Tuesday, June 2, 2020

अनलॉकिंग लॉकडाऊन...


....दहा-पंधरा दिवसांपूर्वी ची गोष्ट...... अकरा-साडे अकराची वेळ असावी....उन्हाचा पारा चढत होता....एका किराणा दुकानात गेलो होतो... सोबतच्या  मित्राला किराणा माल खरेदी करायचा होता...बरीच गर्दी होती दुकानात...मित्राला सोशल डिस्टन्स पळून लाईन मध्ये लागावं लागलं....थोड्या अंतरावर दुकानाच्या बाहेर दोन महिला उभ्या होत्या...त्यातील एक महिला त्या मित्राजवळ जाऊन काहीतरी द्या असं त्याला सांगत होती.....दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्या काहीतरी द्या असं हातवारे करत होत्या...बर्याच वेळानंतर तो मित्र खरेदी करून बाहेर आला...आणि त्या स्त्रियांना एक-दोन किलो तांदूळ, तेल असे बरेच काही सामान दिलं...मी बाहेर उभं राहून हे सर्व पाहत होतो....या मित्रा व्यतिरिक्त कुणीही त्यांच्याकडे लक्ष  दिलं नाही....त्यांच्या मागणीला दाद दिली नाही...उलट त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला....अर्धा-पाऊन  तास तिथे उभा होतो पण कुणी त्यांची मदत करताना दिसलं नाही...त्यांचे ते केविलवाणे / सुकलेले चेहरे, हडकुळी शरीरयष्टी, गौर वर्ण, मळलेले कपडे, पायात जुनाट स्लिपर असं चित्र पाहून मी विचारमग्न झालो...
त्या दृश्यानं मला अस्वस्थ केलं...विचलित केलं...याने दिलेलं दोन-चार दिवस पुरेल...पुढे काय? त्यानंतर मी दोन-तीन वेळेस त्या दुकानात गेलो....प्रत्येक वेळी त्या महिला तिथे दिसल्या....कित्येकांना मागतात....काही जण काही वस्तू घेऊन देतात....कित्येक जण टाळतात त्यांना...कित्येक तास म्हणजे दुकान बंद होईपर्यंत त्या तिथे उन्हा-तान्हात उभ्या राहतात... कुठलंही काम उपलब्ध नसल्याने त्या महिलांना हा मार्ग पत्करावा लागला...पोटाची भूक...दुसरं काय?
रात्री जेव्हा हि लोकं झोपी जात असतील ती उद्याच्या चिंतेत चं...आज निभावलं...उद्या काय? चिंता...चिंता आणि फक्त चिंता...पाचवीला पुजलेली...
त्यात आपला दृष्टीकोन फार चांगला नसतोच....आपल्यापैकी अनेक  त्यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहणार, हेटाळणी करणार, त्यांच्या पासून दूर पळणार, दुर्लक्षित करणार, टीका-टिप्पणी करणार पण त्यांची हि अवस्था का यावर कधीही विचार करणार नाही कारण आपल्याला त्यांचे प्रश्न, अडचणी समजू शकत नाही... या गर्तेतून त्यांना बाहेर कोण काढणार?  असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते....पण यांच्यासाठी आपल्याकडे अनलॉकिंग नाहीच...
James Baldwin या लेखकाने म्हटलंय...
“Anyone who has ever struggled with poverty knows how extremely expensive it is to be poor.”
वाटलं म्हणून अचानक सगळं बंद ची घोषणा करावी तेवढा सोपा हा देश नाही....मागचा-पुढचा विचार न करता घेतलेले निर्णय कित्येकांच्या आयुष्यात प्रचंड उलथा-पालथ करतात....देशोधडीला लावतात... लॉकडाऊन मुळे काय परिणाम झालाय हे घरात बसून कळणार नाही...मिडिया सुद्धा तळागाळापर्यंत पोचत नाही...आपल्या सोईने ते बातम्या छापतात, प्रसारित करतात... ज्याच्या खिशात पैसा आहे, बँकेत सेविंग आहे, पगार सुरु आहे त्यांना कधीही फरक पडणार नाही, पडला नाही. फरक पडला त्यांना ज्यांच्याकडे ना खिशात पैसा, ना बँकेत सेविंग, ना पगार...
काम करून पोट भरणार्यांचे जे हाल झाले असतील त्यांची कल्पना करता येणार नाही...त्याचं दु:ख हि आपण समजू शकत नाही...गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना घरात बसावं लागलं...आर्थिक ओघ अचानक आटला....ओघाने अडचणी आल्याच...गरिबांच्या आयुष्यात सेविंग, पोलिसी,  मेडिक्लेम सारखे प्रकार नसतात...हे सगळे श्रीमंतांचे चोसले...

लॉकडाऊन च्या काळात मी जेव्हा हि बाहेर गेलो तेव्हा आसपास ची परिस्थिती पाहत होतो...ग्राउंड लेव्हल ला काय चाललं आहे त्याचा वेध घेत होतो...काही स्वयंसेवी संस्थांनी, धार्मिक संस्थांनी, राजकारणी लोकांनी कित्येकांना डबे पुरविण्याच काम केलय...तरीही ते प्रत्येक घटकापर्यंत पोचू शकले नाहीत हे तेवढंच खरं...यात हि काही लोकं फक्त फोटो सेशन साठी हि उठाठेव करत होते...अडचणी च्या काळात हि प्रसिद्धी चा मोह थोपवता आला  नाही अनेकांना...मदतीचा गवगवा करायचा नसतोच...पण कोण सांगणार त्यांना? लोकांची गरिबी  हि या लोकांच्या पत्थ्यावर पडते...त्यात हि ते स्वहित शोधत असतात...
आपण जो पर्यंत या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तो पर्यंत शाश्वत विकास म्हणता येणार नाही. तुम्ही कुठल्या हि विचारधारेचे असा....हे दृश्य तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही....
या देशातील प्रत्येक घटक जोपर्यंत आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होत नाही तो पर्यंत विकासाच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही.......
हजारो कोटी खर्चून बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प आणणार..त्याची प्रसिद्धी करणार ...पण ती कुणासाठी? सामान्य माणूस तो खर्च करू शकतो? मुठभर लोकांसाठी सुविधा निर्माण करून काय करणार? इकडे बहुसंख्य लोकं अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत पिढ्यान-पिढ्या...त्या आर्थिक गर्तेतून ते अजूनही बाहेर निघाले नाहीत....
डिजिटल इंडिया ची स्वप्ने बघताना Poverty फ्री इंडिया हि प्रत्यक्षात आणायला हवं...मंगळ , चंद्र च्या वार्या   सुटल्या तरी चालतील...पण या मातीत जन्मलेल्या लोकांना सुखानं तर जगू द्यायची व्यवस्था करा...फुकटात देऊ नका पण रोजगाराच्या संधी तर निर्माण केल्या जाऊ शकतात...
त्या त्या भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी आवश्यक ती सरकारी पाऊलं कधी पडली नाही...ठराविक शहरांचा विकास करण्याच्या नादात त्यांची हि अवस्था वाईट झाली...लोकसंख्या झेपवत नाही शहरांना...सुविधा पुरविल्या जात नाहीत...रोजगारानिमित्त शहरी भागात जाणारे लोकं आणि ओघाने वाढणार्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणं...प्रश्न अधिक आणि उत्तरं कमी...अशी अवस्था...
लॉकडाऊन च्या निमित्ताने मजुरांचे लोंढे गावाकडे परताना पाहिले...गावाकडेच जर रोजगार निर्मिती झाली तर त्यांना शहरात जाण्याची गरज पडणार नाही...कित्येक गोष्टी टाळता येऊ शकतात...पण सरकारी अनास्था कशी घालवाल हा प्रश्न... जागतिकीकरणानंतर मुख्य प्रवाहातून दूर फेकल्या गेलेल्या कामगारांच्या बाजूने कुणीच लढत नाही... कामगार चळवळी नेस्तनाबूत झाल्यात....आता त्या कुठेही दिसत नाही... असंघटीत क्षेत्रातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत...त्यांना कुणीही वाली नाही...नेतृत्व नाही त्यामुळे शासन दरबारी त्यांचे प्रश्न पोचत नाही...ज्यांनी पोचवायचा प्रयत्न केला ते नेते होऊन गब्बर झालेत...आणि त्यांनी यांना वार्यावर सोडलं...
मध्यंतरी एका प्रसिद्धी फेम आमदाराच्या मतदार संघात कामानिमित्त जाने झाले...गेल्या १५-२० वर्षांपासून त्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते...पण त्या मतदार संघाची अवस्था वाईट...रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत गोष्टींची हि वानवा...मला राहवलं नाही...मी एका व्यक्तीला प्रश्न केला कि तुम्ही कस काय निवडून देता हो या व्यक्तीला....त्याचं उत्तर फार महत्त्वाचं होतं...ते म्हटले...आमदार साहेब बोलावलं तेव्हा येतात...प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात गरिबापासून श्रीमंतांच्या....लोकं बढाया मारतात...आमच्याकडे आमदार साहेब आले होते लग्नात/कार्यक्रमात...लोकं यातच खुश आहेत...
“गरिबी हटावो” पासून “अच्छे दिन” पर्यंत व्हाया “इंडिया शायनिंग” चा प्रवास झालाय आपला....प्रत्येकानं या दुर्लक्षित वर्गाला स्वप्ने दाखविली...प्रलोभने दिली... त्यांची मते मिळवली...राजकीय फायदा करून घेतला...पण गरिबी हि हटली नाही...आणि अच्छे दिन हि आले नाहीत....खरं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा कायापालट कधीच झाला नाही... शेवटी “आत्मनिर्भर” व्हा असं सांगून आपण मोकळे...
P.S.
नेल्सन मंडेला यांनी म्हटलंय...
“Poverty is not an act of Charity; it is an act of Justice”

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव


Monday, June 1, 2020

परीक्षेची परीक्षा...


गेल्या कित्येक दिवसांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल चर्चा सुरु होती....काल तो प्रश्न मिटला....परीक्षा रद्द झाल्या आणि सरासरी च्या आधारावर गुण देऊन निकाल जाहीर करण्याचं ठरलं...यावर चर्चा होत राहील...योग्य कि अयोग्य यावर उठसुठ कुणीही बोलत राहील...
परीक्षा....शिकायला लागल्यापासून परीक्षा आपल्या मागे लागल्या....त्यात मिळणारे गुण यावर आपली गुणवत्ता ठरायला लागली...त्यातून हुशार, साधारण, ढ...अशा कॅटेगरी निर्माण झाल्या...आपली परीक्षा पद्धती चा विचार केला तर घोकंपट्टी...पाठांतर....च्या आधारावर केलेली चाचणी असं म्हणता येईल...आपण सर्वच हे करत आलो...करतोय...
पुस्तकी शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण यातला फरक प्रचंड आहे. मार्केट मध्ये किती गुण मिळाले हे कुणी विचारात नाही. तुम्ही काय शिकलात...त्याचा कसा उपयोग करू शकता यावर सर्व काही अवलंबून...
मग एखाद्या सेमिस्टर ची परीक्षा रद्द झाली तर काय फरक पडतो...परीक्षा महत्त्वाची कि जीव?....
कधी नव्हे तसं संकट उभं ठाकल आहे...त्यामुळे जीव धोक्यात घालणे परवडणारं नाही...
...असंही आपल्याकडे परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्याचं मुल्यांकन करणारे शिक्षक याचा कुठेही ताळमेळ नाही...
परीक्षा पद्धती म्हणजे भूलभुलैया...कागदपत्री शंभर टक्के दिसत असले तरी व्यावहारिक जीवनात त्याचा काहीच उपयोग होत नाही...
या परीक्षेचा एक प्रसंग:
माझ्या एका मित्राची गोष्ट...पदवी चं शेवटच वर्ष होतं...एकूण सहा विषय...वार्षिक परीक्षा होती तेव्हा...स्पेशलायझेशन चे चार विषय आणि दोन ऐच्छिक... स्पेशलायझेशन च्या विषयांचा प्रोब्लेम नव्हताच...सातत्याने अभ्यास असायचा...पण ऐच्छिक विषयाकडे त्यानं वर्षभर ढुंकून हि पाहिलं नाही....वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हा प्रत्येक पेपर साठी एक-दोन दिवस gap होता....त्यामुळे त्याने ठरवलं कि तेव्हाच अभ्यास करायचा...त्याचे ऐच्छिक विषय भूगोल आणि राज्यशास्त्र.... स्पेशलायझेशन चे चार विषय आणि भूगोल यांचे पेपर चांगले गेले...शेवटच्या पेपर साठी दोन दिवस अवधी होता...syllabus पाहून त्या दिवशी तो ग्रंथालयात गेला आणि राज्यशास्त्र विषयाशी सबंधित एक-दोन पुस्तके घेऊन आला. जाड-जुड पुस्तके....आठ विचारवंत होते अभ्यासक्रमात.....कार्ल मार्क्स, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी वगैरे वगैरे....
वाचायला घेतलं तर हे विचारवंत काही डोक्यात घुसेना...हे करू कि ते करू...कुठल्या विचारवंता पासून सुरुवात करू ....त्यात एक दिवस असाच निघून गेला. दुसर्या दिवशी रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती...त्याने ठरवलं कि आठ पैकी फक्त चार विचारवंत अभ्यासायचे....चार सोडून द्यायचे...ते ठरवताना त्याने मार्क्स सारखे समजायला कठीण सोडून दिले....जे समजायला सोपे होते फक्त तेच अभ्यासले...म्हणजे महत्त्वाचे विचारवंत ज्यावर हमखास प्रश्न येतात असे सोडले आणि कसे-बसें उरलेले चार विचारवंत अभ्यासून तो परीक्षेला गेला...प्रश्नपत्रिका जेव्हा हातात आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि ज्याचा त्याने अभ्यास केला आहे त्यावर फक्त पंधरा मार्क चे प्रश्न आहेत आणि उरलेला पेपर जे अभ्यासले नाही त्यावर.... तारांबळ उडाली त्याची....काय करावं ते सुचेना....आयुष्यात पहिल्यांदा असं घडलं होतं.....करून घेऊ...एक दोन-दिवसात होऊन जाईल अभ्यास....हा अतिआत्मविश्वास, निष्काळजीपणा अंगलट आला होता....
...पंधरा मार्कांचा पेपर सोडवून झाल्यावर त्याने ठरवलं कि जे विचारवंत अभ्यासले आहेत त्यांचीच माहिती इथे लिहायची फक्त नावे बदलून...म्हणजे गांधींचे आर्थिक विचार अभ्यासले असतील तर मार्क्स च्या नावाखाली खपवायचे...तेच नाही तर स्वतःला जे वाटते ते या विचारवंतांच्या नावाखाली खपवायचे.....संपूर्ण पेपर त्याने असाच सोडवला...एक-दोन पुरवण्या लावल्या आणि बाहेर पडला.....निकाल लागेपर्यंत जीव टांगणीला लागला....आपला पेपर जर वाचला तपासनार्याने तर दहा-बारा गुणांच्या पलीकडे मिळणार नाहीत....दिवसामागून दिवस जात राहिले....जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा त्याला त्या विषयात शंभर पैकी ८१ गुण होते....त्याला हि धक्का बसला...हीच का ती परीक्षापद्धती? मग हे जे मूल्यमापन होते ते खरं आहे कसं मानायचं....अमुक पहिला...तमुक पहिला...ऐंशी टक्के...नव्वद टक्के...सारं भुलभुलैय्या...
अभ्यास करून जेवढे गुण कधी मिळाले नाहीत तेवढे गुण मिळालेत...कसा विश्वास ठेवावा या व्यवस्थेवर...या परीक्षा पद्धतीवर...मुल्यांकन करणारे काय करत असतील यावरून समजेल....
प्रथम क्रमांक मिळवणारे, ढीगभर टक्के मिळवणारे  कुठे लुप्त होतात हे कधीच समजल नाही... रट्टे मारणारी मंडळी उत्तम गुणांनी पास होते...एवढं मात्र खरं...

