Saturday, December 5, 2015

पुणे विद्यापीठातील आठवणी-भाग ९


जयकर ग्रंथालय-वाचनालय –दुसरी बाजू

जयकर बद्दल जेवढं बोलावं किंवा लिहावं तेवढं कमी. विद्यापीठात प्रत्येकाला परिचित असं ठिकाण. एखाद्याचा फोन लागत नाही तर जयकर मध्ये शोधलं तर सापडेल हा आत्मविश्वास. जयकर बद्दल मी फार ऐकलेलं होतं. जळगाव ला असताना विद्यापीठात शिकत असलेले फार बोलायचे जयकर बद्दल. आपण कधी फोन केलाच तर बऱ्याच वेळा उत्तरं मिळायची कि मी जयकर ला आहे, नंतर बोलतो. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. आपण सुद्धा पुण्यात गेल्यानंतर जयकर ला अभ्यास करायचा असं ठरवलं होतं. जयकर ला असला कुठला अभ्यास होतो जो घरी किंवा रूमवर होऊ शकत नाही. हे माझ्यासाठी एक कोडं होतं.  ते कोडं उलगडण्याचा हा प्रयत्न.

                                                       जयकर ग्रंथालय
जयकर आणि माझा संबंध आला तो २००६ मध्ये. इंग्रजी विभागात प्रवेश मिळाला होता. सगळ्या औपचारिकता संपल्या होत्या. आता अभ्यास आणि आपण एवढचं समीकरण ठेवायचं असं ठरवलं होतं. विद्यापीठात गेल्यानंतर सर्वात अगोदर जयकर ला भेट दिली. भारावून गेलो मी. एवढे सारे विद्यार्थी एका ठिकाणी अभ्यास करताना आयुष्यात पहिल्यांदा च पाहत होतो. लाकडाचे ते टेबल आणि खुर्च्या, त्यावर ट्युबलाईट. कुणी पेपर वाचत होतं, तर कुणी नोट्स काढत होतं. काही फार मोठी मोठी पुस्तकं वाचण्यात मग्न होती. काही एकमेकांशी बारीक आवाजात चर्चा करत होते. काही खुर्च्या रिकाम्या होत्या तर काही विद्यार्थी दुसऱ्यांना म्हणजे ज्यांनी जागा सांभाळली आहे त्यांना खुर्च्या देत होते आणि दुसरीकडे जाऊन बसत. पुष्कळ विद्यार्थ्यांसमोर पाण्याची बाटली दिसत होती. काही बाहेर जात होते तर काही आत येत होते. प्रत्येकाच्या समोर भरपूर सारी पुस्तके पडलेली. कुणी आवाज केलाच तर सगळे शुक शुक करत होते. मुलं-मुली एकत्र बसलेलं. सगळं हिरवगार. वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीन जसं कश्मीर जावं ना बस तसंच.  वाचनालय काय असते ते पहिल्यांदा अनुभवत होतो. उद्यापासून आपण हि यायच आणि यांचा एक भाग होऊन जायचं असं मनोमन वाटलं. अगदी भारावून गेल्यासारखं झालं. या ठिकाणी आपल्या आयुष्याचा कायापालट होईलच असं वाटायला लागलं. इथे फक्त अभ्यास आणि अभ्यास. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची हीच सुरुवात आहे. बरं झालं पुण्यात आलो नाहीतर आपल्या करिअर च काही खरं नव्हतं. असे अनेक विचार माझ्या डोक्यात येऊन गेलेत. जयकर मधून बाहेर पडल्यानंतर घोळक्याने बाहेर उभे असलेले विद्यार्थी दिसले. जयकर मध्ये अभ्यास करणे म्हणजे कसं आपण वेगळ काहीतरी करतोय असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अविर्भाव.
विद्यापीठात गेल्यानंतर कमवा आणि शिका योजनेत काम करणे भाग होते. त्याशिवाय शिकू शकत नव्हतो. योगायोगाने काम करायचं ठिकाण मिळालं ते भौतिक शास्त्र विभाग आणि जयकर. सकाळी सहा वाजेपासून स्वच्छता. हातात झाडू घेऊन गप्पा करत करत परिसर स्वच्छ करायचा आणि नंतर जयकर स्वच्छ करायचं. असा नित्यक्रम. हवी ती जागा सांभाळता येत होती. काय मजा ना. एवढ्या मोठ्या वाचनालयात मला हवी ती जागा मिळवता येत होती. आणि इतर मात्र जागेसाठी भांडत होते. सुरवातीला फार छान वाटलं. पण नंतर जयकर स्वच्छ करून बाहेर येताना लाईन मध्ये असलेले मुलं-मुली आमच्याकडे पाहायचे. तेव्हा कसंतरी वाटायचं. त्यातल्या त्यात जर क्लास मधील मुली असल्या तर फार अवघडल्या सारखं होत होतं. मग काय कुणाकडे हि न पाहता निघून जायचं.
जयकर ग्रंथालय म्हटलं तर अभ्यासाचं ठिकाण नाहीतर इतर सारे उद्योग करण्याचे ठिकाण.
कित्येक प्रेमप्रकरणं जयकर मध्ये सुरु झाली आणि जयकर मध्येच संपली. काही यशस्वी झालेत तर काही अयशस्वी.  जसे जसे दिवस पुढे जात राहिलेत तसं तसं मला वास्तव कळायला लागलं.  काही जोडपे सोबत बसून अभ्यास करायचे. एक येऊन जागा सांभाळत होता सकाळी. बहरत्या तारुण्यात मुली सोबत बसून अभ्यास कसा काय होऊ शकतो हा फक्त विचार चं राहिला माझ्या डोक्यात. त्या जोडप्यांना खरं तर सलाम. माझा एक मित्र या पुढे जाऊन म्हणायचा कि जर नेट पास व्हायचे असेल तर एखादी मुलगी पटव आणि तिच्यासोबत अभ्यास कर, लवकर यश मिळेल. मला ते कधी पटलं नाही.
आता वाचनालय म्हटलं तर प्रत्येक विद्यार्थी फक्त अभ्यास करायला येत होता असही नाही. काही तर फक्त सकाळी जागा सांभाळण्यासाठी यायचे आणि एकदा का बँग ठेवली कि गायब. परत यायचे ते फक्त बँग घ्यायला.
काही विद्यार्थी मात्र दिवसभर जयकर ला बसून असायचे. चक्क १२-१५ तास. किती अभ्यास करत असतील ना ते?
पण नाही ते तसं नव्हतचं. सकाळी नाश्ता, मग पेपर वाचन , थोडा अभ्यास, दुपारी जेवण, जेवानंतर निवांत टेबल वर डोकं ठेऊन दोन एक तासांची झोप, झोप झाली कि फ्रेश व्हायला बाहेर यायचं, मग चहा. संध्याकाळी थोडा फेरफटका मारायचं मेन बिल्डींग कडे. हिरवळ किती आहे त्याचा अभ्यास. मग थोडा वेळ जयकर आणि रात्रीचे  जेवण.  मग जयकर ला तास  दोन तास अभ्यास आणि मग रूमकडे परतीचा प्रवास. अधून मधून येणारे फोन आणि बरंच काही. किती तास अभ्यास व्हायचा ते ज्याचं त्यालाच माहित. सलग १८ तास अभ्यास करणारे हि पाहिलेत. त्यांचे उद्योग हि पाहिलेत. सलग दोन-तीन तासांपलीकडे अभ्यास होऊच शकत नाही. याशिवाय शनिवार- रविवार ला भटकंती (सारसबाग, शनिवारवाडा, पर्वती किंवा अजून इतर ठिकाण) असायची.
फुकटे पेपर वाचक भरपूर सापडतात जयकर ला. ते कधी हि पेपर विकत घेत नाहीत. आपण पेपर वाचायला सुरुवात केली कि ते आपल्याकडे पाहत राहतात. मग हळूच मधलं पान पाहू जरा. अस म्हणून त्याचं हि पेपर वाचन सुरु होते. एक एक पान करून सगळं वाचन संपते.  मग काय संबंध नाही त्यांचा आणि आपला.
काही जोडपे मात्र छान फिरायला जायचे संध्याकाळी मेन बिल्डींग कडे किंवा एलीस गार्डन कडे (एलीस गार्डन -लिखाणाचा स्वतंत्र विषय). तिथल्या हिरवळीवर गप्पा चालायच्या त्यांच्या. काय ते माहित नाही. पण माझ्यासारखे काही उत्सुकतेपोटी पाहायला जायचे कोण कोण आहे तिकडे तर.  संध्याकाळी जोडपे सहसा जयकर ला नसायचे. काही अंधार पडण्यागोदर जयकर ला यायचे तर काही अंधार पडल्यानंतर जेवायलाच जायचे सरळ. गप्पा (????) रंगात आल्यानंतर वेळ होतो म्हणा.  एका डब्ब्यात दोघही जेवणाचा आस्वाद घेताना दिसायचे. एका ताटात जेवल कि प्रेम वाढतं म्हणतात. कदाचित खरंही असेल ते. पण वर्षभरात ती कुठे तर तो कुठे असंही चित्र दिसायचं. मग हे प्रेम कुठं जातं ते नाही कळलं कधी. काही मुलं तर फक्त मुलीमुळे जयकर ला बसून असायचे.
जयकर फक्त अभ्यासाचं ठिकाण नव्हतं. अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थी यांच्यामध्ये वाद सुरु असायचे नेहमी. त्यांच्यामुळे आपल्याला अभ्यास करायला जागा मिळत नाही असं अधिकृत विद्यार्थ्यांचं म्हणणं असायचं. त्यातही तथ्य होतंच म्हणा. मग तक्रारी मागून तक्रारी चालायच्या. तरी प्रश्न काही सुटत ला नाही.  वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी दिसून येतात जयकर ला. स्पर्धा परीक्षा करणारे-त्यातही युपीएससी करणारे, एमपीएससी करणारे आणि काही दोघं हि करणारे- आणि नेट/ सेट करणारे.
जयकर ला कधी पाऊल  हि न टाकणारे यांचा हि ग्रुप असायचा. काही विद्यार्थी कधीही जयकर ला अभ्यासाला आले नाहीत. तरीपण ते यशस्वी झालेत ते हि कमी वेळेत. जयकर ला येणारे मात्र वर्षानुवर्षे येतच राहतात. काही विद्यार्थांना तर जयकर सोडू वाटत नाही. मग त्यांचा प्रवास सुरूच राहतो. पुणे विद्यापीठात कोण किती वर्ष राहतो याची हि चढाओढ दिसते. एकदा का विद्यार्थी विद्यापीठात आला कि तो दोन-चार वर्ष तर सहज राहतो. काही त्या हि पुढे जातात. दहा-दहा वर्ष विद्यापीठात राहिलेले पण पाहिले आहेत. पुणे विद्यापीठ एक मायाजाल आहे. आपल्याला वाटते आपण प्रगती करत आहोत. पण नाही आपण तिथेच असतो. सुरुवातीला अभ्यास होतो. पण नंतर जयकर मध्ये कमी आणि कॅन्टीन ला जास्त हे समीकरण पक्क.  
जयकर हि एक मानसिकता आहे. आपण ती निर्माण केली आहे. घरी बसून यशाची शिखरं पादाक्रांत केलेली उदाहरण आपण  पाहिली आहेत. अभ्यास कुठंही होतो. फक्त ती जिद्द लागते. तरी जयकर काय हे कळण्यासाठी तिथे बसून अभ्यास करावा लागतो. जेवढ्या लवकर यश मिळते तेवढं चांगलं.  अन्यथा कोण किती वेळ राहतो ची चढा ओढ आहेच.


सचिन भगत

Friday, December 4, 2015

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग-८

पुण्यात येऊन दोन-तीन  वर्षे झाली होती. पुढे काय करावे हे कळत नव्हतं. नेट/सेट काही पास होईना. एमफिल ला प्रवेश मिळाला.  अभ्यास सुरूच होता. त्यावेळेस मी पत्रकारिता सुद्धा करत होतो. नवीन बाईक घेतलेली होती. त्यामुळं विद्यापीठाबाहेर चं पुणे अनुभवणं सुरु होतंपुणे परिसर तसा पाहण्यालायकआसपास भरपूर निसर्गरम्य ठिकाणं, किल्ले, मंदिरे आहेत. एम ला असताना काही फिरता आलं नाही. आणि आता तर रिकामा होतो. विद्यावेतन मिळत होतं एम फिल चं. पैश्याचा प्रश्न मिटला होता. संशोधन करण्यासाठी विद्यावेतन दिलं जातं. संशोधन काय ते मला अजूनही कळलेलं नाही. तरी पण मी ते केलं. खरं तर फक्त विद्यावेतन आणि राहण्यासाठी साठी एम फिल ला प्रवेश घेतला जातो. यावर कुणाचंही दुमत असणार नाहीमित्र मंडळी हि वाढली होती. विभागाव्यतिरिक्त मित्र मिळाले होते.  

असंच एकदा तोरणा गडावर जायचं ठरलं. रविवार ला सकाळी आम्ही सगळे (नामदेव सर, चोथवे सर, शिवाजी सर, सुनील सर ) विद्यापीठाच्या बाहेर पडलो.  मी आणि चोथवे सर इंग्रजी विभागाचे तर इतर सगळे राज्यशास्त्राचे.  कुठं आणि कसं जायचं हे ठरलं होतं. पुण्याबाहेर आल्यानंतर तोरणा च्या दिशेने आम्ही सगळे निघालो होतो. दोन-तीन गाड्या होत्या. मध्ये एका ठिकाणी चहा घेतला. त्यावेळी पवार सर म्हटले तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवतो. मी म्हटलं हरकत नाही. पवार सर तसे नवखे. नुकतीच गाडी शिकले होते. मी हि बिनधास्त बसलो . आणि आमचा प्रवास सुरु झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. टिंगल टवाळ्या तर नेहमीच्याच.  राजकारण, समाजकारण, विद्यापीठ अशे कित्येक विषय चर्चेत येत होते.

पुढे एका वळणाला पवार सरांना गाडी वळवता आली नाही आणि आम्ही दोघेही गाडीवरून पडलो. नाल्यावर पूल होता. मी मागेच उडी मारली. पवार सर पुढे जाऊन पडले तर गाडी पुलावरून खाली पाण्यात.  बोलण्याच्या ओघात आणि कळण्याच्या आत नेमकं काय झालं ते क्षणभर कळलंच नाही. मी पवार सरांकडे गेलो आणि तुम्हाला जास्त लागल नाही नाही असं विचारत होतो. मी काय विचारतो आहे यावर त्यांच लक्षच नव्हतं. ते गाडीकडे पाहत होते. सचिन गाडी नवीन आहे. काही झालं तर नसेल ? असे अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली. मी म्हटलं ते जाऊ द्या हो. तुम्ही ठीक आहात का ते सांगा आधी. त्यांना फार टेन्शन आलं होत. गाडीचं काय झालं असेल आता. गाडी पाण्यात पडलेली होती. वर काढायची कशी त्यावर विचार करत होतो. इतर मित्रांना फोन करतो तर लागत नव्हता. कव्हरेज चं नव्हतं. समोरून येणाऱ्या  एका  व्यक्तीला थांबवलं. त्याच्या मदतीने गाडी वर काढली. आणि त्याच्याच मोबाईल वरून फोन लावला. सुदैवाने बीएसेणेल ला रेंज होती आणि आम्ही मित्रांना मागे बोलावलं. सगळेच टेन्शन मध्ये. मी गाडीकडे पाहिलं तर समोरचा भाग उद्धवस्त. तरी मी किक मारून पाहिली तर गाडी सुरु झाली. म्हटलं जाऊ द्या आता. आधी गडावर जाऊ आणि संध्याकाळी गाडी दुरुस्त करू.

आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. तोरणा ची चढाई सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा राजगड वसलेले आहेत. तोरणा म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. तोरणा अत्यंत बिकट गड आहे. ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजेतटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे सौंदर्य. किल्ल्यावर मेंगाई देवी चं मंदिर आहे. वेळेअभावी तिथला सूर्यास्त आम्ही पाहू शकलो नाही. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो.




तोरणा किल्ला फिरून झाला आणि राजगडाच्या पायथ्याशी पण जाऊन आलो. भरपूर मौज मस्ती केली. तरी गाडीचं किती नुकसान झालं असेल याचा विचार डोक्यात अधूनमधून येत होताच. परतल्यानंतर गाडी सरळ शोरूम ला दिली कारण त्यास्थितीत बाईक मला विद्यापीठात न्यायची नव्हती. पवार सर दवाखान्यात गेले. नाही म्हटलं तरीही त्यांनी मला पैसे दिलेच दुरुस्त करायला खर्च आला म्हणून. मला ते घ्यायचे नव्हतेच. पण घ्यावे लागले. वस्तू मध्ये माझा जीव कधी नव्हताच आणि अजूनपण पण नाही. अपघात होतात आयुष्यात. ते काही ठरवून होत नाही. पण आम्ही सुखरूप होतो. आणि तेच महत्त्वाचे होते आणि आहे. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. त्या छोट्या अपघातामुळे आमच्या आनंदावर मात्र काही फरक पडला नाही.
माणसाचं सामाजीकरण होण्यात अश्या भटकंतीचा खूप फायदा होतो. मला हि तो झालाच. एका ठराविक चौकटीतून मी बाहेर येत होतो. समोरच्या व्यक्ती मध्ये चांगलं काय हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याआधी मी मानसं कधी जोडली नाहीत. माझा मित्र मला नेहमी म्हणायचा  कि  तू  destructive आहेस. तुला मानसं जोडता येत नाहीत. कारण माझा स्वभाव फार विचित्र होता. पण काळाच्या ओघात मी बदलत होतो. अपयश मला खूप काही शिकवून गेलं. म्हणूनच या सगळ्या मित्रांशी मी जोडलो गेलो. आमचे संबंध पूर्वी फार काही चांगले नव्हते. नंतर मी संबंध सुधारत गेलो. मानसं जोडण्याचा प्रयत्न केला. अपयशाच्या काळात याच लोकांनी आधार दिला.  खरं तर अपयश कसं पचवावं हे पवार सरांकडून शिकलो. चोथवे सर माझे सिनिअर असून पण माझ्याशी जुळवून घेतलं. सोबत अनेक क्षण घालवलेत. सुनील सर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. नेहमी हसत खेळत असायचे. त्यांच्या सोबत ट्रीप ला जाण्याची मजा काही औरच. जीवन फार मोठं आहे. वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी व्यक्तिमत्त्व भेटत राहतात. कित्येक आपण विसरून जातो पण काही मात्र लक्षात राहतात त्यांच्या वेगळेपणाने.

योगायोग असं कि काल परवा पवार सरांचा फोन आला त्यावेळी मी याच trip चे फोटो पाहत होतो. औपचारिक गप्पा झाल्या .कुठं, काय, कसं ने सुरु होणारे प्रश्न हि झालेत आणि उत्तरं हि झालीत.  नाहीतरी आजकाल प्रश्नही हि ठरलेले आणि उत्तरही हि. संभाषण संपल्यानंतर नकळत भूतकाळात गेलो. काय घडलं होतं ते शब्दात आणण्याचा प्रयत्न केला.
हे आर्टिकल या सगळ्या मित्रांची आठवण म्हणून......

सचिन भगत