Sunday, August 20, 2017

शेवटच्या भेटीनंतरची भेट...पार्ट २ (काल्पनिक)

गेल्या महिन्यात एका मित्राचा फोन आला. कॉन्फरन्स ला चल म्हणे पुण्याला. एका दिवसाची आहे त्यानिमित्ताने भेट हि होईल. मी काही विचार न करता हो म्हटलं. आणि माझं रजिस्ट्रेशन करायला सांगितलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि भेटू म्हटलं मग तिथं. पुण्यात जाणं आम्ही सहसा टाळत नाही. ५-७ वर्षे तिथे राहिल्याने त्या शहराविषयी आपुलकी आहे. पुणे म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो पुण्यातला पाऊस, वडापाव, चितळे, अब चौक, सारसबाग, पर्वती, शनिवारवाडा, विद्यापीठे, भले मोठ्ठे मोल्ल्स, गणेशोत्सव, झेड ब्रिझ, इतर प्रेक्षणीय स्थळ, पेठांच पुणे, माहिती-तंत्रज्ञान उद्योग आणि असंख्य गोष्टी. 
मी ट्रेन ने पुण्याला गेलो. तिथं आम्ही कॉन्फरन्स असलेल्या महाविद्यालयात भेटलो. सर्व सोपस्कार आटोपून आम्ही त्या सेमिनार हॉल ला पोचलो. कॉन्फरन्स नुकतीच सुरु झाली होती. दिवसभर तिथेच होतो. बाहेर जास्त आणि आत कमी. त्यामुळे आत काय झालं हे काही फार माहित नाही. फार काही शिकण्यासारखं होतं असंही काही नाही. नाहीतरी अश्या कॉन्फरन्स म्हणजे आपला ए पी आय वाढवण्यापलीकडे काय असते हो. आम्ही केल्यासारखं करतो तुम्ही शिकण्यासारखं करा. तिकडे काय सुरु असते याचं कुणालाही देणं-घेणं नसतेच. बरीचशी मंडळी चर्चेत गुंग असते. बाहेर ये जा तर नित्याचीच. काही त्या एसीत डुलक्या झोडत होते. 
कॉन्फरन्स शेवटच्या टप्प्यात होती. आभारप्रदर्शन बाकी होतं. त्याला म्हटलं, चल आता काय ते धन्यवाद वगैरे ऐकायचे. सर्टिफिकेट घेऊया आणि निघू. तो हि हो म्हटला. त्या हॉल च्या बाहेर येतंच होतो कि वोट ऑफ थंक्स करणारा आवाज ओळखीचा वाटला. मी मागे वळून पाहिलं तर ओळखीचा चेहरा दिसला. 
अरे ती आणि इथं? मी नकळत बोलून गेलो.
कोण रे? अरे ती madam. 
तू ओळखतो का तिला? 
हो. तू एक काम कर, माझं हि सर्टिफिकेट घे. मी येतो लगेच. नाहीतरी तिथे गर्दी दिसतेय. वेळ लागेलच. 
तो सर्टिफिकेट घेण्यासाठी गेला आणि मी तिथेच शेवटच्या खुर्चीत बसलो आणि त्या दोन-चार मिनिटात जेवढं लिहिता येईल तेवढं लिहून काढलं घाईघाईत कसंतरी. 
मी लिहिलेलं ते असं-
हाय, कशी आहेस?
मी मजेत आहे. तू हि मजेत असशील? 
आज कित्येक दिवसानंतर तुला पाहिलं. ८-१० वर्षे तर नक्की झाली असतील. काय योगायोग आहे ना. तू पुन्हा कधी दिसशील असं वाटलं नव्हतं. पण ते आज प्रत्यक्षात आलंय. पूर्वी सातत्याने भेटी व्हायच्या. कित्येक तास आपण गप्प्यांमध्ये घालवलाय. वेळ कधी निघून जायचा ते कळायचं नाही. तू मंदिरात जाते असं तू जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्यातला भक्त जागी झाला. आणि माझीही मंदिर वारी सुरु झाली. मी रोज जायचो तिथं. तिथं तुझी बर्याचदा भेट हि झाली पण ती natural नव्हती. घडवून आणलेलं होतं सगळं. मी काही फार धार्मिक होतो असं काही नाही. 
फार काही लिहित नाही. मुद्द्यावर येतो. 
माझं प्रेम होतं तुझ्यावर. मला हवी होतीस तू माझ्या आयुष्यात. तसं झालं नाही हे खरं आहे. पण तुला ते कधी सांगू शकलो नाही. तुझं जग वेगळ आहे तसच माझंही आहे. तू दूर गेल्यानंतर हि माझ्या स्वप्नात नेहमी असायची. गेली कित्येक वर्ष मी तुझ्या प्रेमात होतो. आयुष्य म्हणजे तू आणि मी असं एक समीकरण बनवायचा प्रयत्न सुरु होता. पण ते समीकरण अपूर्ण राहिलं. प्रत्येक मुलीत मी तुलाच शोधत होतो. स्कूटीवर जाणर्या मुली दिसल्या कि वाटायचं तूच आहेस. तुझ्या अस्तित्वाचा भास नेहमी व्हायचा. कदाचित आपण कित्येक तास सोबत घालवलेले असल्याने असं होत असावं. जेवढं जास्त तुला विसरायचा प्रयत्न केला तेवढी जास्त तू आठवणीत राहिली. पण आज तुझ्याविना आयुष्य सुरु झालंय. तुझ्या मनात काय होतं मला माहित नाही. मला जाणून हि घ्यायचं नाही. आभाळात ढगांनी खूप गर्दी करावी आणि जमिनीवर पाण्याचा थेंब हि नाही. तसंच काहीतरी झालंय. आज तुला पाहिलं आणि भूतकाळात गेलो. वाटलं सांगून टाकावं सारं. म्हणून हे काही शब्द कागदावर उतरवले. 
गैरसमज नसावा. 
अबक 
आभारप्रदर्शन संपल्यावर मी लगेच त्या स्टेज च्या दिशेने गेलो. ती कुणाशी तरी बोलत होती. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती माझ्यादिशेने आली.
हाय, हाऊ आर यु?
फाईन. (आपल्याकडे एकच उत्तर असते ना.)
बाय द वे तू कशी आहेस?
मस्त...मजेत.
चल चहा घेऊ.ती म्हटली.
ओके.

चहा घेण्यासाठी आम्ही कॅन्टीन ला गेलो. मित्र फोन वर फोन करत होता. मी मोबाईल बंद करून टाकला. 
५-१० मिनिटे गप्पा झाल्या. अधून-मधून माझं लक्ष तिच्या मंगळसुत्राकडे जात होतं. सगळं पूर्वीसारखच होतं. थोडी लठ्ठ जरूर झाली होती. ड्रेस ची जागा साडीने घेतली होती. पहिल्यांदा तिला साडी नेसलेलं पाहिलं. किती सुंदर दिसत होती ती. तिच्या याचं सौंदर्यावर मी वेडा होतो. 
मला जायला हवं आता. उशीर होतोय. ती म्हटली.
ठीक आहे. मी पण निघतो. 
जाता जाता मी ती चिट्ठी तिच्या हातात सोपविली आणि नंतर वाचून घे म्हटलं.
मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. किती सोपं असते ना?
ती निघून गेली आणि मी त्या कॉलेज च्या बाहेर आलो. मित्राला फोन केला तर तो रेल्वे स्टेशन ला गेला होता. त्याने चार-पाच शिव्या दिल्या मला. ट्रेन ला बराच वेळ होता. तिथं जाऊन हि काय करणार होतो. उगाच कशाला वास घेत बसायच. नाही नाही तर कित्येक दिवस याचा फोन नसतो. आणि आज किती फोन झाले असतील?
मी स्टेशन ला पोचलो. त्याला सर्व सांगितलं. 
मोबाईल नंबर घेतला कि नाही. त्याने विचारलं.
नाही.
का?
गरज वाटली नाही. मी ही मागितला नाही आणि तिने हि विचारलं नाही. 
तिचा नवरा काय करतो रे? 
अभियंता आहे म्हणे.
अरे वा छान आहे कि मग.
छान चं काय. आपल छान नाही का? 
बराच वेळ आमची जुगलबंदी सुरु होती. ट्रेन आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. परत येताना मात्र भूतकाळ आणि वर्तमान यात द्वंद सुरु होतं.

No comments:

Post a Comment