Thursday, August 22, 2019

#LATE POST: नेमकं भाग-२


अलीकडे तू तीन वर्षाचा झाला. नाही म्हणायला तुझ्यासोबत आम्ही पण वाढलो. तू बोलायला लागला अन आम्ही काय बोलू नये यावर किती चर्चासत्र पार पडली असतील. जस आम्ही बोलतो तू तसाच रिपीट करतो. मग चांगल असो कि वाईट. रागाच्या भरात भाषेचा दर्जा घसरला कि तू ही तेच अनुकरण करतो. आणि पुढचे कित्येक दिवस तू ते विसरत नाही. आपण तसं बोलायला नको होतं याच्यासमोर याची वारंवार जाणीव करून देतोस. मी कुठे बाहेर गेलोच तर आल्यानंतर “मला का नाही नेलं” असा तुझा पहिला प्रश्न. तुला काय हवं काय नको हे सारं तुला कळायला लागलाय. घरी यायला उशीर झालाच तर “माझे बाबा कुठे गेले” असं विचारून तू थांबत नाही. फोन लावून द्यायला भाग पडतो. तुम्ही कुठे आहे, घरी या. मला यायचं तुमच्यासोबत...असं ऐकलं मी घराच्या दिशेने मार्गस्थ होतो.  
तू फार वेळ कशातही रमत नाही.  बोलायला लागल्यापासून तुझे सातत्याने येणारे प्रश्न. कित्येकदा मला ही माहित नसते. तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसतातच. कुणी भेटलं तर कोण होते ते. ते काय आहे. वगैरे वगैरे. कधी कधी काय उत्तर द्यावे हा पण प्रश्नच.
मला राग आला आता असं मी म्हटल्यावर तुझा प्रश्न- कुठून आला, कुठे चालला तो. आता नेमकं राग म्हणजे काय कसं सांगावं. मी अन्नुत्तरीत. पण तू मात्र पिच्छा सोडत नाही. मग कसातरी विषय बदलून न्यायाचा. हे नेहमीचं झालंय.

तू बोलत असतो आणि आम्ही ऐकत असतो. रोज कॉलेज ला जावू नका. मला पण यायचं आहे. हे नेहमीचंच. बेल वाजली किंवा दरवाजा वाजला तर कोण आलंय पाहायला तू तिथं पोचलेला असतो. कित्येकदा दरवाजा उघडून तू बाहेर पडलेला असतो. जेवताना ताटावर येणारी सायकल...आमची होणारी चिडचिड...कधी कधी एक-दोन फटका...त्यातून तुझं  रडणं आणि आता मी तुमच्याशी बोलत नाही असं म्हणणं...आणि पुन्हा ती सायकल अन तू. नेहमीचं...अंगवळणी पडलंय.
आयुष्यातील प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवून जातो. तसंच आमचंही झालंय.  झोपताना मला इंग्रजी मध्ये गोष्ट सांगा असं रोज. मला गोष्टी येतच नाहीत. मग मी अशीच गोष्ट तयार करून सांगत असतो. आता रोज तिच गोष्ट. एकदा मराठी आणि एकदा इंग्रजीत.
पूर्वी बरं होतं सहा वर्षे वय झाल्यानंतर शाळेत नाव घातलं जायचं. म्हणजे मुलांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक  वाढ व्हायची.  आता सारं बदललंय. आधी प्ले ग्रुप. मग तीन वर्षे पूर्ण व्हायला लागली की नर्सरीत. त्यात ही चोईस...सि.बि.एस. ई., आय.सि.एस.ई. की स्टेट बोर्ड. आता कुठे बोलायला लागले आणि शाळा सुरु. व्यावसायीकरण झालंय.  
आपण ही त्यात सापडलोय. सकाळी तयारी करून द्यावी. शाळेत सोडायला जावं. सोबत टिफीन. युनिफोर्म...शूज...गळ्यात आय कार्ड..एक-दोन पुस्तके वाचता येत नाही तरी पण. बरं तिथे शाळेत काय करतो तो प्रश्न. त्या स्लायडिंग कडे वर्गातून पळून जाणे एवढं कळलंय फक्त. नर्सरीत काय तर इंग्रजी वर्णमाला...हातात लेखन पकडता येत नाही अजून अन सुरु झालंय ए...बि...काढणं.  तुम्ही त्याला शिकवत जा काहीतरी असं मी रोज ऐकतोय घरी. माझं उत्तर एकच...मी त्याला शिकवणार नाही.  जिकडे तिकडे शिक्षकांचा भडीमार नकोय.  शाळेतले शिक्षक पुरेसे आहेत. शाळा आणि घर यातला फरक त्याला कळायला हवा. घराला शाळा बनवून कसं चालणार? बालपण जगू द्यावं मुलांना. मनसोक्त खेळली...बागडली पाहिजेत...मस्ती केली पाहिजे. अविस्मरणीय व्हायला हवं ते.
पालकांनी पालक च राहावं किंवा पालक व्हायला आधी शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. अन्यथा पालकांसाठी सुद्धा कार्यशाळा आयोजन सुरु होईल. तसं काही ठिकाणी सुरु झालंय.  वयानुसार शिकतोच आपण. आज नाही तर उद्या. कुणी  लवकर कुणी उशिरा. निसर्गाचा खेळ सारा. एखादी गोष्ट परिपक्व होण्याआधी प्रक्रिया केली तर परिणाम उलटा च होणार कारण ते निसर्गाच्या विरुद्ध. मुलं जन्माला यायच्या आधी नऊ महीने असते आईच्या पोटात. झटपट नाही होत प्रत्येक गोष्ट. म्हणून मी त्याला शिकवत नाही. वेळ आली की जमेल त्याला. उत्कृष्ट शिक्षक लाभले म्हणून उत्कृष्ट विद्यार्थी बाहेर पडत नाहीत. हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून. योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायला हव्यातच. पण योग्य वेळ कोणती याचं कुठलंच भान आजकाल आढळत नाही.
प्ले ग्रुप च्या गोंडस नावाखाली कमाई सुरु झालीय. ठरलेली फी भरायची. आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नाही. उगाच घरी त्रास. त्यापेक्षा तिथे दोन-तीन तास सोडून द्यायचं. पूर्वी असं नव्हतचं. प्ले ग्रुप ची गरज पडली नाही. दारं-खिडक्या कायम उघड्या असायच्या. गल्ली-बोळामधली पोरं एकत्र येऊन खेळायची. सुरकाठी..रिंगण गोट्या...लपाछपी...विटी-दांडू...लगोरी...लंगडी... भिंगऱ्या .. भोवरे असे किती सारे खेळ होते.  काळ बदललाय. नामशेष झालेत कित्येक खेळ. येणाऱ्या पिढ्यांना कदाचित हे आठवणार नाही. मोकळ्या हवेत खेळणं...बागडणं बंद झालंय...भिंती फक्त सिमेंट च्या च नव्हे तर मनाच्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. पालक ही सिलेक्तीव झाले आहेत. कुणा-सोबत खेळावं...कुणासोबत नाही सारं सांगितल्या जातेय. जिकडे-तिकडे फक्त भिंती. कसा घेणार मुलं मोकळा श्वास?
आता दार-खिडक्या सतत  बंद असतात. पालकांसहित  मुलंही घरात कोंडली जाऊ लागली आणि टीव्ही, मोबाईल, कंप्युटर यात अडकायला लागली आहे. त्यातून कित्येक मानसिक समस्या निर्माण होत आहेत. पण आपल्याला याचं देणं-घेणं नाही. मी माझं कुटुंब...येणाऱ्या पिढ्या ही एकलकोंडी होण्याची भीती आहे. सामाजीकरण नाही तर कुठं येणार मानसिक विकास. मुलांना रागावलेलं आवडत नाही. थोडंस जरी टेन्शन आलं तर आभाळ कोसळल्या सारखं होते.


व्यावसायिक लोकांना त्यात ही संधी दिसली. कमावण्याचे मार्ग सापडला. व्यक्तिमत्त्व विकास, लाइफ स्किल्स, संभाषण कौशल्य यावर वर्क शॉप, सेमिनार, लेक्चर्स उपलब्ध आहेत. या विषयांवर लाखो पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. गोंडस शिर्षक देऊन पैसे मिळवणे सुरु झालंय. पुस्तके वाचून अथवा प्रशिक्षण घेऊन  कुठला आलाय व्यक्तिमत्त्व विकास? आणि हे क्लासेस वाले म्हणतात एक महिन्यात...दोन महिन्यात..भंपकबाजी नुसती. ते झटपट श्रीमंत झालेत एवढं मात्र खरं.
म्हणजे काय तर ज्या गोष्टी मुलं लहान असताना शिकत होती आता ते चार भिंतीआड शिकत आहेत तेही पैसे देऊन. गुगल सर्च केला तर कित्येक ट्रेनर, ट्रेनिंग देणाऱ्या संस्था सापडतील. बक्कल पैसा कमावणे सुरु आहे. पण आडातच नाही तर पोहर्यात येणार कुठून ही म्हण तंतोतंत लागू पडतेय.  भांडवलीकरण झालंय प्रत्येक गोष्टीचं आजकाल. आपणही त्याचा एक भाग बनून बसलो. असो कधीतरी यात बदल घडेल. आपण बदलू...समाज बदलेल..या आशेवर...
                                                                                            सचिन भगत (९९२२१२७३८५)
                                                                              श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
                                                                             शेगाव -४४४२०३

