Wednesday, January 16, 2019

नेमकं-१


मागच्या आठवड्यात एका मित्राचा कॉल आला. इंग्रजी सुधारण्यासाठी दोन-तीन पुस्तक सुचव. त्याला कुणाला तरी सांगायचं असेल कदाचित. मी काही उत्तर दिलं नाही. पुन्हा त्याचा मेसेज आला. औपचारिकता म्हणून मी एक पुस्तक आणि यु-ट्यूब वर उपलब्ध असलेले व्हिडीओ पाहायला सांग असं सांगितल. नेमकं उत्तर माझ्याकडे नव्हत. भाषा शिकवणारी पुस्तके अजून निर्माण झालीच नाहीत आणि कदाचित होणार ही नाहीत.
एखादी भाषा लिहिता येणे आणि बोलणे यात भरपूर अंतर आहे. शिकत असताना मला कधी इंग्रजी बोलता आलं नाही किंवा तसा प्रयत्न ही कधी झाला नाही. मग मी बोलायला कसं शिकलो त्यालाही कारण आहे (अनुभव ४ पोस्ट केलाय मागे कधीतरी).
मुळात भाषा कशी शिकली जाते हे माहित असूनही आपण इतरत्र भटकत असतो. जगातली कुठलीही भाषा असो तिची शिकण्याची पद्धत एकच आहे. (Listening-Speaking-Reading-Writing)
“Look at the way how a child learns a language, there is only listening in the beginning. After many months, a child comes up with an alphabet or a word. It takes around three years for a child to enter into the language system.”
आजकाल पहिल्या वर्गापासून इंग्रजी आहे. पण प्रश्न सुटला नाही. कारण भाषा शिकण्याच्या पद्धतीत दोष आहे.  इंग्रजी ही भाषांतर करून मराठीत अथवा हिंदीत शिकवली जाते. इंग्लिश मेडीअम स्कूल असली तरी संभाषण मातृभाषेतून चालते काही बोटावर मोजण्या-इतके अपवाद वगळता.
एकदा इंग्रजी शिक्षकाने आम्हाला काही मराठी वाक्ये दिली इंग्रजी मध्ये करून आणण्यासाठी होमवर्क म्हणून. त्यातलं एक वाक्य होतं: माझ्याजवळ पैसे नाहीत. मी त्याचं भाषांतर असं केलं: Money is not near me. दुसर्या दिवशी वह्या तपासण्यासाठी दिल्या. याच वाक्यावर त्यांनी बरोबर ची खुन केलेली. माझी चूक कळायला मला नंतर कित्येक वर्ष लागली. भाषांतराचा हा प्रोब्लेम आहे. एबीसीडी पासून सुरु झालेला प्रवास व्याकरणावर थांबला. टेन्स आले आणि आम्ही च टेन्स मध्ये आलो. बोलण्याबाबत काहीच आलं नाही. थेरी फक्त. भाषेबद्दल शिकवल्या जाते परंतु भाषा शिकवली जात नाही. आणि तेच तर मूळ आहे सगळ्या समस्यांचं.  
एकदा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. जवळपास शंभर विद्यार्थी वर्गात. माझ्या बोलण्यात brought  शब्द आला. मी त्याचा उच्च्चार “ब्रॉट” (r-silent /brɔːt/) असा केला. तर सगळी मुलं ओरडली-“सर, इट इज ब्राउट”.  आय सेड, “नो.” मी क्षणभर गोंधळलो. शेवटी मोबाईल काढला आणि यु-ट्यूब वर त्यांना उच्चार दाखवला तेव्हा कुठे त्याचं समाधान झालं. “हु टोल्ड यु.” ते म्हटले, “सर, मिस टोल्ड अस.” अशी जर परिस्थिती इंग्लिश मेडीअम ची असेल तर बोलायलाच नको.
कुठलीही भाषा आत्मसात करणे म्हणजे दुसर्‍याने बोललेली अथवा लिहिलेली भाषा कळणे होय. त्या भाषेत आपल्या मनातील विचार/भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे शिकता येते. कुठलीही भाषा शिकायची असल्यास ती जास्तीत जास्त ऐकणे  ही पहिली पा‍यरी आहे. दुर्दैवाने आपला प्रवास सुरु होतो तो अल्फाबेट पासून. थोडक्यात आपला प्रवास उलटा. ऐकणे-बोलणे-वाचणे-लिहिणे हा प्रवास होत नाही. तोच एकमेव मार्ग भाषा शिकण्याचा.
इंग्रजी भाषा आपली मातृभाषा / बोलीभाषा नाही. त्यामुळे ती आत्मसात करण्‍यासाठी मातृभाषा शिकण्‍याचे वातावरण मिळू शकत नाही. ते निर्माण करावं लागेल.  कोणतीही भाषा शिकणे हे व्यावहारिक आहे.   केवळ एखादे पुस्तक वाचूनही इंग्रजी बोलायला शिकता येणार नाही. आपल्या बोलण्याच्या पातळीतील प्रगती केवळ बोलण्यानेच करता येईल.


आजकाल असंख्य साधने उपलब्ध आहेत. भाषा शिकणे पूर्वीसारखे कठीण नाही. दैनंदिन वापरात कित्येक इंग्रजी शब्दांचा शिरकाव झालाय. व्हिडीओ ऐका/बघा-अनुकरण करा. एवढं पुरेसं आहे. एकदा सुरु केलं कि पुढल्या गोष्टी होत जातात. पण मनाची तयारी  हवी. आत्मविश्वास हवा.
व्याकरण, शब्द पाठांतर करणे  वगैरे काही कामाचं नाही. किमान बोलण्यासाठी तरी ते गरजेचं नाही. मातृभाषा शिकताना कुठलं व्याकरण अभ्यासलं.
“We speak before the identification of alphabets. Forget about grammar and vocabulary.”
हिंदी तर आपण फक्त टीव्ही वर चित्रपट, सिरिअल्स पाहून शिकलो.
Some people say, “Think in English.” But how to think in English? Nobody has an answer.
It is like saying “Think out of the box.” But how? Nobody tells.
खाजगी क्षेत्रात काम करताना “बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल” अशी परिस्थिती आहे. डिग्री ची किंमत शून्य आहे. रोज नवीन आव्हानं आहेत. न शिकलेलं शिकून घ्यावं लागतं. काळ वेगाने बदलतोय. आपण ही बदललं पाहिजे. नाहीतर प्रवास कठीण आहे.  कला शाखेचा हाच प्रोब्लेम झालंय. पारंपारिक सुरु आहे सारं. कौशल्य वाढीसाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. काही ठिकाणी सुरु आहेत परंतु ते पुरेसं नाही.
थोडक्यात काय तर कुठलीही भाषा शिकायची असेल तर स्वतःची मानसिक तयारी हवी. मेहनत हवी. कुणीच भाषा शिकवू शकत नाही. झटपट बोला असं म्हणणारे फक्त झटपट श्रीमंत झालेत. आधी चांगलं मातृभाषेत बोलता यायला हवं. बहुभाषिक असणे ही काळाची गरज. भाषेचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. भाषा हे फक्त विचार व्यक्त करण्याचं माध्यम. एखाद्याला एखादी भाषा छान येते म्हणून खूप काही माहिती असेल असा समजही चुकीचा. तर चेंडू आपल्या कोर्टात. तिथेच सारी उत्तरे दडलेली.
हे सारं माहित असल्याने मी त्या मित्राला फार काही सुचवलं नाही. हे लिखाण म्हणजे त्याच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर.
सचिन भगत
     श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव
संपर्क: ९९२२१२७३८५