दसरा..सण...परंपरा...उत्सव. चांगल्याचा विजय...वाईटाचा शेवट. असं काहीतरी
नेहमी ऐकत आलोय. जळगाव ला होस्टेल ला असताना ची गोष्ट. पहिलंच वर्ष होतं वसतिगृहात
राहण्याचं. एम. जे. चं वसतिगृह फार मोठं नाही. तीन फ्लोअर...त्यामुळे विद्यार्थी
संख्याही कमी. वसतिगृहात राहणारे आजूबाजूच्या परिसरातील. त्यामुळे सण वगैरे असला
की वसतिगृह रिकामं होऊन जायचं. मोजून दहा-पंधरा विद्यार्थी राहायचे अशा वेळेस. वरचा
फ्लोअर त्या वेळेस मणिपूर कडील विद्यार्थ्यांसाठी राखीव होता. त्यांच्याशी कधी
संबंध यायचा नाही. वसतिगृहाच्या बाजूला कॉलेज ची मेस. कुठलाही सण वगैरे असला की
मेस ला दुपारी फिस्ट...आपल्या भाषेत गोड-धोड वगैरे. आणि संध्याकाळी मेस बंद.
म्हणजे एका वेळी जेवण फक्त. हे काळाच्या ओघात माहित झालं.
झालं असं की दसर्याला मी काही घरी गेलो नाही. दुपारी फिस्ट...संध्याकाळी
जेवणाचा प्रश्न उभा ठाकला. आधीच कमवा आणि शिका या योजनेंतर्गत वसतिगृह. महिन्याला
मिळणारे पैसे जेमतेम...म्हणजे मेस पुरते. खिशात १०-१५ रुपये. बाहेर जाऊन जेवण शक्य
नव्हतं. जेवणासाठी किमान ५०-६० रुपये हवे होते त्यावेळेस. तो जळगावात ला पहिला
दसरा ...त्या पपिलोन ला एक कप चहा आणि दोन रुपया वाला पारले यावर निभावून नेला.
अजून एक मित्र जळगाव जवळचा. नाही म्हणायला कधी कधी त्याच्या घरी जाण्याचा योग
यायचा. ते घर चं जेवण...बासुंदी वगैरे अप्रतिमच.
मी आणि माझा मित्र. आम्ही घरी क़्वचितच जायचो. त्यामुळे कुठलेही सण वार असले की
आम्हाला जेवणाची चिंता लागून रहायची. कारण बाहेर हॉटेल ला जेवण्यापुरते पैसे कधी
नसायचेच. कित्येकदा चर्चा... सणवार नकोतच. पुढे पुण्यात गेल्यावर ही तिच अवस्था.
कित्येक सणवार चहा आणि बिस्कीट वर भागवणे हे समीकरण होऊन गेलं ते कायमचं. लोकांसाठी
सण साजरा करणे...आनंद घेणे...मौज-मजा करणे ई. पण आमच्यासाठी सण म्हणजे प्रश्न. कुठला
आनंद आणि काय?
तेव्हापासून कुठलाही सण असो...त्यात फार आनंद कधीच निर्माण झाला नाही. तो कधी
साजरा ही करावा वाटला नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं. फक्त सण पुरतं मर्यादित
न ठेवता. तेव्हापासून कुठलाही सण असो आम्ही एकमेकांना शुभेच्छा कधीच देत नाही. कधी
द्याव्याशा ही वाटल्या नाही. सणवारचं अप्रूप राहिलं नाही.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव
No comments:
Post a Comment