Monday, May 25, 2020

कोरोना...गरिबी...आणि साथीचा रोग...


कोरोना.....ओघाने येणारं lockdown.....वाटेल तिकडे भ्रमंती करणारे अचानक घरात बंदिस्त केल्या गेले.....वेळ कसा घालवायचा म्हणून सोशल मेडिया वर विविध टास्क/challenge येऊ लागले.........
...................वेगवेगळे पदार्थ (केक, ढोकळा, इडली, पोहे, मटन/मासे....) बनवून स्टेटस यायला लागले, आज हे ..उद्या ते....साड्या घालून सेल्फी टाकून झाल्या, टक्कल केलेली फोटो टाकल्या गेले, मेक-अप विना चा सेल्फी चा टास्क हि येऊन गेला...कुणी लिखाण केलं, कुणी गाणी गायली, स्त्री-पुरुष यांच्या कामांची आदलाबदल करून झालं…......lockdown संपल्यावर मी कुणासोबत जेवणार, कॉफी घेणार सारखे ट्रेंड आलेत.........कुणी फेसबुक लाइव येऊन भाषण ठोकायला लागलं...प्रतिकारशक्ती कशी वाढवायची......मास्क कसा बनवायचा....खान-पान कस असलं पाहिजे चे उपदेश....तणावमुक्त जीवन कसे जगायचे तसेच योगा/व्यायाम चे  व्हिडीओ उपदेश...........फेसबुक/टीक-टोक/इंस्ताग्राम/ट्विटर  वर अशा व्हिडीओ/पोस्ट/स्टेटस चा पाऊस पडला....वेबिणार, झूम अशी किती मोठी लिस्ट....हेच काय तर चड्डी कोण धुणार हा वाद हि विकोपाला गेला...चर्चा झडल्या....
हे सारं करत असताना आपल्या आसपास काय सुरुय याचा गंध आपल्याला कधी आला नाही....समजला नाही किंवा काही देणेघेणे नाही म्हणून सोडून दिलं असेल कदाचित...मग्न आहोत आपण आपल्या प्रपंचात....
चायना मधून आलेल्या कोरोना ने हाहाकार केला.... सार्या जगात. लॉकडाऊन ने संपूर्ण जग स्तब्ध झालं...विकासाच्या गप्पा किती हि करा , निसर्गानं ठरवलं कि सारं समाप्त...या निमित्तानं मानवी बुद्धी ची मर्यादा उघडी पडली...
शास्त्रज्ञ, डॉक्टर सारे कामाला लागले...औषध सापडेल...लस येईल ... कोरोना निघून हि जाईल...पण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे कधीच सापडत नाहीत....कदाचित सापडणार हि नाही.................
कोरोना चं जेव्हा भारतात संक्रमण सुरु झालं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तर लोकांनी टिंगल-टवाळी सुरु केली...राजकीय नेत्याच गो करोना गो पासून ...मिम्स, जोक्स चा भडीमार झाला....नन्तर हेच लोकं त्याला जातीय रंग देण्यात गुंतले...हि लोकं कोण तर बहुतांशी सुशिक्षित. कारण गरीब लोकं समाज माध्यम वापरत नाहीत. कुठलाही आजार धर्म पाहत नाही ऐवढं साध logic आपल्याला कळू नये हि या देशाची शोकांतिका....
कोरोनामुळे सगळ्यात जास्त बाधित/प्रभावित तर गरीब लोकंच...पगारदारांना चिंता नाही....महिना झाला कि पगार खात्यात येतो...
गरिबी ...कित्येकांच्या पाचवीला पुंजलेली....जन्म झाला तेव्हापासून संघर्ष सुरु.....कुणी किती प्रयत्न केले निर्मूलनाचे.....करोनाच्या निमित्ताने शेकडो किमी पायी चालणारे मजूर पाहिले...लहान लहान मुलं पाहिली....कुणी त्यांची मदत केली? पोकळ घोषणा झाल्या...प्रसिद्धी झाली...पण मदत पोचली का?   
काय ती इच्छा शक्ती...जी साधं जगू हि देत नाही आणि मरू हि देत नाही...चालण्याशिवाय पर्याय नाही...पायी चालताना भुकेने मृत्यू झालेले पाहिले...अजून काय पाहणार?......जमेल तसं करून लोकं घराच्या दिशेकडे निघाले....कुणी पायी, कुणी सायकल वर.......त्या दृश्यांच्या बातम्या झळकल्या....आर्थिक महासत्ता बनू पाहण्याचं स्वप्न किती तकलादू आहे हे समजल असेलच...जे राष्ट्र स्वतःच्या लोकांचं जीवनमान उंचावु शकत नाही, आणीबाणी च्या परिस्थितीत त्यांची मदत करू शकत नाही, लोकांकडून देणगी गोळा करण्याचं आवाहन करते......प्रगती कशी म्हणता येईल?
जीडीपी वाढला, वाढतोय हा आकड्यांचा खेळ...गरिबांना आकडेमोड येत नाही....पोटाची भूक सर्वात महत्त्वाची...हीच ती भूक...जी काहीही करायला भाग पडते....जगण्याचा संघर्ष म्हणा, नशीब म्हणा कि अजून काही....पण याला सामोरे कसं जायचं याचं नियोजन कुणाकडेही नाही..............   
हात मजूर, कामगार यांचे हाल आपण सर्व पाहतोच आहे. हाताला काम नाही... पोटाला भाकर नाही...तूच सांग देवा काय करावं या लोकांनी....
..........घंटानाद झाला, दिवे लावून झाले, आत्मनिर्भर व्हा असा सल्ला देवून झालं, package ची घोषणा झाली..........पण या या गरिबांच्या आयुष्यात उजेड पडला का, मदत पोचली का? .....याचं उत्तर नाही असंच आहे....तरी आम्ही हे करतोय, ते करतोय याचा ढोल पिटवत राहायचा....हे करणार...ते करणार ची आश्वासने....आकडे फेकत राहायचे....इतक्या लोकांना घरी पोचवलं,.....इतके पैसे गरिबांच्या खात्यात टाकले........इतके अन्न-धान्य वाटप करण्यात आले...... स्थलांतरित मजुरांसाठी एवढ्या ट्रेन तयार आहेत वगैरे वगैरे..........आणि बिकाऊ मेडिया ने त्यांच गुणगान करायचं...........आकडे....आकडे आणि फक्त.......... आकडे.........संवेदना बोथट होत चालल्याचं ते लक्षण...
मन कि बात असो कि फेसबुक लाइव”……………....शब्दांनी पोट भरत नाही....................भुकेल्या पोटी मनोधैर्य वाढत नाही हे कुणी सांगावं?
………..खर्या अर्थानं गरिबी दूर करावी असं कुणाला वाटलं नाही.....त्यावर राजकारण मात्र होत राहिलं............ कोरोना आज ना उद्या जाईल...पण गरिबीचं काय/ ती कशी घालवाल...याचं उत्तर कुणाकडेही नाही.
कोरोना ची साखळी मोडावी म्हणून उपाय योजना सुरु आहेत.............कधी गरिबी ची साखळी मोडावी असं वाटलं....नाहीच..................... .
स्वातंत्र्यापासून समित्या वर समित्या स्थापन होत राहिल्या...योजना येत राहिल्या....कागदपत्री हजारो कोटी खर्च झाला....पण गरिबी काही दूर झाली नाही.............
कोरोना हा साथीचा आजार भयानक आहे पण त्यापेक्षा गरिबी हा साथीचा आजार जास्त भयानक आहे. त्यातून कसं वाचायचं?.................

सरकार कुणाची असो गरिबांच्या आयुष्यात कधी बदल झाला नाही. परंपरागत तसंच आहे...............गरिबी सारखा महाभयानक साथीचा रोग आजपर्यंत आला नाही.......पण त्यावर उपाय करावा...निर्मुलन करावं असं कुणाला वाटलं नाही.....
मुठभर लोकांकडे अगणित पैसा तर एकीकडे बहुसंख्य लोकांची दोन वेळेस च्या जेवणासाठी चाललेली धडपड....किती हि विषमता......
लोकांना करोना चं गांभीर्य नाही असं कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं...त्या लोकांचं जीवन पाहिलंय कधी...कामाला जातो तेव्हा घरात स्वयंपाक होतो ...या lockdown मुळे काम नाही....तर दाम नाही. कसे घरात थांबणार लोकं? बाहेर पडणारच...पोटासाठी....घरात असलेल्या मुलाबाळांसाठी.... चांगल्या पगारावर असलेल्या किती लोकांनी मदत केलीय गरजूंना? ....
याचं गरिबांच्या आयुष्यावर लिखाण करून लोकं नामवंत पत्रकार झाले, लेखक झाले आणि बक्कळ पैसा कमवू लागले...त्यांच्या प्रश्नांवर आंदोलनं करून सत्ता मिळवणारे हि अनेक.............................................आताही तसंच होईल...................................lockdown मुळे लोकांचे कसे हाल झालेत यावर पुस्तके येतील....वर्तमानपत्रात लेख येतील...कथा-कादंबर्या-कविता लेखन होईल, टीव्ही channel वर गप्पा  झडतील....पण पुढे काय? हीच लोकं खरे लाभार्थी...मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाणे ते हेच...
या lockdown मुळे लोकं कोरोना पासून वाचतील पण त्यांना  भुकेपासून कोण वाचवणार? हा अनुत्तरीत प्रश्न................गरिबांच्या नशिबी गरिबी....गरिबी आणि फक्त गरिबी....


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Thursday, May 14, 2020

असंच काहीतरी-६


....तुझा आणि माझा सहवास हा अलीकडच्या काळातला...... म्हणजे गेल्या सहा-सात वर्षातला. आमच्या सारख्या सामान्य माणसापर्यंत यायला तुला फार वेळ लागला. साधा संभाषण पुरता मर्यादित असलेला तू हळू हळू जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला. म्हणजे अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा मध्ये तुझाही क्रमांक लागला. जीवनाचा प्रत्येक भाग तू पादाक्रांत केलास. पूर्वी आत्मनिर्भर असणारं आमचं जीवन निर्भर कसं झाल समजलं नाही..............
आता हे  बघ ना, या लॉक डाऊन मध्ये सगळे घरात आहेत............भेटी-गाठी होईनात.....  तरी कोण काय करतेय ते तू पोचवतो आहेस ना सगळीकडे. फक्त toilet चं रिपोर्टिंग बाकी राहिलंय आता. येत्या काळात कुणास ठाऊक ते ही होईल.  ते रिपोर्टिंग बद्दल तर व्हिडीओ, स्टेटस येतात. काय करतोय, काय खातोय, कुणी बनवलं, कसं बनवलं अशा कित्येक गोष्टी तसेच  anniversery, वाढदिवस त्या मध्ये वन मंथ, टू मंथ पासून पुढे, अमका दिवस-टमका दिवस, शुभेच्छांचा वर्षाव, स्टेटस आणि नंतर स्टेटस चे स्टेटस रिपोर्टिंग करतो तू. बघणारे झूम करू करू बघतात रे पिक्चर फाटेपर्यंत... ओघाने येणारे लाईक आणि कमेंट पाहून आनंदाच्या उकड्या फुटतात रे.....काहीतरी वेगळ असल्याचा, सेलिब्रिटी असल्याचा भास.....तू नसता तर कसं झालं असतं ना या लॉकडाऊन मध्ये. केवढा तुझा आधार सर्वाना.....
तसा मलाही...पण काल परवा तुझा अपघात झाला ...तो होणारंच होता...हवी तशी काळजी घेतली नाही की कधी कधी अपघात होणारंच...अपघात झाल्यावर एक दिवस कसाबसा तू काढला आणि निरोप घेतला. ऐरवी मी आणि तू एक समीकरणच. तू नेहमी सोबतच. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. तू सोबत असलास की जगात मी एकमेव ज्ञान संपन्न असल्याची भावना साऱ्यांचीच. हल्ली तू एवढं वेड लावलय की लहान पासून वृद्धांपर्यंत तुझी क्रेझ आहे. जिकडे बघावं तिकडे तुझं साम्राज्य आहे. तू घड्याळ, calculator संपवले आता टीव्ही सेट वर तुझा डोळा आहे. ते ही तू येत्या काही वर्षात संपवणार यात शंका नाही.

आज तुझ्याविना दिवस काढला. कधी नव्हे ते दुपारी निवांत झोप काढली. हाताच्या बोटांना, डोळ्यांना आराम मिळाला.  आपल्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे हे कित्येक वर्षानंतर समजलं. सर्व सामान्य लोकांच्या आवाक्यात तू जेव्हा पासून आला तेव्हापासून लेखक, कवी, तज्ञ, गायक, संशोधक, राजकारण/समाजकारण/आर्थिक अशा सार्या क्षेत्रातील विचारवंत गल्ली-गल्ली मध्ये निर्माण झालेत. तुझ्यामुळे लोकांची Creativity बहरली आहे. आता बघा ना काहींनी चड्डी प्रकरण सुरु केलंय. त्यावर विनोद, कविता, विडंबन जोरात सुरु आहे. जगासामोराचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असल्यागत भाव जाणवतोय. एकीकडे कोरोना ने हाहाकार केलाय आणि आपली लोकं, तथाकथित विचारवंत, विचारप्रणालीचे अनुयायी एकमेकांवर तुटून पडत आहे....मात्र चड्डी कोण धुणार...मी नाही...ज्याचं त्याने...वगैरे वगैरे...आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न असू शकतो. लोकांच्या कल्पकतेला बारा तोफांची सलामी द्यायला हवी........
तू लोकांना जोडलं की तोडलं संभ्रम आहे मनात. It has brought the world closer असं वाक्य अनेकदा कानावर पडलं. पण आजकाल जिकडे पाहावं तिकडे भांडणं सुरु असतात कित्येकांची, कधीही न भेटलेल्यांची. भाषेचा स्तर तर विचारायला नको. सुसंस्कृत वगैरे शब्द फक्त बोलायचे झाले. त्या झुक्याने वाल उपलब्ध करून दिली. पोस्टी च्या पोस्टी असतात तिथे. चांगल्या, वाईट, सोज्वळ, अश्लील, विनोदी, गंभीर, प्रबोधनपर, राजकीय/अराजकीय अश्या सगळ्या प्रकारात मोडणाऱ्या. तिथे समाधान नाही झालं तर टीव टीवाट, टिक-टोकं आहेच ना.............
तू याला कारणीभूत आहे की माणूस हा प्राणी मुळातच तसा आहे. मत-मतांतरे असू शकतात. तू माणसाच्या हातात आला आणि झपाटून टाकलं त्यांना. कशाचीच भ्रांत नाही. समोरच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही. बरं तू त्या मायाजाल च्या साथीनं एवढं काही उपलब्ध करून दिलं की खरं काय आणि खोटं काय यातच गफलत होऊन बसली. तू त्यावर थांबला नाहीस तर जगाला ज्ञान-समृद्ध करणाऱ्या पुस्तकांनाही  निवृत्त करून टाकलस. भाषेचं तर विचारायची सोय नाही. जेवढी मोडतोड केलीय ती आजगायत कधीच झालेली नसेल............
तू एवढ्यावर थांबत नाहीस. लोकांचे रंग/रूप ही बदलून देतो. मी किती छान दिसतो अथवा दिसते ची जाणिव करून देतो ती पण खोटी खोटी. आभासी. आभास. सत्यापासून लांब घेऊन जातोस सार्यांना.....
तुझ्या एका क्लिक नं समोर भांडार उघडते. त्या भांडरातल मात्र नको असलेलं घेतलं जाते आणि कामाचं सोडून दिलं जाते. जे वैयक्तिक आहे, खाजगी बाब आहे त्याचा ही तू भांडाफोड करायला भाग पाडलस लोकांना. आणि जगासमोर आणण्याची चढा-ओढ सुरु झाली. हल्ली लोकं तुला चड्डी कपडे  घालायला लागले मात्र स्वतः घालायला विसरून जात आहेत. किती बदल झालेत तुझ्यात. सुरुवातीला अतिशय साधा होतास तू. अल्पावधीत  स्मार्ट झालास पण आम्ही मात्र मात्र गाढवं. माणसाची प्रगती झाली की अधोगती यात गफलत आहे.  तू स्टेटस सिम्बॉल झालास सर्वांसाठी. तू किती महागडा यावरून श्रीमंतीचा अंदाज येऊ लागला. डोळ्यांनी फार दिसत नाही तरी तपासणी करून चष्मा लावत नाही लोकं, सत्तर –पंच्याहत्तर हजारांची गाडी घेतलेला व्यक्ती हजार रुपयाच हेल्मेट घेत नाही किंवा चाळीस पन्नास हजाराचा laptop घेतला की दोन-तीनशे रुपये security साठी घालवत नाही. पण तुझ्या बाबतीत व्यक्तीचा स्वभाव वेगळा. तुला विकत घेतला की लगेच कपडे परिधान केले जातात सुरक्षित राहावं म्हणून...........
माझ्या ओळखीत ल्या एका व्यक्तीन मुलगी हट्ट करून बसली म्हणून पंधरा हजार रुपये व्याजाने घेऊन तुला खरेदी केलं............  
एवढंच काय तुझ्या मदतीनं कोण कुठं फिरायला गेलं त्याची इत्यंभूत माहिती माहिती मिळते. ते पण लाइव्ह.  पण त्या तुझ्या माहितीनं आमच्या घरात राडे होतात ना भाऊ. काय सांगू तुला? आमचं सुखी आयुष्य ही तुला पाहवत नाही राव................
तू प्रवेश केला आणि अर्थकारण बदललं. तुझ्या मदतीने नाही किती गले-लट्ठ झालेत. अच्छे दिन आणलेत की  कित्येकांना.....
तुझ्या येण्यानं जगण्याचे संदर्भ बदलले. चोवीस तास सोबत असतो तू. क्षणा-क्षणाची खबर बात कळत असते. सकाळी toilet ला गेलो तरी तू साथ सोडत नाही. किंवा तुझी साथ सोडवत नाही. प्रत्येकाला तू हवा-हवासा वाटतो........  
आज दिवसभर कसं शांत वाटलं.............जगात काय सुरुय याचा गंध ही नाही............. कोण काय म्हटलं, कोण ट्रोल झालं, कुणी टीका केली, कुणाचं काय प्रत्युत्तर ....काहीच माहित नाही. मेंदूला ही आराम मिळाला. अन्यथा कोण बरोबर, कोण चूक यावर विचार करण्यात किती वेळ जातो काय सांगू.............
तुझ्याशिवाय जगणं कठीणच. मी पुन्हा तुझ्याकडे येईलच.............
तो पर्यंत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो. तसंही आमच्या ५६ इंच वाल्यांनी, आत्मनिर्भर भारतचे प्रणेते, जुमालाकार, प्राईम टाईम वाले भाषण बहाद्दर यांनी आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिलाच आहे.  (पण सगळे आत्मनिर्भर झाले तर सृष्टी कशी टिकायची हा प्रश्न मला भंडावून सोडतो.)...................जमलं तर ठीक नाहीतर तू आहेसच की.............    
तो पर्यंत अलविदा!!!

सचिन भगत (९९२२१२७३८५)                                              
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Tuesday, May 12, 2020

#आनंदी_क्षण

परिवर्तन...आनंद...क्षण. परिवर्तन हे निरंतर तर आनंद अथवा क्षण अल्पजिवी. परिवर्तन होताना यांची गाठभेट होतच राहते. या मार्गक्रमणात आनंदाच्या व्याख्या हि बदलत जातात.  त्या परिवर्तनाने कित्येक आनंदाचे क्षण ही लुप्त होऊन जातात. वर्तमानात आनंद या शब्दात ते क्षण बसत नाही. कारण काही असो. जीवनाचा फोलपणा असो...स्वतःची ओळख असो...उमगलेला जीवनाचा अर्थ असो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बदलत जातो...आपल्या संकल्पना बदलत जातात...जीवनाचा अर्थ बदलत जातो. मुळात आपण जगतो ते आनंदाच्या क्षणांसाठी. सारी धडपड हि त्याच्यासाठी. ते क्षण येतात आणि काही कळण्याच्या आत निघून जातात. पुन्हा आपला प्रवास ते मिळवण्यासाठी.

परिवर्तन जळगाव यांच्या जीवनातील 'आठवणीतील आनंदाचे क्षण' या उपक्रमात मनोज ने लिहायला भाग पाडलं. हे लिखाण मला कित्येक वर्षे मागे घेऊन गेलं. ज्या वर्षांचा मागमूस ही नव्हता त्यात पुन्हा गेलो. विस्मृतीत गेलं होतं सगळं. जशास तसं आठवत नाही. ज्या काही पुसटश्या आठवणी आहेत त्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न.

आनंदाचे क्षण:

एक-    

२०००-२००१ चा काळ. उदारीकरण सुरु होऊन दशक उलटत होतं. त्याचा परिणाम सगळीकडे जाणवत होता. शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नव्हतं. सिंदखेड च्या बस स्टॉप वर बसलो होतो. वाट पाहणं सुरु होतं. तास दोन तास बसलो असेल. त्याला कारण ही तसंच होतं. तो निकालाचा दिवस होता. उत्सुकता होती. शिक्षण जीवन बदलू शकते हे समजण्याचा तो काळ. ती आशा कुणाला नसणार. मी त्याला अपवाद कसा ठरेल. त्या साली मी दहावीला होतो. इंटरनेट ग्रामीण भागात पोचायचं होतं.  डिजिटल क्रांती व्हायची होती. दहावी म्हणजे त्यावेळी तो महत्त्वाचा टप्पा. त्यावर पुढे काय करणार हे ठरवायचं. किती गुण मिळवले यावर गुणवत्ता ठरवली जायची. मुळात परीक्षेत मिळणारे गुण आणि गुणवत्ता याचा तिळमात्र सबंध नाही हे समजायला पुढे अनेक वर्षे गेली. असो. ज्या शाळेत मी शिकत होतो ती नवीन स्थापन झालेली. नॉन-ग्रांट. बिन-पगारी शिक्षक. शाळेच्या इमारती व्हायच्या होत्या. पत्र टाकून सप वापरून वर्ग तयार केलेले.  त्या शाळेसारखं आमचं होतं. वर्तमानात काहीच नव्हतं. फक्त सुवर्ण भविष्याचं स्वप्न. असं असताना सुद्धा शैक्षणिक वातावरण चांगलं होतं. स्पर्धा होती...शिक्षकांची शिकविण्याची तळमळ होती. त्या तालमीत आम्ही तयार होत होतो. एका बस मधून सर उतरले आणि मी त्यांच्या मागे धावत गेलो. सर निकाल काय आहे?

सर खुश होते. पहिला आहेस तू. ८२ टक्के. इंग्रजीत ८९ मार्क्स. ते ऐकलं. तेव्हा झालेला आनंद पराकोटीचा. तो पहिला क्षण जेव्हा स्वतःबद्दल काहीतरी करू शकतो याचा आत्मविश्वास दिला. स्व ची जाणिव म्हणता येईल. त्यावेळेस हे खूप मार्क्स झालेत. आता असणारी मार्कांची खैरात त्या वेळी नव्हती. पुढे त्या इंग्रजी विषयाने मला तारलं. पदवी आणि पदव्युत्तर त्यातच.

त्या शाळेत अजूनही बोर्डवर नाव आहे माझं. पहिला असल्याने एक चांदीचा शिक्का बक्षीस म्हणून मिळालेला. तो टिकवता आला नाही तो भाग वेगळा. ते यश तसं एकट्याच नव्हतंच. त्यामागे शिक्षकांची मेहनत होती. दांडगे सर याचं इंग्रजी शिकवण, वाघ सर याचं गणित अजूनही स्मरणात आहे. त्या लोकांनी आम्हाला घडवल. न घडण्याचे हजार गुण होते आमच्यात. त्यामुळे त्यांच्या समोरील आव्हानांची कल्पना येईल . दगडांना पैलू पाडण्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. स्वप्न पेरली त्यांनी आमच्या आयुष्यात. सगळीकडे उजाड रान असताना हिरवळीची स्वप्ने दाखवली. आयुष्यात जे काही करता आलं त्याची सुरुवात त्या शाळेत.

प्रचंड आनंद देणारा तो क्षण. तेवढे गुण पुन्हा कधी मिळाले नाहीत आयुष्यात.

आता शाळा बदलली आहे. सिमेंट च्या भिंती झाल्यात. पुष्कळ झाडे लावण्यात आली त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली.

 

दोन-

आयुष्यात प्रत्येक गोष्टी ठरवून होत नाही. तसंच ठरवून मित्र हि होत नाही. तसच काहीतरी आमच्यात.  मुकेश मला पहिल्यांदा भेटला तो १९९८ साली. आठव्या वर्गात. फक्त एक वर्ष कारण नंतर शाळा बदलली मी. मित्र वगैरे म्हणता येणार नाही त्यावेळेस. पण वर्ग मित्र. अनोळखी...वर्गमित्र...मित्र आणि सर्वकाही असा तो प्रवास. मनोज भेटला त्या एम.जे. च्या होस्टेल ला २००४ साली. आणि मग सान्निध्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंददायी. नाना तर्हेचे उद्योग केलेत...भटकंती असो...खेचाखेची असो...चित्रपट असो... हॉटेलिंग असो की एका डब्यात दोन ची कसरत.  व्यक्त करता येणाऱ्या आणि व्यक्त न करता येणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. यांच्या सान्निध्यात आनंदाची परिभाषा बदलली. आपलं आयुष्य हे आपलं नसतेच. आसपास अनेक लोकं आपल्यावर प्रभाव टाकत असतात. माझं लिखाण, वाचन ही त्यांची देण, त्यांचा प्रभाव. सहवासाने माणूस घडतो तसा तो प्रकार. माझ्या चाकोरीबद्ध आयुष्याला यांनी यु टर्न दिला. वेळ-प्रसंगी आधार दिला. मला बदलायला भाग पाडलं बहुतांशी. ते माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित प्रवास कठीण झाला असता. अनेक वाद-विवाद, विचारांची  भिन्नता असूनही सोबत कायम राहिली. असं कुठलंही क्षेत्र नसेल ज्यावर चर्चा होत नसेल. पुढे मी आणि मुकेश पुण्यात कित्येक वर्ष सोबत होतो. गमती-जमती, चांगले-वाईट प्रसंग आम्ही पाहिलेत, अनुभवलेत. रोज कमीत कमी एक फोन ठरलेला असतो त्याचा. आम्ही जेव्हा ही भेटतो तेव्हा आम्हाला एकांत हवा असतो गप्पा मारण्यासाठी.

तीन-

पदवी संपली होती. नेट-सेट हे उद्दिष्ट होतं. पुढे पुण्यात विद्यापीठात जायचं तर प्रवेश परीक्षा होती. इतर विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी फक्त सहा जागा त्या तीन ओपन तर तीन राखीव. ऐकीव माहितीवरून प्रवेश मिळणे दुरापास्तच. जळगाव सोडणं कठीण होतं. अर्ज भरून ही परीक्षेला जायची इच्छा नव्हती. त्यावेळी मनोज म्हटला तू नाही गेलास तर लोकं म्हणतील लायकी नव्हती, त्यापेक्षा पास हो आणि जाऊ नको. जगाला ताठ मानेने सांगता येईल. मी २३ एप्रिल ला प्रवेश परीक्षा दिली. तो पुण्यात जाण्याचा पहिला प्रसंग. जनरल मध्ये प्रवास करणं म्हणजे हाल च. ते अनुभवलं. २००-२५०  विद्यार्थी आणि जागा फक्त सहा. आठ-दहा दिवसा-नंतर विद्यापीठात फोन केला. शेख madam होत्या तेव्हा. तुझा नंबर लागला. लवकर येऊन प्रवेश घे. पण माझा काही विश्वास बसेना. अजून दोन वेळा फोन केला. ती बाई कंटाळली आणि म्हटली आता जर तुझा फोन आला तर प्रवेश रद्द करून टाकते.  हा टर्निंग पोइंट. बिफोर आणि आफ्टर...आयुष्याचे दोन भाग...पुण्यात जायच्या पूर्वी आणि पुण्यात गेलानंतर ...प्रचंड दरी आहे. मी ...फक्त मी न राहता वेगळा काहीतरी झालो.  आयुष्य बदललं...जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला...यश-अपयश हे फक्त शब्द न राहता   यशाला अनेक हाथ आहेत, अपयशाला कुणीच वाली नाही हे कळून चुकलं. व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याला अर्थ नाही. समाज फक्त यशस्वी लोकांचे गुणगान करतो...ऐकतो...अपयशी लोकांना या समाज व्यवस्थेत स्थान नाही. हि जाणिव त्या विद्यापीठात झाली. म्हणून तिथला प्रवेश गेम-चेंजर. आनंद देणारा क्षण. (एम. ए. झाल्यावर  एम.फिल , वृत्त पदविका वगैरे. विद्यापीठात वसतिगृह तीन आणि पाच चा मुक्काम, रात्री-बेरात्री भटकंती...पुण्याचा आसपास गड-किल्ले यांच्या वार्या.  काही ठराविक व्यक्तींसोबत पालथा घातलेला फर्गुसन रोड, टोकीज, हॉटेल्स, ओपन कॅन्टीन, ओल्ड कॅन्टीन, आदर्श कॅन्टीन चे ते क्षण, पैसे नसताना खिचडी बनवून खाण्याचा आनंद इत्यादी.)

*श्रीमंत भाई, चोथवे सर,मिश्रा सर, बालाजी सूर्यवंशी, नामदेव पवार, सुनील कणकटे, तानाजी, राहुल राजपूत यांच्या सोबत घालवलेले क्षण...

चार- :

नेट परीक्षे बाबतीत जे कित्येकांचं झालं तोच संघर्ष...त्रास माझ्याही वाटेला आला. कितीही प्रयत्न करून असफल. जवळ जाऊन हुलकावणी अनेकदा. ओपन मधून पास व्हायचा किती संघर्ष असतो हे काही वेगळं सांगायला नकोच.  समोरचे प्रश्न वाढत होते...शेक्सपिअर ने म्हटलंय...

When sorrows come, they come not single spies. But in battalions!”(Hamlet)

तसाच काही प्रकार झाला होता. अडचणी वाढत होत्या. पूर्ण वेळ अभ्यास कठीण होता.   त्यामुळे शेवटी पर्याय म्हणून अभियांत्रिकी कडे वळलो. २०१२ च्या नेट परीक्षेची फोर्म भरण्याची जाहिरात आली होती. मला फोर्म भरायचा नव्हता. सोडून दिलं होतं. तेव्हा पंढरपूर ला होतो. फोर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिद्धार्थ काळे या माझ्या ज्युनिअर चा फोन आला. फोर्म भरला का तू? त्यानं विचारलं. मी नाही म्हटलं. त्यानं आग्रह केला. तो म्हटला स्कॅन करून मार्क लिस्ट पाठव, बाकी मी करून घेतो. इच्छा नसताना सुद्धा मी त्याला मार्क लिस्ट पाठवून दिली. डी.डी. वगैरे त्यानेच केलं सगळं. सेट भवन ला जावून फोर्म भरून दिला.

जून च्या शेवटच्या आठवड्यात रविवारी परीक्षा होती. जावं कि जावू नये या द्विधा मनस्थितीत होतो. रात्री बस स्तोप ला गेलो. पंढरपूर वरून चार-पाच तासाचा प्रवास.  पंढरपूर बस-स्थानकावरून सुटणारी साडे-दहा ला असणारी बस निघून गेली होती. त्यानंतर फक्त कर्नाटक वरून येणाऱ्या बसेस असायच्या. पण त्या वेळेस बेळगाव प्रश्नाचं आंदोलन चिघळल होतं त्यामुळे त्या बसेस येणार नव्हत्या. मी रूम वर जायला निघालो. बस स्टॉप च्या बाहेर येत नाही तर रोहिदास ढाकणे या मित्राचा फोन आला. कुठपर्यंत आलात त्यानं विचारलं. मी त्याला परिस्थिती सांगितली. आपण भेटू...तुम्ही या तर खरं. मी पुन्हा बस- स्टॉप ला आलो. रात्री दोन-अडीच वाजता ज्यादा बस सोडण्यात आली पुण्याला जाण्यासाठी. हडपसर ला परीक्षा केंद्र होतं. पहिला...दुसरा पेपर सोडवला. तिसरा पेपर मधील शेवटचे पंचवीस प्रश्न सोडवणे जिवापार झालं. सोडून दिले तसेच आणि बाहेर पडलो. भेटी-गाठी झाल्या आणि पंढरपूर ला परतलो.

निकाल वगैरे ची चिंता नव्हतीच. फेल शिवाय काय होणार...याचा आत्मविश्वास.

जून २०१२ च्या नेट परीक्षेचे दोन निकाल जाहीर झाले होते त्या वेळेस. मी कधीही निकाल पाहिला नव्हता. परीक्षा क्रमांक हि माहित नव्हता. दुसरा निकाल जेव्हा जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी श्रीमंत जाधव या मित्राचा फोन आला. तुझा परीक्षा क्रमांक सांग म्हणे. मला आठवत नव्हता. मी पास होऊ शकत नाही. जाऊ द्या ना. मी म्हटलं. त्यांचा आग्रह एवढा कि मी आठवून आठवून ५०३०००४७ असा क्रमांक सांगितला. तो चुकीचा होता. पुणे सेंटर वरून जेवढे इंग्रजी विषयात पास झाले होते ते सर्व माहित झाले होते. फक्त एक परीक्षा क्रमांक कुणाचा हे समजत नव्हतं. दोन-तीन दिवस गेलेत त्यात. बर्याच जणांचे फोन यायचे. विद्यापीठ विद्यार्थ्यांचा अभ्यास एवढा कि त्यांनी शोध सुरूच ठेवला आणि बी ची सिरीज पर्यंत येऊन ठेपले. श्रीमंत चा अजून एकदा फोन आला. तू नंबर चेक कर पुन्हा ...बी ची सिरीज म्हणजे तूच असशील. शेवटी नाईलाजाने नेट च्या वेबसाईट ला जाऊन लॉग इन केलं (पासवर्ड मिळवता येतो इमेल असला कि....माझा परीक्षा क्रमांक होता...५०३०१७४७). समोर मेसेज दिसला....Congratulations………….अजून बरंच काही लिहिलेलं होतं.

 ज्या गोष्टीचा एवढा पाठलाग केला पण ती दूर पळत होती. जेव्हा पाठलाग सोडून दिला...तेव्हा ती माझ्यापर्यंत.

नेमकं आयुष्यात असंच होतं.  अपेक्षित नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही.

नेट पास झाल्यावर मी पंढरपूर सोडलं. अनेक आठवणी आहेत तिथल्या. न विसरता येण्यासारख्या. तिथली स्वप्ने प्रत्यक्षात आली नाही याची खंत...........................

*पंढरपूर मध्ये माधव सरांशी झालेली ओळख, त्यांच्या सोबत केलेली भटकंती, सोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय.

पाच-

वर्षानुवर्षे पत्र्याच्या घरात राहून उबग आला होता...पावसाळा असला की गळती, हिवाळ्यात कडाक्याची थंडी...घरी असेपर्यंत ते अनुभवलं होतं.. ....त्यामुळे घर कायम मनात घर करून होतं...२०१५ ला स्वतःच घर तयार झालं....स्वतःच झालेलं घर...लग्न....आणि मुलगा....सर्व आनंद देणाऱ्या गोष्टीच. अनेक वर्ष जे स्वप्नात होतं ते प्रत्यक्षात उतरलं हा पेक्षा आनंद नसतोच कुठला. तसंही ते सोपं नव्हतंच...लोन साठी बँकांच्या वार्या...नन्तर हप्ते...ओघाने येणाऱ्या adjustments. मानलं तर त्यात ही आनंदच. जीवन ही एक सर्कस आहे...कसरती कराव्या लागतात. शेक्सपिअर च्या “As You Like It मधील मोनोलॉग ची सुरुवात सर्व काही सांगून जाते...

All the world’s a stage,

And all the men and women merely players;

They have their exits and their entrances;

And one man in his time plays many parts,

His acts being seven ages.

 

आनंदाचे क्षण यावर लिखाण करताना जे जगासमोर मांडता येते तेच लिहिण्याची कुवत... सांगता येणारे अनेक प्रसंग आहेत....परंतु ते सांगता येत नाहीत...समाजात जगताना चौकट ओलांडता येत नाही...त्या आपल्या मर्यादा. म्हणूनच आपण सामान्य. कारण असामान्य लोकांना चौकट हा प्रकार नसतोच. उधळून लावतात ते या सार्या चौकटी आणि मुक्तपणे संचार करतात. जीवनाचा खर्या अर्थाने आनंद घेतात.

आनंदाचे क्षण तसे दुर्मिळ ...पण त्यांचा पाठलाग सुटत नाही...धडपड सतत...ती काही केल्या थांबत नाही. आवक वाढली की गरजा वाढतात तसेच आनंदाच्या संकल्पना ही बदलतात...मग कितीही असलं तरी आपला संघर्ष सुरूच...तो थांबत नाही. ज्या क्षणांनी आनंद दिलाय ते विस्मृतीत गेले. आणि मी नवीन क्षणांच्या शोधात आहे.  नेमकं काय मला कळत नाही.  प्रतिकूलतेत अनुकुलता शोधनं ज्याला जमलं तो कायम आनंदी.

परिवर्तन जळगावचे आभार त्यांनी मला माझ्याच आयुष्याची आनंदाची सफर घडवलीत म्हणून.   ।।

 

धन्यवाद ।।।

परिवर्तनच्या विविध उपक्रमासाठी सबस्क्राईब करा परिवर्तनचं युट्युब चॅनेल

https://www.youtube.comll/channel/UCvmsOWIXxS-lIuzpwRw1JNQ

 

https://www.facebook.com/parivartan.jalgaon/

सचिन भगत

९९२२१२७३८५