Saturday, September 12, 2020

राजू श्रीवास्तव

स्टँड-अप कॉमेडी हा कलाप्रकार फार प्रचलित नव्हता त्या काळात राजू श्रीवास्तव प्रसिद्धी झोतात आला. १९९३ पासून तो या क्षेत्रात काम करतोय. त्या काळी तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. त्यामुळे तेवढी प्रसिद्धी त्याला कदाचित मिळाली नाही. मुळचा उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवाशी असलेला राजू श्रीवास्तव आपलं करिअर घडविण्यासाठी मुंबईत आला. त्याचं खरं नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे.  सुरवातीला 'तेजाब' (1988), 'मैने प्यार किया' (1989) सारख्या काही चित्रपटांमध्ये  त्याने छोट्या-छोट्या भूमिका केल्या. सुरुवातीपासून त्याला कॉमेडिअन व्हायचं होतं. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या मालिकेमधून. त्याला विजेता होता आलं नसलं तरी त्याची कॉमेडी मात्र लोकांना पसंत पडली.

त्यानंतर 'कॉमेडी का महामुकाबला', 'कॉमेडी सर्कस', 'लाफ इंडिया लाफ' आणि 'गँग्स ऑफ हंसीपूर'सारख्या कॉमेडी शोमध्ये त्याने सहभाग घेतला.  या शिवाय त्याने 'बिग बॉस'चे तिसरे पर्व आणि 'नच बलिए'चे 6 व्या पर्वातसुध्दा भाग घेतला.

देश-विदेशात त्याने आपले शो सादर केलेत. राजकारण, समाजकारण, आसपास घडणाऱ्या घटना, छोट्या-मोठ्या गोष्टींवर मिमिक्री करणे, कॉमेडी करणे यात त्याचा हातखंडा. व्यंग असो की विडंबन, विनोद असो की नक्कल अथवा शायरी  या सर्व गोष्टी तो कुशलतेने हाताळतो. आपल्या कॉमेडी मध्ये त्याने फालतू विनोद टाळले आहेत. असभ्य भाषा त्याने टाळली आहे. कुटुंबासोबत शो पाहता यावा असं त्याचं मत आहे. त्यामुळे पारिवारिक कॉमेडियन  ही प्रतिमा त्यानं कायम ठेवली आहे. आजकाल सर्रास अश्लिल कॉमेडी प्रसारित केली जाते. म्हणूनच तो वेगळा.



देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग घेऊन त्याने आपला शो सादर केला आहे. लोकांचं मनोरंजन केलं आहे. लोकांना हसवलं आहे. आजही यु ट्यूब वर सर्च केलं तर त्याचे अनेक शो आपल्याला पाहता येतील. त्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली आहे सादरीकरणाची. प्रसंगावधान आहे. वेळेवर विनोद करण्याची कला अवगत आहे. शायरी, कविता, जोक्स तो सहजपणे सादर करतो.

अलीकडच्या काळात तो फारसा दिसत नाही. भारतात स्टँड-अप कॉमेडी रुजवण्यात मात्र त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कॉमेडी हा प्रकार लोकप्रिय करण्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याला पाहून अनेक जण या क्षेत्रात उतरले. गेल्या काही वर्षात अनेक कलाकार कॉमेडी उदयास आले आणि प्रसिद्ध झाले. तरीही त्यानं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. प्रत्येकाला परिचित असं नाव आहे.  

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

No comments:

Post a Comment