अनिकेत कॅन्टीन
अनिकेत कॅन्टीन हे पुणे
विद्यापीठातील एक महत्त्वाचं ठिकाण. त्या कॅन्टीन
ला अनिकेत हे नाव कसं पडलं हे माहित नाही. विद्यापीठाच्या मधोमध. विद्यापीठातील
विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बाहेरचे लोक पण दिसायचे कॅन्टीन ला. अभ्यास करणारे,
टाईमपास करणारे आणि इतर काही उद्योग करणारे सगळेच इथं नजरेस पडायचे. सुरुवातीला मी
टीका करत होतो इथं तासनतास बसणार्यांवर. पण नंतर मी हि त्यातला एक भाग झालो आणि
ओघाने माझी टीका हि कुठंतरी लुप्त झाली.
अनिकेत च्या बाजूलाच इंटरनेट कफे,
झेरॉक्स, किराणा दुकान, लोंड्री, आणि समोर विद्यापीठाची खानावळ. त्यामुळे गजबजलेला
एरिया. विद्यार्थ्यांची नेहमी लगबग. मी नवीन होतो विद्यापीठात. कॅन्टीन ला जाने
तसे कमीच. जळगाव ला असताना नाश्ता वगैरे
करण्याची काही सवय नव्हती. कारण मेस सकाळी नऊ वाजेपासून सुरु व्हायची. विद्यापीठात
मात्र सगळं वेगळं होतं. मेस उशिरा सुरु व्हायची. आणि सगळे विद्यार्थी जवळपास
नाश्ता करायचे. त्यामुळे माझा हि अनिकेत चा प्रवास सुरु झाला. अनिकेत
ला कॉईन बॉक्स होते फोन करण्यासाठी. कित्येक वेळा फोन करायला तिथेच जावं लागे.
सुरुवातीला फार कमी जात होतो
अनिकेत ला . पण सवय पडली आणि ग्रंथालयात कमी आणि अनिकेत ला जास्त हे समीकरण सुरु
झालं. सकाळी पोहे तर संध्याकाळी भजी किंवा
वडापाव ठरलेला असायचा. डोसा, उत्तपा असले पदार्थ महाग असल्याने तसा आमचा संबध कंमी
त्यांच्याशी. नेट कफेत बसलेली मंडळी पाहून
हळू हळू तिकडे जाने सुरु झालं. एखादा तास वेळ नेट कफेत जायचा. फार काही येत नव्हते
पण प्रयत्न सुरु असायचा. कित्येक विद्यार्थी अनिकेत ला पडून असायचे.
पुढे चालून मी हि त्यातला एक होऊन गेलो. अनेक विषयांवर चर्चा, वादविवाद
चालायचा. कुठल्याही परीक्षेचा निकाल लागला कि अनिकेत भरून जायचं. कफेत पाय ठेवायला
जागा नसते. यशस्वी विद्यार्थी आनंदात तर अयशस्वी हिरमुसलेले दिसत. कुठं काय चुकलं
असेल किंवा काय करायला हवं, प्रत्येकाच्या भविष्याच्या संकल्पना, योजना इथेच
उलगडल्या जात होत्या. अशा अनेक चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे अनिकेत.
तिथली काम करणारी मंडळी ओळखीची झाल्याने
अनिकेत फार जवळचं वाटायचं. कधी कधी त्यांच्याशी बोलून त्यांच्याबाबत विचारपूस
करायचो. गावापासून दूर जाऊन कुटुंबासाठी सर्व काही करणारे हे लोक. ४-५ महिन्यानंतर
घरी जायचेत ते. पै-पै कमवून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायचे. फार पैसा मिळायचा
असंही नाही. एवढ्या कमी पैश्यात कुटुंब कसं चालवतात ते त्यांनाच माहित. त्यांची ती
जगण्याची जिद्द पाहून, आहे ते स्वीकारून आनंदाने जीवन जगणारे लोकं पाहून मला प्रेरणा
मिळत होती. नाहीतरी शिक्षण करत असताना मोठ्या पगाराची नोकरी चे स्वप्न पाहणारे
आम्ही. त्यांची जीवनाची व्याख्या अतिशय सोपी. आणि ती सोपी व्याख्याच कधी माझ्या लक्षात आली
नाही.
अनिकेत च्या बाहेर ओपेन स्पेस आहे.
तिथेही कान्याकोपऱ्यात विद्यार्थी बसलेले असायचे. मुलं-मुली एकत्र असायचे. कपल
स्वतंत्र बसलेले दिसायचे. धूर सोडणारे दूर
कोपर्यात बसत इतरांना त्रास होऊ नये म्हणून. कमवा आणि शिका योजनेत काम करत होतो
तेव्हा वेळ संपली कि आम्ही नाश्ता करायला जात होतो. टीटी एम एम- म्हणजे तू तुझं
आणि मी माझं. माझा एक मित्र होता, एके दिवशी तो मला नाश्ता करायला घेऊन गेला. पैसे
त्यानेच दिले. मला वाटलं काय दिलदार व्यक्ती आहे हा. पण चहाचा शेवटचा घोट घेत नाही
तोच म्हटला कि आज मी पैसे दिले, उद्या तू दे. मला मनातल्या मनात हसू आलं. दुसर्या दिवशी
त्याचा हिशेब चुकता केला आणि नंतर कधी त्याच्या सोबत गेलो नाही. टीटी एम एम हि
संकल्पना मला कधी पटली नाही. नात्यांमध्ये आर्थिक व्यवहार आणायचे नाहीत असं मला
नेहमी वाटायचं. पण व्यवहारी असायला काय हरकत आहे म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.
जीवन जगण्याचा ज्याचा त्याचा मार्ग आहे. तो योग्य कि अयोग्य या फंदात पडण्यात काही अर्थ नाही. मी
आर्थिकदृष्टीने कमकुवत होतो पण मी भुरटेपणा कधी केला नाही. माझ्याकडे पैसे नसताना
मी कधीही कुणासोबत जात नाही. असल्यानंतर मात्र मी इतरांना घेऊन जात होतो कुठल्याही
अपेक्षेविना. फक्त वाक्यांमध्ये थोडा बदल झाला होतं. चल चहा घेऊया या एवजी चहा
घेणार का असं व्यावहारिक वाक्यं अनुभवाने
शिकलो होतो.
आज हि कित्येक विद्यार्थी
विद्यापीठात गेले कि अनिकेत कॅन्टीन अवश्य जातात. आता कॅन्टीन म्हटलं तर सगळं काही
सुरळीत असायचं असं काही नाही. विद्यापीठ टेंडर देत असते. वर्षानुवर्षे ठराविक
लोकांनाच कसं टेंडर दिलं जातं हा संशोधनाचा विषय. त्यातले आर्थिक हितसंबंध काय
असतील किंवा नसतील ते प्रशासनातील लोकांनाच ठाऊक. कारण आंदोलनाशिवाय प्रशासन कधीच
मध्ये येत नाही. विद्यापीठाने ठरवून दिलेले भाव हे कॅन्टीन मालक कधीच अमलात आणत
नसत. ते नेहमी जास्त दराने विक्री करत. विद्यापीठ म्हटलं तर संघटना आल्याच.
कित्येक संघटना आहेत विद्यापीठात. काही
विद्यार्थी त्याचा दुरुपयोग सुद्धा करायचे. मेस ला, कॅन्टीन ला त्यांना पैसे लागत
नसत. त्यामुळे ते कधी आवाज उठवत नव्हते. अनिकेत व्यतिरिक्त हि आदर्श, ओपन आणि ओल्ड
कॅन्टीन (आता बंद) आहेत विद्यापीठात. असंच एकदा आमच्या लक्षात आलं कि विद्यापीठाने
ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री होत नाही. अकौंट विभागात जाऊन आम्ही दर कार्ड घेऊन
आलो. आणि सुरु झाला संघर्ष.
५०-६० विद्यार्थ्यांचं गटाने अनिकेत, ओपन आणि
आदर्श कॅन्टीन ला जाऊन धुडगूस घातला. खुर्च्या ची तोडफोड केली. घोषणाबाजी झाली.
एखादा तास चाललं हे सगळं. आम्ही सगळे आक्रमक होतो. त्यानंतर मात्र मी कॅन्टीन ला
गेलो कि तिथले लोक म्हणायचे पैसे नकोत. पण मला ते कधी जमलं नाही. ताठ मानेने
जगण्याची सवय. कर्ज करू पण फुकटच नको हा सिद्ध्नात.
विद्यापीठाने अनेक आंदोलने पहिली
आहेत. मी विद्यापीठात असताना हि अनेक आंदोलने झालीत. त्यात बऱ्याच वेळा आमचा सहभाग
असायचाच. आंदोलने नेहमीच योग्य असतात असंही नाही. काही चुकीची आंदोलनं हि झालीत.
वैयक्तिक स्वार्थ आड आला म्हणजे अश्या गोष्टी होणारच. काही तथाकथित विद्यार्थी
पत्रकार मंडळी चांगली प्रसिद्धी द्यायचे. जॉब करत असताना सुद्धा विद्यापीठात फुकटात
राहायचं आणि असल्या गोष्टी करायच्या. हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न.
त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आंदोलने करून मूळ प्रश्न काही काळापुरते सुटलेही. पण
कायमचे नाहीत. (पुणे विद्यापीठातील आठवणीतले आंदोलनं लिखाणाचा स्वतंत्र विषय आहे. म्हणून
जास्त लिहिलं नाही. पुढच्या एखाद्या भागात येईलंच)
कित्येक वेळा आम्ही अनिकेत ला
तासंतास बसून असायचो एका कोपर्यात. इथेच बरेच मित्र मिळालेत. नवीन लोकांच्या ओळखी
झाल्यात. एकदा मला पैश्याची गरज होती. प्रवेश घ्यायचा होता जर्नालीसम ला . मी आणि
माझा काही मित्र आम्ही अनिकेत ला बसून इतरांना फोन लावत बसलो. तीन-चार तास तिथेच
बसलो होतो.
परीक्षेत अपयश आलं कि कॅन्टीन ला
जाऊन चहा घेत वेळ घालवायचा. अभ्यासात मन लागलं नाही कि अनिकेत ला जाऊन टाईमपास. साधा
चहा कधी घेतला नाही. घ्यायचा तर स्पेशल चहा. येणाऱ्या जाणार्या विद्यार्थ्यांकडे
पाहत राहायचं. टीका-टिप्पणी करायची. कोण कुठं जाते आणि काय करते याच्या चर्चा
चालायच्या. इथेच सगळा सामान्य ज्ञान आणि इतिहास हळू हळू ज्ञात व्हायचा. एखाद्याला किंवा एखादीला ओळखत नसलो तरी
त्यांच्याबद्दल सगळी माहिती व्हायची.
पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर परत
विद्यापीठात क़्वचित गेलो. आयुष्य बदलत गेलं. जगलेलं जीवन शब्दात उतरवण्याचा
प्रयत्न करतोय. पण भरपूर गोष्टी करायच्या राहून गेल्यात. आता वय बदललं आहे.
व्यवसायानुसार बंधन आलीत. जबाबदार्या वाढल्यात. विद्यापीठात प्रत्येक गोष्ट
काहीतरी शिकवून जाते. शिक्षणाबरोबर बाह्य ज्ञान हि आपोआप येते. वातावरणाचा फरक
कदाचित. व्यक्तिमत्त्व विकास खर्या अर्थाने सुरु होतो. देश्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या विद्यार्थ्यांशी
संबंध येतो. नकळत आपण आणि ते अशी तुलना सुरु होते. अनिकेत कॅन्टीन अनेक
चांगल्या-वाईट अनुभवांचं साक्षीदार आहे.
अनिकेत कॅन्टीन शी कित्येक आठवणी
जोडल्या गेल्या आहेत. सगळ्याचं इथं नमूद करता येऊ शकत नाही खोट्या प्रतिष्ठेमुळे. लिखाणात सत्यता आणायचा प्रयत्न करतोय पण पूर्ण
सत्य अजून उतरत नाहीये. बघूया पुढे काय होते ते.
-सचिन भगत
No comments:
Post a Comment