Friday, December 4, 2015

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग-८

पुण्यात येऊन दोन-तीन  वर्षे झाली होती. पुढे काय करावे हे कळत नव्हतं. नेट/सेट काही पास होईना. एमफिल ला प्रवेश मिळाला.  अभ्यास सुरूच होता. त्यावेळेस मी पत्रकारिता सुद्धा करत होतो. नवीन बाईक घेतलेली होती. त्यामुळं विद्यापीठाबाहेर चं पुणे अनुभवणं सुरु होतं.  पुणे परिसर तसा पाहण्यालायक.  आसपास भरपूर निसर्गरम्य ठिकाणं, किल्ले, मंदिरे आहेत. एम ए ला असताना काही फिरता आलं नाही. आणि आता तर रिकामा च होतो. विद्यावेतन मिळत होतं एम फिल चं. पैश्याचा प्रश्न मिटला होता. संशोधन करण्यासाठी विद्यावेतन दिलं जातं. संशोधन काय ते मला अजूनही कळलेलं नाही. तरी पण मी ते केलं. खरं तर फक्त विद्यावेतन आणि राहण्यासाठी साठी एम फिल ला प्रवेश घेतला जातो. यावर कुणाचंही दुमत असणार नाही.  मित्र मंडळी हि वाढली होती. विभागाव्यतिरिक्त मित्र मिळाले होते.  

असंच एकदा तोरणा गडावर जायचं ठरलं. रविवार ला सकाळी च आम्ही सगळे (नामदेव सर, चोथवे सर, शिवाजी सर, सुनील सर ) विद्यापीठाच्या बाहेर पडलो.  मी आणि चोथवे सर इंग्रजी विभागाचे तर इतर सगळे राज्यशास्त्राचे.  कुठं आणि कसं जायचं हे ठरलं होतं. पुण्याबाहेर आल्यानंतर तोरणा च्या दिशेने आम्ही सगळे निघालो होतो. दोन-तीन गाड्या होत्या. मध्ये एका ठिकाणी चहा घेतला. त्यावेळी पवार सर म्हटले तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवतो. मी म्हटलं हरकत नाही. पवार सर तसे नवखे. नुकतीच गाडी शिकले होते. मी हि बिनधास्त बसलो . आणि आमचा प्रवास सुरु झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. टिंगल टवाळ्या तर नेहमीच्याच.  राजकारण, समाजकारण, विद्यापीठ अशे कित्येक विषय चर्चेत येत होते.

पुढे एका वळणाला पवार सरांना गाडी वळवता आली नाही आणि आम्ही दोघेही गाडीवरून पडलो. नाल्यावर पूल होता. मी मागेच उडी मारली. पवार सर पुढे जाऊन पडले तर गाडी पुलावरून खाली पाण्यात.  बोलण्याच्या ओघात आणि कळण्याच्या आत नेमकं काय झालं ते क्षणभर कळलंच नाही. मी पवार सरांकडे गेलो आणि तुम्हाला जास्त लागल नाही नाही असं विचारत होतो. मी काय विचारतो आहे यावर त्यांच लक्षच नव्हतं. ते गाडीकडे पाहत होते. सचिन गाडी नवीन आहे. काही झालं तर नसेल न? असे अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली. मी म्हटलं ते जाऊ द्या हो. तुम्ही ठीक आहात का ते सांगा आधी. त्यांना फार टेन्शन आलं होत. गाडीचं काय झालं असेल आता. गाडी पाण्यात पडलेली होती. वर काढायची कशी त्यावर विचार करत होतो. इतर मित्रांना फोन करतो तर लागत नव्हता. कव्हरेज चं नव्हतं. समोरून येणाऱ्या  एका  व्यक्तीला थांबवलं. त्याच्या मदतीने गाडी वर काढली. आणि त्याच्याच मोबाईल वरून फोन लावला. सुदैवाने बीएसेणेल ला रेंज होती आणि आम्ही मित्रांना मागे बोलावलं. सगळेच टेन्शन मध्ये. मी गाडीकडे पाहिलं तर समोरचा भाग उद्धवस्त. तरी मी किक मारून पाहिली तर गाडी सुरु झाली. म्हटलं जाऊ द्या आता. आधी गडावर जाऊ आणि संध्याकाळी गाडी दुरुस्त करू.

आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. तोरणा ची चढाई सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्‍यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तोरणा म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. तोरणा अत्यंत बिकट गड आहे. ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे,  तटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे सौंदर्य. किल्ल्यावर मेंगाई देवी चं मंदिर आहे. वेळेअभावी तिथला सूर्यास्त आम्ही पाहू शकलो नाही. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो.




तोरणा किल्ला फिरून झाला आणि राजगडाच्या पायथ्याशी पण जाऊन आलो. भरपूर मौज मस्ती केली. तरी गाडीचं किती नुकसान झालं असेल याचा विचार डोक्यात अधूनमधून येत होताच. परतल्यानंतर गाडी सरळ शोरूम ला दिली कारण त्यास्थितीत बाईक मला विद्यापीठात न्यायची नव्हती. पवार सर दवाखान्यात गेले. नाही म्हटलं तरीही त्यांनी मला पैसे दिलेच दुरुस्त करायला खर्च आला म्हणून. मला ते घ्यायचे नव्हतेच. पण घ्यावे लागले. वस्तू मध्ये माझा जीव कधी नव्हताच आणि अजूनपण पण नाही. अपघात होतात आयुष्यात. ते काही ठरवून होत नाही. पण आम्ही सुखरूप होतो. आणि तेच महत्त्वाचे होते आणि आहे. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. त्या छोट्या अपघातामुळे आमच्या आनंदावर मात्र काही फरक पडला नाही.
माणसाचं सामाजीकरण होण्यात अश्या भटकंतीचा खूप फायदा होतो. मला हि तो झालाच. एका ठराविक चौकटीतून मी बाहेर येत होतो. समोरच्या व्यक्ती मध्ये चांगलं काय हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याआधी मी मानसं कधी जोडली नाहीत. माझा मित्र मला नेहमी म्हणायचा  कि  तू  destructive आहेस. तुला मानसं जोडता येत नाहीत. कारण माझा स्वभाव फार विचित्र होता. पण काळाच्या ओघात मी बदलत होतो. अपयश मला खूप काही शिकवून गेलं. म्हणूनच या सगळ्या मित्रांशी मी जोडलो गेलो. आमचे संबंध पूर्वी फार काही चांगले नव्हते. नंतर मी संबंध सुधारत गेलो. मानसं जोडण्याचा प्रयत्न केला. अपयशाच्या काळात याच लोकांनी आधार दिला.  खरं तर अपयश कसं पचवावं हे पवार सरांकडून शिकलो. चोथवे सर माझे सिनिअर असून पण माझ्याशी जुळवून घेतलं. सोबत अनेक क्षण घालवलेत. सुनील सर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. नेहमी हसत खेळत असायचे. त्यांच्या सोबत ट्रीप ला जाण्याची मजा काही औरच. जीवन फार मोठं आहे. वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी व्यक्तिमत्त्व भेटत राहतात. कित्येक आपण विसरून जातो पण काही मात्र लक्षात राहतात त्यांच्या वेगळेपणाने.

योगायोग असं कि काल परवा पवार सरांचा फोन आला त्यावेळी मी याच trip चे फोटो पाहत होतो. औपचारिक गप्पा झाल्या .कुठं, काय, कसं ने सुरु होणारे प्रश्न हि झालेत आणि उत्तरं हि झालीत.  नाहीतरी आजकाल प्रश्नही हि ठरलेले आणि उत्तरही हि. संभाषण संपल्यानंतर नकळत भूतकाळात गेलो. काय घडलं होतं ते शब्दात आणण्याचा प्रयत्न केला.
हे आर्टिकल या सगळ्या मित्रांची आठवण म्हणून......

सचिन भगत

Wednesday, December 2, 2015

निरर्थक पण अर्थपूर्ण शहाणपणा...

वाकड्यात शिरायला फार हौस. नेहमी वेगळ काही करायचं. एखाद्या कातरवेळी नदीकिनारी बसून पाण्याचा तो प्रवाह पाहायचा. त्यातलं ते जीवंतपण अनुभवायचं. इच्छा झालीच तर पाण्यात एखादी डुबकी मारून सगळी पाप वाहून गेल्यागत श्वास सोडायचा.
बाजू नसताना चौकोन बनवायचा कसा? दुभंगलेल्या बिंदुना जोडायचा कसं? चौकोन होण्यापूर्वीच बिंदू वेगळे झालेत. प्रत्येक बिंदूने आपली दिशा बदलली.
पूर्वी काहीपण बोललो तरी कुणाला फरक पडत नव्हता. पण काय ना प्राध्यापक हा शब्द नावाआधी लागला आणि प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. मग त्यातून सुरु झाला दूर जाण्याचा प्रवास. मान सन्मान या गोष्टी मोठ्या व्हायला लागल्यात. फेसबुक वर ची टिप्पणी हि अयोग्य वाटायला लागली. कारण आपण निष्पाप आहोत, सुसंस्कृत आहोत हे जगाला दाखवायचं असते.  चांगली प्रतिमा तयार करायची असते. अशी प्रतिमा जी कधी नसतेच. वरून कितीही कपडे चढवले तरी आत काय असते ते सगळ्यांना माहित असतेच. सगळे एकच माळेचे मनी. तरीपण मी नाही त्यातला ची धडपड काही थांबत नाही. इतरांचं प्रेम टिंगल टवाळी चा विषय. म्हणून हनुमान पासून गुबगुब पर्यंत विशेषणे शोधून झालीत.
प्रेमात काय काय नाही करत लोकं. स्वतःला फार तत्त्वनिष्ठ समजणारे लोक शरण गेलेत. नुसते शरण च गेले नाहीत तर त्यात वाहून गेलेत  आणि अस्तित्व गमावून बसलेत. ती नाही तर कोणीच नाही इथपर्यंत मजल. कुणी सोन्याची चेन भेट म्हणून दिली तर कुणी महागडा मोबाईल फोन घेऊन दिला. अशा ऑफर्स जोरात आहेत. लव यु, मिस यु सारख्या संदेशांनी इनबॉक्स फूल होताहेत. रोज सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग करणारे हि पाहिलेत. कधी मित्रांना केल नाही पण तिला फोन मात्र नक्की. एवढं सगळं करून नैतिकतेचे आव आणायचे. मग प्रश्न येतो तो आजवरच्या टीका-टिप्पणी चा. कदाचित झालं गेलं गंगेला मिळालं असंही म्हणता येईल. पण गंगा कुठं पवित्र राहिलीय आता. गंगा तर कधीच मैली झाली. जिथं सगळंच कलुषित झालं तिथं गंगेला पुन्हा तेच वैभव प्राप्त करून देणं अवघडच ना.
एक चौकोन बनवायचा होता. बिंदूंची जुळवाजुळव सुरु होती. तीन बिंदुंच्या सहाय्याने चौकोन बनवायला निघालो होतो पण काय झालं कुणास ठाऊक. आधी स्पष्ट दिसणारे बिंदू अस्पष्ट दिसायला लागलेत. तीनही बिंदू जवळ च होते. चौकोन बनवण्याची अपेक्षा प्रत्यक्षात येणार अस वाटत होतं एका बिंदूची कमतरता असूनही. पण सगळे बिंदू एखाद्या वाऱ्याच्या आघाताने/वेगाने दूर फेकल्या गेलेत ते पुन्हा कधी हि जवळ न येण्यासाठीच. आता ते बिंदू जवळ येणार हि नाहीत एवढं अंतर वाढलंय. प्रत्येक बिंदू ने एक आडोसा/आधार घेतलाय कसलातरी स्वतःच तथाकथित अस्तित्व टिकवण्यासाठी. अस्तित्व जे कधीच नव्हते. अस्तित्व म्हणजे नेमकं काय? निर्माण केलेलं कि निर्माण झालेलं?  आणि अस्तित्व नसलंच तर जगता नाही येत? मानलं तर सगळं आहे नाहीतर काहीच नाही. मग नेमकं करायचं काय? कुणीतरी म्हटलंय माणूस आशेवर जगतो. पण नाही माणूस आशेवर जगत नाही तर अपेक्षेवर जगतो. आशा नेहमी निराशेकडे घेऊन जाते आणि अपेक्षा अपेक्षाभंगाकडे. आणि आपण हि जातोच कसलाही विचार न करता. पण आपण तर तिथेच असतो....हो ना?
माणूस बदलला कि संवाद बदलतो. किती ढोंग करतो न आपण.  पण त्या चौकोनापेक्षा वर्तुळ परवडलं न. आपलं जीवन नाही का त्या वर्तुळासारख झालंय. फिरून झालं कि आपण येतो आपल्या मूळ जागी. अर्धा ग्लास रिकामा कि भरलेला यावरून कुठं दृष्टीकोन समजतो का? राहणीमान बदललं म्हणून विचार बदलतात का? बी पॉझीटीव्ह म्हटल्याने खरंच आपण पॉझीटीव्ह होतो का? नाहीच होत....मग हि धडपड कशासाठी? काटेरी झाडांना कुंपणाची गरज काय? बाकी काय तर शून्य....सुरुवात हि तिथेच आणि शेवट हि तिथेच...
थोडक्यात पण महत्त्वाचे: कुणीही वैयक्तिक घेऊ नये. सगळं काल्पनिक आहे. साधर्म्य असल्यास योगायोग समजावा.

सचिन भगत

Friday, January 2, 2015

लपंडाव...


२०१४ हे वर्ष फार काही लाभदायक ठरलं नाही. अपवाद फक्त एका गोष्टीचा. नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण नेहमी नवीन संकल्प करतो. आजपर्यंत  मी पण हेच केलं. या वर्षी मात्र मी कुठलंही संकल्प केला नाही. जशी परिस्थिती येईल तसं जगायचं ठरवलं. म्हणून कुणाला संदेश पाठवला नाही कि फोन केला नाही. नवीन वर्ष सुरु झालं म्हणून जीवनात कुठं काय नवीन घडणार आहे. मागील वर्षाचा विचार केला तर पुष्कळ गोष्टी सांगता येतील.  मात्र प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगता येणार नाही.
या वर्षात काही जवळची मित्र दूर झालीत. मना-मनांमधील दुरावा वाढला. तो नाहीसा होनेपण शक्य नाही. आणि मला नाहीसा पण करायचा नाही. एखाद्या नात्यामध्ये मन गुंतवण पण सोडून द्यायचं ठरवलंय. चूक माझीही असेल किंवा आहेच. पण मला तसंच जगायचं आहे. आणि मी पण मन घट्ट केलंय. मुक्तपणे जगायचं ठरवलंय. कुठंही मन गुंतवायच नाही. व्यावहारिक जीवनात भावनांना जागा नाही. (“Feelings have no place in practical life.”)

खोटं बोलणारी लोकं हि पाहिलीत. अपेक्षित लोकांकडून अनपेक्षित गोष्टी घडताना पाहील्यात. कधीही खोटे न बोलणारे लोकंही  खोट बोलायला लागलेत. त्याचाच जास्त त्रास झाला. त्यामुळे मी संवाद हि सोडलाय. फोन उचलणे हि सोडून दिलेत. आणि फोन करणे तर दूरच.
आश्वासनांपलीकडे काही मिळालं नाही. गरजेच्या वेळी पाठ फिरवणारे लोक हि बघितलेत. पैसा माणसाला बदलवतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. शेवटी प्रश्न हि आपलेच आणि उत्तर हि आपल्यालाच शोधावं लागणार. खरं तर समोर येणारी प्रश्न आणि त्यांचे उत्तर शोधण्यात आपलं जीवन खर्ची पडते. प्रश्न आणि उत्तर याचा लपंडाव सुरु असताना आपण फक्त बघत राहतो.

गरजा मर्यादित करायला हव्यात. आयुष्यात नियोजन हवं. अन्यथा प्रश्न पाठ सोडणार नाहीत. एवढं जरी शक्य झालं तरी अनेक प्रश्न आपोआप नाहीसे होतील. प्रयत्न तर करायला हवा. वाढत्या जबाबदार्या आपल्याला बंदिस्त आयुष्य जगायला भाग पाडतात. मोकळेपणाने जगणे तर दूरच राहिलं. आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचं स्वप्नं तरी कागदावरच आहे. प्रत्यक्षात कधी येईल माहित नाही.
काळाच्या ओघात पूर्वीचे सगळी वाक्ये खोटे ठरायला लागलेत. जस कि A friend in need is a friend indeed, Honesty is the best policy, Failure is the stepping stone to success. त्यात पुढीलप्रमाणे बदल केला तरी हरकत नाही... A friend in need is NEVER a friend indeed, Honesty is the best policy, BUT NOT ALL THE TIME, and Failure is NOT the stepping stone to success, FAILURE IS ALWAYS THE FAILURE and the SUCCESS IS ALWAYS THE SUCCESS, because nobody can understand what one loses when the success gets delayed.

काळ बदललाय...आपणही बदलायला हवे...नाहीतर WHO MOVED MY CHEESE? सारखी अवस्था होईल. नवीन वर्षाचं स्वागत करताना भूतकाळापासून काही बोध घ्यायचा आहे आणि पुष्कळ गोष्टींची पुनरावृत्ती टाळायची आहे. जीवनाच्या लपंडावात एक प्यादा न होता सूत्रधार व्हायचं आहे. ध्येय तर तेच आहे. अपेक्षा आणि अपेक्षाभंग, स्वप्नं आणि स्वप्नपूर्ती, आशा आणि निराशा या सर्व चक्रांमधून स्वतःला बाहेर काढायचं आहे. त्यात कितपत यश मिळेल ते येणारा काळ आणि परिस्थिती च ठरवेल. तसंही आता या सगळ्या गोष्टींची सवय झालीय. अंगवळणी पडलंय सगळं.

नवीन वर्षाच्या जुन्या शुभेच्छा !!!


सचिन भगत