Friday, February 19, 2016

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग – १०

अनिकेत कॅन्टीन
अनिकेत कॅन्टीन हे पुणे विद्यापीठातील एक महत्त्वाचं ठिकाण.  त्या कॅन्टीन ला अनिकेत हे नाव कसं पडलं हे माहित नाही. विद्यापीठाच्या मधोमध. विद्यापीठातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बाहेरचे लोक पण दिसायचे कॅन्टीन ला. अभ्यास करणारे, टाईमपास करणारे आणि इतर काही उद्योग करणारे सगळेच इथं नजरेस पडायचे. सुरुवातीला मी टीका करत होतो इथं तासनतास बसणार्यांवर. पण नंतर मी हि त्यातला एक भाग झालो आणि ओघाने माझी टीका हि कुठंतरी लुप्त झाली.
अनिकेत च्या बाजूलाच इंटरनेट कफे, झेरॉक्स, किराणा दुकान, लोंड्री, आणि समोर विद्यापीठाची खानावळ. त्यामुळे गजबजलेला एरिया. विद्यार्थ्यांची नेहमी लगबग. मी नवीन होतो विद्यापीठात. कॅन्टीन ला जाने तसे कमीच.  जळगाव ला असताना नाश्ता वगैरे करण्याची काही सवय नव्हती. कारण मेस सकाळी नऊ वाजेपासून सुरु व्हायची. विद्यापीठात मात्र सगळं वेगळं होतं. मेस उशिरा सुरु व्हायची. आणि सगळे विद्यार्थी जवळपास नाश्ता करायचे. त्यामुळे माझा हि अनिकेत चा प्रवास सुरु झाला.   अनिकेत ला कॉईन बॉक्स होते फोन करण्यासाठी. कित्येक वेळा फोन करायला तिथेच जावं लागे.  

सुरुवातीला फार कमी जात होतो अनिकेत ला . पण सवय पडली आणि ग्रंथालयात कमी आणि अनिकेत ला जास्त हे समीकरण सुरु झालं. सकाळी पोहे तर संध्याकाळी  भजी किंवा वडापाव ठरलेला असायचा. डोसा, उत्तपा असले पदार्थ महाग असल्याने तसा आमचा संबध कंमी त्यांच्याशी.  नेट कफेत बसलेली मंडळी पाहून हळू हळू तिकडे जाने सुरु झालं. एखादा तास वेळ नेट कफेत जायचा. फार काही येत नव्हते पण प्रयत्न सुरु असायचा. कित्येक विद्यार्थी अनिकेत ला  पडून असायचे.  पुढे चालून मी हि त्यातला एक होऊन गेलो. अनेक विषयांवर चर्चा, वादविवाद चालायचा. कुठल्याही परीक्षेचा निकाल लागला कि अनिकेत भरून जायचं. कफेत पाय ठेवायला जागा नसते. यशस्वी विद्यार्थी आनंदात तर अयशस्वी हिरमुसलेले दिसत. कुठं काय चुकलं असेल किंवा काय करायला हवं, प्रत्येकाच्या भविष्याच्या संकल्पना, योजना इथेच उलगडल्या जात होत्या. अशा अनेक चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे अनिकेत.

तिथली काम करणारी मंडळी ओळखीची झाल्याने अनिकेत फार जवळचं वाटायचं. कधी कधी त्यांच्याशी बोलून त्यांच्याबाबत विचारपूस करायचो. गावापासून दूर जाऊन कुटुंबासाठी सर्व काही करणारे हे लोक. ४-५ महिन्यानंतर घरी जायचेत ते. पै-पै कमवून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायचे. फार पैसा मिळायचा असंही नाही. एवढ्या कमी पैश्यात कुटुंब कसं चालवतात ते त्यांनाच माहित. त्यांची ती जगण्याची जिद्द पाहून, आहे ते स्वीकारून आनंदाने जीवन जगणारे लोकं पाहून मला प्रेरणा मिळत होती. नाहीतरी शिक्षण करत असताना मोठ्या पगाराची नोकरी चे स्वप्न पाहणारे आम्ही. त्यांची जीवनाची व्याख्या अतिशय सोपी.  आणि ती सोपी व्याख्याच कधी माझ्या लक्षात आली नाही.

अनिकेत च्या बाहेर ओपेन स्पेस आहे. तिथेही कान्याकोपऱ्यात विद्यार्थी बसलेले असायचे. मुलं-मुली एकत्र असायचे. कपल स्वतंत्र बसलेले दिसायचे.  धूर सोडणारे दूर कोपर्यात बसत इतरांना त्रास होऊ नये म्हणून. कमवा आणि शिका योजनेत काम करत होतो तेव्हा वेळ संपली कि आम्ही नाश्ता करायला जात होतो. टीटी एम एम- म्हणजे तू तुझं आणि मी माझं. माझा एक मित्र होता, एके दिवशी तो मला नाश्ता करायला घेऊन गेला. पैसे त्यानेच दिले. मला वाटलं काय दिलदार व्यक्ती आहे हा. पण चहाचा शेवटचा घोट घेत नाही तोच म्हटला कि आज मी पैसे दिले, उद्या तू दे. मला मनातल्या मनात हसू आलं. दुसर्या दिवशी त्याचा हिशेब चुकता केला आणि नंतर कधी त्याच्या सोबत गेलो नाही. टीटी एम एम हि संकल्पना मला कधी पटली नाही. नात्यांमध्ये आर्थिक व्यवहार आणायचे नाहीत असं मला नेहमी वाटायचं. पण व्यवहारी असायला काय हरकत आहे म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. जीवन जगण्याचा ज्याचा त्याचा मार्ग आहे. तो योग्य कि अयोग्य  या फंदात पडण्यात काही अर्थ नाही. मी आर्थिकदृष्टीने कमकुवत होतो पण मी भुरटेपणा कधी केला नाही. माझ्याकडे पैसे नसताना मी कधीही कुणासोबत जात नाही. असल्यानंतर मात्र मी इतरांना घेऊन जात होतो कुठल्याही अपेक्षेविना. फक्त वाक्यांमध्ये थोडा बदल झाला होतं. चल चहा घेऊया या एवजी चहा घेणार का असं व्यावहारिक  वाक्यं अनुभवाने शिकलो होतो.

आज हि कित्येक विद्यार्थी विद्यापीठात गेले कि अनिकेत कॅन्टीन अवश्य जातात. आता कॅन्टीन म्हटलं तर सगळं काही सुरळीत असायचं असं काही नाही. विद्यापीठ टेंडर देत असते. वर्षानुवर्षे ठराविक लोकांनाच कसं टेंडर दिलं जातं हा संशोधनाचा विषय. त्यातले आर्थिक हितसंबंध काय असतील किंवा नसतील ते प्रशासनातील लोकांनाच ठाऊक. कारण आंदोलनाशिवाय प्रशासन कधीच मध्ये येत नाही. विद्यापीठाने ठरवून दिलेले भाव हे कॅन्टीन मालक कधीच अमलात आणत नसत. ते नेहमी जास्त दराने विक्री करत. विद्यापीठ म्हटलं तर संघटना आल्याच. कित्येक संघटना आहेत विद्यापीठात.  काही विद्यार्थी त्याचा दुरुपयोग सुद्धा करायचे. मेस ला, कॅन्टीन ला त्यांना पैसे लागत नसत. त्यामुळे ते कधी आवाज उठवत नव्हते. अनिकेत व्यतिरिक्त हि आदर्श, ओपन आणि ओल्ड कॅन्टीन (आता बंद) आहेत विद्यापीठात. असंच एकदा आमच्या लक्षात आलं कि विद्यापीठाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री होत नाही. अकौंट विभागात जाऊन आम्ही दर कार्ड घेऊन आलो. आणि सुरु झाला संघर्ष.
 ५०-६० विद्यार्थ्यांचं गटाने अनिकेत, ओपन आणि आदर्श कॅन्टीन ला जाऊन धुडगूस घातला. खुर्च्या ची तोडफोड केली. घोषणाबाजी झाली. एखादा तास चाललं हे सगळं. आम्ही सगळे आक्रमक होतो. त्यानंतर मात्र मी कॅन्टीन ला गेलो कि तिथले लोक म्हणायचे पैसे नकोत. पण मला ते कधी जमलं नाही. ताठ मानेने जगण्याची सवय. कर्ज करू पण फुकटच नको हा सिद्ध्नात.

