Wednesday, December 11, 2019

असंच काहीतरी-५


आजकाल फक्त प्रश्न पडतात. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामागे धावावं तर नवीन प्रश्न समोर आ वासून उभे असतात. उत्तर कशाचच मिळत नाही. आसपास काय चाललं आहे, काय नाही याचा वेध घेता घेता स्वतःच्या आयुष्यात काय चाललं आहे याचं भान राहत नाही. सगळं काही सुरळीत असल्याचा भास. पण तो फक्त भास. त्याला काही तर्क नसतो. एखादी गोष्ट भंडावून सोडते. पण ते सोडून पुढे निघून जायचं. त्या गोष्टीच्या नादाला लागायचं नाही. आजचा दिवस गेला ना. तसा उद्याचा पण जाईल. फार संकल्प करायचे नाहीत. संकल्प सिद्धीस जात नाहीत. अपेक्षित होत नाही. हा पूर्वानुभव. मग कशाला हवेत नव-नवीन संकल्प. जे समोर आलं त्याला सामोरे जायचं. सर्व काही असून नसल्याचा भास आणि नसून असल्याचा हेच ते चक्र. पसारा वाढवत जातो आपण.हाव...दुसरं काय? पण हिच हाव नवीन प्रश्न घेऊन येते…
व. पु. काळे यांनी वपुर्झा मध्ये म्हटलंय:
“प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...”
आयुष्यातला प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते. Each decision in life has its own price tag.  ती किंमत आपल्याला कधीच माहित नसते. ती फक्त आपण चुकती करतो. कळत ही नाही कशी. आपण सतत धावत असतो. हे झालं की ते. पसारा वाढला की प्रश्न वाढत जातात. ते सोडवता सोडवता नाकी नऊ.  जगण्याच्या अनेक संकल्पना असतात. प्रत्येकाच्या वेगळ्या. माणूस हा मुळातच बुद्धिवादी प्राणी. म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा. तो सतत नाविन्याच्या शोधात असतो…
कित्येकदा ओळखीचे चेहरे अनोळखी वाटायला लागतात. अंगवळणी पडलेल्या पाउल वाटा ही दिसेनाश्या होतात. मी कोण, मी कोण आक्रोश सुरु होतो. वाटेतले खाच-खळगे, अगणित समस्या, पण मी थांबत नाही. पायाला कायम भिंगरी. जशी पायाला तशी विचारांना. unstoppable…
गर्दी. जिकडे तिकडे फक्त गर्दी. आसपास माणसांची गर्दी. डोक्यात  प्रश्नांची गर्दी. या गर्दीत आपण कधी हरवून जातो समजत नाही…
खिशातलं पाकीट जाड झालंय. सहजच पाकीट उघडलं तर जुन्या-पुराण्या किराण्याची मालाची यादी, बिल, एटीएम च्या पावत्या, थोडे-बहुत पैसे यापलीकडे काहीच नाही. पाकिटात पण गर्दी झाली होती अनावश्यक गोष्टींची. जुन्या-पुराण्या पावत्या-बिल. एक-एक करून फेकून दिल. आता पाकीट हलकं झालं होतं. शेवटी एटीएम, क्रेडीट कार्ड तेवढं उरलं फक्त. का सांभाळून ठेवलं एवढं सारं माहित नाही. उपयोगाचं नसून सुद्धा. हेच ओझं घेऊन आपला प्रवास सुरु राहतो…
कॉलेज च्या वेळेला कॉलेज ला गेलो. मी आल्याची सही केली ती सही माझ्यापेक्षा महत्त्वाची आहे. पायर्या चढून कॅबीन उघडून मध्ये शिरलो. दरवाजा बंद केला. हिवाळ्यात डास खूप असतात. त्यामुळं दरवाजा तसा नेहमी बंदच.  टेबल वर लक्ष गेलं तर टेबल पूर्ण व्यापलेला.  एक कंप्युटर, मोउस, सीपीयू,  laptop आणि चार्जर, हार्ड डिस्क, यूपीएस, दोन-तीन नेट केबल,तीन-चार पेन ड्राईव्ह, मोबाईलचं चार्जर, हेडफोन, डायरी, चार-पाच पुस्तकं, दोन-चार पेन, डस्टर, चार-पाच खडू, स्टेपलर, पंचिंग मशिन, इपीएबिएकस  extension फोन, पाण्याची बॉटल एवढं सारं. जशी डोक्यात विचारांची गर्दी झालीय तशीच टेबल वर पण. किती सार्या अनावश्यक गोष्टींनी गर्दी केलीय डोक्यात. म्हटलं तर डस्ट बिन. पण ती डस्ट बिन कधी रिकामी केली जात नाही. काय होणार. दुर्गंध. आपल्या आचारात-विचारात सगळीकडे…
काही कमी करता येईल का असा विचार करता करता खुर्चीत बुड टेकवलं तेवढ्यात फोन वाजला. आणि हे बाजूला राहिलं, सुरु झाली दुनियादारी. जगण्यासाठीचा संघर्ष. कधीही न संपणारा. मला काय वाटतंय, काय हवंय त्यापेक्षा लोकांना काय वाटते, काय हवंय ते पूर्ण करण्याचा प्रवास. या प्रवासात मी विसरलोय स्वतःला. जे लोकं दाखवतात तेच पाहतो. त्यांना जे आवडते तेच बोलतो, तेच करतो. माझ्या विचारांना, कल्पनांना तिलांजली दिलीय…
क्षणभंगुर आहे सगळं. या जगात शाश्वत असं काहीच नाही. मग तरी पकडून ठेवण्याचा का अट्टहास?
गर्दीची सवय झालीय. पण या गर्दीत मी कुठंय? माहित नाही. या गर्दीचा एक भाग न दिसणारा.
“समय बलवान होता है. और ये समय ही तो है जो भी चलने को मजबूर करता है. आज नाही तो कल इसी चक्र मे हम फसे हुये है.”

आजकाल फोन वाजत नाही. वाजलाच तर आपल्यासाठी नाही एवढं मात्र नक्की. प्रत्येकाचा फोन करण्याचा एक अजेंडा असतो. काहीतरी काम असते. ते संभाषण म्हणजे बिजनेस. कित्येक फोन मी उचलत नाही. त्या truecaller ने बरंच केलंय. नंबर सेव्ह नसला तरी कुणाचा आहे ते समजते. अचानक आलेले फोन मी उचलत नाही. माझ्या आयुष्यात काय चाललंय वगैरे कुणाला काही देणं-घेणं नाही. तरी कुणाला काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. कामानिमित्त संभाषण.  ज्या संभाषणाचा हेतू मुळात व्यापार आहे त्यात आत्मीयता संबंध आलेत कुठून? मग न उचललेला बरा. काम असलं म्हणजेच फोन. हे मनाला फार पटत नाही. काय करणार?...
कुठंतरी एक वाक्य वाचनात आलेलं...लेखकाचं नाव आठवत नाही: “असूनही जी दिसत नाही,पण मनाला जाणवते,ती भावना.जे नजरेला दिसतं,तो व्यवहार.” व्यवहार...म्हणजे यश आलं की पैसा येतो आणि पैसा आला की आसपास गर्दी होत जाते. नको नको ते, दूर-दूरचे संबध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात काहीपण करून. कधी वाहवा...खुशमस्करी करून. आपल्याला ही ते आवडतं कारण आपला शब्द प्रमाण...जे बोलतो ते सत्य. या प्रक्रियेत आपण स्वतःला विसरून जातो. अस्तित्वात नसलेली प्रतिमा तयार करून घेतो स्वतःची. सत्य कधी समोर येतच नाही. आसपास ची गर्दी तसं होऊ देत नाही. कारण प्रत्येकाचा एक अजेंडा. साला हा व्यवहार कधी समजला नाही. म्हणून फसगत झालीय…

अनेकदा शांततेच्या अपेक्षेने माणूस घरी जातो. घरी गेल्यावर मात्र तुम्हाला काही समजत नाही, हे करा, ते करा, हे असं , ते तसं,  हे आणावं लागेल वगैरे अनेक सूचना असतात. बरं...ठीक आहे एवढा काय तो आपला प्रतिसाद.  तो चहा घश्याखाली उतरत नाही, झिंग येत नाही तोवर पुढचा प्रवास ठरलेला असतो. आणि घाई-घाईत कपडे बदलून पुन्हा आपण धावायला सुरुवात करतो.  हरवलेल्यांना शोधणं सोपं नक्कीच नाही…
सोनेरी भविष्याची स्वप्ने रंगवत रंगवत आपण जगत राहतो. ती स्वप्ने कधी हवेत विरून जातात कळत नाही. आपण ती शोधत राहतो. पण मिळत कधीच नाही. अथांग समुद्राची खोली जशी मोजता येत नाही तसंच आयुष्याचं ही गणित कधी कळत नाही…
“So it comes to this; one doesn’t need rest. Why bother about sleep if one isn’t sleepy? That stands to reason, doesn’t it? Wait a minute, there’s a snag somewhere; something disagreeable. Why, now, should it be disagreeable? …Ah, I see; it’s life without a break.”
― Jean-Paul Sartre, No Exit
चक्रव्यूह जो कधी भेदता येत नाही. मुद्दा असा की या चक्रव्युहात आपण स्वतः शिरतो परत कधीही बाहेर न येण्यासाठी. आणि आपल्याला घेऊनच तो संपतो.
शेवटी-
वि.स. खांडेकर (अमृतवेल)-
" भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन बांधुन ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांच वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पहाणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणुन धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!! "

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Monday, November 25, 2019

नैतिकता हरवत चाललेली पत्रकारिता (Journalism)


मी शिकत असताना पत्रकारीते बद्दल प्रचंड आकर्षण होतं. या आकर्षणापायी मी २०११-१२ ला रानडे ला प्रवेश घेतला. एक वर्षाचा डिप्लोमा. नेमकी पत्रकारिता काय हे जाणून घ्यायचं होतं. मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्या वर्षभरात कळल्या. बातमी म्हणजे काय? ती कशी लिहावी...पहिल्या उतार्यात काय असलं पाहिजे...संशोधन.... Truth & accuracy, Impartiality, Independence....फिचर (Feature), कोलम (Column) सारख्या संकल्पना ... प्रिंटींग ते सर्क्युलेशन पर्यंत चा प्रवास वगैरे अनेक गोष्टी.
त्यातलं एक  Yello Journalism....खरं तर आजकाल हेच सुरुय. कुठलंही संशोधन नाही. मनोकल्पित बातम्या सर्रास दाखवल्या जात आहेत. खरं-खोटं ची खातरजमा नाही.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारदिन साजरा करणार्‍या किती जणांना जांभेकर समजले हा कळीचा मुद्दा.
आपल्या लेखणीतून सत्ताधार्यांना घाम फोडणारे पत्रकार पाहिलेय.  अनेक नावाजलेले पत्रकार (Journalists) या देशाने पाहिलेय. प्रल्हाद केशव अत्रे पासून अनेक.

आज मात्र पत्रकारिता हा उद्योग (Business) झालाय.  मोठं-मोठे वर्तमान पत्र, चॅनेल कुणाच्या मालकीचे आहेत हे पाहिल्यावर लक्षात येईल. ते कुणाचा अजेंडा चालवतात वगैरे ते ही कळेल.
आपण भोळी-भाबडी मानसं जे वाचतो, पाहतो त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या कधी कळत नाही की त्या मालकांना जे दाखवायचे आहे ते दाखवतात. कुठली बातमी दाखवायची, कुठली नाही हे सारं ते ठरवतात. खरं-की खोटं या भानगडीत आपण पडत नाही. वाचलेलं , पाहिलेलं खरं असेलच याची आता शाश्वती राहिली  नाही.
अलीकडचे पत्रकार पहिले की त्यांची कीव येतेय. कुठला अभ्यास नाही, संशोधन नाही. माईक हातात धरला की तत..मम करून वेळ मारून न्यायचा प्रकार सुरु झालाय. त्यात भर पडली ती सोशल नेट्वर्किंग ची. नेमकं खरं काय हे कधीच समजत नाही. आताची सगळ्यात मोठी बातमी...आणि बातमी काय ...अमुक-तमुक यांच्या भेटीला गेले, हॉटेल/घरा मधून बाहेर पडले.  बरं की घरात येऊ देत नाही तुम्हाला. अन्यथा तुम्ही तर आमके महाशय किती वेळ संडासात गेले? ते बाहेर पडल्यानंतर कसा वास येत आहे याची ही बातमी केली असती. अरे काहीतरी लाज बाळगा. पत्रकारिता काय ते तर समजून घ्या.
ज्ञानाच्या, अभ्यासाच्या नावानं बोंब आहे. चाटुगिरी आतातरी बंद करा. तो ABP चा एक महाशय तर असं काही बोलतो की त्याला सर्वज्ञात आहे. अरे तुझी लायकी सगळ्यांना ठाऊक आहे. इतकं पण चाटू नये की ज्यामुळे आपली ओळख चं नष्ट होईल.
कशाची बातमी करावी याचं काहीतरी तारतम्य असायला हवं. लोकांचे असंख्य प्रश्न असताना त्यांना वाचा फोडण्या ऐवजी त्या तैमुर न शी केली, सु केली याचं वार्तांकन. कुठे घसरलात रे गाढवानो. गाढव च.
पूर्वी चर्चेत नामवंत लोकं असायची. त्यांच्या चर्चा ऐकाव्या वाटायच्या. सध्या त्या चर्चेतली लोकं पाहिली की असं वाटतं त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना ही तो आश्चर्याचा धक्का बसत असेल हे महाशय एवढे ज्ञानी म्हणून.
आरडाओरडा केली म्हणजे आपण म्हणतो ते खरं होतं का कुठं? सत्य ते सत्य. मग ते तुम्ही कसंही सांगा ते बदलत नाही. असे आरडाओरडा करणाऱ्या पत्रकारांची कीव येते.  दलाल पत्रकार प्रचंड वाढले आहेत. भुरटे पत्रकार म्हणता येईल यांना.
लोकशाहीचा चौथा खांब (Fourth Pillar of Democracy) वगैरे बोलायच्या गोष्टी झाल्याय. हा खांब डळमळीत झालाय. पाकीट पुरवलं, त्यांना साजेसे निर्णय घेतले की आपला हेतू साध्य. हेच आज काल चे राजकारणी करताय. ब्रेकिंग न्यूज (Breaking News) सेन्सेशनल चं असली पाहिजे का? या बांडगूळ पत्रकांना आधी न्यूज (News) म्हणजे काय, नंतर ब्रेकिंग न्यूज चा अर्थ समजून सांगायला पाहिजे.
अलीकडचा शब्द म्हणजे सूत्र...नेमकं काय? सूत्राच्या नावाखाली आपल्याला हवं ते दाखवता येतं, खपवता येतं एवढंच.  सूत्र (Source) समजायचं असेल ना तर तुम्ही जसे जन्माला आलात ते सूत्र. तिथं logic आहे. त्या anchors बद्दल तर बोलायलाच नको. तोंड दिलंय म्हणून काहीपण बरळत सुटतात.
पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासला गेलाय.  माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय खपवलं जातंय.
आज किती माध्यम (Media) तटस्थ (Impartial) आहेत? जे काही आहेत त्यांचे काय हाल आहेत. यावरून माध्यम म्हणजे लोकांचा आवाज वगैरे किती झोल आहे हे लक्षात येईल. सत्ताधार्यांच्या मर्जीतले संपादक (Editors) सगळीकडे दिसून येतील. त्यामुळे तटस्थ वगैरे या फंदात आपण पडायलाच नको.

निवडणुकीच्या दरम्यान चे पोल आठवतात ना...२२० पार वगैरे.  मग कुठून रसद पुरवली गेली असणार हे उघड आहे. प्रत्यक्ष चित्र वेगळंच होतं. माझा आणि तुझा वाले हवेत उडत गेले. त्यांच्या त्या tagline आणि ते काय करतात याचा कुठलाही संबंध नाही.
त्यातल्या काही...
•“उघडा डोळे बघा निट”
•अचूक बातमी ठाम मत
•एक पाऊल पाऊल पुढे
•चला, जग जिंकूया
•सबसे तेज
•मजबूत इरादे, बढते कदम
•खबर...बनते भारत की
•खबर हर किमत पर
•सच जो आप जाणना चाहते है
•हकीकत जैसी खबर वैसी
•आपको रखे आगे
किती जण ते अमलांत आणतात हा संशोधनाचा विषय.
मेडिया वातावरण निर्मिती करत असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरून perception तयार करत असतो. किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार? लोकांनी ठरवलं तर लपण्यासाठी सुद्धा जागा उरणार नाही या भटक्या पिलावळ जमातीला.
आता सगळेच पत्रकार तसे झालेत असं नाही. बोटावर मोजण्या इतके नैतिकता बाळगून आहेत अजून. प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले तरी नैतिकता त्यांनी सोडली नाही. म्हणून अस्सल पत्रकारिता अजून जिवंत आहे.
टीव्ही सुरु करताना कुठलं न्यूज चॅनेल (News Channel) लावावं हाच मोठा प्रश्न आहे. कंटाळून मागच्या हप्त्यात काही न्यूज चॅनेल Deactivate केली free to air असली तरी.  
“Get the truth and print it.”
John S. Knight

आताच चित्र गंभीर आहे. ते कधी बदलेल माहित नाही. सत्ताधार्यांना प्रश्न विचारणारे, मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे, त्यांना सळो की पळो करून सोडणारे पत्रकार, संपादक यांचा अस्त झाला. पुन्हा कधीतरी उदय होईल. सारं चित्र पालटेल.  या आशेवर थांबतो.

RIP Journalism…

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव


Sunday, November 24, 2019

2५ नोव्हेंबर निमित्त...


आज २५ नोव्हेंबर...म्हणजे त्याचा वाढदिवस.आयुष्यात  एका वर्षाची भर पडली. नवीन वर्षात पदार्पण करताना मागे वळून पाहिलं तर आठवणींचा भांडार आहे.  गेल्या अनेक वर्षात तो अनेकदा मला गवसला असं वाटत राहिलं...पण जेव्हा जेव्हा तो गवसला असं वाटलं तेव्हा तेव्हा अजून खूप काही राहिल्याची भावना वृद्धिंगत होत गेली. यानिमित्ताने त्याला उलगडण्याचा प्रयत्न करतोय...शक्य नसलं तरी.
लिखाण, वाचन, चर्चा त्याचे आवडते क्षेत्र. तसं लिखाण तो फार पूर्वीपासून कमी अधिक प्रमाणात करत आलाय. माझ्या लिखाणाचा तो सेन्सॉर बोर्ड. आधी तो पाहणार, वाचणार. बदल सुचवणार.  मग पोस्ट. म्हणजे पहिला वाचक. माझ्या लिखाणाची प्रेरणा. म्हणजे तो लिहितो म्हणून मी लिहायला लागलो ओढून-ताढून. एवढंच.
त्या एम. ई.एस. मध्ये तो पहिल्यांदा भेटला. मग त्या एम. ई. एस. पासून पुण्यापर्यंत व्हाया जळगाव. आम्हीं संपर्कात. सातत्याने सोबत. तो आणि मी एक घट्ट समिकरण. खरं म्हणे आज कुठल्या कलर चि under wear घातली तिथपर्यंत माहिती. दोन लोकांमध्ये भांडणे लावून भांडण सुरु असताना पुस्तकात डोकावणारा हा. म्हणजे आगलाव्या.
तो नेमका कसा आहे... मला उलगडलेला कि अजुनही न उलडलेलं एक कोडं. तो बोलत नाही. ऐकुन घेतो. समोरचा चुकीचा असला तरीही त्याला जाणीव न होऊ देणारा. इथे आमचं कित्येकदा खटकतं. किती काळ असा जगणार आहेस? स्पष्ट सांगत जा. गुळमुळीत उत्तर देऊन तो मला टोलवतो. मला आहे तसा स्विकारणारा तो पहिला व्यक्ती. माझ्यात त्याने बदल अपेक्षित केले नाहीत. कधीतरी एखादं मत व्यक्त केलं असेल परंतु ते झालंच पाहिजे असा तगादा त्याने कधी लावला नाही. मी मात्र त्याला आहे तसा स्विकारत नाही. Dos and don’ts सांगत असतो. तो ते फार मनावर घेत नाही. ऐकून सोडून देतो.
समज गैरसमज आमच्यात ही. नाही असं नाही. पण तो ही कधी त्याबद्दल बोलत नाही आणि मी पण नाही. तिथं सोडून पुढे.
निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून राष्ट्रपती राजवट लागेपर्यत रोज आज काय झालं त्यावर कित्येक चर्चा पार पडल्या. त्या संघर्ष यात्रा करणाऱ्या महिला निवडणुकीत पडल्या म्हणून विरोधकांपेक्षा  पतिदेव ला  जास्त आनंद झाला असेल असा शोध लावून त्यावर एकमत असणारे आम्ही. तसं अनेक बाबतीत एकमत ही. जसं की संधी एकदाच येते. (कोणती ते विचारू नये.), प्रेम म्हणजे व्यवहार वगैरे. दिवसभरात एक-दोन फोन ठरलेले.
व्हेव करून अंडे... एवढंच रोज न चुकता फेसबुक ला पाठवतो.
बोल बेटे...
कुछ नही, ऐसेही तेरी याद आयी...
अरे फेक मत साले...

हा रोजचा संवाद.
१९९९ ते २०१९.. तब्बल वीस वर्ष. ओळखी पासून वर्गमित्र  ते मैत्री आणि त्या पलीकडचा हा प्रवास. चढ-उतार, खाच-खळग्यांनी भरलेला.  सोबत भ्रमंती ही कित्येकदा.
तो बहुरूपी आहे... बहू आयामी आहे... व्यासंगी आहे. त्याचे असंख्य चेहरे आहेत. तो प्रत्येकाला वेगळ्या रूपात भेटतो. तो आरश्यात जेव्हाही पाहत असेल तेव्हा मी म्हणजे जादूगार असं त्याला वाटत असावं. आमच्या चर्चा कायम सुरु असतात...नेहमी वेगवेगळे विषय.... समाजकारण, राजकारण. कुठलाही विषय असो. बॉलीवूड ते  हॉलीवूड व्हाया मराठी, तमिळ. बालपण ते वृद्धावस्था. स्त्री-पुरुष संबंध/समस्या. प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण. आरोग्य. शारीरिक गरजापासून  ते बौद्धिक गरजांपर्यंत. नट-नट्या म्हणजे  नर्गिस ते अँजेलिना जोली पर्यंत. म्हणजे काही पण. भुकेचे अनेक अर्थ शोधणारा.त्याला शब्दात पकडता येत नाही. तसं ते अशक्यच. Chatting वगैरे आम्ही करत नाही. बोलायचं तर फोन करतो.
कित्येक वेळा शाब्दिक जुगलबंदी...एकमेकांना शिव्या...सर्व. तसं शिव्यांनी आम्ही समृध्द. पायाच्या  नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत तोंडपाठ. काही निर्माण केलेल्या ही. ग्रामीण भागातील असल्याने तेवढा फायदा. सलग तास-दीड तास आम्ही एकमेकांना शिव्या घातल्याय कित्येकदा.
आयुष्यात घडलेया प्रत्येक प्रसंगाचा, एक  कप चहा च्या  समस्यांपासून दोन वेळेस च्या  जेवणा पर्यंत च्या प्रवासाचा साक्षीदार. ज्याला मी संपूर्ण माहीत आहे. उमगलेला आहे असा. काही नाती मागून मिळत नाहीत ती निर्माण होत जातात. तसंच काहीतरी समजा.
सोशल नेटवर्किंग वर राजकारण संबंधी पोस्ट न टाकणारे आम्ही. ती वैयक्तिक बाब. त्याचा उदो-उदो नको. नाहीतर आजकाल भक्त, पुरोगामी वगैरे संकल्पनांचा जोरात वापर सुरुय. आपल्याला कुठलंही लेबल नको. जे योग्य ते योग्य. यावर ठाम.
त्याच्याबद्दल  काय लिहू? माझ्यात नसलेला प्रत्येक  समाजमान्य गुण त्याच्यात. आणि प्रचलित प्रथेनुसार विरुध्द ते सारे माझ्यात. एका नाण्याच्या दोन बाजू. कदाचित त्यामुळे हे सारं घडलं असेल. सांगण्या सारखे अनेक प्रसंग. एक दुसऱ्यांना कितीही शिव्या घातल्या  तरी एका ताटात जेवण्याची क्षमता कला अवगत.
तसं तो आणि मी विरोधाभास आहे. तो अपेक्षित करत नाही कुणाकडून काही. मी मात्र अपेक्षित च्या  पुढे जाऊन घेऊन घेतो.
जळगाव पासून पुण्यापर्यंत. जर त्याचा विषय निघाला असेल तर मी ओघाने येत असतोच. तो म्हणजे चांगला. मी म्हणजे टीकेचा धनी.
ते पण अंगवळणी पडलंय. माझ्या मनातला जे वाटेल चांगलं वाईट याचा विचार न करता मनाला पटेल ते मी करत गेलो, जगत गेलो. तो मात्र तसा नाही. इतरांना अपेक्षित गोष्टी करत गेला, करतोय. स्वतःच्या ईच्छा अपेक्षा सोडून. दुर्दैवाने यामुळेच त्याला गृहीत धरल्या जाते. मी पण तेच करत आलोय. त्याच्यावर प्रत्येक गोष्ट लादत आलोय. पण तो बोलत नाही. याला कधी बोलावं क वाटत नाही. मला पडलेला प्रश्न.
तो अजब रसायन आहे. कुणाला सहजासहजी कळणार नाही. तो कळू देणार नाही पण ज्याला कुणाला तो कळेल तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल.
या वीस वर्षात त्याला मी जवळून पाहिलं आहे. तरी कित्येक गोष्टी उलगडता आल्या नाहीत. मी त्याला कधी समजण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्याला रागावलेले मी क़्वचित पाहिलंय. तरी आठवत नाही.
नॉनव्हेज चा दर्दी... रसिक.  वादग्रस्त मुद्द्यांवर बोलणे तसं  आम्ही टाळतोच.
एकदा मी त्याला पत्र लिहिलं. अपयशाचा काळ होता. संपता संपेना. संपूर्ण पत्र नकारार्थी विचारांनी भरलेलं. त्याचं उत्तर आलं काही दिवसांनी. भलं मोठ्ठ उत्तर. त्यात दडलेला कवी दिसला. काही ओळी त्याच्या लेखणीतून उतरल्या...तो पत्राचा शेवट होता...त्या ओळी अशा:
फिनिक्स शोधताना...
मी ऐकून होतो.
नष्ट होऊनही घेतो…
राखेतून उभारी.
मी म्हटलं काहीतरीच...
पण खरं सांगतो.
तुझे जीवन पाहताना....
गवसला फिनिक्स.
म्हणूनच फिनिक्स वर अविश्वास नाही...
तुझाच दोस्त.
…………………
30/11/11 
11.40pm.
एका औपचारिक पत्रातली त्याच्या काही ओळी...
प्रेमाचा गुन्हा!
प्रेमाच्या राज्यात
प्रेम करणं हा गुन्हा नाही
पण ज्याच्यावर ते जडतं
त्याच्यापासून लपवणं
हा मात्र गुन्हा आहे.
हा गुन्हा सुद्धा कसा?
तर त्यात गुन्हेगार स्वतःच फसतो,
गडबडतो, गोंधळतो,
गुन्हा कबूल करत नाही.
पण त्याचा चेहरा बोलत जातो.
प्रेमाच्या न्यायालयात
या गुन्ह्याला शिक्षा एकच
जन्मभर तडपण्याची!
तो विनोदी आहे. एका पत्रात मैत्रीबद्दल त्याने लिहून पाठवलेलं......
हमारी दोस्ती
It cannot break
It will break only when
We will be no more.
But it will continue in the heaven.
And there, in the palace of Indra,
We will see (enjoy) the dance of Urvashi, Rambha and Menaka…
मी जळगाव सोडल्यानंतर ते तो पुण्यात येईपर्यंत सातत्याने पत्र व्यवहार व्हायचा. त्यात खंड पडला नाही. मी पुण्यात कशासाठी गेलोय याची नेहमी जाणिव करून देत गेला. कधी आधार म्हणून, कधी प्रेरणा म्हणून तर कधी विनोदी शैलीत तो पत्र लिहित होता. एका पत्रात त्याच्या या ओळी मला प्रचंड भावल्या...
तू अनुभवलेल्या चटक्यांना
एक दिवस शांती मिळेल
तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांनी
पाहिलेल्या स्वप्नांना
एक दिवस मुक्ती मिळेल
तुझी वजन करण्याची भाषा ही
एक दिवस सत्यात अवतरेल
तो दिवस असेल .....
मला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा तो आसपास च होता. त्याच्या असण्याने असंख्य गोष्टी शक्य झाल्या. प्रवास सुकर झाला. आजकाल भेटी-गाठी होत नाहीत...तो कुठं...मी कुठं. पण संपर्क कायम आहे.
तो विनोदी आहे. खोडकर आहे. गंभीर आहे. प्रगल्भ आहे. आज्ञाधारी आहे. सद्गृहस्थ आहे.  तो सर्वच आहे. पण नेमकं कोण याचा थांगपत्ता लागत नाही. तो प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधत जातो. त्यामुळे लोकं जोडली गेली, जोडली जातात. आपलं कसं जोडण्यापेक्षा तोडण्यावर जास्त भर. त्यामुळे कुणी सहसा जोडले गेल नाहीत. आणि जे काही जोडले गेले तेही  बरेच गळून पडलेत काळाच्या ओघात. त्याने मला कित्येकदा सांगितल...जिभेवर नियंत्रण ठेव. तसा त्याचा फायदा कधी झाला नाही. मग त्याने तो विषय सोडून दिला.
तो त्याच्या समस्यांसंदर्भात कधी सांगत नाही. कित्येक गोष्टी स्वतः जवळ ठेवतो. अंतर्मुख आहे त्या बाबतीत. अनेक वर्षांचा कालावधी गेल्यानंतर सांगतो पण ते अर्ध सत्य. खोदून-खोदून विचारलं तेव्हा.
तर असा या आमचा मित्र. आमचा यासाठी की तो कित्येकांचा आहे. त्याने माझ्यासारखी सीमा अधोरेखित केली नाही. त्याचा आज वाढदिवस. म्हणून हे शब्दरूपी लिखाण. येत्या काळात त्याला अपेक्षित गोष्टी घडतील ही अपेक्षा. कारण त्या आतापर्यंत घडायला हव्या होत्या. किती लिहू आणि काय? तो न संपणारा विषय आहे. तेवढ्या खोलात मी जाऊ शकत नाही. ती माझी मर्यादा. जेवढा एक व्यक्ती म्हणून गवसला तेवढा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.
नाव लिहायची गरज नाही. कारण...
“नाम तो सूना ही होगा....”


टीप- ती बॅग विसरू नको. त्या बॅग मधील  निखळ प्रेम  पहायचं आहे.  कधी बघितलं नाही रे म्हणून हा अट्टहास. वाट पाहतोय...आणि तो मोबाईल, पुस्तक विसरू नको. एवढं लिहिलंच आहे तर औपचारिकता म्हणून वाढदिवसाच्या बॅगभर...सॉरी... ढिगभर शुभेच्छा.

तुझाच...
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव