Tuesday, February 18, 2020

नेमकं ८


शिक्षण...परवलीचा शब्द. काळाच्या ओघात त्याचं महत्त्व सर्वांच्या लक्षात आलंय. त्यामळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत त्याकडे कल प्रचंड वाढलाय. सर्वच स्तरातील लोकं आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यात पुढाकार घेत आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षण म्हटलं शाळा, माध्यम आणि नंतर बोर्ड याची चोईस आहे.
काल एक जण भेटला होता. अनौपचारिक गप्पा करताना म्हटला तुझा मुलगा शाळेत जातो का?
मी म्हटलं, हो, नर्सरीत जातो.
सि.बि.एस.ई. का? तो म्हटला.
नाही...स्टेट बोर्ड. मी सांगितलं.
तो उत्तरला-सि.बि.एस.ई. ला टाकायला पाहिजे होतं ना. त्यांचा syllabus अडव्हांस असतो.
मी म्हटलं फार काही फरक पडत नाही. मी झेड पि ला होतो. पहिली ते चौथी एक शिक्षक होते. जे शिकवलं ते अजूनही आठवते. सि.बि.एस.ई असो का स्टेट बोर्ड काय शिकवलं जाते त्यापेक्षा कसं शिकवलं जातं ते महत्त्वाचे. Board/school doesn’t matter.
मी ऐकू शकत नाही असं दिसल्यावर त्याने तो विषय सोडून दिला. त्याचं काही चूक होतं असं मी म्हणणार नाही कारण सगळीकडे इंग्रजी माध्यम आणि उपलब्ध असेल तर सि.बि.एस.ई. बोर्ड ही  मानसिकता झालीय. त्यांच्या दृष्टीने स्टेट बोर्ड म्हणजे मागासलेलं. त्यामुळे सि.बि.एस.ई. चं पिक जोमात आहे. काही वर्ष चालेल. अजून कुठलं तरी बोर्ड येईल. मग त्याची हवा. आपण त्यात वाहत जातो. अव्वाच्या सव्वा फी भरायला तयार. सि.बि.एस.ई. ची फक्त  नर्सरी ची पुस्तके घेतली तर अडीच-तीन हजाराच्या घरात. असं साधारण चित्र आहे.  बोर्ड कुठलंही असो, शाळा कोणतीही असो. जोपर्यंत आपण काही करत नाही. काहीच होत नाही.
सि.बि.एस.ई. शाळा सर्व खाजगी. तिथे शिकवणारे कसे आहेत याच्या खोलात गेलं तर वास्तव लक्षात येईल. अत्यंत कमी पैशात हे खाजगी शाळा मालक कामे करवून घेतात. गुणवत्ता काही नामवंत शाळा सोडल्या तर कुठं आहे? शेत चांगलं असून चालत नाही. त्याची तशी मशागत व्हायला पाहिजे. तसंच शिक्षणाचं. पण कोण सांगेल? जिकडे प्रवाह तिकडे सारे.
झेड पि. शाळा म्हणजे कमकुवत दर्जा चे शिक्षण असं चित्र आजकाल निर्माण झालंय. आणि सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई म्हणजे शिक्षणाचा दर्जा उत्तम. त्यामुळे शिक्षणाचा बाजार सुरू झाला आहे.
मुलांना चांगल्या  शाळेत घालण्यासाठी प्रत्येक पालक धडपडतो. जे आपल्याला मिळालं नाही ते मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. हिच शिक्षण सम्राटांसाठी संधी आणि त्यांनी ते हेरली पण. आज शहरी भागापासून खेड्यापाड्या पर्यंत  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झालाय. त्यात वेगवेगळ्या बोर्डांची भर.
कित्येक पालकांना आवाक्यात नसताना सुद्धा या शाळांबद्दल ओढ आहे.  चांगलं बोर्ड आणि महागडी शाळा म्हटलं की दर्जा चांगला ही भावना निर्माण झालीय.
भली मोठी इमारत बांधायची, स्वच्छता गृह सारख्या पूरक सुविधा आणि प्रोजेक्टर किंवा डिजीटल बोर्ड, कॅमेरे लावले की लोकं आपोआप येतात.  तिच त्यांची खरी जाहिरात. शिक्षकांचा दर्जा, त्याचं शिक्षण किंवा शिकवण्याची पद्धत याकडे कुणी लक्ष घालत नाही.
एके काळी संस्कारांचं केंद्र असलेलं प्राथमिक शिक्षण आता व्यवसायाचं केंद्र बनलंय. आपण सगळेच याला कारणीभूत. आपण बदललो आहे त्यामुळे शिक्षण सम्राटांना फावलंय.
छळी लागे छम छम, विद्या येई घम घम असं पूर्वी म्हटलं जायचं. आज शिक्षक मुलांना हात ही लावू शकत नाही. तसं केलं तर पालक दुसर्या दिवशी शाळेत हजर असतात.
झेड.पि. शाळांची अवस्था दयनीय आहे. त्याला कारणीभूत सरकारी उदासिनता. बरं जे सत्तेत त्यांचाच खाजगी शाळा. त्यामुळे त्यांनी ही अवस्था जाणूनबुजून होऊ दिली. राजकारण्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय.  आज झेड.पि. शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. विद्यार्थी मिळत नाहीत. सुरु असलेले वर्ग बंद पडत आहेत. शिक्षकांचं समायोजन केलं जातंय.
शिक्षणसम्राट निर्माण झालेत गेल्या काही वर्षात. त्यांनी शिक्षण हा व्यवसाय/ व्यापार करून टाकलाय.  आज हे शिक्षणसम्राट सर्व जनतेला वेठीस धरत आहेत. भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे लोकं जनतेला लूटत आहेत. नर्सरी पासून केजी ते पीजी पर्यंत यांचा धंदा जोरात सुरु आहे. कित्येकांना त्यांचे डोनेशन परवडणारे नाही.  अशीच परिस्थिती राहिली तर शिक्षण फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल. आपल्या हे लक्षात येत नाही. अजून काही काळ येणार नाही.

