्धतीचा कि विद्यार्थ्यांचा. अन्नुत्तरीत आहे सगळं.

                                                                   Sachin Bhagat

Monday, July 28, 2014

अव्यक्त त्या भावना, अव्यक्त ते प्रेम आणि अशांत माझं मन.......



काल माझ्या एका मित्राचा फोन आला. मी जेवण करत होतो. मी नंतर फोन करतो असं म्हटलं. तो म्हटला, नक्की कर, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याला काय सांगायचं या विचार करत मी घाईघाईने जेवण संपवलं आणि घराबाहेर पडलो. त्याला फोन केला आणि आमचं बोलणं सुरु झालं. पुढे मी फक्त ऐकण्याचं काम केलं. तो जे काही बोलला ते त्याच्याच शब्दांत...
मला एक वर्ष झालं पुण्यात येऊन. पुणे विद्यापीठात एम.एस.सी. ला प्रवेश मिळाल्याने मी खूप आनंदात होतो. विभाग पण छान वाटत होतो. सगळं व्यवस्थित सुरु होतं. मी भविष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. सहसा मी मुलांमध्ये मिसळत नव्हतो. आपण इथं का आलो आहे याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणून सकाळी लवकर उठून सरळ ग्रंथालयाकडे माझी पावले वळत होती. विभागात लेक्चर संपल्यावर पुन्हा जयकर. असा माझा दिनक्रम होतं. पण कुणास ठाऊक होतं कि शांततेत चाललेल्या माझ्या जीवनात वादळ येईल म्हणून. ती शांतता हि मला आवडायला लागली होती. मी मितभाषी असल्याने फार मित्र नव्हते. कॅन्टीन कधी तासभर बसलो नाही कि निसर्गरम्य एलीस गार्डन मध्ये कधी गेलो नाही. कधी मन लागत नसलं तर एकटाच चतुश्रुंगी च्या टेकडीवर तासनतास बसून राहायचो. किती छान वाटत होतं ते. संध्याकाळ झाली कि पुणे किती सुंदर दिसायचं. सगळं शहर उजळून निघायचं. तर कधी त्या कातरवेळी माझ्या जीवनात हि तो प्रकाश लवकरच येईल याचा आभास देऊन जायचा. तो उजेड मला आशेचा किरण वाटत होता. मी वेगवेगळे अर्थ काढत असायचो. नकळत बाजूला बसलेल्या जोडप्यांकडे लक्ष जायचे. लोकं किती मग्न असतात त्यांच्या कामात. आपल्या बाजूला कोण आहे याचं हि भान त्यांना राहत नाही. इथे कुणीच कुणाची तमा बाळगत नाही. माझ्या शहरात तर असं कधी पाहायला मिळालं नाही.  नकळत माझं शहर आणि पुणे याची तुलना हि व्हायची. पुण्यात विद्यापीठात शिकत असल्याचा अभिमान वाटायचा. तो घरी गेलो कि पुण्यातल हे मित्रांना सांगायची मजा काही औरच.   सगळं कसं मजेत चाललं होतं. 


विभागात जाऊन मला दहा-पंधरा दिवस झाले असतील. माझ्या वर्गातील एक मुलगी नेहमी माझ्याकडे पाहत रहायची. मी तिकडे दुर्लक्ष करत गेलो. याआधी कधी कुण्या मुलीशी बोललो नाही कि कुणी मैत्रीण हि नाही. बरं मी कुण्या मुलीशी पण बोलत नव्हतो. विद्यापीठात घोळक्याने राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये हि मी कधी गेलो नाही. मग हि माझ्याकडे का पाहते असते?  मुलगी खूप सुंदर. त्यामुळं माझाच काहीतरी गैरसमज होतो असं वाटलं. दिवसामागून दिवस जात राहिलेत. अजूनही ती माझ्याकडेच पाहत होती. मग याला गैरसमज तरी कसा समजू. कधी वाटलं तिला जाऊन विचारावं. पण ती हिम्मत कधी झालीच नाही. हळू-हळू मुलांमध्ये याची चर्चा सुरु झाली. ती सुंदर असल्याने खूप मुले तिच्या मागे होती. एक-दोन जणांनी तिला प्रपोज हि केलं. ती सरळ नाही म्हटली त्यांना. ती माझ्याकडे पाहते याची चर्चा पूर्ण विभागात झाली. हळू-हळू हे प्रकरण काही तिच्या गावाच्या विद्यार्थ्यांनी तिच्या आई-वडिलांपर्यंत पोचवलं. मला यातलं काहीच माहित नव्हतं.  एके दिवशी त्या मुलीचे नातेवाईक विद्यापीठात आलेत. मी अनिकेत कॅन्टीन कडे जात होतो. त्यांनी मला मध्येच गाठलं. माझ्या वर्गातील काही मुलंही त्यांच्यासोबत होती.   आमच्या मुलीचा नाद सोड नाहीतर महागात पडेल असं बरंच काही बोललेत ते. मी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. माझ्याबाजुने कुणीच नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा मित्र असायला पाहिजे याची जाणीव झाली. काही वेळानंतर ते निघून गेलेत. पण मी फार घाबरलो होतो. आजपर्यंत मी कुणाच्या घेण्यादेण्यात हि नव्हतो. माझं कुणाशी भांडण झाल्याचंही मला आठवत नाही. मी तसाच रूम ला गेलो तर ते पुन्हा कधी विभागात न येण्यासाठीच.

नोव्हेंबर महिना होता तो. सेमिस्टर ची परीक्षा जवळ आली होती. घराबाहेर पहिल्यांदा बाहेर पडलो होतो. जगाचा अनुभव नव्हता. फार कुणात कधी मिसळलो नाही. सामाजिक ज्ञान कधी आलं नाही त्यामुळे. मी स्वतः मध्येच गुरफटलो होतो. प्रश्न होता त्या मुलीचा. हळू-हळू मलाही ती आवडायला लागली होती. दिवसरात्र तिचाच विचार करत होतो. दिवसभर रूम ला पडून असायचो. अभ्यासात मन लागत नव्हतं. माझी मानसिक स्थिती ढासळत गेली. तिच्याशी मी कधीच बोललो नाही आजगायात. याला प्रेम म्हणावं कि आकर्षण. सुरुवातीला वाटलं हे आकर्षण चं आहे. पण मग इतर भरपूर मुली असताना मी तिचाच का विचार करतो.
या विचारप्रक्रियेत मी अभ्यास कधी सोडून दिला ते कळलंच नाही. परीक्षा जवळ आली होती. मी परीक्षेला गेलोच नाही. परीक्षा तर सोडा मी नंतर कधी विभागात गेलोच नाही. मी परीक्षेला गेलो नाही म्हणून तिने पण परीक्षा दिली नाही. निकाल लागला तेव्हा कळाल कि तिचे पण सगळे विषय बाकी आहेत म्हणून. दोघेही फेल. तिने परीक्षा माझ्यामुळेच दिली नाही हे मात्र नक्की होतं. तिचं हि माझ्यावर प्रेम आहे हे ठाऊक झालं होतं. पण तिला सांगणे कधी जमलं नाही. एक वर्ष निघून गेलं आता. मी दुसरे सेमिस्टर ची परीक्षा पण नाही दिली. एक वर्ष ड्रोप केलंय. पुन्हा प्रवेश घेतला आता पहिल्या वर्षाला. घरी सांगायची हिम्मत नव्हती म्हणून मामा ला फोन करून सगळं सांगितलं.

मामा वडिलांना भेटायला गेला. वडील बांधकाम काम करतात. दिवसाला २००-३०० रुपये मिळतात. मामा भेटायला सरळ त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्यांना घेऊन एका हॉटेल ला गेला आणि चहा सांगितला. सगळा प्रसंग सांगितला. वडील रडायला लागले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दिवसभर राब राब राबून बाप पैसे पाठवतो. ओवरटाईम करतो कारण मला दर महिन्याला पैसे पाठवावे लागतात. बापाचं अवसान गळालं होतं. मामानं कसाबसा धीर दिला. काय चाललं असेल त्याच्या मनात. काम करताना प्रत्येक क्षण माझा विचार करत असेल. मुलगा शिकतोय तर किती अपेक्षा असतील. अंग मेहनतीचं काम असून पण कधी खाडा टाकला नाही बापानं मी पुण्यात आल्यापासून. मी सांगू तरी काय सांगू त्यांना. कसं समजावू त्यांना. तो कि किती खचला असेल. पण बाप तो बाप. त्याने काळजावर दगड ठेवून हे पचवलं असेल. संध्याकाळी फोन केल्यावर बाप काहीच बोलला नाही त्याबद्दल. फक्त अभ्यास कर म्हटला. जे झालं ते विसरून कामाला लाग.
मला माझीच लाज वाटत होती. मी काय करून बसलो हे. आता पुन्हा नव्याने सुरुवात. आयुष्यातलं एक वर्ष वाया घालवलं मी. कुणासाठी आणि कशासाठी. बापच्या कष्टाच्या पैश्याचं मी चीज नाही केलं. त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक नाण्यात त्यांची मेहनत होती. माझ्याकडे किती अपेक्षेने पाहतात ते. आईला काही काळात नाही. ती बिचारी साधीभोळी. तिला याचा गंध हि नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे.
असं त्याने खूप काही सांगितलं. मला काय बोलावं कळत नव्हतं. तो असं काही करेल मला कधी वाटलं नाही.  रात्री मला कितीवेळ झोप नाही लागली. मला एवढं वाटलं तर त्याच्या वडिलांना किती वाईट वाटलं असेल. कसं सावरलं असेल त्या माणसाने स्वतःला. असे नानातऱ्हेचे विचार माझ्या मनात घोळत होते. या प्रसंगाचा विचार करता मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी उठलो ते कॉलेज ला जाण्यासाठीच.
प्रेम कि आकर्षण कि अजून काही. मला कळायला मार्ग नाही. त्याला समजवायला माझ्याकडे शब्द नाहीत.
प्रेम होतं तर तिला सांगायला तर पाहिजे होतं. कुणाचा दोष असेल यात. त्या मुलीचा कि याचा. एक वर्ष वाया गेल्याने त्याची काय स्थिती असेल. त्याचं मन कुठं असेल. अशी अनेक मुलं पुण्यात स्वप्न घेऊन जातात. कुणाची स्वप्ने प्रत्यक्षात येतात कुणाची अधांतरी राहतात.