...ज्यांना कमी गुण मिळतात त्यांना येणारं नैराश्य ...त्यातून निर्माण होणार्या मानसिक समस्या याकडे हि लक्ष द्यायची गरज आहे.
त्यामुळे टक्केवारीच्या या प्रवाहात अडकून न पडता काय गरजेचं आहे यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे...
आपली परीक्षा पद्धती च आरोपीच्या पिंजर्यात आहे...त्यात बदल गरजेचा आहे...काही प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत...केस स्टडी, ओपन बुक टेस्ट हा त्यातील एक प्रकार...
शिकलेलं समजलं पाहिजे...त्याचा दैनंदिन जीवनात वापर करता आला पाहिजे असा व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन बदल व्हायला पाहिजेत...
पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी हा प्रकार बंद व्हायला हवा...पालकांनी गुणांच्या मागे न लागता कौशल्य वाढीकडे लक्ष द्यायला पाहिजे...
त्यामुळे परीक्षा रद्द झाली काही फरक पडणार नाही...ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत त्यांना प्रचंड वाव आहे...
काही तथाकथित विद्यार्थी संघटनांना न जुमानता सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घेतला हे बरं झालं....


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव


Monday, May 25, 2020

कोरोना...गरिबी...आणि साथीचा रोग...


कोरोना.....ओघाने येणारं lockdown.....वाटेल तिकडे भ्रमंती करणारे अचानक घरात बंदिस्त केल्या गेले.....वेळ कसा घालवायचा म्हणून सोशल मेडिया वर विविध टास्क/challenge येऊ लागले.........
...................वेगवेगळे पदार्थ (केक, ढोकळा, इडली, पोहे, मटन/मासे....) बनवून स्टेटस यायला लागले, आज हे ..उद्या ते....साड्या घालून सेल्फी टाकून झाल्या, टक्कल केलेली फोटो टाकल्या गेले, मेक-अप विना चा सेल्फी चा टास्क हि येऊन गेला...कुणी लिखाण केलं, कुणी गाणी गायली, स्त्री-पुरुष यांच्या कामांची आदलाबदल करून झालं…......lockdown संपल्यावर मी कुणासोबत जेवणार, कॉफी घेणार सारखे ट्रेंड आलेत.........कुणी फेसबुक लाइव येऊन भाषण ठोकायला लागलं...प्रतिकारशक्ती कशी वाढवायची......मास्क कसा बनवायचा....खान-पान कस असलं पाहिजे चे उपदेश....तणावमुक्त जीवन कसे जगायचे तसेच योगा/व्यायाम चे  व्हिडीओ उपदेश...........फेसबुक/टीक-टोक/इंस्ताग्राम/ट्विटर  वर अशा व्हिडीओ/पोस्ट/स्टेटस चा पाऊस पडला....वेबिणार, झूम अशी किती मोठी लिस्ट....हेच काय तर चड्डी कोण धुणार हा वाद हि विकोपाला गेला...चर्चा झडल्या....
हे सारं करत असताना आपल्या आसपास काय सुरुय याचा गंध आपल्याला कधी आला नाही....समजला नाही किंवा काही देणेघेणे नाही म्हणून सोडून दिलं असेल कदाचित...मग्न आहोत आपण आपल्या प्रपंचात....
चायना मधून आलेल्या कोरोना ने हाहाकार केला.... सार्या जगात. लॉकडाऊन ने संपूर्ण जग स्तब्ध झालं...विकासाच्या गप्पा किती हि करा , निसर्गानं ठरवलं कि सारं समाप्त...या निमित्तानं मानवी बुद्धी ची मर्यादा उघडी पडली...
शास्त्रज्ञ, डॉक्टर सारे कामाला लागले...औषध सापडेल...लस येईल ... कोरोना निघून हि जाईल...पण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे कधीच सापडत नाहीत....कदाचित सापडणार हि नाही.................
कोरोना चं जेव्हा भारतात संक्रमण सुरु झालं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तर लोकांनी टिंगल-टवाळी सुरु केली...राजकीय नेत्याच गो करोना गो पासून ...मिम्स, जोक्स चा भडीमार झाला....नन्तर हेच लोकं त्याला जातीय रंग देण्यात गुंतले...हि लोकं कोण तर बहुतांशी सुशिक्षित. कारण गरीब लोकं समाज माध्यम वापरत नाहीत. कुठलाही आजार धर्म पाहत नाही ऐवढं साध logic आपल्याला कळू नये हि या देशाची शोकांतिका....
कोरोनामुळे सगळ्यात जास्त बाधित/प्रभावित तर गरीब लोकंच...पगारदारांना चिंता नाही....महिना झाला कि पगार खात्यात येतो...
गरिबी ...कित्येकांच्या पाचवीला पुंजलेली....जन्म झाला तेव्हापासून संघर्ष सुरु.....कुणी किती प्रयत्न केले निर्मूलनाचे.....करोनाच्या निमित्ताने शेकडो किमी पायी चालणारे मजूर पाहिले...लहान लहान मुलं पाहिली....कुणी त्यांची मदत केली? पोकळ घोषणा झाल्या...प्रसिद्धी झाली...पण मदत पोचली का?   
काय ती इच्छा शक्ती...जी साधं जगू हि देत नाही आणि मरू हि देत नाही...चालण्याशिवाय पर्याय नाही...पायी चालताना भुकेने मृत्यू झालेले पाहिले...अजून काय पाहणार?......जमेल तसं करून लोकं घराच्या दिशेकडे निघाले....कुणी पायी, कुणी सायकल वर.......त्या दृश्यांच्या बातम्या झळकल्या....आर्थिक महासत्ता बनू पाहण्याचं स्वप्न किती तकलादू आहे हे समजल असेलच...जे राष्ट्र स्वतःच्या लोकांचं जीवनमान उंचावु शकत नाही, आणीबाणी च्या परिस्थितीत त्यांची मदत करू शकत नाही, लोकांकडून देणगी गोळा करण्याचं आवाहन करते......प्रगती कशी म्हणता येईल?
जीडीपी वाढला, वाढतोय हा आकड्यांचा खेळ...गरिबांना आकडेमोड येत नाही....पोटाची भूक सर्वात महत्त्वाची...हीच ती भूक...जी काहीही करायला भाग पडते....जगण्याचा संघर्ष म्हणा, नशीब म्हणा कि अजून काही....पण याला सामोरे कसं जायचं याचं नियोजन कुणाकडेही नाही..............   
हात मजूर, कामगार यांचे हाल आपण सर्व पाहतोच आहे. हाताला काम नाही... पोटाला भाकर नाही...तूच सांग देवा काय करावं या लोकांनी....
..........घंटानाद झाला, दिवे लावून झाले, आत्मनिर्भर व्हा असा सल्ला देवून झालं, package ची घोषणा झाली..........पण या या गरिबांच्या आयुष्यात उजेड पडला का, मदत पोचली का? .....याचं उत्तर नाही असंच आहे....तरी आम्ही हे करतोय, ते करतोय याचा ढोल पिटवत राहायचा....हे करणार...ते करणार ची आश्वासने....आकडे फेकत राहायचे....इतक्या लोकांना घरी पोचवलं,.....इतके पैसे गरिबांच्या खात्यात टाकले........इतके अन्न-धान्य वाटप करण्यात आले...... स्थलांतरित मजुरांसाठी एवढ्या ट्रेन तयार आहेत वगैरे वगैरे..........आणि बिकाऊ मेडिया ने त्यांच गुणगान करायचं...........आकडे....आकडे आणि फक्त.......... आकडे.........संवेदना बोथट होत चालल्याचं ते लक्षण...
मन कि बात असो कि फेसबुक लाइव”……………....शब्दांनी पोट भरत नाही....................भुकेल्या पोटी मनोधैर्य वाढत नाही हे कुणी सांगावं?
………..खर्या अर्थानं गरिबी दूर करावी असं कुणाला वाटलं नाही.....त्यावर राजकारण मात्र होत राहिलं............ कोरोना आज ना उद्या जाईल...पण गरिबीचं काय/ ती कशी घालवाल...याचं उत्तर कुणाकडेही नाही.
कोरोना ची साखळी मोडावी म्हणून उपाय योजना सुरु आहेत.............कधी गरिबी ची साखळी मोडावी असं वाटलं....नाहीच..................... .
स्वातंत्र्यापासून समित्या वर समित्या स्थापन होत राहिल्या...योजना येत राहिल्या....कागदपत्री हजारो कोटी खर्च झाला....पण गरिबी काही दूर झाली नाही.............
कोरोना हा साथीचा आजार भयानक आहे पण त्यापेक्षा गरिबी हा साथीचा आजार जास्त भयानक आहे. त्यातून कसं वाचायचं?.................

सरकार कुणाची असो गरिबांच्या आयुष्यात कधी बदल झाला नाही. परंपरागत तसंच आहे...............गरिबी सारखा महाभयानक साथीचा रोग आजपर्यंत आला नाही.......पण त्यावर उपाय करावा...निर्मुलन करावं असं कुणाला वाटलं नाही.....
मुठभर लोकांकडे अगणित पैसा तर एकीकडे बहुसंख्य लोकांची दोन वेळेस च्या जेवणासाठी चाललेली धडपड....किती हि विषमता......
लोकांना करोना चं गांभीर्य नाही असं कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं...त्या लोकांचं जीवन पाहिलंय कधी...कामाला जातो तेव्हा घरात स्वयंपाक होतो ...या lockdown मुळे काम नाही....तर दाम नाही. कसे घरात थांबणार लोकं? बाहेर पडणारच...पोटासाठी....घरात असलेल्या मुलाबाळांसाठी.... चांगल्या पगारावर असलेल्या किती लोकांनी मदत केलीय गरजूंना? ....
याचं गरिबांच्या आयुष्यावर लिखाण करून लोकं नामवंत पत्रकार झाले, लेखक झाले आणि बक्कळ पैसा कमवू लागले...त्यांच्या प्रश्नांवर आंदोलनं करून सत्ता मिळवणारे हि अनेक.............................................आताही तसंच होईल...................................lockdown मुळे लोकांचे कसे हाल झालेत यावर पुस्तके येतील....वर्तमानपत्रात लेख येतील...कथा-कादंबर्या-कविता लेखन होईल, टीव्ही channel वर गप्पा  झडतील....पण पुढे काय? हीच लोकं खरे लाभार्थी...मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाणे ते हेच...
या lockdown मुळे लोकं कोरोना पासून वाचतील पण त्यांना  भुकेपासून कोण वाचवणार? हा अनुत्तरीत प्रश्न................गरिबांच्या नशिबी गरिबी....गरिबी आणि फक्त गरिबी....


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव