Tuesday, May 12, 2020

#आनंदी_क्षण

परिवर्तन...आनंद...क्षण. परिवर्तन हे निरंतर तर आनंद अथवा क्षण अल्पजिवी. परिवर्तन होताना यांची गाठभेट होतच राहते. या मार्गक्रमणात आनंदाच्या व्याख्या हि बदलत जातात.  त्या परिवर्तनाने कित्येक आनंदाचे क्षण ही लुप्त होऊन जातात. वर्तमानात आनंद या शब्दात ते क्षण बसत नाही. कारण काही असो. जीवनाचा फोलपणा असो...स्वतःची ओळख असो...उमगलेला जीवनाचा अर्थ असो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बदलत जातो...आपल्या संकल्पना बदलत जातात...जीवनाचा अर्थ बदलत जातो. मुळात आपण जगतो ते आनंदाच्या क्षणांसाठी. सारी धडपड हि त्याच्यासाठी. ते क्षण येतात आणि काही कळण्याच्या आत निघून जातात. पुन्हा आपला प्रवास ते मिळवण्यासाठी.

परिवर्तन जळगाव यांच्या जीवनातील 'आठवणीतील आनंदाचे क्षण' या उपक्रमात मनोज ने लिहायला भाग पाडलं. हे लिखाण मला कित्येक वर्षे मागे घेऊन गेलं. ज्या वर्षांचा मागमूस ही नव्हता त्यात पुन्हा गेलो. विस्मृतीत गेलं होतं सगळं. जशास तसं आठवत नाही. ज्या काही पुसटश्या आठवणी आहेत त्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न.

आनंदाचे क्षण:

एक-    

२०००-२००१ चा काळ. उदारीकरण सुरु होऊन दशक उलटत होतं. त्याचा परिणाम सगळीकडे जाणवत होता. शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नव्हतं. सिंदखेड च्या बस स्टॉप वर बसलो होतो. वाट पाहणं सुरु होतं. तास दोन तास बसलो असेल. त्याला कारण ही तसंच होतं. तो निकालाचा दिवस होता. उत्सुकता होती. शिक्षण जीवन बदलू शकते हे समजण्याचा तो काळ. ती आशा कुणाला नसणार. मी त्याला अपवाद कसा ठरेल. त्या साली मी दहावीला होतो. इंटरनेट ग्रामीण भागात पोचायचं होतं.  डिजिटल क्रांती व्हायची होती. दहावी म्हणजे त्यावेळी तो महत्त्वाचा टप्पा. त्यावर पुढे काय करणार हे ठरवायचं. किती गुण मिळवले यावर गुणवत्ता ठरवली जायची. मुळात परीक्षेत मिळणारे गुण आणि गुणवत्ता याचा तिळमात्र सबंध नाही हे समजायला पुढे अनेक वर्षे गेली. असो. ज्या शाळेत मी शिकत होतो ती नवीन स्थापन झालेली. नॉन-ग्रांट. बिन-पगारी शिक्षक. शाळेच्या इमारती व्हायच्या होत्या. पत्र टाकून सप वापरून वर्ग तयार केलेले.  त्या शाळेसारखं आमचं होतं. वर्तमानात काहीच नव्हतं. फक्त सुवर्ण भविष्याचं स्वप्न. असं असताना सुद्धा शैक्षणिक वातावरण चांगलं होतं. स्पर्धा होती...शिक्षकांची शिकविण्याची तळमळ होती. त्या तालमीत आम्ही तयार होत होतो. एका बस मधून सर उतरले आणि मी त्यांच्या मागे धावत गेलो. सर निकाल काय आहे?

सर खुश होते. पहिला आहेस तू. ८२ टक्के. इंग्रजीत ८९ मार्क्स. ते ऐकलं. तेव्हा झालेला आनंद पराकोटीचा. तो पहिला क्षण जेव्हा स्वतःबद्दल काहीतरी करू शकतो याचा आत्मविश्वास दिला. स्व ची जाणिव म्हणता येईल. त्यावेळेस हे खूप मार्क्स झालेत. आता असणारी मार्कांची खैरात त्या वेळी नव्हती. पुढे त्या इंग्रजी विषयाने मला तारलं. पदवी आणि पदव्युत्तर त्यातच.

त्या शाळेत अजूनही बोर्डवर नाव आहे माझं. पहिला असल्याने एक चांदीचा शिक्का बक्षीस म्हणून मिळालेला. तो टिकवता आला नाही तो भाग वेगळा. ते यश तसं एकट्याच नव्हतंच. त्यामागे शिक्षकांची मेहनत होती. दांडगे सर याचं इंग्रजी शिकवण, वाघ सर याचं गणित अजूनही स्मरणात आहे. त्या लोकांनी आम्हाला घडवल. न घडण्याचे हजार गुण होते आमच्यात. त्यामुळे त्यांच्या समोरील आव्हानांची कल्पना येईल . दगडांना पैलू पाडण्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. स्वप्न पेरली त्यांनी आमच्या आयुष्यात. सगळीकडे उजाड रान असताना हिरवळीची स्वप्ने दाखवली. आयुष्यात जे काही करता आलं त्याची सुरुवात त्या शाळेत.

प्रचंड आनंद देणारा तो क्षण. तेवढे गुण पुन्हा कधी मिळाले नाहीत आयुष्यात.

आता शाळा बदलली आहे. सिमेंट च्या भिंती झाल्यात. पुष्कळ झाडे लावण्यात आली त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली.

 

दोन-

आयुष्यात प्रत्येक गोष्टी ठरवून होत नाही. तसंच ठरवून मित्र हि होत नाही. तसच काहीतरी आमच्यात.  मुकेश मला पहिल्यांदा भेटला तो १९९८ साली. आठव्या वर्गात. फक्त एक वर्ष कारण नंतर शाळा बदलली मी. मित्र वगैरे म्हणता येणार नाही त्यावेळेस. पण वर्ग मित्र. अनोळखी...वर्गमित्र...मित्र आणि सर्वकाही असा तो प्रवास. मनोज भेटला त्या एम.जे. च्या होस्टेल ला २००४ साली. आणि मग सान्निध्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंददायी. नाना तर्हेचे उद्योग केलेत...भटकंती असो...खेचाखेची असो...चित्रपट असो... हॉटेलिंग असो की एका डब्यात दोन ची कसरत.  व्यक्त करता येणाऱ्या आणि व्यक्त न करता येणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. यांच्या सान्निध्यात आनंदाची परिभाषा बदलली. आपलं आयुष्य हे आपलं नसतेच. आसपास अनेक लोकं आपल्यावर प्रभाव टाकत असतात. माझं लिखाण, वाचन ही त्यांची देण, त्यांचा प्रभाव. सहवासाने माणूस घडतो तसा तो प्रकार. माझ्या चाकोरीबद्ध आयुष्याला यांनी यु टर्न दिला. वेळ-प्रसंगी आधार दिला. मला बदलायला भाग पाडलं बहुतांशी. ते माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित प्रवास कठीण झाला असता. अनेक वाद-विवाद, विचारांची  भिन्नता असूनही सोबत कायम राहिली. असं कुठलंही क्षेत्र नसेल ज्यावर चर्चा होत नसेल. पुढे मी आणि मुकेश पुण्यात कित्येक वर्ष सोबत होतो. गमती-जमती, चांगले-वाईट प्रसंग आम्ही पाहिलेत, अनुभवलेत. रोज कमीत कमी एक फोन ठरलेला असतो त्याचा. आम्ही जेव्हा ही भेटतो तेव्हा आम्हाला एकांत हवा असतो गप्पा मारण्यासाठी.

तीन-

पदवी संपली होती. नेट-सेट हे उद्दिष्ट होतं. पुढे पुण्यात विद्यापीठात जायचं तर प्रवेश परीक्षा होती. इतर विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी फक्त सहा जागा त्या तीन ओपन तर तीन राखीव. ऐकीव माहितीवरून प्रवेश मिळणे दुरापास्तच. जळगाव सोडणं कठीण होतं. अर्ज भरून ही परीक्षेला जायची इच्छा नव्हती. त्यावेळी मनोज म्हटला तू नाही गेलास तर लोकं म्हणतील लायकी नव्हती, त्यापेक्षा पास हो आणि जाऊ नको. जगाला ताठ मानेने सांगता येईल. मी २३ एप्रिल ला प्रवेश परीक्षा दिली. तो पुण्यात जाण्याचा पहिला प्रसंग. जनरल मध्ये प्रवास करणं म्हणजे हाल च. ते अनुभवलं. २००-२५०  विद्यार्थी आणि जागा फक्त सहा. आठ-दहा दिवसा-नंतर विद्यापीठात फोन केला. शेख madam होत्या तेव्हा. तुझा नंबर लागला. लवकर येऊन प्रवेश घे. पण माझा काही विश्वास बसेना. अजून दोन वेळा फोन केला. ती बाई कंटाळली आणि म्हटली आता जर तुझा फोन आला तर प्रवेश रद्द करून टाकते.  हा टर्निंग पोइंट. बिफोर आणि आफ्टर...आयुष्याचे दोन भाग...पुण्यात जायच्या पूर्वी आणि पुण्यात गेलानंतर ...प्रचंड दरी आहे. मी ...फक्त मी न राहता वेगळा काहीतरी झालो.  आयुष्य बदललं...जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला...यश-अपयश हे फक्त शब्द न राहता   यशाला अनेक हाथ आहेत, अपयशाला कुणीच वाली नाही हे कळून चुकलं. व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याला अर्थ नाही. समाज फक्त यशस्वी लोकांचे गुणगान करतो...ऐकतो...अपयशी लोकांना या समाज व्यवस्थेत स्थान नाही. हि जाणिव त्या विद्यापीठात झाली. म्हणून तिथला प्रवेश गेम-चेंजर. आनंद देणारा क्षण. (एम. ए. झाल्यावर  एम.फिल , वृत्त पदविका वगैरे. विद्यापीठात वसतिगृह तीन आणि पाच चा मुक्काम, रात्री-बेरात्री भटकंती...पुण्याचा आसपास गड-किल्ले यांच्या वार्या.  काही ठराविक व्यक्तींसोबत पालथा घातलेला फर्गुसन रोड, टोकीज, हॉटेल्स, ओपन कॅन्टीन, ओल्ड कॅन्टीन, आदर्श कॅन्टीन चे ते क्षण, पैसे नसताना खिचडी बनवून खाण्याचा आनंद इत्यादी.)

*श्रीमंत भाई, चोथवे सर,मिश्रा सर, बालाजी सूर्यवंशी, नामदेव पवार, सुनील कणकटे, तानाजी, राहुल राजपूत यांच्या सोबत घालवलेले क्षण...

चार- :

नेट परीक्षे बाबतीत जे कित्येकांचं झालं तोच संघर्ष...त्रास माझ्याही वाटेला आला. कितीही प्रयत्न करून असफल. जवळ जाऊन हुलकावणी अनेकदा. ओपन मधून पास व्हायचा किती संघर्ष असतो हे काही वेगळं सांगायला नकोच.  समोरचे प्रश्न वाढत होते...शेक्सपिअर ने म्हटलंय...

When sorrows come, they come not single spies. But in battalions!”(Hamlet)

तसाच काही प्रकार झाला होता. अडचणी वाढत होत्या. पूर्ण वेळ अभ्यास कठीण होता.   त्यामुळे शेवटी पर्याय म्हणून अभियांत्रिकी कडे वळलो. २०१२ च्या नेट परीक्षेची फोर्म भरण्याची जाहिरात आली होती. मला फोर्म भरायचा नव्हता. सोडून दिलं होतं. तेव्हा पंढरपूर ला होतो. फोर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिद्धार्थ काळे या माझ्या ज्युनिअर चा फोन आला. फोर्म भरला का तू? त्यानं विचारलं. मी नाही म्हटलं. त्यानं आग्रह केला. तो म्हटला स्कॅन करून मार्क लिस्ट पाठव, बाकी मी करून घेतो. इच्छा नसताना सुद्धा मी त्याला मार्क लिस्ट पाठवून दिली. डी.डी. वगैरे त्यानेच केलं सगळं. सेट भवन ला जावून फोर्म भरून दिला.

जून च्या शेवटच्या आठवड्यात रविवारी परीक्षा होती. जावं कि जावू नये या द्विधा मनस्थितीत होतो. रात्री बस स्तोप ला गेलो. पंढरपूर वरून चार-पाच तासाचा प्रवास.  पंढरपूर बस-स्थानकावरून सुटणारी साडे-दहा ला असणारी बस निघून गेली होती. त्यानंतर फक्त कर्नाटक वरून येणाऱ्या बसेस असायच्या. पण त्या वेळेस बेळगाव प्रश्नाचं आंदोलन चिघळल होतं त्यामुळे त्या बसेस येणार नव्हत्या. मी रूम वर जायला निघालो. बस स्टॉप च्या बाहेर येत नाही तर रोहिदास ढाकणे या मित्राचा फोन आला. कुठपर्यंत आलात त्यानं विचारलं. मी त्याला परिस्थिती सांगितली. आपण भेटू...तुम्ही या तर खरं. मी पुन्हा बस- स्टॉप ला आलो. रात्री दोन-अडीच वाजता ज्यादा बस सोडण्यात आली पुण्याला जाण्यासाठी. हडपसर ला परीक्षा केंद्र होतं. पहिला...दुसरा पेपर सोडवला. तिसरा पेपर मधील शेवटचे पंचवीस प्रश्न सोडवणे जिवापार झालं. सोडून दिले तसेच आणि बाहेर पडलो. भेटी-गाठी झाल्या आणि पंढरपूर ला परतलो.

निकाल वगैरे ची चिंता नव्हतीच. फेल शिवाय काय होणार...याचा आत्मविश्वास.

जून २०१२ च्या नेट परीक्षेचे दोन निकाल जाहीर झाले होते त्या वेळेस. मी कधीही निकाल पाहिला नव्हता. परीक्षा क्रमांक हि माहित नव्हता. दुसरा निकाल जेव्हा जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी श्रीमंत जाधव या मित्राचा फोन आला. तुझा परीक्षा क्रमांक सांग म्हणे. मला आठवत नव्हता. मी पास होऊ शकत नाही. जाऊ द्या ना. मी म्हटलं. त्यांचा आग्रह एवढा कि मी आठवून आठवून ५०३०००४७ असा क्रमांक सांगितला. तो चुकीचा होता. पुणे सेंटर वरून जेवढे इंग्रजी विषयात पास झाले होते ते सर्व माहित झाले होते. फक्त एक परीक्षा क्रमांक कुणाचा हे समजत नव्हतं. दोन-तीन दिवस गेलेत त्यात. बर्याच जणांचे फोन यायचे. विद्यापीठ विद्यार्थ्यांचा अभ्यास एवढा कि त्यांनी शोध सुरूच ठेवला आणि बी ची सिरीज पर्यंत येऊन ठेपले. श्रीमंत चा अजून एकदा फोन आला. तू नंबर चेक कर पुन्हा ...बी ची सिरीज म्हणजे तूच असशील. शेवटी नाईलाजाने नेट च्या वेबसाईट ला जाऊन लॉग इन केलं (पासवर्ड मिळवता येतो इमेल असला कि....माझा परीक्षा क्रमांक होता...५०३०१७४७). समोर मेसेज दिसला....Congratulations………….अजून बरंच काही लिहिलेलं होतं.

 ज्या गोष्टीचा एवढा पाठलाग केला पण ती दूर पळत होती. जेव्हा पाठलाग सोडून दिला...तेव्हा ती माझ्यापर्यंत.

नेमकं आयुष्यात असंच होतं.  अपेक्षित नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही.

नेट पास झाल्यावर मी पंढरपूर सोडलं. अनेक आठवणी आहेत तिथल्या. न विसरता येण्यासारख्या. तिथली स्वप्ने प्रत्यक्षात आली नाही याची खंत...........................

*पंढरपूर मध्ये माधव सरांशी झालेली ओळख, त्यांच्या सोबत केलेली भटकंती, सोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय.

पाच-

वर्षानुवर्षे पत्र्याच्या घरात राहून उबग आला होता...पावसाळा असला की गळती, हिवाळ्यात कडाक्याची थंडी...घरी असेपर्यंत ते अनुभवलं होतं.. ....त्यामुळे घर कायम मनात घर करून होतं...२०१५ ला स्वतःच घर तयार झालं....स्वतःच झालेलं घर...लग्न....आणि मुलगा....सर्व आनंद देणाऱ्या गोष्टीच. अनेक वर्ष जे स्वप्नात होतं ते प्रत्यक्षात उतरलं हा पेक्षा आनंद नसतोच कुठला. तसंही ते सोपं नव्हतंच...लोन साठी बँकांच्या वार्या...नन्तर हप्ते...ओघाने येणाऱ्या adjustments. मानलं तर त्यात ही आनंदच. जीवन ही एक सर्कस आहे...कसरती कराव्या लागतात. शेक्सपिअर च्या “As You Like It मधील मोनोलॉग ची सुरुवात सर्व काही सांगून जाते...

All the world’s a stage,

And all the men and women merely players;

They have their exits and their entrances;

And one man in his time plays many parts,

His acts being seven ages.

 

आनंदाचे क्षण यावर लिखाण करताना जे जगासमोर मांडता येते तेच लिहिण्याची कुवत... सांगता येणारे अनेक प्रसंग आहेत....परंतु ते सांगता येत नाहीत...समाजात जगताना चौकट ओलांडता येत नाही...त्या आपल्या मर्यादा. म्हणूनच आपण सामान्य. कारण असामान्य लोकांना चौकट हा प्रकार नसतोच. उधळून लावतात ते या सार्या चौकटी आणि मुक्तपणे संचार करतात. जीवनाचा खर्या अर्थाने आनंद घेतात.

आनंदाचे क्षण तसे दुर्मिळ ...पण त्यांचा पाठलाग सुटत नाही...धडपड सतत...ती काही केल्या थांबत नाही. आवक वाढली की गरजा वाढतात तसेच आनंदाच्या संकल्पना ही बदलतात...मग कितीही असलं तरी आपला संघर्ष सुरूच...तो थांबत नाही. ज्या क्षणांनी आनंद दिलाय ते विस्मृतीत गेले. आणि मी नवीन क्षणांच्या शोधात आहे.  नेमकं काय मला कळत नाही.  प्रतिकूलतेत अनुकुलता शोधनं ज्याला जमलं तो कायम आनंदी.

परिवर्तन जळगावचे आभार त्यांनी मला माझ्याच आयुष्याची आनंदाची सफर घडवलीत म्हणून.   ।।

 

धन्यवाद ।।।

परिवर्तनच्या विविध उपक्रमासाठी सबस्क्राईब करा परिवर्तनचं युट्युब चॅनेल

https://www.youtube.comll/channel/UCvmsOWIXxS-lIuzpwRw1JNQ

 

https://www.facebook.com/parivartan.jalgaon/

सचिन भगत

९९२२१२७३८५

Monday, March 30, 2020

फ्लैशबैक (Flashback)


शिक्षण. प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असणारं. जसं-जसं त्याचं महत्त्व कळत गेलं तसा तसा शिक्षणाकडे लोकांचा कल वाढत गेला. ही प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी. काहीना सहज मिळत जाते, काहीना संघर्ष करावा लागतो तर काहींच्या नशिबी ते ही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. यश-अपयश चं चक्र सुरु असते.
पूर्वी दहावी च्या परीक्षेला प्रचंड महत्त्व होतं. दहावीच्या मार्कांवर कुणी कुठं जायचं हे ठरवलं जायचं. कला, विज्ञान आणि वाणिज्य यापैकी कुठल्या शाखेला जायचं ते या मार्कांवर अवलंबून असायचं. कला शाखेला जाणारे बहुतांशी डी.एड. करायचे कारण डी.एड. म्हणजे नोकरी असं समिकरण होतं. आता ते लुप्त झालंय तो भाग वेगळा.
विज्ञान शाखेला जाणारे अभियांत्रिकी किवा मेडिकल कडे जास्त ओढा असणारे. ग्रामीण भागात त्यावेळेस शिक्षणाची दुरावस्था होती. मार्गदर्शन वगैरे काही नाही. २०००--२००१ साली मी दहावी उत्तीर्ण झालो. ८२%. जास्त मार्क्स मिळाले म्हणजे विज्ञान शाखेला जायचं असं होत. माझं ही तसंच झालं. जी मानसिकता आसपास निर्माण झाली होती तिचा प्रभाव माझ्यावर ही.
भुसावळ ला पि. ओ. नाहाटा मध्ये अकरावीला प्रवेश घेतला. विज्ञान शाखेबद्दल काहीच माहित नव्हतं.  कुणी सांगणारं ही नव्हतं. केवळ मार्क्स चांगले म्हणून मी तिकडे गेलो. व्हायचं तेच झालं.
बरं तो काळ म्हणजे खाजगी क्लासेस च्या वाढीचा. त्यामुळे वर्ग ही संकल्पना नव्हतीच. तीन-चार दिवस कॉलेजला गेलो. वेळापत्रक पाहिलं. पण वर्ग मात्र रिकामे. चीट-पाखरू ही नाही. कुणी ओळखीचं नव्हतं. इकडे-तिकडे विचारपूस केली तर समजलं की सर्व मुलांनी बाहेर क्लास लावले आहेत. कॉलेज चे शिक्षक तेथे शिकवायला जातात. जो क्लास लावेल त्याला practical चे मार्क्स ही चांगले. जिथे आमचे शिक्षक शिकवायला जायचे त्या क्लास ला भेट दिली. एका विषयाचे साडे-तीन हजार. ऐपत चं नव्हती. क्लास लावणे ही शक्य नव्हतं.
सकाळी मुलं फक्त practical ला यायची कॉलेजला.
विषयानुसार परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न. बरंच काही विसरलो आहे.
#Mathematics (I & II)
दहावीला असताना त्रिकोणमिती हे प्रकरण मी स्किप केलं होतं. कारण ते sinθ, cosθ, tanθ.कधी डोक्यात गेलंच नाही. त्याचा नाद मी सोडून दिलेला. समजून घेण्याचा कधी प्रयत्न ही केला नाही. एखादं प्रकरण स्किप केलं तर फार काही फरक पडत नाहीच.
विज्ञान शाखेत गेल्यावर सुरुवात Limitation. Derivative आणि Integration पासून. जिकडे पाहावं तिकडे sinθ, cosθ, tanθ. काही कळायला मार्ग नव्हता.
maths चे बारा वाजतील ते कळलं होतंच.  तसं झालंही. खर्या अर्थानं ते कधी समजलंच नाही. बारावी ला असताना एक maths चा क्लास लावला होता. जेव्हा त्या सरांनी फीज मागितली तेव्हा सोडून दिला.
ते vector , matrices, Permutations & combinations, probability असे काही प्रकरणं जमत होते. पण maths कधी आवाक्यात आलं नाही.
एकतर क्लास नाही. स्वतः किती समजेल. सेल्फ-स्टडी च्या पण मर्यादा.

#Physics-
याचे ही हाल तेच. ते thermodynamics, semiconductor, Force, Waves, Oscillations, Surface tension डोक्यात गेलंच नाही. practical च्या वेळेस मी फक्त जाऊन उभा असायचो. ग्रुप मधले इतर जण perform करायचे. मी फक्त copy. ते resonance tube वापरून speed of sound काढा किंवा determine अमुक-तमुक. आवाक्याबाहेर.
#Chemistry(Organic/Inorganic)-
chemistry ची अवस्था maths सारखीच वाईट.  म्हणजे जे maths चं तेच chemistry चं. तो केमिकल लोचा डोक्याबाहेरचा. Alkane, Alkene आणि Alkyne स्वाहा. chemical bond वगैरे पण स्वाहा.
माझा फोकस राहिला तो नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नावर. ती Wurtz Reaction तोंडपाठ. compound चे formulae/Structure असं काहीतरी पाठ करावे लागे. CH3CHO म्हणजे Acetaldehyde, HCHO म्हणजे Formaldehyde. कारण काही समजलंच नाही.
practicals ची अवस्था तिच. बर्याच दा प्रयत्न करून पाहिला पण व्यर्थ. इतर जसे करतात तसं अनुकरण केल्यावर सुद्धा अपेक्षित results मिळाले. नाही.

#Biology (zoology & Botany)-
या विषयाची स्थिती जरा बरी होती त्या diagram सोडून. बर्यापैकी थेरी. Drawing नावाचा प्रकार आयुष्यात कधी आला नाही. जर्नल मध्ये त्या figures /Diagrams कधीच जमल्या नाहीत. मग तिथे मी युक्ती शोधून काढली. मी  इतरांचे जर्नल लिहून देणार त्यांनी माझ्या figures काढून द्याव्यात. ते नाही जमलं तर ट्रेस पेपर घेऊन यायचा. एखाद्याचं जर्नल आणायचं. शाई संपलेल्या पेनाने त्यावर घोटायचं. म्हणजे जर्नल खाली जर्नल अन मध्ये ट्रेस पेपर. असा तो काथ्याकुट. त्या zoology मधील फक्त Amoeba ची आकृती तेवढी येत होती. कारण त्याला ठराविक असा शेप नव्हताच. Botany चे हाल काही वेगळे सांगायला नको.
#English & Marathi:
हे दोन विषय फक्त माझे. तसे ते सर्वांचेच.
अशी परिस्थिती. क्लास नाही. कॉलेजला लेक्चर नावाचा प्रकार नाही.
सेल्फ-स्टडी एकमेव पर्याय. बाजारातून ते Jigar, Reliable सारख्या नोट्स घेऊन यायच्या. समजत तर काहीच नाही. मग घोकंपट्टी हा एकमेव आधार. कसंतरी अकरावी चं वर्ष संपलं. निकाल जेव्हा लागला तेव्हा मिळालेलं टक्के होते ५६. म्हणजे ८२ ते ५६ असा ढासळलेला आलेख. physics, chemistry, maths मध्ये ३५ प्रत्येकी. Biology म्हणजे थेरी असल्याने तिथे जास्त मार्क्स. तेच मराठी आणि इंग्रजी च्या बाबतीत. त्यामुळे ते ५६ टक्के तरी झालेत. सायन्स सोडून आर्ट्स जावं असंही वाटे. पण तसं केलं तर नाचक्की होईल या भितीने ते तसंच सुरु ठेवलं. जर अकरावीत काहीच समजलं नाही तर बारावीत समजण्याचा प्रश्न निर्माण होणारच नव्हता. अकरावी हा बेस.
काय होईल या तणावाखाली बारावीचं वर्ष सुरु होतं. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेआधी सराव परीक्षा व्हायच्या. फेब्रुवारी मध्ये सराव परीक्षा झाली. बोर्डाच्या परीक्षेला दहा-बारा दिवस उरले असतील. सराव परीक्षेमधील प्रगती म्हणजे सर्व विषयात शून्य. Biology, मराठी आणि इंग्रजी विषय वगळता.
काय होणार? मी चिंतेत होतो. पण एका गोष्टीवर विश्वास होता ती म्हणजे घोकंपट्टी. परीक्षेच्या आदल्या दिवशी. गेल्या चार-पाच वर्षाचे पेपर पाहिले. नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नाच्या रट्टा मारायचा. तेच केलं. म्हणजे गणिते पाठ, chemistry च्या Reaction पाठ. एखादी स्टेप विसरून जात होतो पण उत्तर मात्र बरोबर.
असे उद्योग करून कशी-बशी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर सगळ्या नोट्स, पुस्तकं रद्दीत देऊन टाकली. मला त्या आठवणी सुद्धा नको होत्या.  कारण पुढे मला भविष्य दिसतंच नव्हतं त्या शाखेत.
आयुष्यात घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरत नाहीत. मुळात कुठलाही निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतोच. आपण त्याला कसं सामोरे जातो किंवा त्याला कसं सिद्धीस नेतो त्यावर सर्व अवलंबून. निकाल जाहीर झाला तेव्हा ६२ टक्के होते. ते माझे नव्हतेच. फक्त रट्टा मारण्याचा फायदा.
पुढे विज्ञान शाखा सोडून मी कला शाखेकडे वळलो.
या दोन वर्षात तसं बरंच काही समजत होतं. पुढे बर्याचदा वाटलं की विज्ञान शाखा सोडायला नको होती. जमलं असतं हळू-हळू. पण तसं कुणी सांगणारं नव्हतं.
आयुष्यात आपण चुका करत जातो अनावधानाने.  मी विज्ञान शाखेला गेलो ती पहिली चूक आणि दुसरी म्हणजे विज्ञान शाखा सोडली ती.
परिस्थिती नुसार आपण निर्णय घेत जातो. काळाच्या कसोटीवर ते चूक किंवा बरोबर असं आपण मापन करू शकत नाही. तत्कालीन परीस्थीती चं अशी असते की आपण तशी कृती करत जातो. मी असं करायला नको होतं किंवा हे करायला पाहिजे होतं याला काही अर्थ नाही.
निर्णय चुकीचं जरी असला तरी तरी त्याला योग्य करता येतो.
ग्रामीण भागातून शहरी भागात गेल्यावर जी तारांबळ उडते ती अनुभवली. त्यांचा क्लास वेगळा. या दोन वर्षात खूप कमी जणांशी संबंध आला. match नाही होत आपण. कित्येकांना मी ओळखत नाही. practical च्या batch चे काही जण ओळखीचे झाले होते फक्त. आपल्या मनातला inferiority complex कधीच जात नाही. शहरातले विद्यार्थी आपल्याला सामावून घेत नाही आणि आपणही ही कधी त्यांच्यात रुळण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकाची जडणघडण वेगळी. मुलं-मुली एकत्रित गप्पा मारताना पहिल्यांदा पाहिले. आपणही त्या घोळक्याचा भाग असावा असं कित्येकदा वाटलं पण सत्यात कधी उतरलं नाही.
कॉलेजला गेल्यावर वेळ असलाच तर कधी कट्ट्यावर जाऊन फक्त इकडे-तिकडे पाहत राहायचं किंवा कॅन्टीन ला जाऊन फक्त बसायचं आसपास काय चाललंय ते बघत. कित्येकदा त्या तापी नदीच्या किनार्यावर जाऊन बसत होतो. त्या नदीचा प्रवाह पाहत. कितीही अडथळे आले तरी नदी आपला मार्ग तयार करतेच. तसंच काहीतरी आपल्याही आयुष्यात होत असते. मार्ग सापडतो. फक्त ती दृष्टी हवी. धैर्य हवं. अपयश पचविण्याची ताकद हवी.
तर अशी ही दोन वर्षे. म्हटलं तर अनुभव  नाहीतर अपयश.


पोस्ट-स्क्रिप्ट:
शिक्षणाचा बाजार सुरु होण्याचा तो काळ. त्या लाटेत प्रत्येकाने आपले हात धुवून घेतले. पण त्यावर कुणी कधी बोललं नाही. खाजगी क्लासेस चा तो सुकाळ. सरकारची भूमिका तर बघ्याची नेहमी. शिक्षकांनी पगार आणि शिकवणी वर्ग यातून अमाप पैसा कमावला. नंतर शासनाने बंधने आणली पण खूप उशिरा सुचलेल शहाणपण. पण शोषण या लोकांनी केलंय त्याचं काय? आताही आताही परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी फक्त प्रवेशापुरते महाविद्यालयात जातात. क्लास होतंच नाहीत महाविद्यालयात. सगळ्यांचे क्लासेस आहेत दुसरीकडे. अकोला, लातूर, नांदेड, क्वोटा असे हब/ pattern निर्माण झालेत. पैसे कमविण्याचा सोपा मार्ग. तसा शिक्षण हा आपला मुलभूत अधिकार. पण यात घुसखोरी झाली आणि शिक्षण माफिया तयार झालेत. त्यावर कशी बंधने आणावीत? लाखाच्या घरात फीज आहे. एका-एका क्लास ला हजारो विद्यार्थी आहेत. मग महाविद्यालये हवीत तरी कशाला? शासनाने का खर्च करावा? का अनुदान द्यावं? प्रश्न गंभीर आहे. गरीब विद्यार्थ्यांनी शिकावं कसं? त्यांनी हा खर्च कसा पेलावा? स्पर्धेत ही मुलं मागे नाही पडणार तर काय?अजूनही यावर कुणी बोलत नाही. बहुतांशी संस्था राजकारणी लोकांच्या. ते त्यांचे हितसंबंध जोपासणार. पालक ही काय करणार. ऐपत नसतानाही ते मुलांना चांगलं शिक्षण मिळाव म्हणून धडपडत असतात. याचाच फायदा ही लोकं उचलतात. आज ही कित्येक लोकांच्या आवाक्याबाहेर आहे शिक्षण. सामान्य लोकांचा कुणी वाली नाही हे त्रिकालबाधित सत्य.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Tuesday, February 18, 2020

नेमकं ८


शिक्षण...परवलीचा शब्द. काळाच्या ओघात त्याचं महत्त्व सर्वांच्या लक्षात आलंय. त्यामळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत त्याकडे कल प्रचंड वाढलाय. सर्वच स्तरातील लोकं आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यात पुढाकार घेत आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षण म्हटलं शाळा, माध्यम आणि नंतर बोर्ड याची चोईस आहे.
काल एक जण भेटला होता. अनौपचारिक गप्पा करताना म्हटला तुझा मुलगा शाळेत जातो का?
मी म्हटलं, हो, नर्सरीत जातो.
सि.बि.एस.ई. का? तो म्हटला.
नाही...स्टेट बोर्ड. मी सांगितलं.
तो उत्तरला-सि.बि.एस.ई. ला टाकायला पाहिजे होतं ना. त्यांचा syllabus अडव्हांस असतो.
मी म्हटलं फार काही फरक पडत नाही. मी झेड पि ला होतो. पहिली ते चौथी एक शिक्षक होते. जे शिकवलं ते अजूनही आठवते. सि.बि.एस.ई असो का स्टेट बोर्ड काय शिकवलं जाते त्यापेक्षा कसं शिकवलं जातं ते महत्त्वाचे. Board/school doesn’t matter.
मी ऐकू शकत नाही असं दिसल्यावर त्याने तो विषय सोडून दिला. त्याचं काही चूक होतं असं मी म्हणणार नाही कारण सगळीकडे इंग्रजी माध्यम आणि उपलब्ध असेल तर सि.बि.एस.ई. बोर्ड ही  मानसिकता झालीय. त्यांच्या दृष्टीने स्टेट बोर्ड म्हणजे मागासलेलं. त्यामुळे सि.बि.एस.ई. चं पिक जोमात आहे. काही वर्ष चालेल. अजून कुठलं तरी बोर्ड येईल. मग त्याची हवा. आपण त्यात वाहत जातो. अव्वाच्या सव्वा फी भरायला तयार. सि.बि.एस.ई. ची फक्त  नर्सरी ची पुस्तके घेतली तर अडीच-तीन हजाराच्या घरात. असं साधारण चित्र आहे.  बोर्ड कुठलंही असो, शाळा कोणतीही असो. जोपर्यंत आपण काही करत नाही. काहीच होत नाही.
सि.बि.एस.ई. शाळा सर्व खाजगी. तिथे शिकवणारे कसे आहेत याच्या खोलात गेलं तर वास्तव लक्षात येईल. अत्यंत कमी पैशात हे खाजगी शाळा मालक कामे करवून घेतात. गुणवत्ता काही नामवंत शाळा सोडल्या तर कुठं आहे? शेत चांगलं असून चालत नाही. त्याची तशी मशागत व्हायला पाहिजे. तसंच शिक्षणाचं. पण कोण सांगेल? जिकडे प्रवाह तिकडे सारे.
झेड पि. शाळा म्हणजे कमकुवत दर्जा चे शिक्षण असं चित्र आजकाल निर्माण झालंय. आणि सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई म्हणजे शिक्षणाचा दर्जा उत्तम. त्यामुळे शिक्षणाचा बाजार सुरू झाला आहे.
मुलांना चांगल्या  शाळेत घालण्यासाठी प्रत्येक पालक धडपडतो. जे आपल्याला मिळालं नाही ते मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. हिच शिक्षण सम्राटांसाठी संधी आणि त्यांनी ते हेरली पण. आज शहरी भागापासून खेड्यापाड्या पर्यंत  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झालाय. त्यात वेगवेगळ्या बोर्डांची भर.
कित्येक पालकांना आवाक्यात नसताना सुद्धा या शाळांबद्दल ओढ आहे.  चांगलं बोर्ड आणि महागडी शाळा म्हटलं की दर्जा चांगला ही भावना निर्माण झालीय.
भली मोठी इमारत बांधायची, स्वच्छता गृह सारख्या पूरक सुविधा आणि प्रोजेक्टर किंवा डिजीटल बोर्ड, कॅमेरे लावले की लोकं आपोआप येतात.  तिच त्यांची खरी जाहिरात. शिक्षकांचा दर्जा, त्याचं शिक्षण किंवा शिकवण्याची पद्धत याकडे कुणी लक्ष घालत नाही.
एके काळी संस्कारांचं केंद्र असलेलं प्राथमिक शिक्षण आता व्यवसायाचं केंद्र बनलंय. आपण सगळेच याला कारणीभूत. आपण बदललो आहे त्यामुळे शिक्षण सम्राटांना फावलंय.
छळी लागे छम छम, विद्या येई घम घम असं पूर्वी म्हटलं जायचं. आज शिक्षक मुलांना हात ही लावू शकत नाही. तसं केलं तर पालक दुसर्या दिवशी शाळेत हजर असतात.
झेड.पि. शाळांची अवस्था दयनीय आहे. त्याला कारणीभूत सरकारी उदासिनता. बरं जे सत्तेत त्यांचाच खाजगी शाळा. त्यामुळे त्यांनी ही अवस्था जाणूनबुजून होऊ दिली. राजकारण्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय.  आज झेड.पि. शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. विद्यार्थी मिळत नाहीत. सुरु असलेले वर्ग बंद पडत आहेत. शिक्षकांचं समायोजन केलं जातंय.
शिक्षणसम्राट निर्माण झालेत गेल्या काही वर्षात. त्यांनी शिक्षण हा व्यवसाय/ व्यापार करून टाकलाय.  आज हे शिक्षणसम्राट सर्व जनतेला वेठीस धरत आहेत. भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे लोकं जनतेला लूटत आहेत. नर्सरी पासून केजी ते पीजी पर्यंत यांचा धंदा जोरात सुरु आहे. कित्येकांना त्यांचे डोनेशन परवडणारे नाही.  अशीच परिस्थिती राहिली तर शिक्षण फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल. आपल्या हे लक्षात येत नाही. अजून काही काळ येणार नाही.

खरं पाहिलं तर बाहेरून जे दिसते त्याला बळी न पडता शाळेतील शिक्षण पद्धतीचा दर्जा बघायला हवा. चांगल्या इमारती असल्या म्हणजे चांगलं शिक्षण असेलच असं नाही.
न संपणारा विषय आहे. तूर्तास एवढंच.

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव