Monday, September 30, 2019

मी अनुभवलेलं परिवर्तन (परिवर्तन अभिवाचन महोत्सव, जळगाव)


मी शनिवार ला जळगावला गेलो. मनोज नेहमी घ्यायला येतो. पण परिवर्तन चा कार्यक्रम असल्याने त्याला जमलं नाही. त्यानं सांगितल्याप्रमाणे मी रोटरी हॉल गाठला. अनेक लोक येतात या अभिवाचानाला. स्व-इच्छेने. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. हळू-हळू हॉल भरत गेला. काही लोकांनी मनोगतं व्यक्त केली सुरुवातीला. अभिवाचन चा शेवटचा दिवस होता. साडे-सहा ला असलेला कार्यक्रम पाउणे-आठ च्या आसपास सुरु झाला. परिवर्तन चा कार्यक्रम तसा वेळेवर सुरु होत नाही. असं ऐकलं कुणाच्या तरी तोंडून. पण परिवर्तन ही प्रक्रिया आहे निरंतर चालणारी. ती ठरवलं म्हणजे होत नाही. परिवर्तन व्हायला वेळ लागतोच. त्यामुळे परिवर्तन हे साजेसं नाव. याबद्दल दुमत नसावं.
आतापर्यंत च्या आयुष्यात मी अभिवाचन कधी बघितलं नव्हतं. 
मला ती संधी मिळाली या निमित्ताने.
फेसबुक वर फक्त वाचनात आलेलं, मनोज ने सांगितलेलं प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
खरं तर मि आलोय आणि मला हा अभिवाचन च्या कार्यक्रमाला घेऊन निघाला. पण मी काही बोललो नाही.  वयानुसार थोडा बदल माझ्या बाबतीत ही. त्याचं ही काही वेळापत्रक असते. म्हणून मी काही न बोलता हॉल मध्ये जाऊन बसलो होतो. त्याला माझ्या बद्दल थोडी शंका होतीच. हा बसेल की नाही म्हणून. एक-दोनदा त्याने मेसेज ही केला. बाहेर येऊ शकतोस, गाडी घेऊन जाऊ शकतोस वगैरे. पण तसं काही घडलं नाही.
अमृता प्रितम.. साहीर आणि इमरोज हा विषय होता.
विषय जवळचा होता.  कारण अमृता प्रितम आणि तिचं आयुष्य याबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं, आहे. अमृतावर मी काही पुस्तके वाचली होती. किती वेळा गुगल सर्च केलं. मला नेहमी काहीतरी खटकत राहिलं. कधीच समाधान मिळालं नाही. काहीतरी राहून गेलंय असं वाटतं राहिलं. माझ्या मनात तिच्याबद्दल, साहीर बद्दल नेहमी कुतूहल होतं, उत्सुकता होती.
या अभिवाचनाच्या निमित्ताने अमृता प्रीतम... मला आज नव्याने कळली.. कारण मी तिला समजून घेताना साहिर आणि ती असा संबंध जोडता होतो. पण तसे नाही. तिचं बालपण, आजुबाजूच वातावरण, एक कवयित्री अश्या अनेक ओळखी मला झाल्या.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमरोज. जो मला कधीच समजला  नव्हता.
कार्यक्रम जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसा एक एक गोष्ट उलगडत गेली.
ईमरोज कोण ते  कळलं. चित्रकार. पेंटर की त्या पेक्षा अधिक.
इमरोज सुटून गेला होता . त्याचं मोठे पण लक्षात नव्हतं आलं. तब्बल ४५  वर्षे हा माणूस अमृता सोबत राहिला. दुर्दैवाने त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. या अभिवाचनातून परिवर्तन ने  इमरोज लोकांसमोर आणला, सादर केला हे महत्त्वाचे.
नेहमी इंग्रजी मधून वाचलेली अमृता आज मराठीतून कळाली.
अभिवचन एवढं सोपं नाही. त्यात अमृता. साहीर. इमरोज. जी नावं कित्येकांना माहित नाही. नावं माहित असलीच तर त्याचं योगदान माहित नाही. परिवर्तन ने ते आव्हान समर्थपणे पेललंय.
मनाला भिडणारे संवाद, आवाज, देहबोली, अधून-मधून येणारं संगीत मस्तच. उत्कृष्ट कलाकार आहेत. चांगल्या लोकांचा गोतावळा आहे. उत्कृष्ट सादरीकरण. 
माणूस सहवासानं घडतो. ज्यांना हा सहवास ती नशीबवान लोकं. अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात परिवर्तन च हे काम उल्लेखनीय.
मला कलाकारांची नाव माहीत नाही. त्याबद्दल क्षमस्व. ते शंभू अण्णा आणि हर्षल सर मात्र लक्षात राहिले.
गांधी नाकारायचा...हे शंभू अण्णा/पाटील यांची कलाकृती पाहण्याचा योग आला नाही. गांधी सादर करणं तसं कठीणच. पण त्यांनी गांधी अतिशय वेगळ्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने सादर केला असं ऐकलं. कार्यक्रम झाल्यावर परिवर्तन बद्दल थोडी माहिती जाणून घेतली.
२०१५ ला परिवर्तन ची सुरुवात झाली. वाचन संस्कृती वाढवणे, जोपासणे हा एक उद्देश. म्हणून पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन पुस्तकं देऊन सत्कार करतात. पुस्तकांची देवाण-घेवाण. छान च. वाचनाचं वेड कमी होत असताना, वाचन संस्कृती लयास जात असताना हे प्रयत्न वाखाणण्याजोगे. परिवर्तन ला एक चळवळ म्हटलं तर हरकत नाही.  या पेक्षा चांगली चळवळ होऊ शकत नाही.

अनेक महोत्सव / कार्यक्रम आयोजित केले जातात परिवर्तन तर्फे. वाचन प्रेरणा दिन, धुळे महोत्सव असे अनेक.
अनेक लोकं आहेत परिवर्तन मध्ये. कुठल्याही संस्थेच आर्थिक पाठबळ नसताना हे सुरुय. समाज प्रबोधन. परिवर्तन ही एक चळवळ आहे. जीवनाचा महोत्सव आहे. परिवर्तन फक्त जळगाव पुरती मर्यादित न राहता सर्वत्र ती पोचावी ही आशा आणि ती पोचेल ही खात्री. हल्ली ऐकण्याची क्षमता कमी झालीय. पण मी तिथे च बसुन राहिलो. हे या महोत्सवाच/अभिवाचनाच महत्त्व.
या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
Thank you परिवर्तन.

सचिन भगत   (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव

Friday, September 27, 2019

बेरीज-वजाबाकी


आयुष्यात आपलं नेहमी बेरजेचं गणित सुरु असते. एक एक गोष्ट आपण जमा करत जातो. शिक्षण, नोकरी, बायको, मुलं-बाळ, घर, दुचाकी, चारचाकी असं कित्येक. आधी गरज म्हणून नन्तर गुंतवणूक. हे सारं करत असताना वजाबाकी कशाची होते ते आपल्याला कळत नाही. सतत धावपळ काहीतरी मिळवण्यासाठी. या धावपळीत काहीतरी राहून जाते. नेमकं काय ते कळण्याआधी वेळ निघून गेलेली असते.कधी-कधी आपल्याला कळतच नाही.
स्लामबुक होतं कित्येक दिवस जपून ठेवलेलं. त्यात सहसा कुणी खराब लिहित नाही. सगळे चांगलंच लिहितात. कित्येक वर्षांनी मी ते वाचायला घेतलं. काय-काय लिहून ठेवलेलं. वाचताना मला ते खटकत गेलं.  आपण असे नाहीतच. म्हणून एक एक करत त्यातले सगळे भरलेले पाने  स्वाहा केली. मनाला ते पटलं नाही.  जुने-पुराने फोटो, आठवणी ही नष्ट केल्या. वयानुसार माणूस बदलत जातो. पूर्वी ज्या गोष्टी चांगल्या वाटायच्या त्या आता मूर्खपणाच्या वाटतात.  काळाच्या ओघात चांगल्या वाटणार्या गोष्टी आता नको वाटायला लागल्याय. स्वतःची ओळख झाली की तसं होणारंच. समाजात वावरताना किती मुखवटे धारण करतो आपण. प्रत्येक ठिकाणी वेगळा चेहरा. पण स्वतःशी खोटं बोलता येत नाही. माझ्या ही बाबतीत तेच झालं. एक-एक  करत सगळ्या गोष्टी नाहीश्या केल्यात. आठवणी जपून ठेवाव्या असं म्हणतात. मी तसं केलं नाही. त्या आठवणी कधी ओझं होऊन जातात हे कळत नाही. मुक्तपणे जगण्याचा आनंद वेगळा. भूतकाळाची  आठवण  नाही आणि भविष्याचा विचार नाही. वर्तमानात जगायचं. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. कशाला कशाचं ओझं आणि चिंता हवी?
काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे मागे लागतात....म्हटले तर शेपूट. आपल्या सर्वांच्या जवळचा शब्द. शेपटाचा प्रवास फार रंजक. आपण विविध ठिकाणी त्याचा वापर करतो. काही करा कुत्र्याचं शेपूट वाकडंच. काल एक मित्र भेटला. आजकाल भेटणं होत नाही. बायको..पोरं-सोरं आहेत. शेपूट लागलंय मागे. आधी बायको...मग मुलं...आपल्यासाठी शेपूट. आपण म्हातारे झालो की आपण ही शेपूट होऊन बसतो मुलांसाठी. म्हणजे काय हे शेपूट ते शेपूट करता करता आपण शेपूट होऊन जातो. त्या शेपटाचा प्रवास आपल्यापासून सुरु होऊन आपल्याजवळ येऊन थांबतो.
नोकरी असो व्यवसाय असो की अजून काही. मागे लागलेलं शेपूट काही सुटत नाही. आयुष्यात केलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. जेवढा सोडवायचा प्रयत्न करावा तेवढं ते अजून मागे लागते. मानवाची उत्क्रांती ही तशीच. आदिमानवाला शेपटी होती. उत्क्रांती होत काळाच्या ओघात शेपटी नाहीसी झाली.
माझा एक मित्र. त्याला फोन केला की तो कधी कधी उचलत नाही. नंतर फोन करून सांगतो की मी जेवण करत होतो. पण मग फोन उचलून सांगायचं, जेवतोय नंतर बोलू. त्याला किती वेळा सांगितलं चांगलं बोलून, शिव्या घालून पण ते शेपूट वाकडंच.
किती सार्या गोष्टी आहेत ज्या समजायला लागल्यापासून पाठ सोडत नाही. कितीही प्रयत्न करा. त्याचा पाठलाग सुटत नाही.

वाढदिवसाला वगैरे परिचित-अपरिचित, फेसबुक फ्रेंड, एकमेकांना कधीही भेटलेले, मोबाईल मध्ये नंबर असूनही कधीही डायल केलेले, तोंड ओळख असणारे, मित्राचे मित्र असणारे  असे अनेक डिजिटली शुभेच्छा देतात. फोन करायला, भेटायला वेळ नाही. फेसबुक वर हजारो फ्रेंड्स आहेत, मोबाईल ची लिस्ट पाचशे-सातशे च्या घरात आहे.  खर्या अर्थाने संपर्कात कुणीच नाही. आदान-प्रदान  सारं काही डिजिटल. फोरवर्ड.
डिजिटल...प्रगत झाल्याचं लक्षण असं आपण सगळे मानतो. एखादी दुखद घटना घडली की आपण ती सर्वांसोबत शेअर करतो. सांत्वन ही डिजिटल. मग माणूस म्हणून निसर्गाने ज्या भावना दिल्यात, मन दिलं त्याचं काय? आपण काय रोबोट आहोत? नाही. पण आपण रोबोट झालोय. भावनाशुन्य आयुष्य सुरु झालंय. कशाचच  देणं-घेणं नाही.
आपला प्रवास सुरु आहे. काय मिळवलं. काय गमावलं. माहित नाही. सारं काही क्षणिक. आयुष्यातील होणारी बेरीज-वजाबाकी मात्र सुरु आहे सातत्याने आपल्याला न कळत.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव