Wednesday, March 7, 2018

एक अनुभव:


९-१० वर्षांपूर्वीची गोष्ट. मला जॉब हवा होता. आर्थिक चणचण प्रचंड होती. त्यावेळेस मी पुण्यात होतो. दररोज सकाळी ६ वाजता रूम सोडून ग्रंथालयात जात होतो. रात्री ११-१२ वाजता परत यायचं. मग वर्तमानपत्र वाचन. सकाळी वर्तमानपत्र उशिरा यायच. त्यामुळे कधी वाचन व्हायचं नाही सकाळी. एका रविवारी ग्रंथालयात गेलोच नाही. आर्थिक अडचण कशी सोडवायची या विवंचनेत होतो.  ९ च्या आसपास वर्तमानपत्र आलं. ते वाचत असताना एक जाहिरात नजरेस पडली. संशोधन सहाय्यक या पदासाठी. ११ महिन्यांचा कालावधी आणि ११००० रुपये मासिक पगार. जाहिरात वाचून काढली. मुलाखत द्यायची होती फक्त. ठरलेल्या वेळेत मी त्या संस्थेत पोहचलो. एका जागेसाठी तब्बल ३५ लोकं आली होती. प्रत्येकाकडे अनुभव होता. मी तर नवीन. ना अनुभव ना संगणक ज्ञान. जाहिरातीत स्पष्ट म्हटलेलं होतं कि संगणकाच ज्ञान आवश्यक. मी तर कधी संगणक वापरला हि नव्हता. तरीही मी त्या मुलाखतीला गेलो. एवढे सारे उमेदवार असल्याने त्यांनी मुलाखती आधी भाषांतर परीक्षा घ्यायचे ठरवले.  एक मराठीमधील उतारा इंग्रजी मध्ये तर इंग्रजी मधील मराठी मध्ये करायचा. भाषांतर मला बर्यापैकी जमत होतं आणि मी केलंही तसं.
मुलाखती सुरु झाल्या. मी एका कोपर्यात जाऊन बसून राहिलो माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहत. एखाद्याची मुलाखत संपून तो उमेदवार बाहेर आला कि बाकीचे त्याच्या भोवती जमत होते. कुठले प्रश्न विचारले वगैरे ची चर्चा होत होती. मी मात्र शांत होतो. मुलाखतीचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी त्या फंदात पडलो नाही.
जॉब मिळणे तसं कठीण दिसत होतं. माझ्याकडे आवश्यक पात्रता नव्हती. साधारण तास –दीड तासानंतर माझा नंबर आला आणि मी त्या रूम मध्ये शिरलो. चार-पाच लोकं होती तिथे बसलेली. त्यांनी मला बसायला सांगितलं. नेहमी प्रमाणे पहिला प्रश्न होता: स्वतःबद्दल ओळख करून दिली. फार काही इंग्रजी येत नव्हतं पण बोललो ५-७ वाक्य. त्यातला एक जण म्हटला कि तुम्ही कशाला येताय इकड. अभ्यास करा. हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. “नसेल हि सर पण जॉब करणे गरजेचा झालाय”, मी उत्तरलो.
अनेक प्रश्न विचारली गेली आणि मी उत्तरे हि दिलीत. त्या मधली एक व्यकी मात्र शांत होती. त्यांनी मला एकही प्रश्न विचारला नव्हता. शेवटी त्यांच्याकडून प्रश्न आला-तुम्ही जाहिरात वाचली का? “हो”, मी म्हटलं. त्या जाहिरातीचा कागद त्यांनी माझ्याकडे भिरकावला आणि शेवटची ओळ वाचा म्हटले. त्यात लिहिलं होतं.-“संगणकाचे ज्ञान आवश्यक”.
“तुम्ही कुठलाच कोर्स केलेला नाही आणि अनुभव हि नाही”, ते महाशय उत्तरले. काय बोलावं मला सुचेना. पण मी बोललो-सर, ज्या लोकांनी ४-५ कोर्सेस केलेली असतील त्यांच्यापेक्षा मी संगणक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. खरं तर तसं काही नव्हतच.  सुदैवाने त्या रूम मध्ये संगणक नव्हता. हाताळायला लावलं असतं तर पंचाईत झाली असती. माझी मुलाखत संपली आणि मी बाहेर पडलो आणि न थांबता थेट विद्यापीठात गेलो. त्यानंतर जवळपास एक आठवडा उलटून गेला असेल तेव्हा मला त्या संस्थेतून फोन आला. “संशोधन सहायक पदासाठी तुमची निवड झालीय. उद्या या आणि ऑर्डर घेऊन रुजू व्हा”, असं काहीतरी ती बाई बोलली.  मी खुश झालो. समोरचे प्रश्न मिटणार होते.
honesty is the best policy but not always साठी इमेज परिणाम
हे सारं कसं घडलं. रोज ग्रंथालयात जाणारा मी आज गेलो नाही. गेलो असतो तर हि जाहिरात कळली नसती. मुलाखत हि त्याच दिवशी होती. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे दूर होतातच.
एक शिकवण मिळाली-Honesty is the best policy, but not all the time.
मी प्रामाणिक राहिलो असतो तर? मी खरं सांगून टाकलं असतं तर मला जॉब मिळाला असता? नाहीच.
दुसर्या दिवशी मी त्या ऑफिस ला गेलो. ऑर्डर घेतली. एका व्यक्तीने मला कुठं बसायचं ते सांगितलं. मी तिकडे पाहिलं तर त्या टेबलावर संगणक ठेवलेला होता. मी खुर्चीत जाऊन बसलो. काय कराव आता. माझं संगणक ज्ञान शून्य. तो दिवस कसातरी काढला. संध्याकाळी काही मित्रांकडून कसा वापरायचा ते थोडं बहुत एका कफेत जाऊन शिकून घेतलं. पुढचे आठ महिने जर मी काही केलं असेल तर ते फक्त मी आणि संगणक. इतर फार काही काम नव्हतं. कालावधी पूर्ण व्हायच्या आतच मी राजीनामा दिला आणि तेथून बाहेर पडलो.  मन लागलं नाही तिथे. स्वप्न वेगळी होती. ध्येय वेगळंच होतं.

No comments:

Post a Comment