Tuesday, August 20, 2019

जागो ग्राहक जागो- भाग ४


प्रत्येकाला पैसा हवाय. हाव. त्यामुळे चेन मार्केटिंग सारखे प्रकार बाजारात आले. थोडक्यात वैयक्तिक संबंधांच्या साखळीमधून विकण्याचे तंत्र. त्यासाठी प्रशिक्षण ही दिले जाते. मोठ-मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या होतात. सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात. आणि आपण त्याला बळी पडतो. सॅनिटरी नॅपकिन पासून आजकाल चेन मार्केटिंग सुरु झालीय. एकाने मेंबर व्हायचं आणि मेंबर कनेक्ट करत जायचं ठराविक रक्कम भरून. आपण मेंबर झालो की मग नातेवाईक,परिचित, मित्र, शेजारी असे आपणही जोडायला सुरुवात करतो. एवढे सदस्य झाले की एवढा वाटा तुमचा असं ते ढोबळ स्वरूप. खूप मोठ्या प्रमाणात कमिशनचे प्रलोभन दाखवले जाते.  आकर्षक व्याजदर/नफा वगैरे . कित्येक लोकं या प्रलोभानापायी बुडालीत. मैत्रेय चं बघा काय झालंय. कित्येक लोकांचे पैसे बुडालेत. मालक/प्रतिनिधी (मार्केटिंग एजंट) कमवून बसलेत. सामान्य माणूस लोभेपायी देशोधडीला लागला. पैसे कधीतरी मिळतील अशी आशा कित्येकांना आहे. तसं अशक्यच. जाऊ द्या.
विमा क्षेत्रात सध्या भरपूर गुंतवणूक सुरु आहे. मोठ-मोठ्या बँका, कंपन्या ग्राहक मिळवण्यासाठी सरसावल्या आहेत. कित्येक लोकं आपण गेल्यानंतर काय या भितीने विमा काढतात तर काही गुंतवणूक म्हणून. मुळात विमा कशासाठी काढावा याचं ज्ञान समाजात नाही. विमा पॉलिसी नेमकं काय हेच कित्येकांना माहित नाही. विमा प्रतिनिधी फक्त ज्यावर जास्त कमिशन तेच ग्राहकांना सांगतात. खरं-तर विमा म्हणजे गुंतवणूक नाहीच.  प्रतिनिधीना टार्गेट दिलेले असतात. खरं-खोटं बोलून ग्राहक मिळवण्याची शर्यत सुरु आहे. असंख्य प्लान उपलब्ध आहेत. आपल्यामधील कित्येक त्याला बळी पडत आहेत. असाच एक प्रसंग.
मध्यंतरी आम्ही ट्रीप ला गेलो होतो. आठ-दहा लोकं. प्रवासा-दरम्यान इकडच्या-तिकडच्या गप्पा होतातच. प्रत्येक आपापले अनुभव सांगत होता. त्यात मी माझा विमा क्षेत्रा-संबंधित अनुभव सांगितला. माझी फसवणूक झाली होती. भांडून मी पैसे परत मिळविले. (जागो ग्राहक जागो- भाग २) आमच्यापैकी एकाची तशाच पद्धतीने फसवणूक झाली होती. विमा काढून ८-९ महीने उलटले होते. पन्नास हजार रुपये वार्षिक हप्ता. प्रतिनिधी त्यांच्या ऑफिस ला येऊन भेटली होती. माहिती सांगितली. यांनी ती स्विकार करून हप्ता ही भरला. ३-४ महिन्यानंतर त्यांना मेल आला कंपनीकडून. पन्नास हजाराचे ४१ हजार झाले होते. म्हणजे तो विमा गुंतवणूक म्हणून तर होताच पण subject to market risk.
त्या प्रतिनिधीने दिलेली माहिती अर्धवट होती. यांनी गुंतवणूक म्हणून विमा घेतला आणि त्या प्रतिनिधीने त्याला subject to market risk करून टाकलं. ते यांना माहित नाही. यांना मार्केट रिस्क नको होतं. झालं. आता पुढे काय? यांना काहीच माहित नाही. “फसवलं नं राव त्या बाईने मला”, असं ते तीन-चार वेळा बोलले.
मला पैसे परत मिळू शकतात काय? त्यांनी विचारलं.
विमा काढून बरेच महीने उलटले असल्याने मी साशंक होतो. विमा रद्द करण्याचा कालावधी हि संपला होता. त्याला फ्री लुक पेरिअड असं म्हणतात म्हणजे विम्याची कागदपत्रे मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला मला ते नकोय म्हणून रद्द करता येते. पण तो पर्याय हि समोर नव्हता.
त्यामुळे मी म्हटलं, प्रयत्न करूयात. रीतसर तक्रार दाखल करू.
ट्रीप वरून परत आल्यानंतर त्यांनी मला त्या विम्याचे कागदपत्रे दाखवली. नेमकं काय सांगितलं होतं आणि काय झालंय याची विचारपूस केली. तक्रार कुठे आणि कशी दाखल करायची हे माहित असल्यने फक्त कुठल्या मुद्द्यावर भर द्यायचा म्हणजे विमा रद्द होऊन पैसे वापस मिळतील यावर विचार केला. त्यानंतर तक्रार करण्यासाठी खालील मेल लिहिला:
Dear Sir/Madam,
I am XXX  from  Shegaon. Your representative visited me to get the policy from me. I agreed for the policy-No.00000000-XXXXX and paid 50000/-. I received the documents later on. I did not read it for many months. When I received official statement from your side (monthly policy charge details-All funds), the amount has been in decreasing order. This is not what your representative had conveyed me. As per her information, this was an investment policy. Now it has been revealed that it is subject to market risk. This was not conveyed by her.
It is clear that what she conveyed was not true at all. I still remember that she did not allow me to fill the policy documents. She said, “I will do it.” I trusted her. She has deceived me.
I have gone through the rules of IRDAI which clearly states that the policy documents have to be filled by me as I am an educated person. This has not happened in my case. Your representative did it. I only signed it. Now I realize why she did it.
I do not agree with this policy. I request you cancel my policy and return the amount with deductions as per the rules of IRDAI.
This is not the way to do the business. I am really disappointed by this type of business. Such type of business harms the image of XXX which is known for the best business and service.
I am writing this to you as I believe that justice will be done.
Kindly cancel my policy and return my amount.
If you don’t do it, I will approach Consumer Forum. The legal options are open.
The details of Policy: XXXXX
हे जसच्या तसं त्यांनी त्यांच्या ई-मेल वरून पाठवलं संबंधित कंपनीला. तक्रार आल्याने एक-दोन दिवसात काही प्रतिनिधी त्यांना येऊन भेटून ही गेलेत. मन वळवण्याचा ही प्रयत्न झाला. इकडून नकार. विमा काढताना रेकोर्डिंग करण्याची पद्धत काही बँका/कंपन्या करत आहेत. यांच्या बाबतीत रेकोर्डिंग झालं होतं. ते तपासण्यात आलं. रेकोर्डिंग खराब झाल्याने त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.
प्रकरण अंगावर येईल असं दिसल्याने त्यातल्या एकाने हा प्रसंग दुसर्या प्रतिनिधीच्या माथी मारला. तो दुसरा प्रतिनिधी काही दिवसांआधी हे जग सोडून गेला होता. रीतसर प्रक्रिया पार पडली. जवळ-पास एक महिन्याने संपूर्ण रक्कम परत मिळाली.




आता सुशिक्षित लोकांना जर गंडवलं जात असेल तर अशिक्षित/सामान्य लोकांबाबत तर कल्पना करवत नाही.  फसवणूक करणारे सुशिक्षित. किती हा विरोधाभास. आपण ज्ञानाच्या/ नैतिकतेच्या गप्पा ठोकतो दोन-चार पुस्तके वाचली की पण ते अंमलात येत नाही.  कित्येक लोकं मागे लागतात /भेटतात  विमा काढण्यासाठी. बहुतांशी आपल्या आसपासचीच जास्त. नाही म्हटलं तर रुसवे-फुगवे. असा विचार करून विमा काढणार्यांची संख्याही काही कमी नाही. हे फक्त विम्याच्या बाबतीत नाही. तर बाजारात कित्येक प्रोडक्ट्स चेन मार्केटिंग पद्धतीने विकले जात आहेत.  
विमा काढू नये असं मत नाही. विमा चांगलाच. फक्त आपल्याला काय हवंय आणि ते मिळतेय का याची खात्री करायला हवी. कारण पैसा आपला. तो फुकटात मिळत नाही. त्याला मेहनत करावी लागते. संघर्ष करावा लागतो. कित्येकांची बोलणी ऐकावी लागतात. भविष्य चांगलं व्हावं म्हणून कित्येक स्वप्नांना तिलांजली दिली जाते.  ग्राहक सजग होणं काळाची गरज आहे. फसवणूक टाळण्याचा तो एकमेव मार्ग.

