जीवन एक चक्र आहे. प्रत्येक पावलावर ते
आपल्याला अनुभव देत जाते. कधी चांगले कधी वाईट. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं
अनुभव समृद्ध होत जातो. नवीन शिकत जातो. विद्यार्थी दशा प्रत्येकाचा जीवनातला
महत्त्वाचा टप्पा. प्रश्नाचं स्वरूप वेगळ. त्याची उत्तरे हि आपल्याला शोधावी
लागतात. छोटे छोटे प्रोब्लेम ही मोठे बनून जातात. आमची विद्यार्थी दशा म्हणजे चोहोबाजूंनी अडचणी
असलेली. जाईल तिथं समस्या, काही करेल तिथे अडचण. असाच एक अनुभव-
पुणे विद्यापिठात एम.ए. च्या दुसर्या वर्षाला असताना
ची गोष्ट. आमच्या विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ची दोन दिवसीय कॉन्फरन्स आयोजित
केली होती. दुसरा दिवस होता. कॉन्फरन्स
सुरु व्हायला वेळ होता. आम्ही वेळेआधीच तिथे होतो. हिवाळा होता. कोवळ्या उन्हात आमच्या विभागाचे एक प्राध्यापक
महाशय काही महिला प्राध्यापाकांसोबत विभागाबाहेर बसलेले होते. चर्चा सुरु होती
त्यांची. ऐकावं म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. तेव्हा या लोकांचं प्रचंड
आकर्षण होतं. ओळख असल्याने गुड मोर्निंग सर म्हणून चर्चा ऐकू लागलो. त्यांनी ओळख
करून दिली त्या महिला प्राध्यापकांची. विविध विषयांवर चर्चा सुरु होत्या. तू माझं
कौतुक, मी तुझं कौतुक असं चक्र सुरु होतं. साधारण अर्धा तास झाला असेल. आमचे प्राध्यापक
महाशयांनी त्या महिला प्राध्यापकांना चहा घेऊयात असं म्हटले. त्या हो म्हटल्या.
थंडीचे दिवस. चहा कुणाला नकोय? आमच्या
विभागाजवळ च ओपन कॅन्टीन आहे. रस्ता ओलांडला कि कॅन्टीन मध्ये. प्राध्यापक महाशयांनी माझ्याकडे
पाहिलं आणि म्हटले, सचिन, चहा घेऊन ये सर्वांसाठी. मी तेथून निघावं तेच त्यातली एक
महिला प्राध्यापक अरे पैसे घे म्हटली. माझे पाय तिथे अडखळले पण आमचे महाशय उत्तरले, “तो घेऊन येईल. असू
द्या.”
खिश्यात दमडी नाही. सहा लोकं म्हणजे तीस रुपये
हवेत. आता काय करावं? तेथून निघालो आणि कॅन्टीन ला आलो. ४-५ मिनिटे विचार केला. त्या चहावाल्याकडे गेलो आणि म्हटलं “आमच्या ....सरांनी
सहा कप चहा सांगितला आहे. ते नंतर पैसे देतील. तो व्यक्ती उत्तरला, “उन्होने नही
बोला है उनके नामपर कुछ भी देनेका.” “अहो ते बसले आहेत सर तिथे. तुम्ही विचारू
शकता, त्यांनीच पाठवलं आहे मला, मी आत्मविश्वासाने बोललो.” फार विचार न करता
त्याने सहा कप भरले आणि माझ्या स्वाधीन केले. “खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं” या
कधीतरी ऐकलेल्या तत्त्वाचा वापर झाला. खोटं बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. चहा घेऊन
तिथून निघालो.
प्राध्यापक महाशयांच्या चर्चा सुरु होत्या. चहा
दिला. thank you ... thank you आपले
नेहमीचे शब्द कानावर आले. हसत-खेळत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवसाचं
सेशन सुरु होण्याच्या बेतात होतं. त्यामुळे थोड्या वेळाने ते हॉल कडे जाण्यास
निघाले. मला वाटलं, सर नन्तर तरी पैसे देतील. पण तसं काही झालं नाही.
ते निघून गेले. मी त्या रिकाम्या कपांकडे पाहत
बसलो बराच वेळ. कॅन्टीन वापस न्यावेत कि नाही? पैसे मागितले तर काय बोलायचं? विविध
प्रश्न होते डोक्यात. शेवटी मी ते कप उचलले आणि कॅन्टीन ला एका कोपर्यात ठेऊन आलो
त्या चहावाल्याची नजर चुकवत. पुढचे पंधरा दिवस मी कॅन्टीन कडे फिरकलो ही नाही.
तसंही आमचे प्राध्यापक महाशय आणि महिला हे काही
नवीन नव्हतं. बरेच किस्से चवीनं चर्चिले जात होते. वर्षभरात सिनिअर कडून कित्येक
गोष्टी ऐकून सामान्य ज्ञान ओसंडून वाहत होतं.
विद्यार्थ्यांकडे पैसे असतीलच असं नाही. बरं
सामन्यांकडे पोकेट मनी हा प्रकार नसतो. लाख –दोन लाख पगार असणार्यांनी तीस रुपये
देऊ नयेत. कठीण आहे सारं. कदाचित त्यांना वाटलं असेल छोटी रक्कम आहे. पण
आमच्यासाठी ती किती मोठी होती त्यांना नाहीच कळणार. खिश्यात दमडी नसताना किती दिवस
काढले असतील? किती वर्षे काढली असतील? एका डब्यात दोन असो कि एक वेळचा डबा. डबे
बंद असले की होणारे हाल कुणाला माहित? भूक लागली कि चहा वर निभावून न्यायचं. असंख्य
वेळा झालंय, केलंय असं. भूक...या शब्दाभोवती फिरतं आपलं जीवन. ती नाही टाळता येत.
नियंत्रण तर शक्यच नाही. उपाशीपोटी झोप लागत नाही. अभ्यास तर दूर राहिला. विद्यापिठात
शिक्षणासाठी येणारे असे कित्येक
विद्यार्थी सापडतील ज्यांना हे अनुभव आलेत.
सचिन भगत