सुरुवात कुठून करावी हे कधीच कळत नाही. काहीतरी
डोक्यात येतं आणि लिखाण सुरु होतं. आयुष्यात अनेक प्रसंग आलेत. नेमकं कुठल्या
प्रसंगावर लिहावं हेच कळत नव्हतं. तेव्हा एका प्रसंगाची आठवण झाली. पुणे
विद्यापीठात होतो. पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. आमच्या वर्गात एकजूट कधीच
नव्हती. प्रत्येकाचं तोंड वेगळ्या दिशेला. सगळे एकत्र यायचे म्हणून आम्ही गेट
टुगेदर करायचं ठरवलं. मी, रव्या, सुभाष, मनोज, जित्या, संदीप आणि आन्या असे सगळे
मिळून मनोज महेर च्या रूमवर जायचं ठरलं. रूम विद्यापीठाच्या जवळचं होती. नॉन वेज
आणि ड्रिंक असा मेनू. पैसे गोळा करून रात्री आम्ही तिथं पोचलो. आवश्यक सगळं खरेदी
केलं. मग सुरु झाली पार्टी. मनोज, आन्या आणि जित्या काही ड्रिंक घेणारे नव्हते.
मी, कदम, रव्या आणि संदीप मनसोक्त प्यायलो. माझा तो पहिलाच प्रसंग. त्यामुळे किती
घ्यावी काही कळल नाही. त्यातून च “YOU KNOW, MY MIND IS MOVING” हे वाक्य आलं. नंतर ते वाक्य फार प्रचलित झालं आमच्यात.
एकच मिनिट थांबा, मला तिला फोन करायचा आहे,
प्रॉमिस केलंय मी तिला. असा म्हणणारा तो सुभाष. आता ती कोण कधी त्याने स्पष्ट
सांगितलं नाही. आम्हाला माहित असूनही खेचण्याचे उद्योग मात्र सुरु राहायचे. त्याचं
आणि माझं कधी जमत नव्हतं . कारण त्याला जी मुलगी आवडत होती तिच्यावर मी पण लाईन
मारतो असं त्याला वाटत होतं. त्याने धमक्या देऊन पाहिल्या खूप वेळा. तिचं लग्न झाल्यावर मात्र तो
बदलला. त्याचं ते प्रेम सगळ्यांना माहित होतं. प्रत्यक्षात आलं नाही तो भाग वेगळा.
अर्थातच एकतर्फी असल्याने पराभव निश्चित होता. पाच नंबरच्या वसतिगृहात राहत असताना मात्र आम्ही
कधी नव्हे ते चांगले बोलत होतो. खूप वेळेस सोबत पार्ट्या केल्यात. तो नेहमी मला
सच्या म्हणायचा. सच्या साल्या हे नेहमी त्याच्या तोंडी असायचं. आम्ही पण काही
त्याच्या नावाचा अपभ्रंश करायचं थोडी सोडलं होतं.
रव्या हे एक वेगळ व्यक्तिमत्त्व. शांत राहील तो
रव्या कसला. पार्टी मध्ये त्याचा पाय काही ठिकाणावर राहत नव्हता. वारंवार जमिनीवर
आदळत होता. माझा भगत चा भग्या त्यानेच केलं. साल्याने नंतर सरळ नाव कधी घेतलंच
नाही.
गेट टुगेदर मध्ये सगळ्या पोरींचा इतिहास समोर येत
गेला. कोण काय करत आणि कुणासोबत फिरतं , कुणाला कोण आवडते, रात्री फोनवर कोण कुणाशी बोलतो अशा सगळ्या खमंग
चर्चा. दोन-तीन तास हे सगळं सुरु होतं. खाण्याचा काही प्रश्नच नव्हता.
जे काही खाल्लं ते काही वेळाने सगळं बाहेर पडलं.
तो रव्या मात्र अरे भग्या मेला कि जिवंत आहे म्हणून ओरडत राहिला आणि खाण्याचा आनंद
घेत राहिला. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा mind move झाला
होता.
तरी पण मनाने आम्ही काही एकत्र आलो नाही. ते शक्य
झालं ते एम ए झाल्यानंतर. नंतर कुठलाही वाद उरला नाही. कारण वाद असण्याचं कारण
म्हणजे मुली. आता त्याचं विद्यापीठात नाही म्हटल्यावर सगळं कसं शांत होत. त्यामुळे
वादविवाद आपोआप संपले होते. नंतर कदम माझा चांगला मित्र झाला. सगळं विसरून आम्ही
ध्येयाकडे वाटचाल करत होतो.
आन्या बद्दल किती लिहावं. तो आमच्यासाठी
क्रीटीसीझम मधला डेरीडा. खऱ्या अर्थाने आधुनिक. आधी लिव इन रिलेशनशिप आणि नंतर रजिस्टर लग्न असा
तो त्याचा प्रवास. एके काळी माझ्या शिवाय कधी जेवत नव्हता. नेहमी माझ्या आसपास
असणारा मित्र. गरजेच्या वेळी नेहमी धावून येत होता. वादविवाद होत राहिलेत पण
आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. अपयश च्या वेळी मानसिक आधार देणारा तोच.
त्याच्या रूमवर ची खिचडी कशी विसरणार. घरून आला कि डब्बा आणायला कधी विसरायचं नाही
तो. आम्ही तर त्याची वाटच पाहत होतो. एकदा तर रात्री दोन वाजता आम्ही त्याच्या घरी
जाण्यासठी पुण्यातून निघालो. बारामतीत पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती. तिथून पन्नास
किलोमीटर अजून प्रवास होता. काय मजा आली होती त्या प्रवासात. थंडी चे दिवस आणि
गाडी चालायची म्हणजे सोपं नव्हतं. बऱ त्याला गाडीही चालवता येत नव्हती. त्याच्या
घरी पोहचे पर्यंत मात्र माझी वाट लागली होती.
संदीप म्हणजे एक अस्सल व्यक्तिमत्त्व. मुलींच्या
प्रेमात रडणारा. जी आवडत नव्हती तिला बहिण म्हणणारा. त्याला किती वेळा प्रेम झालं
ते नाही सांगता येणार. पण त्याच्या शेवटच्या प्रेमाच्या वेळी मी साक्षीदार. तिच्या
सोबत राहून तो फार बदलून गेला होता. तिच्यासोबत कुठ कुठ फिरला असेल त्यालाच माहित.
तिचं लग्न ठरलं तेव्हा तर खऱ्या अर्थाने मजनू झाला होता. खरंच झाला होता कि नाटक
करत होता ते त्यालाच माहित. तिच्या लग्नाला आम्ही पुण्यातून थेट नाशिक गाठलेलं.
खिशात फक्त तीकीटापुरते पैसे. तिथे गेल्यावर एका जुनिअर कडून पाचशे रुपये घेतलेले
परत येण्यासाठी. प्रवासात चहा पिण्यासाठी हि पैसे नव्हते. भूक लागली होती पण जेवण
च गेलं नाही आणि आम्ही परत आलो. एकदा
त्याची आणि माझी मुंबईत भेट झाली. पूर्वीचे दिवस कधीच संपले होते. नवीन आयुष्य
सुरु झालं होतं.
यात नंतर आमच्यात सामील झाला तो अजिंक्य. तसं
आम्ही त्याला आज्या म्हणतो. तो एक वेगळाच माणूस. कुणालाही आपलेसे करून घेण्याच
त्याचा स्वभाव.एकदा त्याच्या जवळ गेलं कि तो कधीही दूर होत नाही. त्याचे अनेक
किस्से रंगवून सांगण्यात काही लोकांचे दिवस गेलेत. मुळात त्याच्याबद्दल फार गैरसमज
असायचे इतरांचे. पण तसं काहीच नव्हतं. तो एक चांगला गृहस्थ. कुणाशीही कधीही
वैमनस्य त्याने ठेवलं नाही. इतर काय म्हणतात ते तो दुर्लक्ष करतो. आणि त्याला
वाटेल तसं जगतो. मानसं कशी जोडावी हे त्याच्यापासूनच मला थोडं शिकायला मिळालं. मला
जमलं नाही तो भाग वेगळा. पुण्यात गेलो कि त्याला नेहमी भेटतो. विद्यापीठात फेरफटका
मारून आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. जातीने ब्राम्हण असला तरी सर्वसमावेशक.
जातीचा त्याला कधी अभिमान नाही. आमचा तो विद्यापीठाबाहेर चा कट्टा कायम असायचा. पण
त्याला पोरींचा फार नाद. दिसायला देखणा असल्याने ते साहजिक होतं. त्याचा अभ्यास
म्हणजे परीक्षेच्या आधी. जयकर मध्ये फार वेळ कधी न बसू शकणारा तो. काही
दिवसांपूर्वी पुण्यात गेलो तेव्हा भेटला. अजूनही तसाच. भरपूर वेळ आम्ही सोबत
घालवला. कित्येक विषयांवर चर्चा झाली. आपलेपण काय असते हे तेव्हा खऱ्या अर्थाने
कळाल.
आता मी काय फार धुतल्या तांदळाचा होतो अस नाही.
माझेही अनेक उद्योग सुरु असायचे. हि झाली कि ती. पण अयशस्वी.
आता सगळे
वेगवेगळ्या मार्गाला लागलेत. ध्येय एकच होतं. नेट पास व्हायचं. नंतर ते
प्रत्यक्षात आलंही. रव्या गावाकडेच ४० किमी अंतरावर कॉलेज ला आहे. आन्या आय आय टी
मध्ये पी एच डी करतोय. कदम कोकणात आहे. एकदा महाड ला गेलो होतो तेव्हा त्याला
भेटलो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. संदीप नाशिक ला आहे. जित्याचा काही
पत्ता नाही. सगळे विवाहबद्ध झालेत. दुर्दैवाने कुणाच्याही लग्नाला जाता आले नाही.
विद्यार्थी अवस्था संपली कि मोकळेपणा ने जगता येत नाही. वाढत्या जबाबदार्यांमुळे
प्रत्येकजण बंदिस्त होतो. कधीतरी संपर्क होतो. पण तो हि कामानिमित्त.
ते दिवस म्हणजे भारलेले क्षण. असे ते विद्यापीठातले दिवस. काटेरी वाटेवर चा
प्रवास परंतु सुवर्ण भविष्याची स्वप्ने पाहताना प्रत्येकाने ते हि स्वीकारलं.
चढ-उतार येत राहिलेत पण न डगमगता प्रत्येकजण पुढे चालत राहिला. या कालावधीत या
सगळ्या मित्रांनी जीवनाला वेगळा अर्थ दिला. आठवणीत ठेवण्यासारखे क्षण दिलेत. सुरुवात
कशी पण असो परंतु शेवट मात्र चांगला झाला. कुणाच्याही मनात कुणाबद्दल गैरसमज
नव्हता. आणि तेच महत्त्वाचं आहे.
कधी वेळ मिळालाच पुन्हा एकदा गेट टुगेदर करूयात.
Miss you all. Miss every moment that we spent
together. For all the members of the First Ever GET TOGETHER…
(काही मर्यादांमुळे सगळ्या गोष्टी लिहू शकलो नाही.....त्या समजून
घ्याव्यात.)
No comments:
Post a Comment