Sunday, February 25, 2018

माझ्या मुलाच्या दुसर्या वाढदिवसानिमित्त



बालपण’ हा नुसता शब्द उच्चारला, तरी मन ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाऊन उडय़ा मारायला लागतं. पण हाती काहीच लागत नाही. साधा फोटो ही नाही. काही कळण्याआधीच आमची दुनियादारी सुरु झाली. कोमेजलं गेलं सारं. अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सुरु झाला होता. आमच्या नशिबी आलं ते फक्त संघर्ष, फरफट  आणि दोन वेळेसच्या च्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत. या शिवाय काही आठवतच नाही. तंत्रज्ञान नसल्याने आठवणी साठवल्या हि गेल्या नाहीत. त्यामुळे आमचं बालपण म्हणजे कोरा कागद. त्यावर फक्त संघर्ष्याच्या रेघोट्या आहेत.  पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. आणि जे हातातून सुटलंय ते मिळवावं.
वर्षा मागे वर्ष गेलेत, सरत गेलं सारं.. शाळा, शाळेतून हायस्कूल, हायस्कूलमधून कॉलेज अन् कॉलेज संपल्यावर नोकरी.. या सा-या टप्प्यांमध्ये ‘ते’ बालपणही आपण मागे सोडून जात आहोत, याची जाणीव तेव्हा नव्या उमेदीच्या काळात कदाचित झाली नसावी. आता ते सारे क्षण आठवले की, बालपण पुन्हा हवंहवंसं वाटतं.
बालपणाच्या आठवणींनी मनात निर्माण होणा-या मोहांना आवर घालताना नेहमीच प्रश्न पडतो की, खरंच हरवलं का ते सारं काही?  ‘हरवलेलं काही नाही, फक्त आपलं बालपण तुम्ही आपल्या मुला-मुलीत पाहा. सर्व तुम्हाला जवळच सापडेल. फक्त काळाचा फरक आहे.’ तरीही राहून-राहून वाटतं.. काळाचा हा फरक आयुष्यातून वजा केला तर?
आज माझ्या मुलाचा दुसरा वाढदिवस...पाहता पाहता दोन वर्षे भुर्कन उडून गेलीत. गेल्या दोन वर्षात त्यानं माझा दिनक्रम बदलून टाकलाय. त्याला हव्या त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न सुरुय. बालपण एकदाच मिळते. भविष्यात त्याला कुठलीही खंत नसली पाहिजे. आमचं आयुष्य म्हणजे तो.  त्याच्या लहानपणीच्या आठवणी ही कैद करणं सुरुय.
ऑटो ला आपच्या, मोबाईल ला बिया, कार ला पम्पम, पक्षी दिसले कि चू-चू असं बरंच काही म्हणत असतो. दिवसभर फक्त दे-दे सुरु असते. नेमकं काय ते आम्हाला हि कळत नाही. घरातून बाहेर जायचे म्हणजे त्याला न माहित. त्याच्यासमोर निघालो कि तो आपल्या अगोदर दरवाज्याजवळ असतो. संध्याकाळी घरी गेलो कि तो बोट पकडून दरवाज्याजवळ घेऊन जातो.
टेबल ओढणे, फ्रीज उघडणे, drawar उघडणे सुरु असते. जेवढ नको म्हणाल, तो ते पुन्हा पुन्हा करतो. दिवसभर बाबा...आई सुरु असते. हेड, नोझ, स्टमक, इयर, टीथ, सगळं दाखवतो.
आपण त्याला कधी मारलं तर तो आपल्याला येऊन घट्ट पकडतो.
ग्रंथालयाजवळ नेहमी कबुतर असतात. त्याला मी रोज कबुतर दाखवतो. तिथे गेलो कि तो टाळ्या वाजवतो. बाईक फेरफटका झाल्याशिवाय त्याला करमत नाही. त्याला बिल्डींग च्या खाली आणलं कि तो बाईक जवळ घेऊन जातो.
संध्याकाळी ग्राउंड वर गेलं कि त्याला बॉल कुठे असतात ते माहित असते तिथे जाऊन तो दोन-तीन बॉल घेऊन येतो. आपल्या हातात जो आहे तोच त्याला हवं असते. आपलं लक्ष नसलं तर कधी माती तोंडात टाकेल याची खात्री नाही. त्याच्या मागे मागे फिरायचं नेहमी.
सकाळी तो माझ्या आधी उठतो. काही खायचं झालं कि त्याचा मोर्चा माझ्याकडे. माझ्याजवळ येऊन माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न सुरु असतो.
आंघोळीला जायचं म्हटलं कि माझ्या आधी तो बाथरूम मध्ये असतो. गरम पाणी असते तर बाबा “हा” आहे असं मला सांगत असतो.
तयार झाला कि माझं बोट पकडून दरवाज्याकडे नेतो. बाहेर जायचं असते त्याला. त्याला घरी परत आणणे हि मोठी कसरतच.
मोबाईल हातात आला म्हणजे फेका-फेकी करत असतो. लहान मुलांसाठी असलेले गाणे सुरु असले कि त्याला कुठे काय असते ते माहित झालंय. ए बि सी सॉंग सुरु असलं कि तो पण तसच म्हणत असतो. बाळ दिसलं कि बा ओरडतो.
पूर्णपणे बोलता येत नाही अजून पण सगळं समजायला लागलाय. बर्याचदा वाटतं कधी मोठा होतो हा. चीड-चीड ही होते. कधी शांततेने जेवण नाही की काहीच नाही.  बाबा / आई  या या सुरु असते नेहमी. गलरीत गेला कि हातात येईल ते फेकून देतो खाली.  रात्री-बेरात्री उठून तास-दोन तास खेळून आपल्या झोपेचे बारा वाजवतो कित्येकदा.
रांगत तो चाललाच नाही. डायरेक्ट उभा राहायला लागला.  पडझड सुरूच असते. नवीन-नवीन प्रयोग सुरु असतात त्याचे. तो झोपतो तेव्हाच फक्त शांतता असते.

आज तो दोन वर्षाचा झालाय. त्याचं आयुष्य आम्हीही जगलोय. तो घरी नसला कि घर रिकामं वाटत. त्याच्या येण्यानं आमचं आयुष्य बहरलंय. आमचे कधी वादविवाद झाले तर चेहरा पाहण्यासारखा असतो. त्याच्याकडे पाहिलं कि कित्येकदा विषय संपून जातात. त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट वेळेवर देण्याचा प्रयत्न असतो.
रम्य ते बालपण किंवा लहानपण देगा देवा असं म्हटले जाते.  आमचं बालपण निसटून गेलंय पण यान ती उणीव भरून काढलीय. त्याने ते जगलय तर आम्ही अनुभवलंय.
आमच्या वेळी मनोरंजनाची कुठलीच साधने नव्हती. आमचं बालपण गेलं असाव ते बाहेर फिरण्यात .टी.व्ही. नव्हता, तर चॅनेल्स कुठले?  आता परिस्थिती बदलली आहे. आज काल ची पिढी तंत्रज्ञानामध्ये गुंतलीय. तेच नकोय.  बाहेर च्या वतावरणात जी शिकवण मिळते ती चार भिंतीआड नाहीच मिळत. आतातर परिस्थिती अशी आहे कि शेजारी कोण राहतंय हे पण माहित नसतं.
त्याच्यामुळे मी बदलतोय. कधी नव्हे ते कुणाचा तरी वाढदिवस साजरा करायला लागलोय. अंगवळणी पडलं नाही अजून. वाढदिवस वगैरे ह्या संकल्पना आमच्या आयुष्यात कधी आल्याच नाही. सोशल नेट्वर्किंग ला सांगावं लागतं कि आज तुमचा वाढदिवस आहे. शुभेच्छा हि येतात तिकडून व्हर्च्युअली.
माय-बापांचे किती कष्ट असतात मुलं वाढवताना. दुर्दैवाने आजच्या पिढीला हे कळतंच नाही.  वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आयुष्यभर फक्त धावत असतात आणि मुलाचं चांगलं संगोपन करण्याची धडपड करत असतात. शेवटी काय तर भरकटलेल आयुष्य.     
कुठलंही दडपण नाही, अपेक्षा नाहीत, त्याला जे वाटेल ते करू द्यावं. पडला तरी चालेल कारण सांगून मुलं शिकत नाहीत. घेऊ द्या चांगले –वाईट अनुभव, जोपर्यंत वेदना काय असते हे कळत  नाही तोपर्यंत सांगून फायदा नाही. उपदेशाचे डोस पाजायचे नाहीतच असं ठरवलंय.
तो अजून लहान आहे तरी मी त्याला हे करू नको पडशील असं सांगत नाही कित्येकदा. तो पडला किंवा त्याला लागलं कि पुन्हा ते तो करतच नाही. स्वानुभवांतून मिळालेली शिकवण आयुष्यभर पुरते तर उपदेश विसरून जाण्याची शक्यता अधिक असते.  आयुष्य एकदाच मिळते. त्याचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा, आणि काहीतरी विधायक करावं एवढं काय ते. बाकी काही नाही.
तो आमच्या आयुष्यात येऊन आज दोन वर्षे पूर्ण झालीत. त्याच्या सान्निध्यात आनंदी-आनंद आहे. त्याच्यातच गुंतलो आहे किंवा त्यानेच गुंतवलय आम्हाला. मंद वार्याची झुळूक यावी अचानक तसं काहीतरी झालंय. रंग भरलेय त्यानं आमच्या आयुष्यात. त्याने दिलेल्या त्रासात ही आनंद आहे. त्रास देणे त्याचा अधिकार तर आम्ही ते आनंदाने स्वीकारावं हे आमचं कर्तव्य.
लिखाण माझं असलं तरी अनुभव प्रत्येकाचेच आहेत. त्यात नवीन काहीच नाही. मी फक्त शब्दात व्यक्त केलंय.
(सुरुवातीला काय लिहावं असा प्रश्न होता. पहिल्या वाढदिवसानिमित्त गेल्या एक लिखाण झालं होतं. मग आता काय लिहावं. पण लिहायला घेतलं आणि शब्द सापडत गेले, वाक्य तयार होत गेले आणि आणि शेवटी हे आर्टिकल.)
सचिन भगत