शिक्षण. प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकण्याची
क्षमता असणारं. जसं-जसं त्याचं महत्त्व कळत गेलं तसा तसा शिक्षणाकडे लोकांचा कल
वाढत गेला. ही प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी. काहीना सहज मिळत जाते, काहीना
संघर्ष करावा लागतो तर काहींच्या नशिबी ते ही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात
चढ-उतार येत असतात. यश-अपयश चं चक्र सुरु असते.
पूर्वी दहावी च्या परीक्षेला प्रचंड महत्त्व
होतं. दहावीच्या मार्कांवर कुणी कुठं जायचं हे ठरवलं जायचं. कला, विज्ञान आणि
वाणिज्य यापैकी कुठल्या शाखेला जायचं ते या मार्कांवर अवलंबून असायचं. कला शाखेला
जाणारे बहुतांशी डी.एड. करायचे कारण डी.एड. म्हणजे नोकरी असं समिकरण होतं. आता ते
लुप्त झालंय तो भाग वेगळा.
विज्ञान शाखेला जाणारे अभियांत्रिकी किवा
मेडिकल कडे जास्त ओढा असणारे. ग्रामीण भागात त्यावेळेस शिक्षणाची दुरावस्था होती.
मार्गदर्शन वगैरे काही नाही. २०००--२००१ साली मी दहावी उत्तीर्ण झालो. ८२%. जास्त
मार्क्स मिळाले म्हणजे विज्ञान शाखेला जायचं असं होत. माझं ही तसंच झालं. जी
मानसिकता आसपास निर्माण झाली होती तिचा प्रभाव माझ्यावर ही.
भुसावळ ला पि. ओ. नाहाटा मध्ये अकरावीला प्रवेश
घेतला. विज्ञान शाखेबद्दल काहीच माहित नव्हतं. कुणी सांगणारं ही नव्हतं.
केवळ मार्क्स चांगले म्हणून मी तिकडे गेलो. व्हायचं तेच झालं.
बरं तो काळ म्हणजे खाजगी क्लासेस च्या वाढीचा.
त्यामुळे वर्ग ही संकल्पना नव्हतीच. तीन-चार दिवस कॉलेजला गेलो. वेळापत्रक पाहिलं.
पण वर्ग मात्र रिकामे. चीट-पाखरू ही नाही. कुणी ओळखीचं नव्हतं. इकडे-तिकडे
विचारपूस केली तर समजलं की सर्व मुलांनी बाहेर क्लास लावले आहेत. कॉलेज चे शिक्षक
तेथे शिकवायला जातात. जो क्लास लावेल त्याला practical चे मार्क्स ही चांगले. जिथे
आमचे शिक्षक शिकवायला जायचे त्या क्लास ला भेट दिली. एका विषयाचे साडे-तीन हजार.
ऐपत चं नव्हती. क्लास लावणे ही शक्य नव्हतं.
सकाळी मुलं फक्त practical ला यायची कॉलेजला.
विषयानुसार परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न. बरंच
काही विसरलो आहे.
#Mathematics (I & II)
दहावीला असताना त्रिकोणमिती हे प्रकरण मी स्किप
केलं होतं. कारण ते sinθ, cosθ, tanθ.कधी डोक्यात गेलंच नाही.
त्याचा नाद मी सोडून दिलेला. समजून घेण्याचा कधी प्रयत्न ही केला नाही. एखादं
प्रकरण स्किप केलं तर फार काही फरक पडत नाहीच.
विज्ञान शाखेत गेल्यावर सुरुवात Limitation. Derivative आणि Integration पासून. जिकडे पाहावं तिकडे sinθ, cosθ, tanθ. काही कळायला मार्ग
नव्हता.
maths चे बारा वाजतील ते कळलं होतंच. तसं झालंही. खर्या अर्थानं ते कधी समजलंच नाही. बारावी
ला असताना एक maths चा क्लास लावला होता. जेव्हा त्या सरांनी फीज मागितली तेव्हा
सोडून दिला.
ते vector , matrices, Permutations & combinations, probability असे काही
प्रकरणं जमत होते. पण maths कधी आवाक्यात आलं नाही.
एकतर क्लास नाही. स्वतः किती समजेल. सेल्फ-स्टडी
च्या पण मर्यादा.
#Physics-
याचे ही हाल तेच. ते thermodynamics,
semiconductor, Force, Waves, Oscillations, Surface tension डोक्यात गेलंच नाही. practical च्या वेळेस मी फक्त जाऊन
उभा असायचो. ग्रुप मधले इतर जण perform करायचे. मी फक्त copy. ते resonance tube
वापरून speed of sound काढा किंवा determine
अमुक-तमुक. आवाक्याबाहेर.
#Chemistry(Organic/Inorganic)-
chemistry ची अवस्था maths सारखीच वाईट. म्हणजे जे maths चं तेच chemistry चं. तो
केमिकल लोचा डोक्याबाहेरचा. Alkane,
Alkene आणि Alkyne स्वाहा. chemical bond वगैरे पण स्वाहा.
माझा फोकस राहिला तो नेहमी विचारल्या जाणार्या
प्रश्नावर. ती Wurtz Reaction तोंडपाठ. compound चे formulae/Structure असं काहीतरी पाठ करावे लागे. CH3CHO म्हणजे Acetaldehyde, HCHO म्हणजे Formaldehyde. कारण काही समजलंच नाही.
practicals ची अवस्था तिच. बर्याच दा प्रयत्न
करून पाहिला पण व्यर्थ. इतर जसे करतात तसं अनुकरण केल्यावर सुद्धा अपेक्षित
results मिळाले. नाही.
#Biology (zoology & Botany)-
या विषयाची स्थिती जरा बरी होती त्या diagram
सोडून. बर्यापैकी थेरी. Drawing नावाचा प्रकार आयुष्यात कधी आला नाही. जर्नल मध्ये
त्या figures /Diagrams कधीच जमल्या नाहीत. मग तिथे मी युक्ती शोधून काढली. मी इतरांचे जर्नल लिहून देणार त्यांनी माझ्या figures
काढून द्याव्यात. ते नाही जमलं तर ट्रेस पेपर घेऊन यायचा. एखाद्याचं जर्नल आणायचं.
शाई संपलेल्या पेनाने त्यावर घोटायचं. म्हणजे जर्नल खाली जर्नल अन मध्ये ट्रेस
पेपर. असा तो काथ्याकुट. त्या zoology मधील फक्त Amoeba ची आकृती तेवढी येत होती. कारण त्याला ठराविक असा शेप
नव्हताच. Botany चे हाल काही वेगळे सांगायला नको.
#English & Marathi:
हे दोन विषय फक्त माझे. तसे ते सर्वांचेच.
अशी परिस्थिती. क्लास नाही. कॉलेजला लेक्चर
नावाचा प्रकार नाही.
सेल्फ-स्टडी एकमेव पर्याय. बाजारातून ते Jigar, Reliable सारख्या नोट्स घेऊन यायच्या. समजत तर काहीच
नाही. मग घोकंपट्टी हा एकमेव आधार. कसंतरी अकरावी चं वर्ष संपलं. निकाल जेव्हा
लागला तेव्हा मिळालेलं टक्के होते ५६. म्हणजे ८२ ते ५६ असा ढासळलेला आलेख. physics,
chemistry, maths मध्ये ३५ प्रत्येकी. Biology म्हणजे थेरी असल्याने तिथे जास्त मार्क्स. तेच मराठी आणि
इंग्रजी च्या बाबतीत. त्यामुळे ते ५६ टक्के तरी झालेत. सायन्स सोडून आर्ट्स जावं
असंही वाटे. पण तसं केलं तर नाचक्की होईल या भितीने ते तसंच सुरु ठेवलं. जर
अकरावीत काहीच समजलं नाही तर बारावीत समजण्याचा प्रश्न निर्माण होणारच नव्हता.
अकरावी हा बेस.
काय होईल या तणावाखाली बारावीचं वर्ष सुरु
होतं. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेआधी सराव
परीक्षा व्हायच्या. फेब्रुवारी मध्ये सराव परीक्षा झाली. बोर्डाच्या परीक्षेला
दहा-बारा दिवस उरले असतील. सराव परीक्षेमधील प्रगती म्हणजे सर्व विषयात शून्य. Biology, मराठी आणि इंग्रजी विषय वगळता.
काय होणार? मी चिंतेत होतो. पण एका गोष्टीवर
विश्वास होता ती म्हणजे घोकंपट्टी. परीक्षेच्या आदल्या दिवशी. गेल्या चार-पाच
वर्षाचे पेपर पाहिले. नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नाच्या रट्टा मारायचा. तेच
केलं. म्हणजे गणिते पाठ, chemistry च्या Reaction पाठ. एखादी स्टेप विसरून जात होतो पण उत्तर मात्र बरोबर.
असे उद्योग करून कशी-बशी परीक्षा दिली. परीक्षा
झाल्यावर सगळ्या नोट्स, पुस्तकं रद्दीत देऊन टाकली. मला त्या आठवणी सुद्धा नको
होत्या. कारण पुढे मला भविष्य दिसतंच
नव्हतं त्या शाखेत.
आयुष्यात घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरत
नाहीत. मुळात कुठलाही निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतोच. आपण त्याला कसं सामोरे
जातो किंवा त्याला कसं सिद्धीस नेतो त्यावर सर्व अवलंबून. निकाल जाहीर झाला तेव्हा
६२ टक्के होते. ते माझे नव्हतेच. फक्त रट्टा मारण्याचा फायदा.
पुढे विज्ञान शाखा सोडून मी कला शाखेकडे वळलो.
या दोन वर्षात तसं बरंच काही समजत होतं. पुढे
बर्याचदा वाटलं की विज्ञान शाखा सोडायला नको होती. जमलं असतं हळू-हळू. पण तसं कुणी
सांगणारं नव्हतं.
आयुष्यात आपण चुका करत जातो अनावधानाने. मी विज्ञान शाखेला गेलो ती पहिली चूक आणि दुसरी
म्हणजे विज्ञान शाखा सोडली ती.
परिस्थिती नुसार आपण निर्णय घेत जातो. काळाच्या
कसोटीवर ते चूक किंवा बरोबर असं आपण मापन करू शकत नाही. तत्कालीन परीस्थीती चं अशी
असते की आपण तशी कृती करत जातो. मी असं करायला नको होतं किंवा हे करायला पाहिजे
होतं याला काही अर्थ नाही.
निर्णय चुकीचं जरी असला तरी तरी त्याला योग्य
करता येतो.
ग्रामीण भागातून शहरी भागात गेल्यावर जी
तारांबळ उडते ती अनुभवली. त्यांचा क्लास वेगळा. या दोन वर्षात खूप कमी जणांशी
संबंध आला. match नाही होत आपण. कित्येकांना मी ओळखत नाही. practical च्या batch
चे काही जण ओळखीचे झाले होते फक्त. आपल्या मनातला inferiority complex कधीच जात नाही. शहरातले विद्यार्थी आपल्याला
सामावून घेत नाही आणि आपणही ही कधी त्यांच्यात रुळण्याचा प्रयत्न करत नाही.
प्रत्येकाची जडणघडण वेगळी. मुलं-मुली एकत्रित गप्पा मारताना पहिल्यांदा पाहिले.
आपणही त्या घोळक्याचा भाग असावा असं कित्येकदा वाटलं पण सत्यात कधी उतरलं नाही.
कॉलेजला गेल्यावर वेळ असलाच तर कधी कट्ट्यावर
जाऊन फक्त इकडे-तिकडे पाहत राहायचं किंवा कॅन्टीन ला जाऊन फक्त बसायचं आसपास काय
चाललंय ते बघत. कित्येकदा त्या तापी नदीच्या किनार्यावर जाऊन बसत होतो. त्या नदीचा
प्रवाह पाहत. कितीही अडथळे आले तरी नदी आपला मार्ग तयार करतेच. तसंच काहीतरी
आपल्याही आयुष्यात होत असते. मार्ग सापडतो. फक्त ती दृष्टी हवी. धैर्य हवं. अपयश
पचविण्याची ताकद हवी.
पोस्ट-स्क्रिप्ट:
शिक्षणाचा बाजार सुरु होण्याचा तो काळ. त्या
लाटेत प्रत्येकाने आपले हात धुवून घेतले. पण त्यावर कुणी कधी बोललं नाही. खाजगी
क्लासेस चा तो सुकाळ. सरकारची भूमिका तर बघ्याची नेहमी. शिक्षकांनी पगार आणि
शिकवणी वर्ग यातून अमाप पैसा कमावला. नंतर शासनाने बंधने आणली पण खूप उशिरा सुचलेल
शहाणपण. पण शोषण या लोकांनी केलंय त्याचं काय? आताही आताही परिस्थिती अशी आहे की
विद्यार्थी फक्त प्रवेशापुरते महाविद्यालयात जातात. क्लास होतंच नाहीत
महाविद्यालयात. सगळ्यांचे क्लासेस आहेत दुसरीकडे. अकोला, लातूर, नांदेड, क्वोटा
असे हब/ pattern निर्माण झालेत. पैसे कमविण्याचा सोपा मार्ग. तसा शिक्षण हा आपला
मुलभूत अधिकार. पण यात घुसखोरी झाली आणि शिक्षण माफिया तयार झालेत. त्यावर कशी बंधने
आणावीत? लाखाच्या घरात फीज आहे. एका-एका क्लास ला हजारो विद्यार्थी आहेत. मग
महाविद्यालये हवीत तरी कशाला? शासनाने का खर्च करावा? का अनुदान द्यावं? प्रश्न
गंभीर आहे. गरीब विद्यार्थ्यांनी शिकावं कसं? त्यांनी हा खर्च कसा पेलावा? स्पर्धेत
ही मुलं मागे नाही पडणार तर काय?अजूनही यावर कुणी बोलत नाही. बहुतांशी संस्था
राजकारणी लोकांच्या. ते त्यांचे हितसंबंध जोपासणार. पालक ही काय करणार. ऐपत
नसतानाही ते मुलांना चांगलं शिक्षण मिळाव म्हणून धडपडत असतात. याचाच फायदा ही लोकं
उचलतात. आज ही कित्येक लोकांच्या आवाक्याबाहेर आहे शिक्षण. सामान्य लोकांचा कुणी
वाली नाही हे त्रिकालबाधित सत्य.
सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज
अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव