Saturday, December 5, 2015

पुणे विद्यापीठातील आठवणी-भाग ९


जयकर ग्रंथालय-वाचनालय –दुसरी बाजू

जयकर बद्दल जेवढं बोलावं किंवा लिहावं तेवढं कमी. विद्यापीठात प्रत्येकाला परिचित असं ठिकाण. एखाद्याचा फोन लागत नाही तर जयकर मध्ये शोधलं तर सापडेल हा आत्मविश्वास. जयकर बद्दल मी फार ऐकलेलं होतं. जळगाव ला असताना विद्यापीठात शिकत असलेले फार बोलायचे जयकर बद्दल. आपण कधी फोन केलाच तर बऱ्याच वेळा उत्तरं मिळायची कि मी जयकर ला आहे, नंतर बोलतो. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. आपण सुद्धा पुण्यात गेल्यानंतर जयकर ला अभ्यास करायचा असं ठरवलं होतं. जयकर ला असला कुठला अभ्यास होतो जो घरी किंवा रूमवर होऊ शकत नाही. हे माझ्यासाठी एक कोडं होतं.  ते कोडं उलगडण्याचा हा प्रयत्न.

                                                       जयकर ग्रंथालय
जयकर आणि माझा संबंध आला तो २००६ मध्ये. इंग्रजी विभागात प्रवेश मिळाला होता. सगळ्या औपचारिकता संपल्या होत्या. आता अभ्यास आणि आपण एवढचं समीकरण ठेवायचं असं ठरवलं होतं. विद्यापीठात गेल्यानंतर सर्वात अगोदर जयकर ला भेट दिली. भारावून गेलो मी. एवढे सारे विद्यार्थी एका ठिकाणी अभ्यास करताना आयुष्यात पहिल्यांदा च पाहत होतो. लाकडाचे ते टेबल आणि खुर्च्या, त्यावर ट्युबलाईट. कुणी पेपर वाचत होतं, तर कुणी नोट्स काढत होतं. काही फार मोठी मोठी पुस्तकं वाचण्यात मग्न होती. काही एकमेकांशी बारीक आवाजात चर्चा करत होते. काही खुर्च्या रिकाम्या होत्या तर काही विद्यार्थी दुसऱ्यांना म्हणजे ज्यांनी जागा सांभाळली आहे त्यांना खुर्च्या देत होते आणि दुसरीकडे जाऊन बसत. पुष्कळ विद्यार्थ्यांसमोर पाण्याची बाटली दिसत होती. काही बाहेर जात होते तर काही आत येत होते. प्रत्येकाच्या समोर भरपूर सारी पुस्तके पडलेली. कुणी आवाज केलाच तर सगळे शुक शुक करत होते. मुलं-मुली एकत्र बसलेलं. सगळं हिरवगार. वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीन जसं कश्मीर जावं ना बस तसंच.  वाचनालय काय असते ते पहिल्यांदा अनुभवत होतो. उद्यापासून आपण हि यायच आणि यांचा एक भाग होऊन जायचं असं मनोमन वाटलं. अगदी भारावून गेल्यासारखं झालं. या ठिकाणी आपल्या आयुष्याचा कायापालट होईलच असं वाटायला लागलं. इथे फक्त अभ्यास आणि अभ्यास. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची हीच सुरुवात आहे. बरं झालं पुण्यात आलो नाहीतर आपल्या करिअर च काही खरं नव्हतं. असे अनेक विचार माझ्या डोक्यात येऊन गेलेत. जयकर मधून बाहेर पडल्यानंतर घोळक्याने बाहेर उभे असलेले विद्यार्थी दिसले. जयकर मध्ये अभ्यास करणे म्हणजे कसं आपण वेगळ काहीतरी करतोय असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अविर्भाव.
विद्यापीठात गेल्यानंतर कमवा आणि शिका योजनेत काम करणे भाग होते. त्याशिवाय शिकू शकत नव्हतो. योगायोगाने काम करायचं ठिकाण मिळालं ते भौतिक शास्त्र विभाग आणि जयकर. सकाळी सहा वाजेपासून स्वच्छता. हातात झाडू घेऊन गप्पा करत करत परिसर स्वच्छ करायचा आणि नंतर जयकर स्वच्छ करायचं. असा नित्यक्रम. हवी ती जागा सांभाळता येत होती. काय मजा ना. एवढ्या मोठ्या वाचनालयात मला हवी ती जागा मिळवता येत होती. आणि इतर मात्र जागेसाठी भांडत होते. सुरवातीला फार छान वाटलं. पण नंतर जयकर स्वच्छ करून बाहेर येताना लाईन मध्ये असलेले मुलं-मुली आमच्याकडे पाहायचे. तेव्हा कसंतरी वाटायचं. त्यातल्या त्यात जर क्लास मधील मुली असल्या तर फार अवघडल्या सारखं होत होतं. मग काय कुणाकडे हि न पाहता निघून जायचं.
जयकर ग्रंथालय म्हटलं तर अभ्यासाचं ठिकाण नाहीतर इतर सारे उद्योग करण्याचे ठिकाण.
कित्येक प्रेमप्रकरणं जयकर मध्ये सुरु झाली आणि जयकर मध्येच संपली. काही यशस्वी झालेत तर काही अयशस्वी.  जसे जसे दिवस पुढे जात राहिलेत तसं तसं मला वास्तव कळायला लागलं.  काही जोडपे सोबत बसून अभ्यास करायचे. एक येऊन जागा सांभाळत होता सकाळी. बहरत्या तारुण्यात मुली सोबत बसून अभ्यास कसा काय होऊ शकतो हा फक्त विचार चं राहिला माझ्या डोक्यात. त्या जोडप्यांना खरं तर सलाम. माझा एक मित्र या पुढे जाऊन म्हणायचा कि जर नेट पास व्हायचे असेल तर एखादी मुलगी पटव आणि तिच्यासोबत अभ्यास कर, लवकर यश मिळेल. मला ते कधी पटलं नाही.
आता वाचनालय म्हटलं तर प्रत्येक विद्यार्थी फक्त अभ्यास करायला येत होता असही नाही. काही तर फक्त सकाळी जागा सांभाळण्यासाठी यायचे आणि एकदा का बँग ठेवली कि गायब. परत यायचे ते फक्त बँग घ्यायला.
काही विद्यार्थी मात्र दिवसभर जयकर ला बसून असायचे. चक्क १२-१५ तास. किती अभ्यास करत असतील ना ते?
पण नाही ते तसं नव्हतचं. सकाळी नाश्ता, मग पेपर वाचन , थोडा अभ्यास, दुपारी जेवण, जेवानंतर निवांत टेबल वर डोकं ठेऊन दोन एक तासांची झोप, झोप झाली कि फ्रेश व्हायला बाहेर यायचं, मग चहा. संध्याकाळी थोडा फेरफटका मारायचं मेन बिल्डींग कडे. हिरवळ किती आहे त्याचा अभ्यास. मग थोडा वेळ जयकर आणि रात्रीचे  जेवण.  मग जयकर ला तास  दोन तास अभ्यास आणि मग रूमकडे परतीचा प्रवास. अधून मधून येणारे फोन आणि बरंच काही. किती तास अभ्यास व्हायचा ते ज्याचं त्यालाच माहित. सलग १८ तास अभ्यास करणारे हि पाहिलेत. त्यांचे उद्योग हि पाहिलेत. सलग दोन-तीन तासांपलीकडे अभ्यास होऊच शकत नाही. याशिवाय शनिवार- रविवार ला भटकंती (सारसबाग, शनिवारवाडा, पर्वती किंवा अजून इतर ठिकाण) असायची.
फुकटे पेपर वाचक भरपूर सापडतात जयकर ला. ते कधी हि पेपर विकत घेत नाहीत. आपण पेपर वाचायला सुरुवात केली कि ते आपल्याकडे पाहत राहतात. मग हळूच मधलं पान पाहू जरा. अस म्हणून त्याचं हि पेपर वाचन सुरु होते. एक एक पान करून सगळं वाचन संपते.  मग काय संबंध नाही त्यांचा आणि आपला.
काही जोडपे मात्र छान फिरायला जायचे संध्याकाळी मेन बिल्डींग कडे किंवा एलीस गार्डन कडे (एलीस गार्डन -लिखाणाचा स्वतंत्र विषय). तिथल्या हिरवळीवर गप्पा चालायच्या त्यांच्या. काय ते माहित नाही. पण माझ्यासारखे काही उत्सुकतेपोटी पाहायला जायचे कोण कोण आहे तिकडे तर.  संध्याकाळी जोडपे सहसा जयकर ला नसायचे. काही अंधार पडण्यागोदर जयकर ला यायचे तर काही अंधार पडल्यानंतर जेवायलाच जायचे सरळ. गप्पा (????) रंगात आल्यानंतर वेळ होतो म्हणा.  एका डब्ब्यात दोघही जेवणाचा आस्वाद घेताना दिसायचे. एका ताटात जेवल कि प्रेम वाढतं म्हणतात. कदाचित खरंही असेल ते. पण वर्षभरात ती कुठे तर तो कुठे असंही चित्र दिसायचं. मग हे प्रेम कुठं जातं ते नाही कळलं कधी. काही मुलं तर फक्त मुलीमुळे जयकर ला बसून असायचे.
जयकर फक्त अभ्यासाचं ठिकाण नव्हतं. अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थी यांच्यामध्ये वाद सुरु असायचे नेहमी. त्यांच्यामुळे आपल्याला अभ्यास करायला जागा मिळत नाही असं अधिकृत विद्यार्थ्यांचं म्हणणं असायचं. त्यातही तथ्य होतंच म्हणा. मग तक्रारी मागून तक्रारी चालायच्या. तरी प्रश्न काही सुटत ला नाही.  वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी दिसून येतात जयकर ला. स्पर्धा परीक्षा करणारे-त्यातही युपीएससी करणारे, एमपीएससी करणारे आणि काही दोघं हि करणारे- आणि नेट/ सेट करणारे.
जयकर ला कधी पाऊल  हि न टाकणारे यांचा हि ग्रुप असायचा. काही विद्यार्थी कधीही जयकर ला अभ्यासाला आले नाहीत. तरीपण ते यशस्वी झालेत ते हि कमी वेळेत. जयकर ला येणारे मात्र वर्षानुवर्षे येतच राहतात. काही विद्यार्थांना तर जयकर सोडू वाटत नाही. मग त्यांचा प्रवास सुरूच राहतो. पुणे विद्यापीठात कोण किती वर्ष राहतो याची हि चढाओढ दिसते. एकदा का विद्यार्थी विद्यापीठात आला कि तो दोन-चार वर्ष तर सहज राहतो. काही त्या हि पुढे जातात. दहा-दहा वर्ष विद्यापीठात राहिलेले पण पाहिले आहेत. पुणे विद्यापीठ एक मायाजाल आहे. आपल्याला वाटते आपण प्रगती करत आहोत. पण नाही आपण तिथेच असतो. सुरुवातीला अभ्यास होतो. पण नंतर जयकर मध्ये कमी आणि कॅन्टीन ला जास्त हे समीकरण पक्क.  
जयकर हि एक मानसिकता आहे. आपण ती निर्माण केली आहे. घरी बसून यशाची शिखरं पादाक्रांत केलेली उदाहरण आपण  पाहिली आहेत. अभ्यास कुठंही होतो. फक्त ती जिद्द लागते. तरी जयकर काय हे कळण्यासाठी तिथे बसून अभ्यास करावा लागतो. जेवढ्या लवकर यश मिळते तेवढं चांगलं.  अन्यथा कोण किती वेळ राहतो ची चढा ओढ आहेच.


सचिन भगत

No comments:

Post a Comment