सचिन भगत (9922127385)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

Saturday, August 17, 2019

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय


विदर्भाची पंढरी संतनगरी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं शेगाव. ऐंशीचं दशक. २०-२५ हजार असलेली लोकसंख्या.  शैक्षणिक मागासलेपण असंच काहीसं चित्र. मोठ-मोठ्या शहरांमध्ये जाऊन कित्येकांना तांत्रिक शिक्षण परवडणारे नव्हते.  हे चित्र बदलायचं म्हणजे नेतृत्वाची, दूरदृष्टीची गरज.  त्यावेळेस तांत्रिक शिक्षणाचा मागमूस ही नव्हता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते आवाक्यापलीकडचे. अश्या परिस्थितीत १९८३ मध्ये कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन शिक्षण संस्थेद्वारे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय ची स्थापना केली आणि बदलाची प्रक्रिया सुरु झाली.  सुरुवातीला रेल्वे स्टेशन जवळ दोन भाड्याच्या खोलीमध्ये हा प्रवास सुरु झाला. या महाविद्यालयाच्या रूपानं त्यांनीएक छोटंसं रोपटं लावलं. त्याचं सातत्याने संवर्धन केलं. आणि पाहता पाहता या रोपट्याचा वटवृक्ष झाला. तब्बल ८२ एकर परिसरावर हे महाविद्यालय आज उभं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचं दालन या निमित्ताने उपलब्धझालं.  शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. हे महाविद्यालय म्हणजे सेवेचं, ज्ञानाचं प्रतिक.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून हिविद्यार्थी इथे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी येतात.  महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, परमाणु आणि दूरसंचार अभियांत्रिकी च्या एकूण ३६० जागा आहेत. तसेचअभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचा दोन वर्षाचा पदव्युत्तर कोर्स सुद्धा उपलब्ध आहे.
महाविद्यालय अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असून सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांना चार वेळा एन. बि. ए. ने नामांकन दिले. आता पाचव्यांदा नामांकनासाठी महाविद्यालयाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रिक्वालिफायर साठी महाविद्यालय पात्र आहे.  नॅक बेंगलोर नामांकन सर्व अभ्यासक्रमांना मिळालंय. अभ्यासक्रमांची गुणवत्ता वाढवणे आणि टिकविणे यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले  जातात. विद्यापिठ परीक्षांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता येतात. तसेच स्मार्ट इंडिया हकथॉन, कडेन्स इंडिया कोंटेस्ट, विद्यापिठ प्रकल्प स्पर्धा या सारख्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी होऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवत आहेत.
विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत प्लेसमेंट साठी आवश्यक गुण जसे कि  मल्टी टास्किंग,संभाषण कला, ऍप्टिट्यूड, सकारात्मक वृत्ती,सॉफ्ट स्किल्स, नेतृत्व गुण, तांत्रिक कौशल्य, सांघिक कौशल्य, आत्मविश्वास ई. विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्दर्शनपर कार्यक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार सातत्याने आयोजित केल्या जातात. त्यात तज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतात. परकीय भाषा वर्ग, स्पोकन इंग्लिश, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन ई. सातत्याने सुरू असते.
तसेच उद्योग जगतात सुरु असलेले बदल अंगीकारण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक माहिती होण्यासाठी तसेच उद्योग जगताची खोलवर माहिती व्हावी यासाठी   विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे आपणकाय शिकत आहोत, त्याचा उद्योग जगतात काय उपयोग आहे तसेच अजून काय करायला हवं याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने कंपन्यांमध्ये उच्च पदावर नियुक्त होत आहेत.
प्लेसमेंट साठी महाविद्यालयात अनेक कंपन्या येतात आणि विद्यार्थ्यांची निवड करतात. महाविद्यालयाचे प्लेसमेंट उत्कृष्ट असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. उद्योजक कसं व्हावं यावरही  मार्गदर्शन केलं जाते. त्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष आहे.
संशोधांनाला वाव देण्यासाठी अद्ययावत संशोधन केंद्र स्वतंत्र इमारतीत असून विद्यार्थ्यांसाठी नेहमी पलब्ध आहे. वेळोवेळी मार्गदर्शन तसेच स्टार्ट अपसाठी विद्यार्थ्यांना सहाय्य या केंद्रामार्फत केले जाते.

अभियांत्रिकी शिक्षणात क्षेत्रात श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेतुन उत्तीर्ण झालेले हजारो विद्यार्थी जगातील मोठ-मोठ्या नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. औद्योगिक क्षेत्राचीगरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून प्रशिक्षण सातत्याने आयोजित केले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अभ्यासपुर्ण विद्यार्थी घडविण्याचेकाम तज्ञ प्राध्यापक करीत आहे. महाविद्यालयात कुशल, अनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच पी.एच.डी धारक प्राध्यापक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
महाविद्यालयाचे कित्येक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये देश-परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो. त्यात देश-परदेशात असलेले माजी विद्यार्थी सहभागी होतात आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाविद्यालय आणि पालक  यांची महत्त्वाची भूमिका असते.  त्यासाठी दरवर्षी पालक मेळावा आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना   सांगितली जाते. आदरयुक्त शिस्त, विद्यार्थ्याकडे दिलेजाणारे वैयक्तिक लक्ष, वसतिगृहातील शिस्त, रात्र अभ्यासिका, संशोधनाचे वातावरण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सर्व सोयी-सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
संगणकीकृत ग्रंथालय, वाचनालय, अद्ययावत प्रयोग शाळा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसोबत सामंजस्य करार, इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा साहित्य सुविधासहित खेळाची विस्तीर्ण मैदाने, अद्ययावत जिम, इंटरनेट आणिइंट्रानेट  सुविधा, सुसज्ज इमारती, नजरेत भरणारी स्वच्छता, वेगवेगळ्या प्रजातींची प्रचंड वृक्षसंपदा इ. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांची पहिली पसंती  असते.  त्याचा परिणाम म्हणजे दरवर्षी महाविद्यालयात १००टक्के प्रवेश होतात.


वाचन संस्कृती वाढावी तसेच तिचे योग्य रीतीने संवर्धन व्हावे यासाठी ग्रंथसंचय तसेच ग्रंथ प्रदर्शन या माध्यमातून संत श्री गुलाबराव महाराज ग्रंथालयात पुस्तके, मासिके, नियतकालिके, अभ्यासोपयोगी जर्नल्स तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारितऑडीओ-व्हिज्युअल कॅसेटस् व सीडीज् च्या  माध्यमातून ही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. ऐंशी हजारहून  अधिक पुस्तके, शेकडो संदर्भ साहित्य, विविध शैक्षणिक विषयांना वाहिलेली अभ्यासपूर्ण मासिके यांनी परिपूर्ण असलेल्या याग्रंथालयाद्वारे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वाचन साहित्यासोबतच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारे अभ्यासपूर्ण व संस्कारक्षम धार्मिक ग्रंथही उपलब्ध केले जातात. या ग्रंथालयात बहुमजली दालन असून एकाच वेळेस ५०० हून अधिक विद्यार्थीं त्याचा लाभघेऊ शकतात. इंटरनेट सेवा, बुक बँक सेवा, डिजिटल लायब्ररी सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
 श्रीं‘च्या प्रेरणेने साकारलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयास उच्च दर्जाची सांस्कृतिक व धार्मिक बैठक लाभली आहे. हे शैक्षणिक संकुल ‘साक्षात सरस्वतीदेवीचे मंदिर‘ आहे असे अत्युच्च ध्येय समोर ठेवून उभारण्यात आलेल्या यामहाविद्यालयाच्या आवारातील सर्व इमारतींना संतसत्पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. भारतातील आध्यात्मिक श्रेष्ठता दर्शविणाऱ्या विविध संतांचे पुतळे येथे आपणांस पाहावयास मिळतात. या शैक्षणिक संकुलात संत ज्ञानेश्वर वसतिगृह, संत कबिरव संत गुरूनानक वसतिगृह, स्वामी विवेकानंद वसतिगृह, आद्य शंकराचार्य वसतिगृह ही मुलांची वसतिगृहे आणि संत मुक्ताबाई, संत जनाबाई  व संत मीराबाई ही मुलींची वसतिगृहे उभारली आहेत. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी वसतिगृहात राहतात. सर्व वसतिगृहांमध्ये वाय-फाय, प्रार्थना कक्ष, मेस सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयास भलामोठा कॅम्पस लाभला असून सर्वत्र हिरवळ आहे. परिसरात कॅन्टीन, पार्किंग, स्वयंचलित वीज यंत्रणा, दवाखाना, ए. टी. एम., अतिथी गृह, 1200 आसन क्षमतेच अद्ययावत सभागृह, 250 आसन क्षमतेचा हाय टेक सेमिनार हॉल, झेरॉक्स, स्टाफ क्वॉर्टर्स, सोलर प्रोजेक्ट, नर्सरी व प्लॅन्टेशन युनिट अशा विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. हया व्यतिरिक्त शैक्षणिक चर्चासत्रे, रक्तदान शिबिर, योगा शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर,ध्यानधारणा वर्गांमार्फत विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव दिला जातो. अध्यात्म आणि विज्ञान याची योग्यरीतीने सांगड घालून मानवी मूल्ये जपली जात आहे. 1983 पासून सुरू झालेला महाविद्यालयाचा प्रवास म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा परिपाक. महाविद्यालयचं व्यवस्थापन सर्वत्र नावाजल गेलय.   “सर्वे भवंतू सुखिना” हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे.
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Thursday, August 15, 2019

असंच काहीतरी-४


आज १५ ऑगस्ट ...स्वातंत्र्य दिन. खरं बोलायचं तर सुट्टी. कारण देशभक्ती वगैरे ह्या बोलायच्या गोष्टी झाल्या. हे कळून चुकलंय. नाहीतरी कित्येक भारतियांची देशभक्ती फक्त वर्षातले दोन-चार दिवस सोडून दिसत नाही. आपण ही त्यातलेच. जाऊ द्या.
तर मूळ मुद्द्यावर येऊ. १५ ऑगस्ट अन रक्षाबंधन. एकाच दिवशी. घरी एकटाच असल्याने काय करावं हे सुचेना. त्यातच माझं लक्ष पुस्तकांच्या कपाटाकडे गेल. गेले कित्येक दिवस झालेत पुस्तकांना हात लागला नाही. पुस्तकही कदाचित माझी वाट पाहत असतील. मग काय पुस्तकांची स्वच्छता करावी असं ठरलं. सगळी पुस्तके बाहेर काढली आणि एक-एक चाळण सुरु झालं. आपल्याकडे एवढी सारी पुस्तके झाली याचा मला गंध ही नव्हता.
पुस्तक...माझ्यासाठी म्हणजे शाळेतून घेणे आणि शेवटी वापस देणे. एवढंच. जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दहावी पर्यंत अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायला मिळत होती. ती फक्त घ्यायची आणि रोज दप्तरात घेऊन जायचं. एवढंच काय ते. कारण प्रशोत्तारांसाठी नवनित होतंच की. त्यामुळे ती पुस्तके फक्त घ्यायची नसतात तर वाचायची पण असतात हे कुणी सांगितलं नाही आणि कळण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. थोडक्यात काय तर पहिली ते दहावी म्हणजे घोकंपट्टी....नवनित ची पारायणं. तेच आमच्यासाठी वाचन. कुणी विचारलं वाचन करतोस का? तर उत्तर असायचं , हो, दररोज. त्यांना कुठं माहिती होतं.  तेच-तेच पुन्हा पुन्हा वाचलं की लक्षात राहते. त्यासाठी वाचन.
वाचाल तर वाचाल वगैरे कधी समजलं नाही. वाचन कशासाठी आणि का? सारं अलाहिदा.
२००३ मध्ये एम. जे. कॉलेज च्या होस्टेल असताना आमचे काही मित्र ग्रंथालयातून पुस्तके आणायची. रूम मध्ये बर्याचदा त्याचं वाचन सुरु असायचं. अभ्यास सोडून हे काय सुरु आहे त्याचं असंही वाटायचं. पण मी त्यांना कधी विचारलं नाही आणि त्यांनीही कधी सांगितलं नाही. एकदा रूम मध्ये कुणीच नसताना एक पुस्तक नजरेस पडलं. माधुरी शानभाग याचं “स्वप्नाकडून सत्याकडे”. कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित. छोटं असल्याने मी ते वाचायला सुरुवात केली. उत्सुकता वाढत गेली त्यामुळे ते पुस्तक संपल्याशिवाय ते मी खाली ठेवलं नाही. छान वाटलं. आयुष्यात पहिल्यांदा कुठलंतरी पुस्तक वाचून झालं. पुस्तके वाचण्यालायक असतात. काहीतरी असते त्यात. एवढं मात्र समजलं. अधून-मधून एखादं-दुसरं वाचायचा प्रयत्न सुरु झाला. ययाती, युगंधर, मृत्युंजय सारखी पुस्तके दिसली की त्यांचा आकार पाहून त्यांना हात लावायची हिम्मत झाली नाही. पण कुठंतरी सकारात्मक घडत होतं. अधून-मधून एखाद दुसर पुस्तक वाचनात येत होतं. पण पाहिजे तेवढी गती काही येईना.
पुढे पुण्यात गेल्यानंतर नेट- सेट मध्ये गुंतलो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त वाचन जेमतेम. नाही म्हटलं तरी चालेल. त्यात भर पडली ती इंग्रजी पुस्तकांची. जळगावात मराठी पुस्तकांबद्दल चर्चा ऐकल्यात. पुण्यात मात्र ते चेतन भगत, रश्मी बन्सल  अश्या कित्येक इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांची नाव कानावर पडायला लागली.  काही विद्यार्थी पुस्तके हातात घेऊन फिरायची. शेक्सपिअर, चार्लेस डीकेंस, जेन ऑस्टेन, टोनी मोरीसन, ओर्वेल, हेमिंग्वे, एच.जि. वेल्स, बेकेट, एमिली ब्रोनटे, डिकिन्सन अशी कित्येक लेखकांची नाव ऐकिवात आली. पुणे विद्यापिठ म्हटलं की माझ्यासमोर एखादं मॉल समोर येते. सगळे प्रकार उपलब्ध. राजकारण, समाजकारण, साहित्य अश्या अनेक विषयांवर लिखाण झालेली पुस्तके चर्चेत येत. कॅन्टीन ला बसून चर्चा ही ऐकील्यात. कधी कधी वाचायची उत्सुकता ही निर्माण झाली. पण वाचन काही झालं नाही.
इथे मराठी वाचनाचे वांधे. त्यात आता हे इंग्रजी. जे सुरु होतं ते कळत नव्हतं त्यामुळे त्या वाटेला जायला नको. थोडक्यात काय तर गरजेपुरते वाचन.
दोन-तीन वर्षानंतर एका दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चेतन भगत ठरवून वाचून काढला. त्यात विशेष काही नव्हतं. विद्यार्थी का वाचतात ते मात्र समजलं.  २००-२५० पानांमधून ४-५ पाने काढली की शून्य. त्या चार-पाच पानांसाठी दिवस-रात्र ते पुस्तके वाचणारे ही सापडलेत. कुणी काय वाचावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. असंही तारुण्यात चालायचं. मुळात त्या पुस्तकांचा वाचकवर्ग बहुतांशी तरुण.
माझा एक मित्र. चांगला वाचक. पुस्तके विकत घ्यायचा पण फक्त मुलींना द्यायचा. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मुलींना पुस्तके ही भेट द्यायचा कधी कधी. मला मात्र आजगायत त्याने पुस्तक दिलं नाही कित्येकदा मागून पण. कित्येकदा आम्ही चर्चा करतो पुस्तकांबद्दल. नवीन पुस्तके खरीदी केली की लगेच फोटो ची देवाण-घेवाण.  अजून एक मित्र. मी पुण्यात असताना त्याने मला पुस्तक पाठवलं न सांगता. सहवास व्यक्तीला घडवतो. माझ्या वाचनाची सुरुवात ला तेच कारणीभूत.

पुढे जॉब सु-रु केल्यानंतर पुस्तकांची खरेदी सुरु केली.  ई-कॉमर्स चा उदय झाला होता. घरपोच पुस्तकं मिळायला लागली होती. अमेझॉन, फ्लिपकार्त, बुकगंगा सारख्या अनेक साईट उपलब्ध असल्याने विकत घेणे सोपे झाले. पुस्तके विकत घेण्याचा छंद लागला तो कायमचा. दरमहा एक-दोन पुस्तके विकत घेणे सुरु झालं.  ठेवायची कुठं असं प्रश्न निर्माण झाल्याने बुक शेल्फ घरात आलं.
पाहता-पाहता अच्युत गोडबोले, सदानंद देशमुख, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, उत्तम कांबळे, विश्वास पाटील, भालचंद्र  नेमाडे, रणजीत देसाई, आनंद यादव, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, व. पु. काळे, रणजीत देसाई अश्या अनेक मराठी लेखकांची पुस्तके तर इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या रश्मी बन्सल, चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता,अमिश त्रिपाठी, हेलेन किलर लेखकांची पुस्तके वाचनात आली. याशिवाय काही चरित्रे, आत्मचरित्रे, दलित साहित्य वाचनात आलं. दलित साहित्य वाचताना येणारी अस्वस्थता शब्दात सांगताच येत नाही. मराठी साहित्य इंग्रजी साहित्याच्या तुलनेत कुठेच कमी नाही हे ही जाणवलं. उगाच त्या इंग्रजी साहित्याचा बागुलबुवा का? असा प्रश्न नेहमी पडतो.
पुस्तक वाचायचं तर ते स्वतःच असावं या मताचा असल्याने कधी कुणाकडून पुस्तक घेतलं नाही. विकत घेण्याची ऐपत नव्हती. सहजासहजी दुसर्यांना देत पण नाही. द्यायला हवी. वाचन-संस्कृती वाढली पाहिजे. तसा प्रयत्न केला पण वाचायला दिलेली २०-२५ पुस्तके वापस आलीच नाहीत. अन वापस आलेली वाईट अवस्थेत होती.
पूर्वी ट्रेन ने प्रवास करताना पुस्तके वाचताना काही लोकं दिसायची. आता पुस्तकांची जागा मोबाईल ने घेतली आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. आपणही त्यास जबाबदार आहोतच त्यासाठी.
सुरुवातीला वाचन व्हायचं बर्यापैकी. आता खंड पडायला लागलाय. अधून-मधून वेळ मिळाला तर एखादं पुस्तक हाती घेतलं जाते.
रोज ठरवतो की आज काहीतरी वाचायचं. पण प्रत्यक्षात फार कमी वेळा येते.
तरी पुन्हा कधीतरी वाचनास सुरुवात होईल या आशेवर पुस्तके विकत घेणे सुरु आहे.
                                                                                                                                          सचिन भगत