Thursday, September 17, 2020

अर्णब गोस्वामी - पत्रकारिता क्षेत्रातील एक विकृत चेहरा

अर्णब गोस्वामी...एक धडाडीचा पत्रकार, जण-सामान्य जनतेचा आवाज असं काही चित्र काही वर्षांपूर्वी होतं. तो कित्येकांचा आयकॉन होता...आयडॉल होता. द टेलिग्राफ पासून पत्रकारितेची सुरुवात करणारा अर्णब नंतर एन.डी.टी. व्ही., टाईम्स नाऊ ते स्वतःची रिपब्लिक टीव्ही वर सतत आपल्यासमोर येत राहिला. या दरम्यान एक पत्रकार म्हणून त्यात अनेक बदल झाले. एक संयमित, अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करणारा अर्णब आता मात्र बिथरला आहे. सध्या तो रिपब्लिक टीव्हीचा एडिटर इन चीफ आहे.

पालघर मध्ये हत्या झालेलं प्रकरण असो , सुशांत सिंगचं आत्महत्या प्रकरण असो की अजून काही तो मिडिया ट्रायल घडवून आणतोय. त्याचा तो आविर्भाव, वर्तणूक, मी म्हणतो तेच खरं ई. लाईव्ह पाहताना मात्र आता किळस निर्माण होते. अर्णब गोस्वामी स्वतःला सध्या न्यायाधीश समजत असून कुणालाही जुमानत नसल्याचं चित्र आहे आणि हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीशिवाय शक्य नाही हे उघड आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक रसातळाला घेऊन जातो. त्यामुळे पत्रकार की कलाकार असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.

पत्रकारिता एक सन्माननीय क्षेत्र काम आहे. जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोचविण्याचे काम पत्रकार करत असतात. परंतु अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही हे मात्र पत्रकारिता कशी असू नये याचं ज्वलंत उदाहरण आहे."जसा जसा तो मोठा होत गेला, प्रसिद्ध होत गेला तसे आरोप ही त्याच्यावर होत राहिले.  २०१८ मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईनं आत्महत्या केली होती. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

विमानामध्ये एकपात्री विनोदी कलाकार (स्टँडअप कॉमेडियन) कुणाल कामरा याने अर्णव गोस्वामीशी अयोग्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर इंडिगो विमान कंपनीने सहा महिन्यांसाठी बंदी घातली. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

आपल्या शो मध्ये तो अरेरावी करतो, पक्षपात करतो असंही त्याच्या बाबतीत बोलले जाते. जस जसं वय वाढत जाते तसं तसं परिपक्वता वाढत जाते असं म्हणतात परंतु ४७ वर्षीय अर्णब च्या बाबतीत मात्र ते उलट आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख असो, कर्मचाऱ्यांशी उद्धवर्तन असो तो सतत चर्चेत आहे.  रिपब्लिक टीव्ही म्हणजे त्याची मक्तेदारी, सब कुछ अर्णब.

एकीकडे  त्याच्या चॅनेल ची टी.आर. पी. वाढत असताना एक एक जण त्याला सोडून जात आहे. अलीकडेच तेजिंदरसिंग सोधी यांनी त्याच्या नेटवर्क राम-राम ठोकला. राजीनामा पत्रात त्यांनी  अनेक धक्कादायक खुलासे केलेत. सर्वात मोठं नेटवर्क म्हणताना अनेक राज्यात साधा एक रिपोर्टर सुद्धा नाही.

पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित “रामनाथ गोयंका अवार्ड फॉर एक्सलंस इन जर्नालिझम” मिळवणारा, एक चांगला, अभ्यासू, सत्ताधार्याना धारेवर धरणारा ते बाष्कळ बडबड करणारा, आक्रस्ताळ करणारा, प्रखर हिंदुत्व जोपासणारा, भाजपा समर्थक, पत्रकारितेचे सारे संकेत तुडवणारा हे अधपतन क्लेशदायक आहे. पत्रकारितेची हत्या केल्याचं पाप मात्र त्याच्या माथी लागेल हे शाश्वत सत्य.

एकीकडे अर्णब विष ओकत देशाच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करत असताना रविश कुमार सारखा पत्रकार मात्र एक हाती किल्ला लढवतो आहे. देशासाठी महत्त्वांच्या मुद्द्यांवर बोलतोय.

लोकशाहीचा चौथा खांब डळमळीत झाला आहे. पेड पत्रकारिता सुरु झालीय. रविश सोडला तर बाकी सारे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला...मग सरकारला जाब कोण विचारेल? कोरोना ने अर्थव्यवस्था डळमळीत केलीय, अनेक बेरोजगार झालेत या विषयी कुणीच बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून कंगना, सुशांत, बॉलीवूड वगैरे सुरु आहे. लोकांचं मनोरंजन होईल. पण नुकसान होईल ते या देशाचं.

हे सर्व घडत असताना पत्रकारांच्या हक्कांचे आणि पत्रकारितेच्या नियमांचे संरक्षण करणारी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मात्र मूक गिळून गप्प आहे.

 

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

Tuesday, September 15, 2020

ऑनलाइन शिक्षण: स्वप्न आणि वास्तव

कोरोना आला आणि सगळ्या गतीविधी स्तब्ध झाल्या. शिक्षण-क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल? त्याला  पर्याय म्हणून आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळायला सुरुवात केली. यु-ट्यूब व्हिडीओ, झूम, ऑफिस टिम, गुगल मिट, गुगल फॉर्म, टेलेग्राम, मूडल, वेबेक्स असे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात झाली.  सुरुवातीला शिक्षकांना ही ते कठीणच गेलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपण सगळे भांबावलो. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल कंटेंट आपल्याकडे नव्हता. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असे सर्वच चिंताक्रांत.

मंदीतही संधी निर्माण झाली ती लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट ई. निर्मिती करणाऱ्यांना कारण त्यांचा खप वाढला.   मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून कित्येकांनी ऐपत नसताना खर्च केला. परंतु ज्यांची ऐपत नाही त्याचं काय? असंघटीत क्षेत्रात काम करणारे, रोजंदारीवर काम करणारे, कष्टकरी, आदिवासी अशा लोकांनी काय करावे?  एकतर हाताला काम नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर ठाकला आहे. त्यात  शाळा, महाविद्यालयांकडून फी भरण्याचा तगादा आणि ऑनलाइन शिक्षणाचा रेटा. त्या पालकांनी काय करावं? त्यांच्या पाल्यांनी काय करावं? फी भरली नाही म्हणून कित्येक शाळा त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. समान संधी या तत्त्वाला हरताळ फासली गेली.

कुठलीही गोष्ट अमलांत आणण्यापूर्वी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करण्याआधी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यात ऑनलाईन  शिक्षणासाठी लागणारी साधने, नेटवर्क, विज यांचा समावेश आहे.  आपल्याकडे तसं झालं नाही. ऑनलाईन  शिक्षण सुरु करण्यापूर्वी ज्या सुविधा गरजेच्या आहेत त्याकडे ना सरकारने लक्ष दिलं ना शाळांनी. उच्च वर्गातील लोकांना अडचण नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा विचार केला तर ग्रामीण भागात परिस्थिती वाईट. स्मार्ट फोन नाही, नेटवर्क नाही, विज नाही.  विद्यार्थ्यानी काय करावं? कित्येक घरात स्मार्ट फोन असलाच तर साधारण दोन-तीन मुले शिकत असतात. आता एक स्मार्ट फोन दोन-तीन जण  कसे वापरणार? संगणक, laptop ई. चा तर ते लोकं विचार ही करू शकत नाही. कारण तेवढी गुंतवणूक करण्याची त्यांची आर्थिक कुवत नाही. मग गरीब पार्श्वभूमीतून आलेले विद्यार्थी जर शिक्षणापासून वंचित राहत असतील तर त्याची  जबाबदारी कुणाची?

पारंपारिक शिक्षणाला पर्याय ऑनलाईन शिक्षण आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. वस्तुस्थिती पाहिली तर असं लक्षात येते की ऑनलाईन शिक्षण यावर पूर्णपणे आपण अवलंबून राहू शकत नाही. पारंपारिक शिक्षणाला ऑनलाईन ची जोड देऊन शिक्षण पद्धती अधिक चांगली करता येईल. प्रत्येक पद्धतीचे तसे फायदे-तोटे असतात. पारंपारिक पद्धतीत विद्यार्थांना जे सोशल स्किल्स प्राप्त होतात, मानसिक जडण-घडण होते, व्यक्तिमत्व विकास होतो ते ऑनलाईन पद्धतीत होत नाही. जगण्यासाठी पुस्तकी ज्ञान कामी येत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालंय. ते फार तर पैसे कमविण्यासाठी कामात येते परंतु समाजात जगताना, कुटुंब एकसंघ ठेवताना जी सामाजिक कौशल्ये लागतात ती पारंपारिक शिक्षण पद्धतीत मिळतात. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग, मित्र-मैत्रिणी, स्पर्धा, यश-अपयश, खेळ  यातून अनेक गोष्टी विद्यार्थी शिकतात. ऑनलाईन  मध्ये याचा गंध ही नाही.

शिक्षण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचलं पाहिजे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. याबाबत सरकारने विचार करायला हवा.  ऑनलाईन शिक्षणाचा अट्टहास करताना गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत काय परिणाम होतील याचा विचार व्हायला हवा.

प्राथमिक शिक्षण म्हणजे नर्सरी ते साधारण चौथीपर्यंत ऑनलाईन शिक्षण कितपत फायदेशीर ठरणार? कारण त्या वयोगटातील मुलांना फार काही समज नसते. मुळात भारतात तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कश्यासाठी  करायचा याचं भान नाही. तेव्हा प्राथमिक शिक्षणाबाबत गोंधळ निर्माण होईल. स्क्रिन ला ही मुले बळी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम कसे होतील? Screen Addiction मुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात? अशा अनेक बाबींचा विचार झाला पाहिजे. म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा अट्टहास करताना पायाभूत सुविधा निर्माण करणे, नियोजन करणे, कुठल्या वयोगटासाठी काय योग्य याचा आराखडा तयार करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत.

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

 

Saturday, September 12, 2020

कंगना राणावत (Kangana Ranavat)-दुसरी बाजू

बॉलीवूड...मायानगरी....मायाजाल..... देशभरातून कित्येक युवक-युवती आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतात. काही यशस्वी होतात तर कित्येक  अयशस्वी... बॉलीवूड मधील राजकारण, वातावरण, संस्कृती  प्रत्येकाला झेपेल असंही नाही. तिथे काय योग्य नि काय अयोग्य यात फार अंतर नाही. कोण कधी कुणासोबत जाईल, कधी लग्न होईल नि कधी तुटेल अथवा लिव्ह इन असे अनेक प्रकार तेथे चालतात.  प्रसिद्धी, झगमगाट, पैसा इ. च्या मागे लागणारे अनेक. अशा अनेक नावांपैकी एक कंगना राणावत...मुळची हिमाचल प्रदेशातील...मुंबईत आली आणि आपली कारकीर्द घडवली...मुंबईत आलेली एक नवखी युवती ते एक यशस्वी अभिनेत्री असा तिचा प्रवास...

कंगना राणावत...बॉलीवूड क्वीन....सध्या सगळीकडे तिची चर्चा. तसंही ती नेहमी प्रसिद्धी झोतात असते. आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून ती आपल्यासमोर आली आहे. अनेक दर्जेदार चित्रपट तिने दिलेत. तिच्या अभिनयाची सुद्धा प्रशंसा केली जाते. आज जे आपल्याला दिसते की ती आता रुळली आहे बॉलीवूड मध्ये, ते सहज घडून आलं नसेल. मेहनत असेल, संघर्ष असेल, मान-अपमान वाटेला आला असेल. परंतु ती त्यातून तावून सुलाखून बाहेर पडली. आणि एक चांगली अभिनेत्री, प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आता आपण तिच्याकडे पाहतो. जेवढे प्रशंसक तेवढे टीकाकार ही असणार.

ती चित्रपटसृष्टीत आल्यापासून तिचा प्रवास दिसतो तेवढा सोपा नसणार. अलीकडे ती जरा जास्तच चिडचिड करतेय. अनेकदा वाद ओढवून घेते. तिच्यावर टीका-टिप्पणी सुद्धा ओघाने आलीच.परंतु आपल्या पैकी किती लोकांनी तिचं आयुष्य बघितलंय? ती अशी का वागतेय हे जाणून घेण्याचा आहे प्रयत्न केलाय का कधी?

कुटुंबाचा विरोध झुगारून ती वयाच्या सोळाव्या वर्षी दिल्लीला आली आणि थिएटर ग्रुप जॉईन केला. नंतर ती मुंबईत आली बॉलीवूड मध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी. ते सुद्धा कुठलीही पार्श्वभूमी नसताना. कुणी Godfather नाही की कुणाचा पाठींबा नाही. नेपोटीझम प्रचंड असताना करिअर घडवणे, स्वतःची ओळख निर्माण करणे वाटते तेवढंही सोपं नसणार. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती Outsider. त्यामुळे प्रस्थापित लोकांचा किती त्रास झाला असणार त्याची आपल्याला कल्पना ही करता येणार नाही. पांचोली असो, महेश भट असो की ऋत्विक रोशन या साऱ्यांनी तिचा गैरफायदा उठवला. तिच्यावर अत्याचार केलेत.  हे सर्वाना माहित आहे. वेळोवेळी ती याबद्दल माध्यमांमध्ये बोलली आहे. एवढं सत्य बोलायला ही हिंमत लागते. आपली प्रतिमा काय होईल हा विचार न करता आपल्यासोबत काय घडलं ते जगासमोर मांडते आहे. एक महिला म्हणून आपण तिचं कौतुक नक्की करायला हवं.

एक महिला म्हणून तिचा विचार करायला हवा. आता तिचं करिअर चांगलं सेट झालंय, परंतु भूतकाळ कसा विसरणार? पावलागणिक फसवणूक झाली असणार, अत्याचार झाले असतील. ती साऱ्यांना पुरून उरली. आज जे तिचं वर्तन आपल्याला दिसतेय त्याचं उत्तर कदाचित तिच्या भूतकाळात दडलेलं असणार.

आजकाल ती सोशल मेडिया वर जोहर, कपूर, रोशन, पांचोली या प्रस्थापित सर्वांवर तोंडसुख घेतेय. नेपोटीझमवर बोलतेय. एवढी हिंमत आजपर्यंत कुणी दाखवली नाही. म्हणून तिचं स्वागत केलं पाहिजे. तिची भूमिका कदाचित आपल्याला पटणार नाही परंतु तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण गदा आणू शकत नाही.

राजकारणी तिचा वापर करून घेतील स्वतःच्या फायद्यासाठी हे उघड आहे. सुशांत सिंग प्रकरणात ती सातत्याने वेगवेगळी विधाने करत आहे. मुंबई पोलिसांवर आक्षेप असो की मुंबई बद्दल चं तिचं वक्तव्य चुकीचं आहेच. मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख ही चुकीचाच.  पण म्हणून बीएमसी च्या कारवाई चं ही आपण समर्थन करू शकत नाही. मुंबई...मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक...त्यामुळे मुंबईबद्दल अपशब्द म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान...असं चित्र. त्यामुळे ती टीकेची धनी झाली. टीका सुद्धा व्हायला पाहिजे त्याबद्दल शंका नाही.

जेव्हा सर्वांच्याच नजरा वाईट, प्रत्येकजण परिस्थितीचा गैरफायदा उठवण्याच्या प्रयत्नात अशा परिस्थितीत एका महिलेला किती त्रास सहन करावा लागत असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. सेक्स सिम्बॉल म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते. ती त्याला बळीही पडली असणार. तिचा गैरफायदा घेतला गेला असणार. याबद्दल दुमत नाही. बॉलीवूड मध्ये काय चालते हे आपल्या सर्वाना माहित आहे. स्त्री कडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन काही नव्याने सांगण्याची गरज नाही. चित्रपटांमधून आपल्या समोर ते येतेच.

२०१३ मध्ये Daily News and Analysis ला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं:

"People in the industry treated me like I didn't deserve to be spoken to and I was some unwanted object. I couldn't speak English fluently and people made fun of me for that. So dealing with rejection became a part of life. ... All that has taken a toll, I guess. I find it hard to deal with praise. Today, when people say that I have made it and made it on my own, I feel like locking up myself somewhere ... It scares me."

संघर्ष, छळ त्यातून आलेल्या मानसिक, शारीरिक वेदना, नैराश्य तसे असह्यच. परंतु ती टिकली आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळे तिला या लोकांचा राग असणारच. तिच्या वाटेला आलेलं आयुष्य कसं असेल ते आपल्या गावी नाही. त्यामुळे आज जे काही कंगना करत आहे ते यातूनच आलं आहे असं म्हटलं तर हरकत नसावी.

ती कोणत्याही अवार्ड शो ला जात नाही कारण ते सगळं ठरवून केलेलं असते, मॅनेज असते असं तिचं मत. आजपर्यंत तिला तीन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहे अभियानाकरिता. याशिवाय तिला भारत सरकारच्या पद्मश्री या पुरस्काराने ने सुद्धा सन्मानित केलं गेलं आहे.

ती केवळ एका राज्याची नाही तर या देशाची नागरिक आहे. ती कुठे ही जाऊ शकते, राहू शकते. कुठलंही राज्य तिला तिचा तो हक्क नाकारू शकत नाही. देशात कायद्याचं राज्य आहे. तिचं काही चुकलं असेल तर कायदेशीर प्रक्रियेने तिच्यावर कारवाई करावी किंवा व्हायलाच पाहिजे.

याच बरोबर महिला सबलीकरणाच्या गप्पा करताना महिलांवर होणारे अत्याचार,त्यांचा छळ आपण टाळू शकलोय का, त्यांना खरं स्वातंत्र्य दिलंय का याचा ही विचार करण्याची गरज.एका महिलेला सुरक्षा पुरवून फार काही साध्य होणार नाही. साध्य होईल ते फक्त राजकारण. तुम्ही एक यशस्वी कलाकार आहात म्हणून कुठल्याही विषयावर आपण बोलू शकतो हा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढीस लागला आहे.  राजकीय पक्ष फक्त आपला फायदा करून घेणार....दुसरं काहीच नाही.   कलाकारांनी हे टाळायला हवं.

एक अभिनेत्री, एक महिला म्हणून तिचा आदर...

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

राजू श्रीवास्तव

स्टँड-अप कॉमेडी हा कलाप्रकार फार प्रचलित नव्हता त्या काळात राजू श्रीवास्तव प्रसिद्धी झोतात आला. १९९३ पासून तो या क्षेत्रात काम करतोय. त्या काळी तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. त्यामुळे तेवढी प्रसिद्धी त्याला कदाचित मिळाली नाही. मुळचा उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवाशी असलेला राजू श्रीवास्तव आपलं करिअर घडविण्यासाठी मुंबईत आला. त्याचं खरं नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे.  सुरवातीला 'तेजाब' (1988), 'मैने प्यार किया' (1989) सारख्या काही चित्रपटांमध्ये  त्याने छोट्या-छोट्या भूमिका केल्या. सुरुवातीपासून त्याला कॉमेडिअन व्हायचं होतं. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या मालिकेमधून. त्याला विजेता होता आलं नसलं तरी त्याची कॉमेडी मात्र लोकांना पसंत पडली.

त्यानंतर 'कॉमेडी का महामुकाबला', 'कॉमेडी सर्कस', 'लाफ इंडिया लाफ' आणि 'गँग्स ऑफ हंसीपूर'सारख्या कॉमेडी शोमध्ये त्याने सहभाग घेतला.  या शिवाय त्याने 'बिग बॉस'चे तिसरे पर्व आणि 'नच बलिए'चे 6 व्या पर्वातसुध्दा भाग घेतला.

देश-विदेशात त्याने आपले शो सादर केलेत. राजकारण, समाजकारण, आसपास घडणाऱ्या घटना, छोट्या-मोठ्या गोष्टींवर मिमिक्री करणे, कॉमेडी करणे यात त्याचा हातखंडा. व्यंग असो की विडंबन, विनोद असो की नक्कल अथवा शायरी  या सर्व गोष्टी तो कुशलतेने हाताळतो. आपल्या कॉमेडी मध्ये त्याने फालतू विनोद टाळले आहेत. असभ्य भाषा त्याने टाळली आहे. कुटुंबासोबत शो पाहता यावा असं त्याचं मत आहे. त्यामुळे पारिवारिक कॉमेडियन  ही प्रतिमा त्यानं कायम ठेवली आहे. आजकाल सर्रास अश्लिल कॉमेडी प्रसारित केली जाते. म्हणूनच तो वेगळा.



देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग घेऊन त्याने आपला शो सादर केला आहे. लोकांचं मनोरंजन केलं आहे. लोकांना हसवलं आहे. आजही यु ट्यूब वर सर्च केलं तर त्याचे अनेक शो आपल्याला पाहता येतील. त्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली आहे सादरीकरणाची. प्रसंगावधान आहे. वेळेवर विनोद करण्याची कला अवगत आहे. शायरी, कविता, जोक्स तो सहजपणे सादर करतो.

अलीकडच्या काळात तो फारसा दिसत नाही. भारतात स्टँड-अप कॉमेडी रुजवण्यात मात्र त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कॉमेडी हा प्रकार लोकप्रिय करण्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याला पाहून अनेक जण या क्षेत्रात उतरले. गेल्या काही वर्षात अनेक कलाकार कॉमेडी उदयास आले आणि प्रसिद्ध झाले. तरीही त्यानं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. प्रत्येकाला परिचित असं नाव आहे.  

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

Wednesday, September 2, 2020

वर्क फ्रॉम होम (Work From Home)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झालं. परिणाम व्हायचा तो झाला. उद्योगधंदे, कंपन्या यांचे कामकाज ठप्प झाले. जेथे शक्य तिथे वर्क फ्रॉम होम ची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली गेली. वर्क फ्रॉम होम चा येत्या काळात काय परिणाम होईल ते तर दिसून येईलच परंतु जॉब चे संदर्भ कसे बदलले आहेत ते लक्षात घेणे गरजेचे आहे. घरी बसून काम करता येत असल्याने कंपनीत जायची गरज नाही. त्यामुळे वाहतूक व्यवसायात असलेले कॅब चालक, ऑटो चालक यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. जवळपास  ३ लाख आयटी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण निम्मे झाले. त्यामुळे प्रदूषण सुद्धा कमी झालेय.

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकांचा प्रवासाचा खर्च, कपडे, खाद्य पदार्थ इत्यादी गोष्टींवर होणारा खर्च कमी खूप कमी झालाय. वरवर पाहता ते कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याचा दिसतेय.  त्यांचा प्रवासात जाणारा वेळ वाचतोय. हे असलं तरी घरी तसा सेट अप तयार करणे, इन्टरनेट या बाबींची पूर्तता त्यांना करावी लागणार आहे.

कंपन्यांना ही ते फायद्याचे आहे. मग ती ऑफिस मधील विजेची बचत असो की ओघाने येणारे अनेक खर्च टाळले जात आहे. त्यामुळे भविष्यात अनेक कंपन्या  वर्क फ्रॉम होम चा पर्याय कायमस्वरूपी निवडू शकतात. अलीकडे आरपीजी या कंपनीने कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम चा पर्याय दिल्याची बातमी झळकली. ४ बिलियन डॉलर मूल्य असलेल्या या ग्रुपची टायर, आयटी, आरोग्य, ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मोठी उलाढाल आहे.  सेल्स विभागाचे सर्व कर्मचारी कायमस्वरुपी घरातून काम करतील असं धोरण आरपीजीने तयार केलं आहे. इतर कंपन्याही वर्क फ्रॉम होम च्या  धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. भारतात कॅविनकेअरने आपली कॉर्पोरेट कार्यालये बंद करत जूनमध्ये वर्क फ्रॉम होमचा स्वीकार केला. ट्विटरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना हव्या तेवढ्या कालावधीपर्यंत वर्क फ्रॉम होमची निवड करण्याचा पर्याय दिला आहे. गुगल आणि फेसबुकनेही वर्क फ्रॉम होम वाढवलं आहे.

वर्क फ्रॉम होम चा काय परिणाम होईल ते दिसून येईलच. अलीकडे एका सर्वेक्षणात वर्क फ्रॉम होम च्या जॉब्स  मध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय.



वर्क फ्रॉम होम चे फायदे:

वेळेची बचत

रहदारी कमी

पैश्याची बचत

कामाच्या तासांमध्ये शिथिलता

कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल

ताण-तणाव कमी

कामाच्या बाबतीत स्वातंत्र्य

वर्क फ्रॉम होम तोटे:

घरात लहान मुले असल्यास व्यत्यय जास्त

घर आणि काम यात फरक जाणवत नाही

क्रयशक्ती कमी

स्वाथ्यास हानिकारक जीवनशैली

इतरांशी असलेला संवाद कमी

एकाकीपणाची भावना वाढीस लागू शकते.

कामगिरीचे मूल्यमापन करणे कठीण

वर्क फ्रॉम होम करताना खालील गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे:

केंद्रित

स्वयंशिस्त

वेळेचे नियोजन

संघटीत आणि संरचित

एकटे काम करण्याची सवय

 

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

 

Sunday, August 30, 2020

गिग इकॉनॉमी (Gig Economy) म्हणजे काय?

अलीकडे व्यापाराचे स्वरुप बदलते आहे. जॉब चे स्वरूप बदलत आहेत. प्रत्येक कंपनी पैसे कसे वाचतील याचा विचार करते म्हणजे नफ्याचा विचार करते. प्रत्येक कामासाठी नवीन उमेदवार नियुक्त करणे  कंपनीला सुद्धा परवडणारे नाही. शोर्ट टर्म प्रोजेक्ट असतील, छोटे-मोठे काम असेल तर नवीन नियुक्ती करणे तोट्याचा सौदा. त्यामुळे नवीन नवीन शक्कल कंपन्या लढवत असतात. गिग इकॉनॉमी हा त्यातील एक प्रकार. त्याला टास्क इकॉनॉमी असेही म्हटले जाते. गिग इकॉनॉमी म्हणजे फ्री मार्केट सिस्टम. गिग हा शब्द स्लँग असून त्याचा अर्थ म्हणजे ठराविक कालावधीसाठी असणारे एखादे काम.  गिग हा शब्द संगीतकार वापरतात.

त्यात  कंपनी एखादे काम ठराविक कालावधीत व्यावसायिकाकडून करून घेते. त्यांचा करार असतो. ठराविक कालावधीत ते काम पूर्ण झाले की त्या व्यावसायिकाचा त्या कंपनीशी काही संबंध राहत नाही. अनेक लोकांना एखाद्या कंपनीत आयुष्यभर राहणे कदाचित आवडत नसेल तेव्हा ते फ्री-लान्सर म्हणून असे काम  किंवा प्रकल्प पूर्ण करून देतात कंपन्यांना. यात त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य असते. कंपनीत जायची गरज भासत नाही. असेल त्या ठिकाणाहून ते काम पूर्ण करतात. काम पूर्ण केल्यानंतर करारानुसार त्यांना त्यांचे देयक मिळते. भारतात सुद्धा गिग इकॉनॉमी जोर धरू पाहत आहे. डेटा अॅनालिटिक्स, कंटेंट रायटिंग, भाषांतर, निवड, विक्री, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्किटेक्चर, अकाउंटिंग, कन्सल्टिंग असे अनेक गिग जॉब्ज दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. कंपन्या आपले प्रकल्प आऊटसोर्स करत आहेत. 

गिग इकॉनॉमी  च्या विस्तारामागे अनेक कारणे आहेत. अनेकांना आपण करत असलेल्या कामाचा कंटाळा येऊ शकतो किंवा कंपनीत वेळेवर वेतन न मिळणे, प्रमोशन न मिळणे, वेतन न वाढणे  असे अनेक करणे असू शकतात ज्यामुळे लोकं या क्षेत्राकडे वळत आहेत. या शिवाय ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे ते असे अनेक जॉब्स एकाच वेळी करत असतात. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी. एकाच वेळी असे व्यक्ती अनेक कंपन्यांशी सबंधित असतात. त्यांच्या कामात लवचिकता असते. त्यांना मिळणारे काम अल्प किंवा दीर्घ काळासाठी असू शकते.

ज्यांना खूप परिश्रम करण्याची सवय असते त्यांच्यासाठी हे लाभदायक क्षेत्र. आजकाल अनेक कंपन्या अश्या कामाची संधी देत आहेत. कंपन्यांना सुद्धा कौशल्य असलेल्या लोकांकडून काम पूर्ण करवून घेता येते.

आजकाल अनेक वेबसाईट गिग जॉब्ज च्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यात ओला, उबेर, अमेझॉन अश्या अनेक कंपन्या आहेत.



प्रगत राष्ट्रांमध्ये गिग इकॉनॉमी वेगाने विस्तारत आहे. कौशल्य असणाऱ्या लोकांना प्रचंड स्कोप आहे. पारंपारिक नोकऱ्यांच्या मागे न जाता या क्षेत्रात सुद्धा करिअर करता येऊ शकते. गरज आहे ती कौशल्यांची.  तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून काम करता येऊ शकते. येत्या काही वर्षात गिग जॉब चे प्रमाण प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने याकडे संधी म्हणून बघितले पाहिजे. बदलत्या काळाशी जुळवून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण  अडगळीत पडणार नाही.

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव