Monday, October 22, 2018

बदलता काळ, बदलते संबंध-१

कित्येक वर्षानंतर आज एका मैत्रिणीसोबत बोलणं झालं. साधारण १०-१२ वर्षे झाली असतील. फेसबुक ने बरं केलंय. जुनी-पुराणी नाती जपलीय. व्हर्चुअलि का होईना. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यात. बोलता बोलता ती म्हणाली-“तु contact ठेवले नाहीस.” आमच्या संभाषणातील फक्त हेच वाक्य माझ्या डोक्यात राहील.
खरंच असं झालंय का? मी विचारात मग्न झालो. नकळत मी कित्येक वर्षे मागे गेलो, भूतकाळात गेलो . समोर असलेली काम सुरु होतं पण माझं मन भूतकाळात रमल होतं.
खरं आहे ते पण. बाहेर च्या जगात आल्यापासून कित्येक लोकं जोडली गेलीत. काही थोड्या काळासाठी तर काही कायमस्वरूपी. काही कामानिमित्त जोडले गेले, काही वैचारिक साम्यतेमुळे तर काही स्वार्थासाठी. त्यात मी पण अपवाद नाही. माणसाचं जीवनच असं आहे. आता जो तो आपापल्या संसारात मग्न आहे. ध्येय वेगळे आहेत. कधी तरीच संपर्क होतो. एकेकाळी खूप जवळ असलेली लोकं इतकी दूर गेली आहेत कि परतीचे मार्ग बंद झालेत. कित्येक कारणे असू शकतात. कोण चूक हा प्रश्न बाजूला. कधी माझं चुकलं असेल कधी त्याचं चुकलं असेल. त्यातून संवाद कमी कमी होत गेला आणि आता पूर्ण बंद.  
८-१० वर्षे मागे गेलो तर ती सारी मंडळी आसपास दिसून यायची. चर्चा, वादविवाद, फिरस्ती सर्व काही चालायचं. एकमेकांबद्दल जिव्हाळा होता, प्रेम होतं , आसक्ती होती. काळाच्या ओघात ते हळू हळू नाहीसं झालं. संवादाची साधने वाढली. सोशल नेट्वर्किंग, मोबाईल क्रांती नं आपण सारे जोडले गेलो व्हर्चुअलि. पण संवाद लुप्त झाला.साधने आहेत पण संवाद नाही. पूर्वी बरंच होतं. संवादाची साधने कमी होती पण संवाद होता. भेटण्या-बोलण्याची उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपलीये. मोबाईल मध्ये नंबर आहे पण तो कधी डायल चं होत नाही. बरं आता तर फुकटात कॉलींग आहे. विशिष्ट प्रसंगी फक्त शुभेच्छांच फोरवर्डीग  सुरु आहे. मेसेज केला की झालं. कुणालाही फोन करावसं वाटत नाही. हीच मानसिकता झालीय प्रत्येकाची. मी पाठवलेला मेसेज मला किमान १५-२० जणांकडून वापस येतो. चक्र सुरु आहे. ते coinbox होते तेव्हा coin संपेपर्यंत बोलणारे आम्ही. आता तर डायल बोटावर आलंय. ते कष्ट ही कशाला. त्या गुगल असिस्तंत ला सांगितलं तरी फोन लागतो. पण नाहीच होत ते.   एका क्लिक वर आहे सारं. पण मनातून क्लिक होत नाही. आणि जो पर्यंत मनातून क्लिक  होत नाही तोपर्यंत हे व्हर्चुयल क्लिक निष्क्रिय. आपण दूर गेलोय एकमेकांपासून. सगळं आदान-प्रदान व्हर्चुअलि. आपण गुंतत चाललो आहे. संवेदना नष्ट होत चालल्या आहेत. तंत्रज्ञानाने आचार-विचार बदलून टाकले आहेत. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ते आता सोशल नेट्वर्किंग वर कळायला लागलंय. लाईक वर लाईक सूर आहे.  मात्र नको इतका तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने संवाद साधायला वेळ मिळेनासा झालाय. सजीव नात्याची प्रेमाने विणलेली घट्ट गुंफण तंत्रज्ञाने विस्कटली. प्रत्यक्ष संवादातून निर्माण होणारा जिव्हाळा तंत्रज्ञानाच्या संवादाने दूर गेला. सोशल नेट्वर्किंग वर हजारो मित्र आहेत, मोबाईल मध्ये हजार contact असतील. पण त्याचा काय फायदा?

गेल्या १०-१५ वर्षात किती लोकं जोडली गेली आणि किती दूर गेली याची सांगड घालत होतो. जी नवीन जोडली गेलीत ती व्यावसायिक कारणाने. जी दूर गेलीत ती आपल्या आचार –विचार, अहंकार यामुळे. माझं मन मला सांगत होतं. यश-अपयश, समाजातलं स्थान, आर्थिक सुबत्ता असे अनेक अडथळे नाते-संबंधात निर्माण झाले आहेत आजकाल. त्यामुळे नाती टिकवणं अवघडच.
पूर्वी कसं होतं. सुख-दु:खात सहभाग होता. पाठबळ, पाठींबा होता. सहवास होता. संवाद होता.  थोडक्यात सपोर्ट सिस्टम होती. हसणं-खेळणं होतं. प्रेरणा होती. आपण यशस्वी व्हायला पाहिजे असं वाटणारे शुभचिंतक होते. नाती सहज तोडता येतात. पण नात्यामुळे निर्माण झालेल्या आठवणी नाही पुसता येत. त्या आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनून राहतात. जवळीकतेणे नातं अथवा मैत्री होत नाही. कुठलंही नातं प्रगल्भ व्हायला मोठा काळ जातो. त्या काळात जे टिकलेत ते टिकलेत.  काळाच्या कसोटीत तावून सुलाखून बाहेर पडणं तसं कठीणच. खांडेकर उगाचच नाही म्हटले: “जग जिकंण्याइतंक मन जिकणं सोप नाही!”
जळगाव मध्ये पदवी ला असताना काही चांगल्या लोकांचं सानिध्य लाभलं. कठीण वाटणारा प्रवास त्यांनी प्रवास सोपा केला. प्रचंड उलथा-पालथी चा तो काळ. शून्यातून सुरु झालेली वाटचाल आणि त्या मार्गात येणारे अडथळे अथवा समस्या. याच आस-पास च्या लोकांनी त्या समस्या उपटून फेकायला मदत केली. व. पु.च्या शब्दात: “प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.” तेच अनुभवलंय. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं महत्त्व आहेत. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जाते. एका काळासाठी लाइफ-लाईन बनून जाते. उपयोगिता संपली कि नातं संपलं. असं झालंय का? बरं तसं झालंय तर प्रत्येकासोबत का होत नाही. जर-तर ..चा काय फायदा? वि. स. खांडेकर म्हटलेत: “जर आणि तर ! शब्दांची सुंदर प्रेते ! हे शब्द कोषातून काढून का टाकत नाहीत?” एकेकाळी अत्यंत जवळ असणारी कित्येक लोकं एवढी दूर गेलीत कि ती आता दिसेनासी झालीत. टाळी एका हाताने वाजत नाही असंही म्हणतात. त्यात जायला नको. मेलेले मुडदे उकरण्यात काही अर्थ  नाही

विचार थांबत नव्हते. मन अशांत होतं. मेंदू उत्तराच्या शोधात होता. प्रश्नाची गर्दी झाली होती. उत्तर शोधता-शोधता निद्रेचा विजय झाला आणि दुसर्या दिवशी याचा मागमूस ही नव्हता. समोरचे प्रश्न वेगळे आहेत. उत्तरे ही मलाच शोधायची आहेत. प्रश्न आणि उत्तर या चक्रात गुरफटून गेलोय. कित्येक अनुत्तरीत आहेत. व. पु. नी म्हटलंय: “प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...”

सचिन भगत

Friday, October 12, 2018

अनुभव ६


अभियांत्रिकी कडे वळण्याआधी मी एका वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. वर वर्षभर जॉब केला. या काळात भरपूर अनुभव आले. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून गेला. वृत्तपत्र पदविका सुरु होती. त्याचे तास संध्याकाळी असायचे. त्यामुळे सी. एच. बी. वर जॉब मिळतो का याची शोध-शोध सुरु होती. एका मित्राकडून एका महाविद्यालायचा संदर्भ मिळाला. त्याने आधीच बोलणं केलेलं होतं. ठरलेल्या दिवशी मी त्या महाविद्यालयात पोचलो. डेमो झाला. आणि सी. एच. बी. वर जॉब मिळाला. सकाळी सात च्या आसपास विद्यापीठ सोडावं लागत होतं. सी. एच. बी. असलो तरी कॉलेज सुटेपर्यंत थांबावं लागे. विद्यापीठापासून ८-१० किमी असेल कॉलेज. कधी-कधी पैसे नसले कि सकाळी लवकर उठून पायीच मार्गक्रमण व्हायचं. तीन-चार वेळेस पैदलवारी झालीय. एवढं चालून काय शिकवण्याची स्थिती राहील. पोट भरल्याशिवाय डोकं चालत नाही. कॉलेज संपल्यावर डबे जायच्या आधी यावं लागे विद्यापीठात. सारी कसरतच. आयुष्यातला एक काळ असतो. त्याला सामोरे जायचं फक्त. तो काही कायम राहत नाही.
सी. एच. बी. वाल्यांचे प्रश्न किती गंभीर असतात त्याची जाणीव झाली. कदाचित त्यामुळेच सी. एच. बी.वर जॉब करायचा नाही हे ठरवता आलं. एक तर त्यांचे पैसे वर्षभर मिळत नाही. किती चकरा व्हायच्या त्या अकाऊंट सेक्शन ला. पण काही उपयोग नाही. बर विभागप्रमुख फक्त आश्वासनं द्यायचा. पण कधी लवकर पैसे मिळावेत असा विचार त्यांनी कधी केलाच नाही. कायम स्वताबद्दल बढाया मारण्यात गुंग. माझे खटके तिथेच उडाले. मी पाठपुरावा कधी सोडला नाही. त्या अकाऊंटवाल्या  बरोबर वाद ही झाला. तिथे दोन प्राध्यापक होती. एक अनुपस्थितीत असला कि त्याच्याबद्दल दुसरे महाशय माहिती पुरवत.  असं नेहमी व्हायचं. चांगलं तर सांगतच नव्हते हे उघड च आहे.  
तिथे बरेच निवृत्त प्राध्यापक यायचेत. तास घायचे. एकदा तिथे एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. रिसर्च पेपर चे पुस्तक छापणार होते. कॉन्फरन्स ला ईंग्रजी विषयाचे एक मोठे व्यक्ती उपस्थित राहणार होते. त्यांचा रिसर्च पेपर बनवायचा होता. त्या विभागप्रमुखांनी एका निवृत्त प्राध्यापकाला बोलावलं आणि पेपर तयार करून द्या असं सांगितलं. त्यांनी  laptop उघडला आणि गुगल सर्च सुरु झालं. जे जे मिळालं ते कोपी होत गेलं. साधारण एक-दीड तास फक्त कॉपी आणि पेस्ट सुरु होतं त्याचं. ३५-४० पेजेस झाले असतील. मग सुरु झालं एडिटिंग. आणि रिसर्च पेपर तयार झाला.  तीन तासात रिसर्च पेपर तयार. संशोधन काय आहे? लाखो लोकं एम.फिल. पी.एच.डी. होतात वर्षभर. हीच काय ती प्रक्रिया. आपण सगळे सारखेच. खरं संशोधन करणारे क़्वचितच. त्या निवृत्त प्राध्यापकाची कीव यायची कधी कधी. किती हाव असावी. निवृत्त झालास ना आता. सन्मानाने जग. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.  असो.
तिथे distance लर्निंग पण होतं. दर रविवारी तास असायचे. पण कधी झालेत माहित नाही. एकही विद्यार्थी कधी आला नाही. ते यायचे फक्त परीक्षेला. प्राध्यापकांची बिले मात्र निघत राहिली. वाईट अवस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोग असो, NAAC असो. काय करतात माहित नाही. ग्रेडिंग कशावर देतात. नियंत्रण काय. कसलाच पत्ता नाही.
मला कित्येक गोष्टी पटत नव्हत्या. मला जे वाटेल ते मी करत गेलो. त्यामुळे दुसर्या वर्षी मला काय ठेवणार नाहीत मला माहित होतं. मी त्यांना भेटायला गेलो. “सचिन, आपल्या बाजूच्या महाविद्यालयात सी. एच. बी. व्याख्याता वर पाहिजे”, असं मी काही न बोलता त्या विभागप्रमुखांनी सांगितलं. मी फोन केलाय तिथे. आदर म्हणून मी हो ला हो केलं. आणि त्या कॅम्पस मधून बाहेर पडलो.
ते महाविद्यालय जवळच असल्याने त्यांनी सुचविलेल्या महाविद्यालयात गेलो. जायला काय हरकत आहे. प्राध्यापक महिला विभाग प्रमुख होत्या. त्यांना भेटलो. त्यांनी तारीख दिली डेमोची. ठरलेल्या दिवशी मी डेमो द्यायला गेलो. आम्ही दोन उमेदवार होतो. दुसरी उमेदवार महिला होती. आधी तिचा डेमो झाला आणि नंतर माझा. ती जे काही बोलली ते अर्धवट आणि कधी मराठीत तर कधी हिंदीत तर क़्वचित इंग्रजीत. त्यामुळे मला तो जॉब मिळेल अशी खात्री झाली. त्यामाने माझा डेमो चांगला होता.  “नंतर कळवते मी”, असं त्या विभागप्रमुख म्हणाल्या. मी विद्यापीठात निघून गेलो. संध्याकाळी मला त्यांचा मेसेज आला. मेसेज खूप मोठा होता. तो मेसेज असा: Dear Sachin. I am sorry. You are the right choice but I can’t appoint you. Another candidate is the daughter of a professor who is a BOS member. He called me in the morning and I said, yes. He has promised me to approve my candidature as the authorized guide of Pune University. I have been trying for it since a couple of years and I don’t want to lose this chance. Once again, sorry.  All the best for your future.
त्या बाईचा मेसेज वाचला. काही का असेना त्या बाईन खरं सांगून टाकलं होतं. तेवढा प्रामाणिकपणा कायम होता. मी काही उत्तर दिलं नाही. पण तो मेसेज मी कधीच डिलीट केला नाही.  योगायोग असा कि ती बाई ज्या व्यक्तीबद्दल बोलत होती ते माझे एम.फिल चे गाईड होते. माझं एम.फिल. अजून बाकी होतं. काहीच बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. प्रत्येक व्यक्ती आपले हितसंबंध जोपासण्यात मग्न आहे. सत्ता आणि पैसा असला कि काहीही करता येतं.. उच्च शिक्षणात काय सुरु आहे यावरून आपल्याला अंदाज येईलच. संशोधनाची दुरावस्था झालीय. संशोधन नाही तर प्रगती कुठून येणार. असे अनेक प्रकार सुरु आहेत. राजकारण घुसलय शिक्षण-क्षेत्रात.  त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात सी. एच. बी. साठी प्रयत्न केले नाहीत. त्या विभागप्रमुखांचे  धन्यवाद. त्यांच्यामुळे वेगळ्या वाटेन जाता आलं. विचार करता आला. परत कधी भेट झाली नाही. माझ्या मित्राने बर्याच शिव्या घातल्यात मला. तुला शांत नाही बसता येत. तू कधी सुधारणार नाहीस म्हणे. वगैरे वगैरे.  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

हा प्रश्न माझाच नाही. कित्येक तासिका तत्त्वावर काम करणार्यांचे हेच हाल आहेत. निमुटपणे सहन करतात. जे बोलतात ते बाहेर फेकले जातात. आपण सिस्टम बदलण्याच्या गोष्टी करतो. पण लोकं एवढी निर्ढावलेली झाली कि त्यांना काहीच फरक पडत नाही. आजही कित्येक प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करत आहेत. कधीतरी जागा निघेल आणि त्याचं काम होईल या आशेवर. आशा फार वाईट. ती करायला भाग पाडते. आणि आपण करत जातो, सहन करतो. बदल कधी होईल? माहित नाही.

Tuesday, October 9, 2018

त्याची गोष्ट (उत्तरार्ध)


ऑल अनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल दन अदर्सत्याच्या डोक्यात हे वाक्य कायम फिरत राहत होतं. इक्वल म्हणजे इक्वल. आता हे मोअर इक्वल कुठून आलं. त्याला काही कळेना. वाचनात आलेलं किती सारं आठवत होतं. अटचमेंट इज द सोफ्ट पोइझन (Attachment is the soft poison). खरंच आहे ते. तिच्यात गुंतलो नसतो तर किती बर झालं असतं. There is always some madness in love. But there is also some reason in madness. यावर त्याच्या विश्वास बसला होता.
ऊन डोक्यावर आलं होतं. आजूबाजुच्या शेतामधले लोकं काम करत होती. त्याचं निरीक्षण कधी थांबल नाही. काय जीवन आहे या लोकांच. उन-वारा-पाऊस वगैरे काही पण असो काहीच फरक पडत नाही. धावत असतात सतत. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. त्याचं जीवनमान तो पाहत होता. वर्षानुवर्षे शेती करणारे अजूनही आहे तिथेच आहेत. त्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्याकडे पाहून त्याला हेवा वाटे. कितीही अडचणी आल्यात तरी त्यांचा प्रवास सुरु आहे. त्याच्या बाबतीत मात्र वेगळच घडलंय. कुठं थांबावं हे कळायला पाहिजे असं त्याला कित्येकदा वाटे.  पण तो अस्तित्ववाद त्याचा पाठलाग काही सोडेना. तो बेकेट नाही का काही तरीच बरळला...
Where I am, I don't know, I'll never know, in the silence you don't know, you must go on, I can't go on, I'll go on.
मनुष्याचं जीवन च निरर्थक आहे म्हणतात. It is meaningless. It is futile. It is absurd. वगैरे काहीतरी.
दिवसामागून दिवस जात राहिलेत. त्याची मानसिकता काही बदलेना. स्वतःच्या आयुष्यात तो गुरफटत गेला. दुनियेत काय चाललंय याचा मागमूस नाही.  विचारांची गर्दी झाली होती. तो सार्त्रा नाही का म्हटला-“I am. I am, I exist, I think, therefore I am; I am because I think, why do I think? I don't want to think any more, I am because I think that I don't want to be, I think that I . . . because . . . ugh!” तो स्वतःशीच पुटपुटत होता कित्येकदा.  तो ओमर खय्याम तर त्याला प्रचंड भावला. त्या रूबायत मधल्या ओळी आठवल्या की त्याला हायसं वाटे:
Oh threats of Hell and Hopes of Paradise!
One thing at least is certain - This Life flies;
One thing is certain and the rest is Lies -
The Flower that once has blown forever dies.”
त्या वर्षी पावसानं दांडी मारली ती मारलीच. उपजीविके पुरत ही निघालं नाही. दोन-तीन वर्षापासून पिक कर्ज ही थकलेलं. त्याची उमेदच गेली होती. त्याला कशातच रस नव्हता.  शेतकऱ्यांच जीवन जवळून पाहत होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारे ए.सी.त राहतात आणि ए.सी. गाडीत फिरतात. सार्या हवेतल्या गप्पा असतात. नेते मोठे झालेत आणि शेतकरी रसातळाला गेला. वृत्तपत्रांमधून विकासाच्या गप्पा, चर्चा व्हायच्या. प्रगती झालीय वगैरे. प्रत्यक्षात सगळं खरं नव्हतं.  नकळत तो तुलना करत होता.
कित्येकदा न राहवून तिचा विचार यायचाच. किती प्रयत्न केला असेल टाळण्याचा. पण शक्यच झालं नाही कधी. ती शेवटची घरी गेली तेव्हा हा शिवाजी नगरला तिला सोडवायला गेला होता. ती बस मध्ये बसून गेली. ती बस नजरेआड होईपर्यंत तो पाहत राहिला. त्याला जायचं होतं तिच्यासोबत तिच्या शहरापर्यंत. पण ती नाही म्हटली. वर्तमानातून-भूतकाळात फिरत होता.
काय करत असेल ती आता? ती खरंच सुखी आहे का? का तिच्या घरच्यांनी जबरदस्ती केली? त्या सार्त्रा चं वाक्य न कळत त्याच्या तोंडून निघे-  “You must be like me; you must suffer in rhythm.”
माय-बापाचा एकमेव आशेचा किरण तो. पण त्याचं काय झालं त्यांना कधी समजलं नाही. त्यांनी कधी विचारलं नाही. आपला पोरगा घरी तर आहे त्यातच त्याचं समाधान.
त्याचं गाव म्हणजे अतिशय छोटं खेड. एका कोपर्यात घडलेली घटना काही सेकंदात पूर्ण गावात. त्याच्याबद्दल असलेल्या चर्चा ही त्याला ऐकिवात होत्या. लोकांच्या नजरा त्याला सर्व काही सांगून जायच्या. रोल मॉडेल व्हायचं होतं पण उलट घडलं. कुणी आपुलकीने विचारे तर कुणी टर उडवण्यासाठी.  लोकांचं ते बोलणं, त्या नजरा..असह्य. तो अल्बर्ट खरंच सांगून गेलाय-“But in the end one needs more courage to live than to kill himself.”
या लेखकांच्या तत्त्वज्ञानाने तो पछाडला होता. वाचलेलं सारं काही आठवत होतं. ओठांवर येत होतं. स्वतःशीच तो बडबडत करत असे.

तो निझे नाही का काय म्हणत होता- One should die proudly when it is no longer possible to live proudly. किती छान बोललाय तो. कित्येक दिवस त्या  वाक्याने त्याचा पिच्छा पुरवला.  मानवी जीवनाचा नेमका अर्थ काय. कशासाठी जगतो आपण?  डू वुई लिव्ह टू सफर? सगळेच धावत असतात. कशासाठी? शेवट माहित असूनही हाव काही सुटत नाही. वेटिंग फॉर समथिंग? बट व्हाट इस समथिंग? नोबडी नोझ.
एके दिवशी तो शेतात गेला आणि परतलाच नाही. त्यानं आपलं जीवन संपवलं होतं. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळल तेव्हा चक्र फिरली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्याच्या खिश्यात एक चिट्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं..”मी लंडन ला चाललो आहे. वाट पाहू नका.” कुणालाच काही समजलं नाही. पोलीस दरबारी आकस्मिक गेल्याची नोंद झाली आणि फाईल बंद.
दुसर्या दिवशी “एका तरुण शेतकर्याची आत्महत्या” अशी बातमी वृत्तपत्रात झळकली. स्थानिक राजकीय नेते मंडळींनी तुटपुंजी मदत दिली. शासनाकडून काही नाही. घोषणा मात्र झाल्यात.
एक तरुण मुलगा गेल्याचं दु:ख ते कुटुंबच जाणो. नेमकं काय झालं. सगळे अनभिज्ञच. लोकांमध्ये कुजबुज मात्र सुरु राहिली. जो तो आपल्या परीने कथानक पसरवत राहिला. ज्याला काही माहित नाही तो पण सहभागी होत राहिला या चर्चेत. नको त्या गोष्टी चघळल्या गेल्या आणि भूतकाळ होऊन गेला.