खरं पाहिलं तर बाहेरून जे दिसते त्याला बळी न पडता शाळेतील शिक्षण पद्धतीचा दर्जा बघायला हवा. चांगल्या इमारती असल्या म्हणजे चांगलं शिक्षण असेलच असं नाही.
न संपणारा विषय आहे. तूर्तास एवढंच.

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Wednesday, February 12, 2020

नेमकं ७

एका whats app ग्रुप मध्ये होतो. मी सहसा कुठली पोस्ट टाकत नाही. फोरवर्ड तर कधीच नाही. फक्त आलेल्या पोस्ट वाचायच्या. यापलीकडे काही नाही. त्या ग्रुप मध्ये बरेच सभासद होते. सर्व सुशिक्षित. त्यातले बहुतांशी सभासद एकाच विचारधारेचे. त्यामुळे पोस्ट ही तश्याच. तशी आमची कुठली विचारधारा नाही. कारण विचारधारेने पोट भरत नाही हे कधीच समजलेलं. जे चांगलं ते चांगलं. मानवते पलीकडे कुठली विचारधारा असू शकत नाही. दुर्दैवाने तसं होत नाही. त्या विशिष्ट विचारधारेच्या पोस्ट एक-दोन लोकांना काही पटत नव्हत्या. त्यांचे नेहमी वादविवाद चालायचे. सगळा ग्रुप तुटून पडत होता. म्हणजे वाद-विवाद ही virtual. मी फक्त वाचत होतो. न राहवून मी आधी त्या विचारधारेच्या समर्थन करणाऱ्या पोस्ट टाकू लागलो आणि  नंतर त्याच्या विरोधात. हे सगळं ठरवून केलं होतं. समर्थन करत होतो तो पर्यंत ठीक पण नंतर जेव्हा विरोध करू लागलो तर काही दिवसानंतर admin ने मला remove केलं. तसंही मला काही घेणं-देणं नव्हतं. मला चांगलं वाटलं. आणि admin ची कीव आली. ज्या विचारधारेचा तुम्ही स्विकार करता, प्रचार करता तिचा तुम्ही बचाव करू शकत नाही, चांगलं काय ते पटवून देऊ शकत नाही या पेक्षा फोलपणा काय असू शकतो. तसंही जगाच्या कुठल्याही कोपर्यात जा खरं ते खरं. त्याला  पटवून द्यायची गरज नसते. ते सर्वाना माहित असते.
लढा विचारांचा विचारांशी असला पाहिजे. तो वैयक्तिक असता कामा नये. कुणी आपल्या विचारधारेशी सहमत असेल असं नाही. पण आजकाल लोकांना ते जमत नाही.
आज-काल कुठेही जा. चहाची टपरी असो...सलून, नाश्ता सेंटर, बस स्टोप, मार्केट ला  किंवा अजून कुठेही लोकं विभागलेले आढळतात. नेमका हाच कसा चांगला हे सांगण्याची चढा-ओढ. इकडे तुम्हाला खायला नाही...हाल आहेत. कुणी येतंय का मदतीला. ज्याचं समर्थन करतात ते ओळखतात तरी का आपल्याला?
गेल्या ५-६ वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलंय.  ज्याला कवडीची अक्कल नाही तो ही तज्ञ झालाय. Whats app University मधून आलेले लेख वाचून ज्ञान समृद्ध झाल्याचा भास कित्येकांना. खरं-काय, खोटं-काय कुणाला माहित नाही. कित्येकदा आलेली माहिती ही जाणीवपूर्वक पसरवली गेलेली असते. काही लोकांना काम-धंदा नाही. ते फक्त forwarding करत असतात. आपण काय forward करतोय याचा कुणी विचार करत नाही.
विचारधारेच्या या गफलतीमुळे कित्येक लोकं एकमेकांपासून दूर जात आहेत. कटुता निर्माण होत आहे नाते-संबंधात. व्यक्ती मोठा की विचारधारा याचा ही विचार व्हायला पाहिजे. आपल्या जवळ असलेला व्यक्तीच वेळ प्रसंगी मदत करू शकतो. दुसरं कुणी येत नाही मदतीला.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये दरी निर्माण करणारी कुठलीही विचारधारा कधी ही वैश्विक होऊ शकत नाही. लोकांना विभागणारी विचारधारा हवी की जोडणारी. ते आपण ठरवायचं. बाकी काही नाही. आपण सारे सुज्ञ.

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव