Thursday, August 15, 2019

असंच काहीतरी-४


आज १५ ऑगस्ट ...स्वातंत्र्य दिन. खरं बोलायचं तर सुट्टी. कारण देशभक्ती वगैरे ह्या बोलायच्या गोष्टी झाल्या. हे कळून चुकलंय. नाहीतरी कित्येक भारतियांची देशभक्ती फक्त वर्षातले दोन-चार दिवस सोडून दिसत नाही. आपण ही त्यातलेच. जाऊ द्या.
तर मूळ मुद्द्यावर येऊ. १५ ऑगस्ट अन रक्षाबंधन. एकाच दिवशी. घरी एकटाच असल्याने काय करावं हे सुचेना. त्यातच माझं लक्ष पुस्तकांच्या कपाटाकडे गेल. गेले कित्येक दिवस झालेत पुस्तकांना हात लागला नाही. पुस्तकही कदाचित माझी वाट पाहत असतील. मग काय पुस्तकांची स्वच्छता करावी असं ठरलं. सगळी पुस्तके बाहेर काढली आणि एक-एक चाळण सुरु झालं. आपल्याकडे एवढी सारी पुस्तके झाली याचा मला गंध ही नव्हता.
पुस्तक...माझ्यासाठी म्हणजे शाळेतून घेणे आणि शेवटी वापस देणे. एवढंच. जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दहावी पर्यंत अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायला मिळत होती. ती फक्त घ्यायची आणि रोज दप्तरात घेऊन जायचं. एवढंच काय ते. कारण प्रशोत्तारांसाठी नवनित होतंच की. त्यामुळे ती पुस्तके फक्त घ्यायची नसतात तर वाचायची पण असतात हे कुणी सांगितलं नाही आणि कळण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. थोडक्यात काय तर पहिली ते दहावी म्हणजे घोकंपट्टी....नवनित ची पारायणं. तेच आमच्यासाठी वाचन. कुणी विचारलं वाचन करतोस का? तर उत्तर असायचं , हो, दररोज. त्यांना कुठं माहिती होतं.  तेच-तेच पुन्हा पुन्हा वाचलं की लक्षात राहते. त्यासाठी वाचन.
वाचाल तर वाचाल वगैरे कधी समजलं नाही. वाचन कशासाठी आणि का? सारं अलाहिदा.
२००३ मध्ये एम. जे. कॉलेज च्या होस्टेल असताना आमचे काही मित्र ग्रंथालयातून पुस्तके आणायची. रूम मध्ये बर्याचदा त्याचं वाचन सुरु असायचं. अभ्यास सोडून हे काय सुरु आहे त्याचं असंही वाटायचं. पण मी त्यांना कधी विचारलं नाही आणि त्यांनीही कधी सांगितलं नाही. एकदा रूम मध्ये कुणीच नसताना एक पुस्तक नजरेस पडलं. माधुरी शानभाग याचं “स्वप्नाकडून सत्याकडे”. कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित. छोटं असल्याने मी ते वाचायला सुरुवात केली. उत्सुकता वाढत गेली त्यामुळे ते पुस्तक संपल्याशिवाय ते मी खाली ठेवलं नाही. छान वाटलं. आयुष्यात पहिल्यांदा कुठलंतरी पुस्तक वाचून झालं. पुस्तके वाचण्यालायक असतात. काहीतरी असते त्यात. एवढं मात्र समजलं. अधून-मधून एखादं-दुसरं वाचायचा प्रयत्न सुरु झाला. ययाती, युगंधर, मृत्युंजय सारखी पुस्तके दिसली की त्यांचा आकार पाहून त्यांना हात लावायची हिम्मत झाली नाही. पण कुठंतरी सकारात्मक घडत होतं. अधून-मधून एखाद दुसर पुस्तक वाचनात येत होतं. पण पाहिजे तेवढी गती काही येईना.
पुढे पुण्यात गेल्यानंतर नेट- सेट मध्ये गुंतलो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त वाचन जेमतेम. नाही म्हटलं तरी चालेल. त्यात भर पडली ती इंग्रजी पुस्तकांची. जळगावात मराठी पुस्तकांबद्दल चर्चा ऐकल्यात. पुण्यात मात्र ते चेतन भगत, रश्मी बन्सल  अश्या कित्येक इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांची नाव कानावर पडायला लागली.  काही विद्यार्थी पुस्तके हातात घेऊन फिरायची. शेक्सपिअर, चार्लेस डीकेंस, जेन ऑस्टेन, टोनी मोरीसन, ओर्वेल, हेमिंग्वे, एच.जि. वेल्स, बेकेट, एमिली ब्रोनटे, डिकिन्सन अशी कित्येक लेखकांची नाव ऐकिवात आली. पुणे विद्यापिठ म्हटलं की माझ्यासमोर एखादं मॉल समोर येते. सगळे प्रकार उपलब्ध. राजकारण, समाजकारण, साहित्य अश्या अनेक विषयांवर लिखाण झालेली पुस्तके चर्चेत येत. कॅन्टीन ला बसून चर्चा ही ऐकील्यात. कधी कधी वाचायची उत्सुकता ही निर्माण झाली. पण वाचन काही झालं नाही.
इथे मराठी वाचनाचे वांधे. त्यात आता हे इंग्रजी. जे सुरु होतं ते कळत नव्हतं त्यामुळे त्या वाटेला जायला नको. थोडक्यात काय तर गरजेपुरते वाचन.
दोन-तीन वर्षानंतर एका दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चेतन भगत ठरवून वाचून काढला. त्यात विशेष काही नव्हतं. विद्यार्थी का वाचतात ते मात्र समजलं.  २००-२५० पानांमधून ४-५ पाने काढली की शून्य. त्या चार-पाच पानांसाठी दिवस-रात्र ते पुस्तके वाचणारे ही सापडलेत. कुणी काय वाचावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. असंही तारुण्यात चालायचं. मुळात त्या पुस्तकांचा वाचकवर्ग बहुतांशी तरुण.
माझा एक मित्र. चांगला वाचक. पुस्तके विकत घ्यायचा पण फक्त मुलींना द्यायचा. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मुलींना पुस्तके ही भेट द्यायचा कधी कधी. मला मात्र आजगायत त्याने पुस्तक दिलं नाही कित्येकदा मागून पण. कित्येकदा आम्ही चर्चा करतो पुस्तकांबद्दल. नवीन पुस्तके खरीदी केली की लगेच फोटो ची देवाण-घेवाण.  अजून एक मित्र. मी पुण्यात असताना त्याने मला पुस्तक पाठवलं न सांगता. सहवास व्यक्तीला घडवतो. माझ्या वाचनाची सुरुवात ला तेच कारणीभूत.

पुढे जॉब सु-रु केल्यानंतर पुस्तकांची खरेदी सुरु केली.  ई-कॉमर्स चा उदय झाला होता. घरपोच पुस्तकं मिळायला लागली होती. अमेझॉन, फ्लिपकार्त, बुकगंगा सारख्या अनेक साईट उपलब्ध असल्याने विकत घेणे सोपे झाले. पुस्तके विकत घेण्याचा छंद लागला तो कायमचा. दरमहा एक-दोन पुस्तके विकत घेणे सुरु झालं.  ठेवायची कुठं असं प्रश्न निर्माण झाल्याने बुक शेल्फ घरात आलं.
पाहता-पाहता अच्युत गोडबोले, सदानंद देशमुख, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, उत्तम कांबळे, विश्वास पाटील, भालचंद्र  नेमाडे, रणजीत देसाई, आनंद यादव, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, व. पु. काळे, रणजीत देसाई अश्या अनेक मराठी लेखकांची पुस्तके तर इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या रश्मी बन्सल, चेतन भगत, सुदीप नगरकर, दुर्जोय दत्ता,अमिश त्रिपाठी, हेलेन किलर लेखकांची पुस्तके वाचनात आली. याशिवाय काही चरित्रे, आत्मचरित्रे, दलित साहित्य वाचनात आलं. दलित साहित्य वाचताना येणारी अस्वस्थता शब्दात सांगताच येत नाही. मराठी साहित्य इंग्रजी साहित्याच्या तुलनेत कुठेच कमी नाही हे ही जाणवलं. उगाच त्या इंग्रजी साहित्याचा बागुलबुवा का? असा प्रश्न नेहमी पडतो.
पुस्तक वाचायचं तर ते स्वतःच असावं या मताचा असल्याने कधी कुणाकडून पुस्तक घेतलं नाही. विकत घेण्याची ऐपत नव्हती. सहजासहजी दुसर्यांना देत पण नाही. द्यायला हवी. वाचन-संस्कृती वाढली पाहिजे. तसा प्रयत्न केला पण वाचायला दिलेली २०-२५ पुस्तके वापस आलीच नाहीत. अन वापस आलेली वाईट अवस्थेत होती.
पूर्वी ट्रेन ने प्रवास करताना पुस्तके वाचताना काही लोकं दिसायची. आता पुस्तकांची जागा मोबाईल ने घेतली आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. आपणही त्यास जबाबदार आहोतच त्यासाठी.
सुरुवातीला वाचन व्हायचं बर्यापैकी. आता खंड पडायला लागलाय. अधून-मधून वेळ मिळाला तर एखादं पुस्तक हाती घेतलं जाते.
रोज ठरवतो की आज काहीतरी वाचायचं. पण प्रत्यक्षात फार कमी वेळा येते.
तरी पुन्हा कधीतरी वाचनास सुरुवात होईल या आशेवर पुस्तके विकत घेणे सुरु आहे.
                                                                                                                                          सचिन भगत

No comments:

Post a Comment