विद्यापीठाने अनेक आंदोलने पहिली आहेत. मी विद्यापीठात असताना हि अनेक आंदोलने झालीत. त्यात बऱ्याच वेळा आमचा सहभाग असायचाच. आंदोलने नेहमीच योग्य असतात असंही नाही. काही चुकीची आंदोलनं हि झालीत. वैयक्तिक स्वार्थ आड आला म्हणजे अश्या गोष्टी होणारच. काही तथाकथित विद्यार्थी पत्रकार मंडळी चांगली प्रसिद्धी द्यायचे. जॉब करत असताना सुद्धा विद्यापीठात फुकटात राहायचं आणि असल्या गोष्टी करायच्या. हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आंदोलने करून मूळ प्रश्न काही काळापुरते सुटलेही. पण कायमचे नाहीत. (पुणे विद्यापीठातील आठवणीतले आंदोलनं लिखाणाचा स्वतंत्र विषय आहे. म्हणून जास्त लिहिलं नाही. पुढच्या एखाद्या भागात येईलंच)

कित्येक वेळा आम्ही अनिकेत ला तासंतास बसून असायचो एका कोपर्यात. इथेच बरेच मित्र मिळालेत. नवीन लोकांच्या ओळखी झाल्यात. एकदा मला पैश्याची गरज होती. प्रवेश घ्यायचा होता जर्नालीसम ला . मी आणि माझा काही मित्र आम्ही अनिकेत ला बसून इतरांना फोन लावत बसलो. तीन-चार तास तिथेच बसलो होतो.
परीक्षेत अपयश आलं कि कॅन्टीन ला जाऊन चहा घेत वेळ घालवायचा. अभ्यासात मन लागलं नाही कि अनिकेत ला जाऊन टाईमपास. साधा चहा कधी घेतला नाही. घ्यायचा तर स्पेशल चहा. येणाऱ्या जाणार्या विद्यार्थ्यांकडे पाहत राहायचं. टीका-टिप्पणी करायची. कोण कुठं जाते आणि काय करते याच्या चर्चा चालायच्या. इथेच सगळा सामान्य ज्ञान आणि इतिहास हळू हळू ज्ञात व्हायचा.  एखाद्याला किंवा एखादीला ओळखत नसलो तरी त्यांच्याबद्दल सगळी माहिती व्हायची.  

पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर परत विद्यापीठात क़्वचित गेलो. आयुष्य बदलत गेलं. जगलेलं जीवन शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करतोय. पण भरपूर गोष्टी करायच्या राहून गेल्यात. आता वय बदललं आहे. व्यवसायानुसार बंधन आलीत. जबाबदार्या वाढल्यात. विद्यापीठात प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जाते. शिक्षणाबरोबर बाह्य ज्ञान हि आपोआप येते. वातावरणाचा फरक कदाचित. व्यक्तिमत्त्व विकास खर्या अर्थाने सुरु होतो.  देश्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध येतो. नकळत आपण आणि ते अशी तुलना सुरु होते. अनिकेत कॅन्टीन अनेक चांगल्या-वाईट अनुभवांचं साक्षीदार आहे.     
अनिकेत कॅन्टीन शी कित्येक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. सगळ्याचं इथं नमूद करता येऊ शकत नाही खोट्या प्रतिष्ठेमुळे.  लिखाणात सत्यता आणायचा प्रयत्न करतोय पण पूर्ण सत्य अजून उतरत नाहीये. बघूया पुढे काय होते ते.         

                                                                                                                            -सचिन भगत

Wednesday, February 17, 2016

इंजिनीरिंग एक्स्पिरिअनस


मी कला शाखेचा विद्यार्थी. इंजिनीरिंग चा ई पण माहित नव्हता. विद्यार्थी असताना कला शाखेत प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहत होतो. कधी कल्पना हि केली नाही कि ते सोडून दुसरंच काहीतरी करावं लागेल.
नशिबाने आणि समोर येणाऱ्या परिस्थितीने मला इंजिनीरिंग मध्ये ढकललं. इंजिनीरिंग ला कम्युनिकेशन स्कील हा विषय असतो. तो शिकविण्यासाठी एम. ए. ईंग्रजी असणे अनिवार्य.
त्या आधी मला कम्युनिकेशन चा “क” पण माहित नव्हता. मी शिकलो ते कथा, कादंबर्या, आणि कविता. त्यामुळे कम्युनिकेशन चा काही संबंध आलाच नाही.
मग सुरु झाला एक प्रवास जे शिकलो त्यापासून दूर जाण्याचा आणि ज्याचा गंध हि नव्हता ते शिकण्याचा. कल्पनेतल्या आयुष्यातून व्यावहारिक आयुष्याकडे मार्गक्रमण. ते काही सहज होत नाही. एवढं आयुष्य एक गोष्ट मिळवण्यामागे धावायचं आणि जवळ आल्यावर नशिबानं आपल्याला कुठंतरी लांब फेकून द्यायचं ते परत न येण्यासाठीच.
मुळात इंजिनीरिंग मध्ये येण्याचा मानस नव्हता. पण नेट पास होईना. नेट पास  झाल्याशिवाय सिनिअर कॉलेज  ला प्राध्यापक होता येत नाही. आणि सिनिअर कॉलेज ला सी एच बी वर जॉब करण्याची इच्छा नव्हती कारण त्यातून मिळत होती तुटपुंजी रक्कम कि ज्यावर उदरनिवार्ह हि शक्य नव्हता.  इंजिनीरिंग मध्ये त्या मानाने चांगलं पैसा मिळत होता.
२०१० मध्ये ठरवलं कि आता इंजिनीरिंग कॉलेज ला जॉब करायचा. मग सुरु झाली शोधा शोध.  पुण्यामध्ये भरपूर कॉलेजेस आहेस.  त्यामुळे जॉब लवकर मिळाला. पुण्यापासून ३०-३५ किमी अंतरावर च्या एका महाविद्यालात रुजू झालो. पगार होता २०-२२ हजार. पण मी समाधानी नव्हतो. शोधा शोध सुरूच होती. महिनाभरात ते कॉलेज सोडलं आणि  दुसरं जॉईन केलं. तिथे हि काही रमलो नाही. धर-सोड सुरु राहिली आणि २०११ ला पुणे सोडून पंढरपूर च्या एका कॉलेज ला रुजू झालो. तोच एक टर्निंग पोइंट होता.  तिथं इंजिनीरिंग खर्या अर्थाने कळलं. सिनिअर कॉलेज ची आशा सोडली होती.  त्यातच २११२ ला मी नेट पास झालो. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. फार दूर निघून गेलो होतो. परिस्थिती हि बदलली होती. एका जागेसाठी २०-२५ लाख रुपये असा रेट सुरु झाला होता.  त्यामुळे इंजिनीरिंग मध्येच करिअर असं ठरवून टाकलं. म्हणून कुठल्याही सिनिअर कॉलेज ला अप्रोच केलं नाही.

इंजिनीरिंग ने काय दिलं तर मी तंत्रज्ञानाशी अवगत झालो. जगाबरोबर चालता झालो. व्यावहारिक अप्रोच अवगत झाला. इंग्रजी विषयात पदवी घेऊनही मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आणि इंजिनीरिंग मध्ये टिकायचं तर इंग्रजी बोलल्याशिवाय पर्याय नव्हता.  इंग्रजी बोलायला शिकलो ते या कारणाने. व्यावसायिक शिक्षण आणि पारंपारिक शिक्षण यातील फरक स्पष्टपणे दिसून आला.
इंजिनीरिंग ला शिकवायला लागल्यानंतर कळलं कि कम्युनिकेशन ची पण व्याख्या आहे. ती म्हणजे एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण वा आदानप्रदान.  शिकवायचे ते संभाषण कौशल्य. पण इथे इंग्रजी भाषेचे तर वांदे आहेत. मग कौशल्य कुठून येणार. तरी पण आपण ते शिकवायचं. आपल्याही उपजीविकेचा प्रश्न आहे ना. मग हे रहाटगाडग चालवण्याशिवाय पर्याय नाही. फक्त इंग्रजीत फाड-फाड बोलायचं. कुणाला समजो अगर ना समजो. प्रत्येकाला वाटतं किती हुशार आपण. पण ज्ञानाचा आणि भाषेचा कुठलाही संबंध नाही. भाषा फक्त ज्ञान व्यक्त करण्याचं साधन. पण काय ना आपण खरं सांगू शकत नाही आणि लोकांना खरं ऐकण्याची सवय राहिली नाही. तंत्रज्ञानाच्या अतिवापराने खरं काय आणि खोटं यात काही फरक च उरला नाही. कित्येक गोष्ठी इतरांच्या नावावर खपवल्या जातात.
कित्येक विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि विचारतात “सर, इंग्रजी बोलायचं कसं?”  काय उत्तरं देणार मी. मलाच माहित नाही मी ते कसं शिकलो. दोन-चार पुस्तके वाचायची आणि ठराविक उत्तरं तयार करून ठेवायची. म्हणजे आपला धंदा छान पैकी चालतो. सगळीकडे हेच सुरु आहे. कुणालाही कुणाचं घेणं-देणं नाही. भाषा शिकवली जाऊ शकत नाही, ती शिकावी लागते. तरी पण जाहिराती दिसतात : इतक्या दिवसात तुम्हाला इंग्रजी शिकवू.  एवढे पैसे लागतील. झटपट बोला इंग्रजी म्हणणारे झटपट प्रसिद्ध आणि श्रीमंत झालेत. किती लोक इंग्रजी शिकलेत हा भाग अलाहिदा.
मुळात आपली भाषा शिकण्याची पद्धतच चुकीची आहे. आपल्याला शिकवलं जाते ए फोर एपल...ते झेड फोर झेब्रा. अन मग ग्रामर शिकवलं जाते. लोकांनी दुकाने मांडली आहेत आणि चांगली चालत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झालाय. पण तिथं एकही शिक्षक इंग्रजी बोलू शकत नाही. बिच्चारे लोक ....काही कळत नाही त्यांना. आपलं पोरगं इंग्रजी माध्यमात शिकावं हि इच्छा प्रबळ झाली आहे. आणि संस्थाचालक आपला गल्ला  भरताहेत. सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शिक्षणाचं इंग्रजीकरण सुरु आहे. पण याची गरज आहे  का याचा विचार कुणाकडे हि नाही. भाषा शिकण्यासाठी ऐकणं आणि बोलणं गरजेचं आहे. पण इथे ते होतंच नाही. वर्षानुवर्षांपासून हेच सुरु आहे. मग काय घंटा इंग्रजी येईल.
खाजगी क्षेत्रात संभाषण कौशल्याशिवाय पर्याय नाही. ती अवगत करावीच लागतात. कला शाखेत ज्याची कमतरता होती ती इथं भरून निघाली. आता रुळलो आहे इथं.  अडचणी खूप आल्यात. पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला.
एका अनोळखी क्षेत्रात करिअर सुरु केलं होतं. पुढे काय होईल याची चिंता नव्हती. एक एक आवश्यक असलेली गोष्ट शिकत गेलो. सुधारण्यास भरपूर वाव आहे.  आणि शिकण्याची प्रक्रिया हि निरंतर आहे.
स्वप्न...काय स्वप्न होतं माझं?. विसरलो आता सगळं. थोर लोकं सांगून गेलेत कि मोठी मोठी स्वप्ने पहा. पण इथं खायला नाही म्हणे स्वप्ने पहा. मी स्वप्ने पाहिलीत....ती उद्धवस्त होतानाही पाहिलीत. पण त्या अनुभवाने मला सक्षम केलं. अनपेक्षित गोष्टी हि घडल्यात.
इथे मुलभूत गरजा अपूर्ण आणि म्हणे रिसर्च करा.
कसा करायचा रिसर्च आणि कशी पहावी स्वप्ने? इथे प्रत्येकाला आयुष्याची पडली आहे. मोठ्या लोकांना बोलायला काय जातं हो. समाजात जाऊन बघा म्हणजे कळेल काय परिस्थिती आहे ती. आता कुठे कित्येकांची पहिली पिढी शिकतेय. आपलं भविष्य सुधारू पाहतेय. प्राथमिक गरजा अजून त्यांच्या पूर्ण नाहीत. कर्ज काढून शिकतात. आणि नोकरीसाठी जावं तर म्हणे इतके लाख घेऊन या.  पण कसं?
इंजिनीरिंग मध्ये शिकवणं हा माझ्या आयुष्यातला एक अपघात होता...ना मनी ना ध्यानी....पण तेच आता जीवन होऊन बसलंय आणि मलाही तेच हवंय. गरजेच्या वेळी या क्षेत्राने मला आधार दिला. योग्य वेळी सावरलं. अन्यथा मी माझाच राहिला नसतो. (इंजिनीरिंग ला एनजिनीरिंग उच्चारतात)
सचिन भगत